भास्करभट्ट  बोरीकर : (तेराव व चौदावे शतक). श्रेष्ठ महानुभव कवी. भास्करचार्य ह्या नावानेही तो ओळखला जातो. ह्याचे मूळ नाव भानुभट. परभणी जिल्ह्यातील बोरी ह्या गावचा तो रहिवीसी. आरंभी कलंकीमार्गातील कोणा केशवाचार्याचे शिष्यत्व त्याने स्वीकारले होते. तथापि पुढे महानुभाव पंथाचे आचार्य नागदेवचार्य ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावातून तो महानुभाव पंथात आला आणि अनन्य निष्ठेने तेथे राहिला. नागदेवाचार्य त्याला ‘ कवीश्वर ‘ म्हणत असत. भास्करभट हा देखणा, वादपटू आणि उत्तम वक्ताही होता. नागदेवाचार्या आणि बाईदेवबास ह्यांच्या नंतर पंथाचे आचार्यपद त्याच्याकडे आले. अहमदनगर जिल्ह्यातील अष्टी येथे त्याचे निधन झाले असावे. असा डॉ. वि. भि. कोलते ह्यांच्यासारख्या अभ्यासकांचा तर्क आहे.

भास्कराच्या नावावर शिशुपाळवध, उद्धवगीता व संस्कृत पूजावसर, चौपद्या, ईशस्तुति, विरहाष्टक, चक्रपाणिचरित्र, दत्तात्रेयचरित्र, श्रीकृषणचरित्र, गीताटीका, नरविलापस्तोत्र (संस्कृत), व चालिसाख्यस्तोत्र (संस्कृत) ह्यांसारखे अनेक गद्य-पद्य ग्रंथ मोडत आसले, तरी शिशुपालवध, उद्धवगीता, नरविलापस्तोत्र, पूजावसारचालीसाख्यस्तोत्र हे पाच ग्रंथ निर्विवीदपणे भास्कराचे मानले जातात.

भास्करकृत शिशुपालवध (१,०८७ ओव्या) आणि उद्धवगीता (८२७ ओव्या) हे दोन काव्यग्रंथ विशेष उल्लेखनीय असून त्यांचा अंतर्भाव महानुभावांच्या ‘ साती ग्रंथा ‘त (महानुभावीय पद्यवाङ्‍मयात महत्त्वपूर्ण मानला जाणारा सात ग्रंथांचा समूह) करण्यात आला आहे. शिशुपालवध हे अत्यंत रसाळ असे काव्य आहे. ते रचताना माघ ह्या संस्कृत कवीच्या शिशुपालवध ह्या महाकाव्याचा आदर्श भास्कराच्या समोर काही प्रमाणात असल्याचे दिसते. मधुर शब्दकळा आणि मनोहर वर्णने ही ह्या काव्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. शिशुपालाचा वध हा ह्या काव्याचा विषय असला, तरी त्यात वीरापेक्षा शृंगार रसाला प्राधान्य मिळाले आहे. असे असूनही हा ग्रंथ महानुभाव पंथात मान्यता पावला आहे. भास्कराने शिशुपालवधाच्या कथेच्या द्वारे महानुभाव पंथाच्या तत्त्वाज्ञानाचे सूक्ष्मपणे निरूपण केले आहे, असे डॉ. कोलते ह्यांनी प्रतिपादले आहे. भास्करभटाचे गुरूबंधू बाईदेवदास ह्यांनी मात्र ‘ ग्रंथु निका ‘ झाल्याचे शिफारसपत्र भास्करभटाला देत असतानाच तो विरक्तांना आनंद देण्याजोगा झाला नाही, अशी टीका केली होती. ती लक्षात ठेवून भास्करभटाने उद्धवगीता हा आपला निवृत्तिपर ग्रंथ लिहिला. उद्धवगीता ही भागवताच्या एकादशस्कंधावरील पहिली मराठी टीका होय. संसारात फार गुरफटल्यामुळे जीव कसे दुःखी होतात, ह्याचे सुबोध निरूपण ह्या टीकेत करण्यात आलेले आहे.

सुर्वे, भा. ग.