भावे, विनायक लक्ष्मण : (१८७१—१२ सप्टेंबर १९२६). मराठी साहित्यसंशोधन आणि ग्रंथाकार. महाराष्ट्र सारस्वत ह्या प्राचीन मराठी साहित्येतिहासग्रंथाचे कर्ते. कुलाबा (विद्यमान रायगड) जिल्ह्यातील पळस्पे ह्या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मराठी व इंग्रजी शिक्षण ठाणे येथे झाले. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून ते बी. एस्‍सी. झाले. ठाणे येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना काव्येतिहाससंग्रह ह्या मासिकाचे एक संपादक जनार्दन बाळाजी मोडक हे त्यांना मुख्याध्यापक म्हणून लाभले. जुन्या ग्रंथांचा जीर्णोद्धार करणे मराठा काव्ये, जुन्या बखरी, इतिहासविषयक लेख प्रसिद्ध करणे हे काव्येतिहाससंग्रहाचे उद्दिष्ट होते. मोडकांचा सहवास व मार्गदर्शन ह्यांमुळे भावे ह्यांना मराठी काव्ये वाचण्याची गोडी लागली. शालेय जीवनातच ते मराठी काव्ये आणि कविचरित्रे ह्यांविषयी निबंध लिहू लागले होते. महाविद्यालयीन जीवनात विज्ञानाचा अभ्यास करीत असतानाही महीपति, श्रीधर, मुक्तेश्वर, अमृतराय ह्यांसारख्या प्राचीन मराठी कवींची कविता ते वाचीत असत, तसेच प्राचीन मराठी साहित्याचे संशोधन करीत असत. महाराष्ट्र सारस्वताच्या पहिल्या आवृत्तीचे लेखन त्यांनी महाविद्यालयात शिकत असतानाच केले होते. १८९३ मध्ये ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाची त्यांनी स्थापना केली. १८९८ मध्ये भावे ह्यांचे वडील मरण पावले. त्यानंतर वडिलांच्या मिठागरात लक्ष घालून त्यांनी मिठाचा व्यापार सुरू केला व त्यात यश मिळविले. १९१८ साली ते त्या व्यापारातून निवृत्त झाले व उर्वरीत आयुष्य त्यांनी सर्वस्वी विद्याव्यासंगात घालविले. पुणे येथे ते निधन पावले.

वि. ल. भावे

महाराष्ट्र सारस्वत हाच भावे यांचा पहिला ग्रंथ होय. त्याची पहिली आवृत्ती विष्णु गोविंद विजापूरकरसंपादित ग्रंथमाला ह्या मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाली (मार्च १८९८ ते मे १८९९). त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या (१९१९, १९२४ १९२८, १९५१, १९६३, १९८२). ह्यांपैकी तिसरी आवृत्ती दोन भागांत प्रसिद्ध झाली होती. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. तथापि त्यात भावे ह्यांनी पुढे सतत भर घातल्यामुळे तिसऱ्या आवृत्तीपर्यंत हा ग्रंथ ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला. चौथा आवृत्ती अद्ययावत करण्याच्या दृष्टीने, तिचे संपादक शं. गो. तुळपुळे ह्यांनी सु. २५० पृष्ठांची एक पुरवणी तिला जोडली. पाचव्या आवृत्तीत ह्या पुरवणीत आणखी सु. १०० पृष्ठांची भर पडली. सहाव्या आवृत्तीत ह्या ग्रंथांची विभागणी दोन खंडांत केली आहे : पहिला खंड हा वि. ल. भावलेखित मूळ ग्रंथ असून दुसरा खंड हा शं. गो. तुळपुळे ह्यांनी तयार केलेल्या पुरवणीचा आहे. अशा प्रकारे हा ग्रंथ वाढत गेला.

मराठी साहित्याचा १८१८ पर्यंतचा इतिहास महाराष्ट्र सारस्वतात आलेला आहे. मराठी भाषेच्या मूळपीठिकेपासून आरंभ करून पेशवाईअखेरील कवीपर्यंत भावे आलेले आहेत. महानुभव संत आणि त्यांचे साहित्य ह्यांचा परिचय महाराष्ट्र सारस्वतातून करून देऊन त्या साहित्याच्या संशोधनाच्या कामीही त्यांनी महत्त्वाची भर घातली. भावे ह्यांनी हे इतिहासलेखन कोठेही रूक्ष होऊ दिले नाही. महानुभाव, संत, पंडित आणि शाहिरी कवितेशी समरस झालेले त्यांचे रसिक मन महाराष्ट्र सारस्वतातून प्रत्ययास येते. प्राचीन मराठी साहित्येतिहासावरील एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून आजही ह्या ग्रंथाला मान्यता आहे.

प्राचीन साहित्याच्या संपादनाचेही कार्य त्यांनी केले. अज्ञानदासकृत अफजलखानाचा पोवाडा, श्री जयरामस्वामी (वडगावकर) कृत अपरोक्षानुभव (१९०५), तुकारामबुवांचा अस्सल गाथा (भाग १ व २ १९१९ , १९२०), पंडित दामोदरकृत वच्छहरण (१९२४) आणि कवीश्वर भास्करकृत शिशुपालवध (१९२६) ही त्यांची काही उल्लेखनीय संपादने.

इतिहाससंशोधनातही भावे ह्यांना रस होता. मराठी दफ्तराचे तीन रूमाल त्यांनी संपादिले आहेत (१९१७, १९२२, १९२८).

चक्रवर्ती नेपोलियन (तीन खंड, १९२१, १९२२, १९२२) हा त्यांनी लिहिलेला चरित्रग्रंथही प्रसिद्ध असून मराठीतील चरित्रांत त्याने लक्षणीय भर घातली आहे. वारसा (१९७१) ह्या नावाने त्यांचे काही स्फुट लेखन संकलित करण्यात आले आहे.

अदवंत, म. ना.