बुलंदी

बुलंदी : ही बुलबुलाचीच एक जात असल्यामुळे लालबुड्या बुलबुलाबरोबरच हिचाही पिक्नोनोटिडी पक्षिकुलात समावेश केला आहे. या पक्षाचे शास्त्रीय नाव पिक्नोनोटस जोकोसस असे आहे. भारत, बांगला देश आणि ब्रम्हदेशांत हा आढळतो. भारतातील डोंगराळ भागात १,८३० मी. उंचीपर्यंत हा आढळतो पण वायव्य भागातील राजस्थानसारख्या रखरखीत ओसाड प्रदेशात हा मुळीच दिसून येत नाही. रंगाच्या फरकावरून याच्या पाच प्रजाती पाडलेल्या आहेत.  

बुलंदी लालबुड्या बुलबुलाएवढाच असतो शरीराची वरची बाजू तपकिरी आणि खालची पांढरी असते. छातीभोवती काळे वलय असते पण पुढच्या बाजूला ते तुटलेले असते. डोक्याचा माथा, त्याच्यावरचा टोकदार तुरा आणि दोन्ही बाजू काळ्या रंगाच्या असतात. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंवर मोठा पांढरा डाग असतो. या पांढऱ्या डागाच्या व डोळ्याच्या मध्ये किरमिजी रंगाच्या लहान पिसांचा झुपका असतो. शेपटीच्या बुडाखाली किरमिजी डाग असतो. चोच आणि पाय काळे असतात. याच्या सगळ्या सवयी लालबुड्या बुलबुलासारख्याच असतात. यांचे राहण्याचे ठिकाण, भक्ष्य (फळे, किटक), प्रजोत्पादनाचा काळ, घरट्याचा आकार, अंड्यांचा रंग वगैरे सगळे काही लालबुड्या बुलबुलाप्रमाणेच असते.

पहा : बुलबुल

कर्वे, ज. नी.