विष्णुदासनामा : (अंदाजे सोळावे शतक). मराठी कवी. मराठीतील कथाकाव्याच्या प्रवर्तनाचे श्रेय ह्यास दिले जाते. मराठीतील पहिले काव्यबद्ध महाभारत ह्याने रचिले. ह्याची निश्चित स्वरूपाची अशी चरित्रविषयक माहिती फारशी उपलब्ध नाही. तथापि निरनिराळ्या संशोधकांनी मांडलेली काही मते अशी : काहींच्या मते हा कवी मध्यप्रांतात उदयाला आला आणि सोळाव्या शतकातील गोमंतकाच्या ह्याच्या काव्याला मोठी लोकप्रियता प्राप्त झाली होती. हा कवी पंढरपूरचा आहे असे मत म. रा. जोशी ह्यांनी व्यक्त केले. गो. का. चांदोरकर ह्यांच्या मते विष्णुदासनाभ्याचेच दुसरे नाव कृष्णदासनामा असे होते. त्याच्या गुरूचे नाव ‘रामभारती’ होते, असेही चांदोरकर सांगतात. पण ह्याबाबतही ऐकमत्य नाही. ‘चिंतामणी’, गोपीनाथ अशीही ह्याच्या गुरुंची नावे सांगितली जातात. नामदेवांचे शिष्य परिसा भागवत हे विष्णूदासनाम्याचे गुरू असावेत, असा म. रा. जोशी ह्यांचा तर्क आहे ह्याचा काळ अंदाजे सोळावे शतक असा असावा, हे निरनिराळ्या संशोधकांच्या निष्कर्षावरून दिसून येते. त्याचे महाभारत शके १५३५ (१६१३) च्या आधी लिहिले गेले असावे असा चांदोरकरांचा निष्कर्ष आहे, तर त्याच्या शुकाख्यान ह्या काव्यातील एका उल्लेखाच्या आधारे वि. का. राजवाडे तो शके १५१७ (१५१५) मध्ये होऊन गेल्याचे सांगतात. विष्णुदासनाम्याच्या साहित्याच्या आणखी एक अभ्यासक डॉ. सरोजिनी शेंडे ह्यांच्या मते ह्याचा काळ साधारणपणे १५८० ते १६३३ पर्यंतचा असावा. विष्णुदासनाम्याने त्याच्या उत्तरवयात महानुभाव पंथाचा स्वीकार केला होता, असेही म्हटले जाते. तथापि ह्या मताला अभ्यासकांकडून फारसा पाठिंबा मिळालेला नाही.

अठरा पर्वांचे मराठी महाभारत  ही विष्णुदासनाम्याची प्रमुख रचना. त्याच्या एका प्रतीची ओवीसंख्या दोन हजार इतकी सांगितली जाते. डॉ. सरोजीनी शेंडे ह्यांच्या मतानुसार ह्या ग्रंथाची ओवीसंख्या सु. १३,५०० इतकी आहे. मूळ महाभारतातील अनेक कथा व उपकथा त्याने गाळल्या आहेत. त्यांच्या जागी लोकांत प्रचलित असलेल्या किंवा स्वरचित कथा तो घालतो. ह्या महाभारतात कालविपर्यासाचा दोषही आढळतो. विष्णुदासनामा हा महानुभव पंथाचा झाला होता. ह्यास सबळ पुरावा नाही. असे डॉ. सरोजिनी शेंडे यांचेही मत आहे. तथापि त्याच्या महाभारताची काही पर्वे महानुभवांच्या सांकेतिक लिपीत बद्ध केलेली आहेत. ह्या महाभारताची सर्व अठरा पर्वे मिळविण्याचा प्रयत्न संशोधकांनी केलेला असून त्यातील बरीच पर्वे सापडलेली आहेत.

ज्ञानेश्वरांचे समकालीन विख्यात संत ⇨नामदेव हे स्वतःस अनेकदा ‘विष्णूदास’ असे म्हणवून घेतात परंतु हे नामदेव आणि विष्णुदासनामा ह्या वेगवेगळ्या व्यक्ति होत. विष्णुदासनाम्याच्या महाभारताच्या हस्तलिखित प्रति तयार करीत असताना काही प्रतकारांनी त्यांना विशेष आवडलेल्या भागांच्या स्वतंत्र प्रति केल्या आहेत. असे दिसते. विष्णुदासनामाकृत हरिश्चंद्राख्यान कपोताख्यान, ऐरावताख्यान, कलियुगमहिमा, चक्रव्यूहकथा, म्हाळसेनकथा ही ह्याची काही उदाहरणे होत.

विष्णुदासनाम्याची रचनाशौली साधी पण रसाळ आहे. मुक्तेश्वर, श्रीधर अशा कवींवरही ह्या कवीचा काही प्रभाव पडला त्याच्या आख्यानांचे सतराव्या शतकाच्या आरंभी कोकणीतून अनुवाद झाले. त्यांची बरीचशी आख्याने प्राचीन मराठी कविता (खंड ३, ५-संपा., ज.शा. देशपांडे) ह्या पुस्तकात अंतर्भूत आहेत.

  

कुलकर्णी, अ.र.