पु.

भावे, पुरुषोत्तम भास्कर : (१२ एप्रिल १९१०-१३ ऑगस्ट १९८०). मराठीतीस एक अष्टपैलू व प्रतिभासंपन्न लेखक. कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, व्यक्तिचित्र, चिंतनात्मक लेख, चित्रपटकथा, प्रवासवर्णन इ. विविध साहित्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. धुळे येथे त्यांचा जन्म झाला. प्रथमपुरूषी एकवचनी (१९८०) हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध असून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण कशी झाली, हे समजून घेण्याच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त आहे. लेखन हा भाव्यांचा जीवनव्यापी व्यवसाय होता. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी ‘ओम् फस्’ ही कथा लिहिली व आपल्या लेखनतपस्येचा श्रीगणेशा केला. त्यांची लेखनतपस्या आमरण टिकून होती. भाव्यांचे संस्कारक्षम बालपण विदर्भात गेले व नागपूरला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास झाला. संपन्न घराण्यात जन्मास येऊनही जीवनातील खडतर अनुभव त्यांना घ्यावे लागले. वाचनाचे भाव्यांना विलक्षण वेड होते. या वाचनामुळेच त्यंच्यातील वाङ्‍मयाभिरूचीचे पोषण झाले.

 

किर्लोस्कर खबरमध्ये (जुलै १९३१) त्यांची ‘फुकट’ ही कथा प्रकशित झाली. तथापि त्यांचे लेखणीचे व प्रतिभेचे सामर्थ्य प्रगट झाले ते त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनामुळे. हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या नागपूरच्या सावधान या साप्तहिकातून त्यांचे लेख प्रसिद्ध होताच (१९३६) त्यांतून प्रगट होणाऱ्या भाषासौंदर्याने व तेजस्वीपणाने वाचक मुग्ध होऊन गेले. अच्युत बळवंत कोल्हटकर व शिवराम महादेव परांजपे ह्या दोन प्रसिद्ध शैलीकार साहित्यिकांच्या लेखनगुणांचे मनोज्ञ रसायन भावांच्या शैलीतून प्रगट झाले. आदेश (१९४१-४८) या त्यांच्या स्वतःच्या साप्ताहिकातूनही त्यांचे अनेक चित्तवेधक लेख प्रसिद्ध झाले आहेत. मूलतःप्रचारी स्वरूपाचे स्वरूपाचे असूनही त्यांचे अनेक लेख वाङ्‍मयगुणांनी मंडित झालेले दिसतात. त्याचे कारण भाव्यांची विशिष्ट लेखनशैली हेच होय. रक्त आणि अश्रू (१९४२) हा त्यांचा लेखसंग्रह केवळ त्यांच्याच नव्हे, तर एकूण मराठी निबंधवाङ्‍मयाताही अद्वितीय असा आहे. परखड परंतु तर्कशुद्ध, चिंतनात्मक तरीही भावना उचंबळून सोडणारे असे त्यांचे वाङ्‍मय वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाघनखे (१९६१), विठ्ठला पांडुरंगा (१९७३), अमरवेल (१९७४), रांगोळी (१९७६), इ. त्यांचे चौदा लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. स्मरणी (१९७४) हा त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा संग्रहही उल्लेखनीय आहे.

 

भावे हे हिंदुत्वनिष्ठ होते. स्वा. सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. हिंदुमहासभा या राजकीय पक्षाचे ते काही काळ सक्रिय कार्यकर्तेही होते. हिंदुहितविरोधी आचारविचार हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. त्यामुळेच त्यांच्या निबंधवाङ्‍‌मयातून तथाकथित पुरोगामीपणावर वारंवार टीका आढळते. म. गांधी व काँग्रेस पक्ष यांच्या धोरणावरही भावे कडाडून हल्ला करतात. भावे हे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक व प्रवक्ते होते. अखंड भारत हे त्यांचे श्रद्धास्थान होते. त्यांच्या साऱ्या लेखनामधून त्यांच्या या जीवनदृष्टीचे दर्शन घडते. त्यांच्या वृत्तीतील निर्भय झुंजारपणा त्यांच्या साहित्यातूनही डोकावतो.

 

भावे सनातन भारतीय संस्कृतीचे व जीवनमूल्यांचे उपासक असले, तरी कर्मठ नव्हते प्रतिगामी नव्हते जीवनातील दिव्यत्व, पौरूष, सौंदर्य यांचे ते पूजक होते. स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतानाच ते स्वैराचारावर टीका करीत. जीवनव्यवहारातील दांभिकतेचा व ढोंगीपणाचा त्यांनी विलक्षण तिटकारा होता. स्त्री ही स्त्री आहे, पुरूष नव्हे व म्हणून पुरूषाचे अनाठायी अनुकरण करणे स्त्रीने सोडून द्यावे, असे ते सांगत. भारतीय संस्कृतीतील केवळ सत्वांशच ते ग्राह्य मानीत आणि हिंदुसमाजाच्या ऐक्याला विघातक अशा जातिभेदादी गोष्टींवर टीका करीत.

 

भाव्यांच्या लेखसंग्रहांतून त्यांची ही मते त्यांनी प्रामाणिकपणे मांडली आहेत. मात्र त्यांच्या ललित लेखनातून त्यांचा आविष्कार फारसा आढळत नाही. मराठी नवकथेचे एक प्रवर्तक म्हणून भाव्यांचे नाव घेतले जाते पण त्यांची कथा रूढ अर्थाने नवकथा नाही. नवी असूनही तिने जुन्या कथेशी नाते राखले आहे. ‘सतरावे वर्ष’, ‘सीमेवर’, ‘सावल्या’, ‘काळ, काम आणि वेग’, ‘ स्वप्‍न’, ‘ ध्यास’, ‘मुक्ती’, ‘रूप’, ‘प्रतारणा’, ‘पुतळा’, ‘दुःख’, ‘फुलवा’, ‘पहिले पाप’, ‘संगम’, ‘घायाळ’, ‘नौका’, यांसारख्या अप्रतिम कथा लिहून भाव्यांनी मराठी कथासृष्टीत आपले नाव अजरामर केले आहे. भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या त्यांच्या नौका (दु. आवृ. १९६३) ह्या कथासंग्रहातील कथा तर एकूण मराठी कथासृष्टीत आपल्या पृथगात्म स्वरूपाने उठून दिसतात. जीवनातील तारूण्याचे व कारूण्याचे, शाश्वतेचे व नश्वरतेचे ते सारख्याच समरसतेने चित्रण करतात. करूणरसाप्रमाणेच हास्यरसाचेही दर्शन ते तेवढ्याच प्रभावीपणे घडवितात ‘आइसक्रिम’ ही त्यांची विनोदी कथा दृष्टीने उल्लेखनीय आहे. त्यांचे एकूण सत्तावीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतूनही हेच जीवनदर्शन आढळते. अकुलिना (१९५०) आणि वर्षांव (१९५५) यांसारख्या कादंबऱ्यांतून ते स्त्रीव्यवथेचे विलक्षण हळुवारपणे चित्रण करतात. अडीच अक्षरे (१९६३) या कादंबरीतून प्रेमभावनेचे विविध पदर उलगडून दाखवणारे भावे आग (१९६१), रोहिणी (१९६२), पिंजरा (१९६४), मागं वळून (१९६६), सायंकाळ (१९६८), व्याध (१९६९), रखमाच्या मुली (१९७४) इ. कादंबऱ्यातून मानवी विकारविलसिताचे व नियतीच्या प्रभावाचे अप्रतिम चित्रण करतात. त्यांच्या एकूण एकोणिस कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत.

 

नाटककार म्हणूनही भाव्यांनी लौकिक प्राप्त केला होता. विषकन्या (१९४३), स्वामिनी (१९५६), महाराणी पद्मिनी (१९७१) ही त्यांची गाजलेली नाटके. सौभाग्य आणि माझा होशील का ? ह्या चित्रपटांच्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या. उत्तर-दिग्विजय (१९६४-६५) आणि चितोड यात्रा (१९६८-६९) ही त्यांची प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत.

अहमदनगर येथे १९६४ साली भरलेल्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करून नाट्यरसिकांनी भाव्यांच्या नाट्यसेवेचे कौतुक केले होते. भावे हे साहित्यक्षेत्रातील एक निरलस कर्मयोगी होते. त्यांची साहित्यसेवा लक्षात घेऊन पुणे येथे १९७७ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. ते उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचा वक्‍तृत्वगुण त्यांच्या लेखनशैलीमध्ये उतरलेला दिसतो. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.

 

संदर्भ : वऱ्हाडपांडे, व. कृ. पु. भा. भावे : साहित्यरूप आणि समीक्षा, नागपूर, १९८१.

 

वऱ्हाडपांडे, व. कृ.