शिवराम महादेव परांजपेपरांजपे, शिवराम महादेव: (२७ जून १८६४–२७ सप्टेंबर १९२९). प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, पत्रकार व प्रभावी वक्ते. जन्म कुलाबा जिल्ह्यातील महाड येथे. त्यांचे वडील एक यशस्वी वकील होते. शिवरामपंतांच्या आईचे नाव पार्वतीबाई. शिवरामपंतांचे प्राथमिक शिक्षण महाड येथे माध्यमिक शिक्षण रत्नागिरीस व पुण्यास आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन आणि डेक्कन कॉलेजांत झाले. रत्नागिरीच्या शाळेत विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांना शिक्षक म्हणून लाभले. पुण्याच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये शिवरामपंतांनी प्रवेश घेतला तो विष्णुशास्त्र्यांच्या प्रभावातून . १८७५ मध्ये गोरेगावचे गणेशपंत गोखले ह्यांची कन्या बयोताई हिच्याशी शिवरामपंतांचा विवाह झाला. १८८४ मध्ये संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून ते मॅट्रिक झाले. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिले विद्यार्थी. १८९५ मध्ये ते एम. ए. झाले. ह्या परीक्षेत त्यांना ‘गोकुळदास’ आणि ‘झाला वेदान्त’ अशी दोन पारितोषिके मिळाली. त्यानंतर पुण्यात नवीनच स्थापन झालेल्या महाराष्ट्र कॉलेजात दोन वर्षे (१८९६ १८९७) ते संस्कृतचे प्राध्यापक होते. तथापि टिळकांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक चळवळीत त्यांचे समरसतेने सहभागी होणे ह्या कॉलेजला अडचणीचे वाटू लागल्यामुळे त्यांना ही प्राध्यापकाची नोकरी सोडून द्यावी लागली. १८९८ मध्ये उत्कट देशाभिमानाच्या प्रेरणेने त्यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केले. १९०८ मध्ये ह्याच पत्रातील काही लेखांच्या आधारे, सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला. ह्या खटल्यात त्यांना १९ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली. तथापि १५ महिन्यांच्या बंदिवासानंतर ५ ऑक्टोबर १९०९ रोजी त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर १९१० साली सरकारने त्यांच्याकडून मागितलेला दहा हजार रुपयांचा जामीन देऊ न शकल्यामुळे काळ साप्ताहिक त्यांना बंद करावे लागले. १९०० ते १९०८ ह्या कालखंडात प्रसिद्ध करण्यात आलेले काळातील निवडक निबंधांचे दहा खंडही सरकारकडून जप्त करण्यात आले. पुढे मुंबई प्रांतातील काँग्रेस सरकारच्या सदिच्छेमुळे १९३७ साली दहावा खंड व १९४६ साली बाकीचे नऊ खंड निर्बंधमुक्त झाले आणि ही संधी घेऊन १९४६ साली सर्व खंडांचे पुनर्मुद्रणही करण्यात आले.

टिळकांच्या मृत्यूनंतर, १२ ऑगस्ट १९२० रोजी शिवरामपंतांनी स्वराज्य हे नवे साप्ताहिक काढले आणि त्यातून महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीचा पुरस्कार केला. तथापि काळाची लोकप्रियता ह्या साप्ताहिकाला लाभली नाही. पुढे वृद्धापकाळामुळे हे साप्ताहिक त्यांनी शंकरराव देव ह्यांच्या स्वाधीन केले (१९२७). पत्रकारिता सांभाळून लोकहिताच्या चळवळींतही त्यांनी वेळोवेळी भाग घेतला. १ मे १९२२ रोजी मुळशी सत्याग्रहात ते सहभागी झाले आणि त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांचा कारावासही भोगला. सायमन आयोगाला विरोध करण्यासाठी आणि ‘नेहरू रिपोर्टा’च्या प्रचारासाठीही ते पुढे आले. शिवरामपंत हे जसे थोर देशभक्त तसेच एक विदग्ध पंडित आणि शैलीकार साहित्यिक होते. १९२९ मध्ये बेळगाव येथे झालेल्या ‘महाराष्ट्र साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. त्याच वर्षी मधुमेहाच्या विकाराने ते पुणे येथे निधन पावले.

शिवरामपंत हे प्रामुख्याने काळकर्ते म्हणून ओळखले जातात. काळ हे नाव त्यांना इंग्रजीतील टाइम्स… ह्या वृत्तपत्रावरून सुचल्याचे दिसते. काळ ह्या शीर्षकातून ध्वन्यर्थाने निष्पन्न होणारे विविध प्रकारचे कार्य–उदा., काळ घडविणे, काळावर प्रभुत्व गाजवणे-शिवरामपंतांनी आपल्या साप्ताहिकातून करून दाखविले. काळातील निबंधांत देशाच्या स्वातंत्र्याची आकांक्षा आणि प्रखर राष्ट्रीय बाणा यांचा उत्कट आणि प्रभावी आविष्कार झालेला आहे. शिवरामपंतांनी वक्रोक्तिव्याजोक्तीची धार असलेली आपली लेखणी एखाद्या अस्त्राप्रमाणे वापरली आणि प्रतिपक्षाला नामोहरम केले. सशस्त्र क्रांतीचा पुरस्कारही त्यांनी वक्रोक्तीचा आधार घेऊन अतिशय खुबीदारपणे केला. वक्रोक्तीचा इतक्या विपुल प्रमाणावर वापर मराठी साहित्यात शिवरामपंतांच्या पूर्वी कुणी केलेला नव्हता आणि त्यांच्या नंतरही तो तसा कुणी केला नाही. त्या काळात परकीय सत्तेच्या दडपणामुळे जे व्यक्त होणे कठीण होते, ते त्यांनी वक्रोक्तीच्या आधारे लोकांपुढे मांडले. पांडित्य व प्रतिभा ह्यांचा एकत्र प्रत्यय देणाऱ्या काळातील लेखांचे वाङ्मयीन मोलही मोठे आहे. अभिजात लेखनशैलीसाठी आजही काळातील त्यांचे निबंध मराठी वाङ्मयात महत्त्वाचे ठरतात. साहित्यसंग्रह (३ भाग, १९२२, १९२५ आणि  १९४६) मध्ये त्यांचे संशोधनपर आणि रसग्रहणपर असे साहित्यविषयक लेख अंतर्भूत आहेत. त्यांच्या रसिक मनाची, विदग्ध पांडित्याची आणि सूक्ष्म परिशीलनाची ते साक्ष देतात. ‘प्रणयिनीचा मनोभंग’ हे ठाकूरसिंगांच्या चित्राचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील सर्जनशील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना मानले जाते. नागानंद, अभिज्ञानशाकुंतल, मृच्छकटिक ह्या संस्कृत नाटकांवरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधनपर लेखही उल्लेखनीय आहेत. गोविंदाची गोष्ट (१९१८) आणि विंध्याचल (१९२४) ह्या त्यांच्या कादंबऱ्या रम्याद‌्भुत स्वरूपाच्या आहेत. कादंबरीलेखनात स्वतःचे वैशिष्ट्य त्यांना निर्माण करता आले नाही. बाणाच्या कादंबरीवर आधारित संगीत कादंबरी (१८९७), शेक्सपिअरच्या मॅक्‌बेथवरून रचलेले मानाजीराव (१८९८), ॲडिसनच्या केटोवर आधारित रामदेवराव (१९०६) अशा काही नाटकांखेरीज पहिला पांडव (१९३१) हे कर्णाच्या जीवनावरील स्वतंत्र पौराणिक नाटकही त्यांनी लिहिले आहे. देशभक्तीचा महिमा तसेच फितुरीचे दुष्परिणाम त्यांच्या नाटकांतून दाखविलेले आहेत. ही नाटके फारशी प्रयोगानुकूल नाहीत. बहुतेक नाटकांची भाषा बोजड असून तीत स्वाभाविकता नाही. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्राचे त्यांनी संस्कृतमध्ये भाषांतर केले होते. अहल्याजार हे त्यांनी लिहिलेले प्रदीर्घ काव्य. त्याशिवाय काही स्फुट कविता आणि नाटकांतील पदे त्यांनी रचिली आहेत. 

शिवरामपंतानी कथालेखनही केले. ‘आम्रवृक्ष’, ‘एक कारखाना’, ‘प्रभाकरपंतांचे विचार’ अशा कथांतून त्यांनी राजकीय विचार पेरले आहेत. आपल्या कथांतूनही त्यांनी व्याजोक्तीचा उपयोग केला आहे. स्वैर कल्पनाविलासाने त्यांच्या काही कथा नटल्या आहेत.

मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास (१९२८) या पुस्तकात मराठ्यांच्या १८०२ ते १८१८ मधील चौदा लढायांचा इतिहास दिला आहे आणि मराठ्यांच्या अपयशाची मीमांसा केली आहे. तर्कभाषा, तर्कसंग्रहदीपिका (१९०४) आणि पूर्वमीमांसेवरील अर्थसंग्रह हे संस्कृताधारित ग्रंथ, भामिनीविलास, प्रसन्नराघव, प्रतिमा यांच्या संपादित आवृत्त्या, मोरोपंतांच्या आर्याभारताची  प्रस्तावना यांवरून परांजप्यांच्या विविध विषयस्पर्शी व्यासंगाची कल्पना येऊ शकेल. रूसोचे राजनीतिशास्त्र (अपूर्ण) या त्यांच्या ग्रंथाचे पहिले प्रकरण रत्नाकर मासिकात प्रकाशित झाले होते. वि. का. राजवाडे यांना भाषांतर मासिकाच्या कामात त्यांचे सहकार्य लाभले होते.

संदर्भ : १. ओगले, शि. ल. शिवराम महादेव परांजपे ह्यांचे चरित्र, पुणे, १९३६.

   २. परांजपे, वा. कृ. काळकर्ते शिवरामपंत परांजपे : जीवन, पुणे, १९४५.

कुलकर्णी, गो. म.