गोडबोले, परशुरामपंत तात्या : (१७९९–१८७४). प्राचीन काव्याचे संपादक, संस्कृत नाटकांचे कुशल अनुवादक आणि अव्वल इंग्रजीतील कोशकर्ते पंडित. संपूर्ण नाव परशुराम बल्लाळ गोडबोले. जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे. वाईलाच नारायणशास्त्री देव यांच्यापाशी संस्कृतचे अध्ययन. परशुरामपंतांचे बंधू दाजीबा ह्यांनी त्यांना मराठी काव्याची गोडी लावली.

मुंबईच्या सरकारी शाळापुस्तक मंडळीने प्रकाशित केलेला महाराष्ट्र भाषेचा कोश (१८२९–३१) तयार 

परशुरामपंत तात्या गोडबोले

करणाऱ्या पंडितांपैकी ते एक होते. त्यांची योग्यता ओळखून सरकारी शिक्षणमंडळाने नेमलेले मराठी भाषांतरकार आणि सल्लागार ⇨मेजर टॉमस कँडी  ह्यांनी त्यांना आपले साहाय्यक पंडित म्हणून नेमले (१८४७). अखेरपर्यंत ते त्या हुद्यावर होते. मेजर कँडी ह्यांचे उजवे हात म्हणून ते ओळखले जात.

संस्कृत नाटकांची मराठी भाषांतरे आणि प्राचीन मराठी काव्याचे संपादन ह्या क्षेत्रांतही त्यांनी भरीव कामगिरी केली. प्राचीन काव्याचा गाढा व्यासंग, मराठीच्या प्रकृतीची नेमकी जाणीव आणि अभिजात रसिकता ह्यांमुळे त्यांनी केलेले संस्कृत नाटकांचे अनुवाद सफाईदार आणि सरस उतरलेले आहेत. ते अनुवाद असे : वेणीसंहार (१८५७), उत्तररामचरित्र (१८५९), शाकुंतल (१८६१), मृच्छकटिक (१८६२), नागानंद (१८६५), पार्वतीपरिणय (१८७२). मराठी वाचकांना जुन्या कवितेची गोडी लावण्याच्या दृष्टीने त्यांनी संपादित केलेला नवनीत (१८५४) हा काव्यवेच्यांचा संग्रह फारच मोलाचा ठरला. वृत्तदर्पण (१८६०) हे त्यांचे छोटेखानी पुस्तकही उपयुक्त ठरले. मोरोपंतांच्या केकावलीचा अर्थनिर्णय करणारी केकादर्श (१८६७) ही त्यांची टीकाही विद्वन्मान्य झाली. याशिवाय नवनीत – भाग दुसरा — कवितासारसंग्रह (१८६३), मराठ्यांच्या इतिहासावर लहान मुलांकरिता सोपी कविता (१८६४), नामार्थदीपिका (१८६६), कादंबरीसार – पूर्वार्ध (१८७२) इ. ग्रंथरचना त्यांनी केली आहे. 

मालशे, स. गं.