मराठी साहित्यसंमेलने : साहित्य –संमेलने हे महाराष्ट्राचे एक खास वैशिष्ट्य आहे. अखिल भारतीय, प्रादेशिक, प्रांतिक, उपनगरीय, शारदीय. वासंतिक, महिलांची, बाल-कुमारांची, नवोदितांची, होतकरूंची, ग्रामीण, दलित इ. नाना प्रकारची मराठी भाषिकांची साहित्यसंमेलने मोठ्या संख्येने व उत्साहाने होतात. या सर्व संमेलनांमध्ये ‘अखिल भारतीय मराठी साहित्य – संमेलन’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या व सर्व मराठी भाषिकांचे प्रातिनिधिक ठरलेल्या संमेलनाला विशेष महत्तव दिले जाते.

ह्या संमेलनांची गंगोत्री म्हणजे न्या. मू. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे ११ मे १८७८ रोजी भरलेले पहिले ‘मराठी ग्रंथकार संमेलन’ होय. दुसरे संमेलन त्यानंतर सात वर्षानी ( १८८५ ) पुण्यातच कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले. तिसरे संमेलन भरण्यासाठी त्यानंतर वीस वर्षाचा कालावधी लागला व हे संमेलन पुण्याबाहेर, सातार्‍यास भरले ( १९०५ ). चौंथे संमेलन १९०६ मध्ये पुण्यामध्ये भरले, पुढाकार टिळक- केळकर –खाडिळकर ह्यांसारख्या मंडळींचा होता. याच संमेलनामध्ये २७ मे रोजी ‘महाराष्ट्र साहित्य -परिषदेची’ स्थापना करण्यात आली. ग्रंथकार संमेलनातून साहित्य- परिषदेचा जन्म झाला आणि स्वाभाविकच पुढची संमेलने भरविण्याची जबाबदारी परिषदेवर आली.

परिषदेची अधिकृत घटना १९१२ च्या अकोल्याच्या संमेलनामध्ये मंजूर होऊन परिषदेचे कार्यालय मुंबई येथे सुरू झाले.परंतु निखळ साहित्यविषयक चळवळीला मुंबई शहर अनुकूल नव्हते हे कलांतराने लक्षात आले. संमेलने भरविण्यामध्ये पुणेकरांचा विशेष पुढाकार होता. १९२१ पर्यत परिषदेने तीन संमेलने भरविली होती  ( १९१५, १९१७ , १९२१ ). पुढे संमेलनाचा अध्यक्ष परिषदेने निवडायचा की स्थानिक संस्थेने असा वाद सुरू झाला. त्या वादात बडोद्याच्या ‘सहविचारांणी सभा’ ह्या स्थानिक संस्थेने संमेलनाध्ययक्ष निवडण्यात यश मिळविले. तथापि १९३२ मध्ये परिषद पुण्यास आणण्याचा ठराव होऊन. १९३३ पासून तिचे कार्यालय पुण्यास सुरू झाले. नंतर संमेलने मोठ्या प्रमाणात परिषदेमार्फतच भरविण्यात येऊ लागली.

साहित्य- परिषदेच्या अनुकरणाने विदर्भ, मुंबई व मराठवाडा येथे विभागीय साहित्यसंस्था उदयास आल्या. बडोदे, ग्‍वाल्हेर, इंदूर व हैदराबाद इ. ठिकाणी संमेलने भरविण्याच्या निमित्ताने मराठी भाषिकांच्या साहित्यसंस्था कार्यरत झाल्या होत्याच. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर या सर्व साहित्यसंस्थांचे संघीकरण करावे व या संस्थांनीच स्वतंत्र अशी एक मध्यवर्ती संघसंस्था स्थापन करावी असे मिरजेच्या संमेलनात ( १९५९ ) ठरले. १९६१ च्या ग्‍वाल्हेरच्या संमेलनात त्यावर शिक्कामोर्तब होऊन मराठी साहित्य महामंडळ नावाची संस्था उदयाला आली. पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भाची विदर्भ साहित्य संघ, मुंबईची मुंबई मराठा साहित्य संघ. मराठवाड्याची मराठवाडा साहित्य परिषद या सांप्रत तिच्या घटक-संस्था असून. आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद, ( हैदराबाद ) मध्यप्रदेश मराठी साहित्य परिषद, ( जबलपूर ) व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, ( गुलबर्गा ) या तिच्या समाविष्ट संस्था आहेत. १९६५ च्या हैदराबाद साहित्य संमेलनापासून साहित्य –संमेलने भरविण्याचे कार्य महामंडाने स्वीकारले. १९८४ पर्यत महामंडळाने १३ संमेलने भरविली. त्यापूर्वीची ४५ धरून ही संख्या ५८ होते. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे २७, विदर्भात ६, मुंबईत ४, मराठवाड्यात २, मध्य प्रदेशात ६, गुजरातेत ४, आंध्र प्रदेशात ३, गोव्यात २, कर्नाटकात ३ व दिल्लीत १ अशी त्यांची विभागणी आहे.

१९४२ च्या नासिक संमेलनात प्रचलित संमेलने कायम ठेवून आणखी विशिष्ट संमेलने भरविण्यास परिषदेने व अन्य संस्थांनी प्रयत्‍न करावेत असे एका ठरावाद्वारे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्रातील विभागीय साहित्यसंस्थांनी व बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यसंस्थांनी अशी संमेलने नियमितपणे भरविण्याचा प्रयत्‍न सातत्याने केला आहे. विदर्भ व मराठवाडा साहित्य-संमेलने, वडोदा, इंदूर, ग्‍वाल्हेर येथील साहित्यसंस्थांची वार्षिक अधिवेशने ह्या बाबतीत अधिक कार्यरत आहेत. मुंबईच्या साहित्य- संघाने उपनगरीय साहित्य-संमेलने भरविलेली आहेत. पुण्याच्या साहित्य-परिषदेने १९७० पासून अशी तीन अधिवेशने घेतली. १९७९ पासून परिषदेने विभागीय संमेलनांऐवजी ग्रंथव्यवहार परिषदा भरविण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यत तीन ठिकाणी परिषदा भरल्या आहेत. यांखेरीज गोव्यातील गोमंतक मराठी साहित्य संमेलने, औदुंबर येथील सदानंद वाड्‍मय मंडळातर्फे दरवर्षी भरविली जाणारी संमेलने, बालकुमार साहित्य संमेलने, १९७५ पासून सुरू झालेली महिला कथाकार संमेलने, जळगाव जिल्हा साहित्य साहित्यसंमेलने, ख्रिस्ती साहित्य संमेलने, ग्रामीण व दलित साहित्य संमेलने इ. अनेक प्रकारची संमेलने नित्य होत आहेत. या सर्व संमेलनांचे स्वरूप व कार्य मात्र मर्यादित राहिले आहे.


संमेलनाच्या अध्यक्षाची निवड आरंभीच्या काळात काही ज्येष्ठ साहित्यिकांच्या व कार्यकर्त्याच्या आपापसांतील चर्चेतून एकमताने होत असे. १९१२ मध्ये अघिकृतपणे तयार झालेल्या परिषदेच्या घटनेतही संमेलनाबाबतीत स्पष्ट नियम करण्यात आले नव्हते. संमेलने भरविण्यासाठी खटपट करणार्‍या मंडळींची निमत्रणे मिळवून परिषदेमार्फत वेगळ्या बैठका घेऊन अध्यक्षांची निवड करण्याची प्रथा सुरू झाली. परिषद आणि संमेलन यांच्या सदस्यांच्या बैठका वेगवेगळ्या भरत. त्यातूनच वादंगाला तोंड फुटले. १९३२ पर्यत हा वाद धुमसत राहिला. संमेलन – समिती व संमेलन ज्या ठिकाणी भरवायचे तेथील कार्यकर्ते यांच्या विचारविनिमयातून अक्ष्यक्ष ठरे. त्यामुळे परिषदेला डावलले जात आहे असे वाटू लागले. १९३३ साली नागपूर संमेलनात संमेलनविषयक अधिकृत नियम करण्याचा ठराव झाला व समिती नेमण्यात आली. इंदूरच्या संमेलनात १९३५ मध्ये संमेलनघटनासमिती नेमण्यात आली. या दोन्ही समित्यांचे एकीकरण करून संमेलन भरविण्याचा अधिकार शेवटी परिषदेकडे आला. परिषदेचे कार्यालय पुण्यास आल्यामुळे हे सुलभपणे होऊ शकले. परिषदेच्या सदस्यांनी अध्यक्षपदासाठी निवडलेल्या तीन नावांतून स्थानिक स्वागत – समितीने अध्यक्षांची निवड करावयाची अशी पद्धत रूढ झाली होती पण काही काळाने स्वागत – समितीने सदस्य नोंदविण्यात ह्या पद्धतीमुळे चुरस निर्माण होऊन त्याचे अनिष्ट परिणाम दिसून येऊ लागले. १९६० साली ही पद्धत बंद करून परिषदेच्या सार्‍या सदस्यांच्या मतदानातून अध्यक्षीय निवड करण्यात येऊ लागली. पुढे महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महामंडळाच्या घटक व समाविष्ट संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी अध्यक्षाची निवड करावी असे ठरविण्यात आले. १९६५ ते १९६९ ह्या काळातील संमेलनाध्यक्षांची निवड या पद्धतीने करण्यात आली. १९६९ ते १९७२ या काळात खूप प्रयत्‍न करूनही संमेलने भरविण्यात महामंडळाला अपयश आले. त्यातूनच स्थानिक स्वागत – समितीला अध्यक्षीय निवडणुकीत महत्त्व द्यावे या विचाराने घटनेत दुरूस्ती करून, महामंडळाच्या सदस्यांनी स्वागत मंडळाकडे तीन नावे अध्यक्षपदासाठी पाठवावयाची व स्थानिक स्वागत-मंडळाने निवडणुकीने त्यांतून एकाची निवड करावयाची असे ठरविण्यात आले. १९७७ साली पुणे येथे या पद्धतीच्या निवडीत जी भयंकर चुरस दिसून आली, ती पाहून घटनेत १९७८ मध्ये पुन्हा दुरूस्ती करण्यात आला. त्यानुसार, महामंडळाच्या चार घटक-संस्थांचे प्रत्येकी ३५, समाविष्ट संस्थांचे प्रत्येकी २०, ह्यात संमेलनाध्यक्ष आणि स्वागत मंडळाचे ५० अशा सदस्यांच्या मतदानाने महामंडळाने सुचविलेल्या तीन व्यक्तींतून अध्यक्षाची अंतिम निवड करावी असे ठरले. बार्शी संमेलनापासून संमेलनाध्यक्षांची निवड या पद्धतीनेच आजवर चालू आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभणे हा त्या त्या व्यक्तीच्या साहित्यसेवेचा सर्वौच्च गौरव समजला जातो.

साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षास प्रत्यक्षात विशेष असे काहीच अधिकार नसतात. संमेलनातील ठरावांची कार्यवाही महामंडळ करते. ही मराठी साहित्य संमेलने साधारणपणे तीन दिवस भरतात. स्वागत, उद्‍घाटन, अध्यक्षीय भाषण यांमध्ये पहिला दिवस व्यक्तीत होतो. नंतरच्या दोन दिवसांत वाङ्‌मयचर्चा, परिसंवाद, कथाकथन, काव्यगायन, विषयनियामक समितीत मंजूर झालेल्या ठरावांच्या आधारे खुले अधिवेशन, अध्यक्षीय समारोप व शेवटी आभारप्रदर्शन असे त्याचे स्वरूप असते. स्वागत –समितीतर्फे रात्री करमणुकीच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. काही संमेलनातून स्वागत समितीने वाङ्‌ममयीन लेख मागवून त्यांचे संग्रह प्रसिद्ध केले आहेत. १९५० च्या मुंबई संमेलनाचे वाड्‍मयीन शाखासंमेलनांची जोड देण्याचा उपक्रम सुरू केला. तो फार थोडा काळ चालला. निबंध मागवून त्यांच्या चर्चेचेही उपक्रम काही ठिकाणी झाले. एकाच वेळी अनेक विषयांवर चर्चा करण्याचे प्रयत्‍नही झाले. संमेलनाचे स्वरूप एकंदरीने उत्सवी राहिले आहे. मराठी साहित्यिक आणि साहित्यप्रेमी जनतेचा वार्षिक उत्सव म्हणजेच संमेलन असे थोडक्यांत म्हणता येईल.

खुल्या अधिवेशनात मांडले जाणारे ठराव व त्यांची चर्चा यांना महामंडळपूर्व संमेलनांतून महत्त्वाचे स्थान असे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव १९४६ च्या बेळगाव संमेलनामध्ये प्रथम आला व पुढील संमेलनांनी त्याचा हिरीरीने पाठपुरावा केला. अश्‍लीलताविरोधी ठरावास संमेलनामध्ये फार महत्त्व सातत्याने आले होते असे दिसते. शुद्धलेखन, लिपिसुधारणा, प्रादेशिक विद्यापीठे, सीमाप्रश्न, विचार- स्वातंत्र्य यांसारख्या विषयांच्या चर्चने अनेक संमेलने गाजली आहेत. कराडचे संमेलन आणीबाणीच्या प्रश्नाने गाजले, तर अकोल्याचे वाङ्‌मयपुरस्कार योजनेच्या संदर्भात शासनाच्या हस्तक्षेपाच्या प्रश्नामुळे गाजले. १९७७ चे पुण्याचे व १९७९ चे चंद्रपूरचे ही दोन अधिवेशने मराठवाडा विद्यापीठाच्या नामकरण प्रश्नाच्या निमित्ताने दलितांनी निर्दशने धरून शेवटच्या दिवशी उधळून लावली. बार्शी संमेलनात ह्या प्रकाराची पुनरावृत्ती अध्यक्षांच्या कुशल हस्तक्षेपामुळे टळली. संमेलनात मंत्र्यांना अवाजवी महत्त्व दिले जाते, असा आक्षेप घेऊन, १९८१ मध्ये मुंबईस काही साहित्यिकांनी एकत्र येऊन मालतीबाई बेडेकरांच्या अध्यक्षतेखाली एक समांतर संमेलन भरविले.

साहित्यिकांच्या तीव्र भावनांना संमेलनाने वेळोवेळी वाट करून दिली आहे.

साहित्यसंमेलने ही मराठी भाषिकांच्या वाङ्‌मयप्रेमातून मोठ्या प्रमाणात भरविण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय दडपणांना न जुमानता या संमेलनांतून साहित्यिकांनी स्वातंत्र्याचा आवाज उठविला. हैदराबाद व मडगाव येथील अधिवेशनांना त्या दृष्टीने फार महत्त्व आहे. औरंगाबाद येथे संयुक्त महाराष्ट्राचा ठराव प्रचंड मताने संमत करण्यात आला ( १९५७ ). मडगाव ( १९६४ ), इचलकरंजी ( १९७४ ), कराड ( १९५७ ), अकोला ( १९८१ ) व जळगाव ( १९८४ ) या संमेलनांनी गर्दीचा उच्चांक गाठला.

ग्रंथकार संमेलने या आरंभीच्या नावाने भरणार्‍या अधिवेशनांचे वेळोवेळी नामांतर होत गेले. १९०८ मध्ये लेखक – संमेलन, १९०९ मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन, मध्यंतरी काही काळ मराठी साहित्य – संमेलन, १९३५ पासून १९५३ पर्यत पुनश्च महाराष्ट्र साहित्य संमेलन, १९५४ पासून पुन्हा ‘मराठी साहित्य संमेलन’ या व्यापक नावाच्या धोरणाचा केलेला स्वीकार व महामंडळाकडे संमेलने गेल्यानंतर त्याच्या मागे  ‘अखिल भारतीय’ या उपाधीची वाढ, अशी ही नामांतराची हकिकत.


संमेलनांची आतापर्यंतची अधिवेशने खालीलप्रमाणे 

क्रम

वर्ष 

स्थळ 

अध्यक्ष 

१ 

१८७८ 

पुणे 

न्या. मू.म. गो. रानडे 

२ 

१८८५ 

पुणे 

कृष्णशास्त्री राजवाडे 

३ 

१९०५ 

सातारा 

र. पां. करंदीकर 

४ 

१९०६ 

पुणे 

गो. वा. कानिटकर 

५ 

१९०७ 

पुणे 

वि. मो. महाजनी 

६ 

१९०८ 

पुणे 

चिं. वि. वैद्य 

७ 

१९०९ 

बडोदे 

का. र. कीर्तिकर 

८ 

१९१२ 

अकोला 

ह. ना. आपटे 

९ 

१९१५ 

मुंबई 

गंगाधरराव पटवर्धन 

१० 

१९१७ 

इंदूर 

ग. ज. आगाशे 

११ 

१९२१ 

बडोदे 

न. चिं. केळकर 

१२ 

१९२६ 

मुंबई 

मा. वि. किबे 

१३ 

१९२७ 

पुणे 

श्री. कृ. कोल्हटकर 

१४ 

१९२८ 

ग्वाल्हेर 

मा. श्री. अणे 

१५ 

१९२९ 

बेळगाव 

शि. म. परांजपे 

१६ 

१९३० 

मडगाव 

वा. म. जोशी 

१७ 

१९३१ 

हैदराबाद 

श्री. व्यं. केतकर 

१८ 

१९३२ 

कोल्हापूर 

सयाजीराव गायकवाड 

१९ 

१९३३ 

नागपूर 

कृ. प्र. खाडिलकर 

२० 

१९३४ 

बडोदे 

ना. गो. चापेकर 

२१ 

१९३५ 

इंदूर 

बाळासाहेब पंतप्रतिनिधी 

२२ 

१९३६ 

जळगाव 

मा. त्रिं. पटवर्धन 

२३ 

१९३८ 

मुंबई 

वि. दा. सावरकर 

२४ 

१९३९ 

अहमदनगर 

द. वा. पोतदार 

२५ 

१९४० 

रत्नागिरी 

ना. सी. फडके 

२६ 

१९४१ 

सोलापूर 

वि. स. खांडेकर 

२७ 

१९४२ 

नासिक 

प्र. के. अत्रे 

२८ 

१९४३ 

सांगली 

श्री. म. माटे 

२९ 

१९४४ 

धुळे 

भा. वि. वरेरकर 

३० 

१९४६ 

बेळगाव 

ग. त्र्यं. माडखोलकर 

३१ 

१९४७ 

हैदराबाद 

न. र. फाटक 

३२ 

१९४९ 

पुणे 

शं. द. जावडेकर 

३३ 

१९५० 

मुंबई 

य. दि. पेंढरकर 

३४ 

१९५१ 

कारवार 

अ. का. प्रियोळकर 

३५ 

१९५२ 

अमळनेर 

कृ. पां. कुलकर्णी 

३६ 

१९५३ 

अहमदाबाद 

वि. द. घाटे 

३७ 

१९५४ 

दिल्ली 

लक्ष्मणशास्त्री जोशी 

३७ 

१९५५ 

पंढरपूर 

शं. दा. पेंडसे 

३९ 

१९५७ 

औरंगाबाद 

अनंत काणेकर 

४० 

१९५८ 

मालवण 

आ. रा. देशपांडे 

४१ 

१९५९ 

मिरज 

श्री. के. क्षीरसागर 

४२ 

१९६० 

ठाणे 

रा. श्री. जोग 

४३ 

१९६१ 

ग्वाल्हेर 

कुसुमावती देशपांडे 

४४ 

१९६२ 

सातारा 

न. वि. गाडगीळ 

४५ 

१९६४ 

मडगाव 

वि. वा. शिरवाडकर 

४६ 

१९६५ 

हैदराबाद 

वा. ल.कुळकर्णी 

४७ 

१९६७ 

भोपाळ 

वि. भि. कोलते 

४८ 

१९६९ 

वर्धा 

पु. शि. रेगे 

४९ 

१९७३ 

यवतमाळ 

ग. दि. माडगूळकर 

५० 

१९७४ 

इचलकरंजी 

पु. ल. देशपांडे 

५१ 

१९७५ 

कराड 

दुर्गा भागवत 

५२ 

१९७७ 

पुणे 

पु. भा. भावे 

५३ 

१९७९ 

चंद्रपूर 

वामन चोरघडे 

५४ 

१९८० 

बार्शी 

गं. बा. सरदार 

५५ 

१९८१ (फेब्रु.) 

अकोला 

गो. नि. दांडेकर 

५६ 

१९८१ (डिसें.) 

रायपूर 

गंगाधर गाडगीळ 

५७ 

१९८३ 

अंबाजोगाई 

व्यंकटेश माडगूळकर 

५८

१९८४ 

जळगाव

शंकरराव खरात 

संदर्भ :  १. कुलकर्णी भीमराव, मराठी साहित्यसंमेलने, अध्यक्षीय मापणे, भाग ३, पुणे, भाग १, १९७२, भाग २ व ३ १९७२.

            २. संत, दु. का. साहित्य संमेलने आणि साहित्यिक प्रश्न, पुणे, १९६०.

कुलकर्णी, भीमराव