कसर : हा कीटक लहान १·५ सेंमी. लांब, चपळ व पंखहीन असून त्याच्या शरीरावरील खवल्यांना रुपेरी चमक असते. त्यावरून त्याला सिल्व्हर फिश हे इंग्रजी नाव पडले आहे. त्याचे शास्त्रीय नावलेपिझ्मा सॅकॅरिना असून त्याचा समावेश थायसान्यूरा गणात होतो. त्याचा प्रसार जगभर सर्वत्र आहे. तो अंधारी जागा पसंत करतो व उजेड पडल्यास आपल्या जलद गतीने हालचाल करताना दिसतो. त्याची अंडी पांढरट व लांबट गोल असतात. ती एका आठवड्यात उबून त्यांतून पिल्ले बाहेर पडतात. अंड्यांतून पिल्ले बाहेर पडणे तापमानावर अवलंबून असते. ३३–३९० से. तापमाप व ७०–८० टक्क्यांपर्यंत हवेतील आर्द्रता त्याला पोषक ठरते. त्यांची वाढ हळू होते. पूर्ण वाढ होण्यापूर्वी ती तीन ते चार वेळा कात टाकतात.

कसर

हा कीटक पुस्तके, कागद व तत्सम पदार्थ, सुती, रेशमी, लोकरी व रेयॉन  कपडे असलेल्या कपाटांत व पेट्यांत आढळतो व त्यांतील वस्तूंचे नुकसान  करतो. तो पुस्तकाच्या बांधणीसाठी वापरलेली खळ, डिंक अगर गोंद यांवर  आपली उपजीविका करीत असावा. पाच टक्के डीडीटी भुकटी, २·५ टक्के  क्लोरडेन किंवा एक टक्का पायरेथ्रम वापरून त्याचा बंदोबस्त करतात. पाव  चमचा पांढरे आर्सेनिक, ४५० ग्रॅम पीठ, पाव चमचा साखर व पाव चमचा मीठ ह्या  प्रमाणात तयार केलेल्या विषारी आमिषाच्या लहान गोळ्या करून कपाटे व पेट्या  यांमध्ये ठेवल्यास कसरीचा बंदोबस्त चांगला होतो.

गर्दे, वा. रा.