जोशी, वामन मल्हार : (२१ जानेवारी१८८२–२०जुलै १९४३). मराठी कादंबरीकार, साहित्यसमीक्षक आणि तत्त्वचिंतक. जन्म कुलाबा जिल्हातील तळे ह्या गावी. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र हे विषय घेऊन एम्‌.ए. झाले (१९०६). त्यानंतर वि. गो. विजापूरकर ह्यांनी कोल्हापूर येथे राष्ट्रीय शिक्षण योजनेखाली चालविलेल्या समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. विजापूरकरांच्या बरोबर विश्ववृत  ह्या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही स्वीकारली. ह्याच मासिकात १९०८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘वैदिक धर्माची तेजस्विता’ ह्या लेखाबद्दल राजद्रोहाचा आरोप येऊन त्यांना आणि विजापूरकरांना दंडाची व तीन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर (१९११) पाच वर्षे केसरी-मराठा संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर काही काळ अच्युत बळवंत कोल्हटकर ह्यांच्या मेसेज  ह्या इंग्रजी दैनिकाचे ते उपसंपादक होते. पुढे महर्षी कर्वे ह्यांच्या हिंगणे येथील पाठशाळेत प्राध्यापक म्हणून ते दाखल झाले (१९१८) व सेवानिवृत्तीपर्यंत त्याच संस्थेत वेगवेगळ्या पदांवर काम करीत राहिले.

वामन मल्हार जोशी

रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद (दुसरी आवृ. १९१५) ह्या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यांनंतर आश्रमहरिणी (१९१६), नलिनी (१९२०), सुशिलेचा देव (१९३०), इंदु काळे व सरला भोळे (१९३४) ह्या चार कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. वाचकाचे मनोरंजन करण्यापेक्षा त्याला विचार करावयास लावण्यासाठी त्यांचे कादंबरीलेखन मुख्यतः झालेले आहे. त्यातून त्यांची तत्त्वचिंतक वृत्ती प्रकर्षाने व्यक्त होते. कर्तव्य आणि ध्येयनिष्ठा कलाप्रेम आणि नीतिबंधने बुद्धी आणि श्रद्धा व्यक्तिस्वातंत्र आणि सामजिक-नैतिक बंधने ह्यांसारखे जीवनविषयक मौलिक प्रश्न त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून उपस्थित केले. त्यांच्याच दृष्टीने ‘नकटी’ ठरणारी  नलिनीसारखी कादंबरीही ह्यास अपवाद नाही. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्यांनी मराठीतील तात्त्विक कादंबरीच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला आहे.

कादंबऱ्याप्रमाणेच त्यांच्या अन्य लेखनालाही एक लक्षणीय वैचारीक बैठक आहे. राष्ट्रवाद, गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद इ. प्रभावी विचारप्रणालींच्या ऐन उत्कर्षाच्या काळात त्यांचे लेखन झाले. तथापि ह्या सर्वच वादांच्या बाबतींत त्यांची भूमिका सदैव डोळस मध्यममार्गीयाचीच राहिली. ‘कारणानाम् अनेकता’ हे तत्त्व त्यांच्या मनावर इतके बिंबलेले होते, की कोणतीही आत्यंतिक वैचारिक भूमिका त्यांना कधीच मानवली नाही. साहीत्यसमीक्षेच्या क्षेत्रातही कलावादी आणि जीवनवादी ह्यांच्या झगड्यात त्यांची भूमिका समंजस मध्यस्थाचीच राहिली. विचार-विलास (१९२७), विचारसौंदर्य (१९४०), विचारलहरी (१९४३) व विचार-विहार (१९४४) हे त्यांच्या राजकारण, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य इ. विविध विषयांवरील चर्चात्मक लेखांचे संग्रह. त्यांचे साहित्यसमीक्षात्मक लेखन थोडेच असले, तरी त्यातून साहित्यविषयक मूलभूत प्रश्न उपस्थित करून त्यांची सोडवणूक कोणत्या दृष्टीने करावी, ह्याचे अचूक मार्गदर्शन त्यांनी केले आहे. म्हणूनच वामन मल्हार जोशी ह्या नावाला साहित्याच्या क्षेत्रात तात्यासाहेब केळकर व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्या नावांइतकेच महत्व प्राप्त झाले.

उपर्युक्त लेखनाखेरीज नवपुष्पकरंडक (१९१६, विविधस्वरूपी लेखनाचा संग्रह), विस्तवाशीं खेळ (१९३७–नाटक) व स्मृतीलहरी (१९४२) ही त्यांची तीन पुस्तके उल्लेखनीय आहेत. स्मृतीलहरीमधील आठवणींचे लेखनही तत्त्वशोधक वृत्तीने केलेल्या जीवनानुभवाच्या चिंतनातून जन्माला आलेले आहे. त्यांच्या ठिकाणी तत्त्वशोधक वृत्तीबरोबरच प्रसन्न विनोदबुद्धी होती. तिचा प्रत्यय त्यांच्या सर्वच लेखनातून–नीतिशास्त्रप्रवेश (१९१९) ह्या प्रबंधात्मक ग्रंथातूनही येतो.

मडगाव येथे १९३० साली झालेल्या पंधराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुंबई येथे ते निधन पावले. 

संदर्भ : कुळकर्णी, वा. ल. वामन मल्हार वाङ्‌मय-दर्शन, तिसरी आवृ., मुंबई, १९७४.                          

कुळकर्णी, वा. ल.