पायरिला: ही उसावरील एक महत्त्वाची कीड असून ऊस पिकविणाऱ्या बहुतेक सर्व देशांत आढळते. भारतात ही पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक इ. राज्यांत आढळते. पायरिल्याचा समावेश हेमिप्टेरा गणाच्या फुल्गोरिडी कुलात करतात. पायरिला पर्प्युसिला  हे त्याचे शास्त्रीय नाव आहे.

पूर्ण वाढ झालेला पायरिला सु. १० मिमी. लांब आणि गवती रंगाचा असून त्याचे डोके चोचीप्रमाणे निमुळते असते. त्याला पंखांच्या दोन जोड्या असून हे पंख कीटक विश्रांती घेत असताना पाठीवर छपराप्रमाणे धरले जातात. अर्भके (बाल्यावस्थेतील पायरिला) फिकट तपकिरी रंगाची असून त्यांच्या शरीराच्या मागील बाजूस दोन मेणवेष्टित पांढऱ्या शेपट्या असतात. ते चपळ असून उसाच्या पानांवर उड्या मारत असतात.

अर्भक तसेच प्रौढ पायरिला उसाच्या पानांमध्ये सोंड खुपसून त्यांतील रस शोषून घेतात. परिणामी अशी पाने निस्तेज होऊन वाळू लागतात.

पायरिला : (अ) अर्भक (आ) प्रौढ

शिवाय हे कीटक आपल्या शरीरातून मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी चढते आणि त्यामुळे पानांच्या अन्न तयार करण्याच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. कीड जास्त प्रमाणावर पडल्यास उसाच्या दर हेक्टरी उत्पन्नात तर घट येतेच परंतु त्याचा साखरेचा उतारा आणि दर्जा यांवरही अनिष्ट परिणाम होतो.

ही कीड जरी वर्षभर उसावर आढळत असली, तरी एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान ती विशेष कार्यक्षम असते. जर उन्हाळ्यामध्ये हवेत जास्त आर्द्रता असून कमी तापमान असले आणि पावसाळ्यात सुरूवातीस कमी पाऊस होऊन बराच काळ बिनपावसाचा गेला, तर किडीला अनुकूल परिस्थिती तयार होऊन बराच काळ ती उग्र स्वरूप धारण करते. उसाशिवाय ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या लगतच्या शेतातील पिकांवरही ती आढळून येते.

मादी वसंत ऋतूच्या सुमारास पानाच्या मागील बाजूवर पुंजक्याने शेकडो अंडी घालते, तर हिवाळ्यामध्ये उसाच्या खोडावरील वाळलेल्या पानांच्या वेष्टनाच्या आतील बाजूस अंडी घालते. ही अंडी एक प्रकारच्या पांढर्‍या तंतुमय पदार्थाने झाकलेली असतात. उन्हाळ्यात एक ते दोन आठवड्यांत अंडी उबतात पण हिवाळ्यात यासाठी ७ ते ९ आठवडे लागतात. अर्भकावस्था उन्हाळ्यात १ ते २ महिन्यांची असते, तर हिवाळ्यात ही अवस्था ५ ते ८ महिन्यांपर्यंत टिकून राहते. या अवधीत ते पाच वेळा कात टाकतात. प्रौढदेखील खूप काळ म्हणजेच ६ महिने किंवा त्याहूनही जास्त काळपर्यंत राहतात. अशा त-हेने जीवनक्रम उन्हाळ्यात एक-दोन महिन्यांचा असतो, तर हिवाळ्यात तो ४ ते ५ महिन्यांचा असतो. हवामानानुसार किडीच्या ३ ते ५ पिढ्या होतात.

ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांची पुंजक्याने घातलेली अंडी गोळा करून त्यांचा नाश करतात. जास्त प्रमाणावर कीड आल्यास १० % बीएचसी भुकटी मारतात. तसेच प्रवाही एंड्रीन अथवा मॅलॅथिऑन फवारल्यास किडींचा बंदोबस्त होतो. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत जेव्हा आर्द्रता भरपूर असते अशा वेळी पायरिल्यावर मेटाऱ्हाइझियम अनिसोप्लिई  हे हिरवट कवक (बुरशीसारखी हरितद्रव्यरहित वनस्पती) येते. त्यामुळे किडीच्या प्रादुर्भावास काही प्रमाणात नैसर्गिक रीत्या आळा बसतो. टेट्रास्टिकस पायरिली  यासारख्या परोपजीवी (दुसऱ्यावर उपजीविका करणाऱ्या) कीटकांचाही या किडीच्या नियंत्रणासाठी उपयोग करतात

पहा :  ऊस.

तलगेरी, ग. मं.