पित्ताशय : पित्तरसाचा संचय करणाऱ्या पिशवीसारख्या स्नायुमय अवयवाला पित्ताशय म्हणतात. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपैकी दोन तृतीयांश प्राण्यांत पित्ताशय असते. पक्ष्यासारख्या कनिष्ठ प्राण्यात आणि घोडा, हत्ती, हरीण यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांत पित्ताशय नसते. जिराफ, पाणघोडा व इतर काही प्राण्यांतील पित्ताशय नाहीसे होत चाललेले आहे. उभयचर (पाण्यात व जमिनीवरराहू शकणाऱ्या), सरीसृप (सरपटणाऱ्या) व सस्तन प्राण्यांत ते बहुतकरून असते. काही प्राण्यांत (उदा., मांजर, गाय, डुक्कर इ.) एक प्रमुख व इतर एकदोन दुय्यम पित्ताशयेही आढळतात. पित्ताशय हा जीवनाला अथवा आरोग्याला अत्यावश्यक असा अवयय नसला, तरी मानवाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. कारण पित्तरसाचा संचय करणे व पित्तमार्गातील दाबाचे नियंत्रण करणे ही कार्ये तो करतो आणि त्यात विकृती उत्पन्न झाल्यास पित्तातील विविध घटकांचे अवक्षेपण होऊन ⇨ पित्ताश्मरी  निर्माण होतात.

प्रस्तुत नोंदीत मानवी पित्ताशय व त्याच्या काही विकारांसंबंधी माहिती दिलेली आहे.

आ. 1. पित्ताशय आणि त्याचे यकृत व आतडे यांच्याशी असलेले संबंध : (1) यकृत (2) उजवी यकृत नालिका (3) डावी यकृत नालिका (4) पित्ताशय (5) पित्ताशय नालिका (6) समाईक यकृत नालिका (7) पित्तरस नालिका किंवा संयुक्त पित्तनालिका (8) ग्रहणी (9) फाटर कुंभिका व पिंडिका (10) अग्निपिंडलिका (11) अग्निपिंड

पित्ताशय हे यकृताच्या [  ⟶ यकृत ] उजव्या खंडाच्या अध:स्थ पृष्ठभागावर असलेल्या एका खाचेत असते. उजवी व डावी यकृत नलिका मिळून बनणारी समाईक यकृत नलिका, पित्ताशय, पित्ताशय नलिका तसेच समाईक यकृत नलिका आणि पित्ताशय नलिका मिळून बनणारी पित्तरस नलिका किंवा संयुक्त पित्तनलिका या सर्वांना मिळून यकृतबाह्य पित्तमार्ग म्हणतात.

 भ्रूणविज्ञान : (भ्रूणाची उत्पत्ती व विकास यांचा अभ्यास). भ्रुणाच्या अग्रांत्रापासून (घशापासून ते लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग हा अन्नमार्गाचा विभाग भ्रूणाच्या ज्या भागापासून तयार होतो त्यापासून) उजवीकडे एक प्रवर्ध (विस्तार) उगवून वाढत जातो. या प्रवर्धापासून यकृत, ⇨अग्निपिंडाचा अग्रभाग व पित्ताशयासहित सर्व पित्तमार्ग तयार होतो. हा प्रवर्ध लांब वाढत जाऊन त्याच्या मध्यभागी पोकळी निर्माण होते. या पोकळीचे वरचे व उजवे टोक विस्तार पावते आणि त्यालाच पुढे पित्ताशय म्हणतात. अग्निपिंड व पित्तमार्ग ग्रहणी भागापासून एकाच प्रवर्धापासून विकसित होत असल्यामुळे अग्निपिंड नलिका व संयुक्त पित्तनलिका ह्या दोन्ही ग्रहणीत एकाच ठिकाणी उघडतात.

 शारीर : पित्ताशय हा करड्या निळ्या रंगाचा पिशवीवजा अवयव यकृताच्या उजव्या खंडाच्या अध:स्थ पृष्ठभागावर असलेल्या खाचेत बसविलेला असतो. त्याचा वरचा पृष्ठभाग संयोजी ऊतकाने (जोडण्याचे कार्य करणार्‍या पेशीसमूहाने) यकृताशी जोडलेला असतो आणि खालचा पृष्ठभाग व दोन्ही बाजू पर्युदराने (उदर गुहेतील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पटलाने) आच्छादित असतात. त्याचा आकार नासपतीसारखा असतो व त्याची लांबी सु. ७ ते १० सेंमी. असून सर्वांत रुंद भागी रूंदी ३ सेंमी. असते. त्याची धारणक्षमता ३० ते ५० मिलि. असते.

 वर्णनाच्या सोयीसाठी पित्ताशयाचे तीन भाग कल्पिले आहेत : (१) बुघ्‍न, (२) काय आणि (३) ग्रीवा किंवा मान.

 (१) बुघ्‍न : सर्वांत अधिक पसरट भागाला बुघ्‍न असे नाव असून तो यकृताच्या अध:स्थ कडेपासून पुढए डोकावल्यासारखा असतो. त्यामुळे तो उदर अग्रभित्तीच्या लगेच मागे व नवव्या बरगडीच्या उपास्थीच्या टोकाखाली असतो. त्याचा पश्चभाग आडव्या बृहदांत्रावर (मोठ्या आतड्यावर) टेकलेला असतो. सर्व बुघ्‍नावर पर्युदराचे आच्छादन असते.

(२) काय (किंवा मुख्य भाग) : हा भाग बुघ्‍न व ग्रीवा यांच्या दरम्यान असून तो उजवीकडून डावीकडे व अग्रपश्च दिशेने खोल जातो. त्याचा वरचा पृष्ठभाग यकृताला संयोजी ऊतकाने जोडलेला असतो. खालचा पृष्ठभाग बृहदांत्र व ग्रहणीवर (लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागावर) टेकल्यासारखा असतो.

(३) ग्रीवा किंवा मान : हा सर्वांत जास्त अरुंद भाग असून पुढच्या भागात वळलेला असून त्यापासून पित्ताशय नलिका निघते. या ठिकाणी म्हणजे पित्ताशय नलिकेची सुरूवात होते त्या ठिकाणी थोडे संकोचन असते. कायेप्रमाणेच ग्रीवा हीच यकृताला अवकाशी ऊतकाने (घटक दूरदूर असल्यामुळे पोकळसर वाटणार्‍या ऊतकाने) चिकटलेली असून या ऊतकातच पित्ताशय रोहिणी बसविलेली असते. ग्रीवेच्या पित्ताशय नलिका सुरू होण्यापूर्वीच्या भागात छोटासा फुगीर भाग असतो. त्याला आर्‌. हार्टमान (१८३१–९३) या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून हार्टमान कोष्ठ म्हणतात.

पित्ताशय नलिका पित्ताशयाच्या ग्रीवेपासून सुरू होते व ती ३ ते ४ सेंमी. लांब असते. ती मागे खाली व डावीकडे वळण घेऊन समाईक यकृत नलिकेस मिळते. पित्ताशय नलिकेच्या आतील श्लेष्मकलास्तराला (बुळबुळीत पातळ अस्तराला) जागजागी घड्या पडलेल्या असतात. अशा एकूण ५ ते १२ घड्या असतात. या घड्यांमुळे सर्पिल झडपेसारखी रचना [ या झडपेला एल्. हिस्टर (१६८३–१७५८)या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून हिस्टर झडप (किंवा सर्पिल झडप) म्हणतात ] होऊन नलिका नेहमी उघडी राहते. त्यामुळे पित्ताशयातील पित्तरस केव्हाही वरून खाली किंवा खालून वर वाहू शकतो.

पित्तरसनलिका किंवा संयुक्त पित्तनलिका ७·५ सेंमी. लांब आणि ६ मीमी. व्यासाची असते. ग्रहणीच्या अवरोही भागाजवळ पित्तरस नलिका आणि अग्निपिंडनलिका एकमेकींजवळ येतात व ग्रहणीच्या भित्तीत शिरताच एकमेकींस जोडल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी जो किंचित फुगीर भाग बनतो. त्याला ‘यकृत-अग्निपिंड कुंभिका’ किंवा ए. फाटर (१६८४–१७५१) या जर्मन शरीररचनाविज्ञांच्या नावावरून ‘फाटर कुंभिका’ म्हणतात. या कुंभिकेचे तोंड ग्रहणीत ज्या छोट्या उंचवट्यावर असते त्याला ‘फाटर पिंडिका’ व तोंडाभोवती पिंडिकेत जो चक्राकार परिसंकोचक स्‍नायू असतो त्याला आर्. ओडी या एकोणिसाव्या शतकातील इटालियन शरीरक्रियाविज्ञांच्या नावावरून ‘ओडी परिसंकोची’ म्हणतात (आ.१).


पित्ताशयाची भित्ती तीन थरांची बनलेली असते : सर्वांत बाहेरचा पर्युदर, मधला स्‍नायू व तंत्वात्मक प्रत्यास्थी (ताण काढून घेतल्यानंतर पुन्हा मूळ स्थितीत येणारे) ऊतक आणि आतला श्लेष्मकलेचा. पर्युदराचा फक्त बुघ्नभागावरच पूर्ण म्हणजे सर्व बाजूंनी थर असतो. काय व ग्रीवा या भागांवर तो फक्त खालच्या पृष्ठभागावर आणि दोन्ही बाजूंवर असतो. पर्युदराच्या खाली अवकाशी ऊतक थर असतो. मधला थर बराच पातळ असतो. आतला थर किंवा श्लेष्मकलास्तर मधल्या थराला काहीसा सैल चिकटलेला असतो. त्याचा रंग पिवळसर करडा असून त्याच्या अनेक छोट्या छोट्या घड्या पडलेल्या असतात. त्यामुळे पित्ताशयाचा आतला भाग मधाच्या पोळ्यासारखा दिसतो. उपकला ओळीने रचलेल्या स्तंभाकार कोशिकांची (पेशींची) असते. या थरामध्ये अनेक केशवाहिन्या (सूक्ष्म रक्तवाहिन्या) विखुरलेल्या असतात. ही एकूण रचना पित्तरसातील पाणी व विद्राव्य (विरघळणारे) पदार्थ रक्तात क्रियाशील अभिशोषणाने शोषिले जाण्यास पूरक अशीच असते.आ. 2. पित्ताशय व पित्तनालिका यांचा आतील भाग : (1) पित्ताशयाचा आतील भाग (2) पित्ताशय नालिका (3) सर्पिल झडप (4) उजवी यकृत नालिका (5) डावी यकृत नालिका (6) समाईक यकृत नालिका (7) पित्तरस नालिका किंवा संयुक्त पित्तनालिका

पित्ताशयाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख रोहिणी ‘पित्ताशय रोहिणी’ असून ती उजव्या यकृत रोहिणीची शाखा असते. पित्ताशय रोहिणीच्या शाखा पित्ताशयाशिवाय यकृत नलिका आणि संयुक्त पित्तनलिकेच्या काही भागास रक्तपुरवठा करतात. पित्ताशयाचे रक्त वाहून नेणार्‍या नीलांमध्ये अनेक फेरफार आढळतात. वरच्या म्हणजे चिकटलेल्या पृष्ठभागाच्या नीला खाचेतून सरळ यकृतात जातात व यकृत नीलांना मिळतात. इतर भागाच्या नीला ग्रीवेजवळ एकत्रित येऊन एक-दोन पित्ताशय नीला तयार होतात व त्याही यकृतातील नीलांना जाऊन मिळतात. क्‍वचितच एक किंवा दोन पित्ताशय नीला सरळ प्रवेशिका नीलेस (आंत्रमार्गातील अशुद्ध रक्त यकृताकडे वाहून नेणार्‍या नीलेस) मिळतात.

पित्ताशयाला अनुकंपी आणि परानुकंपी दोन्ही प्रकारच्या तंत्रिका शाखा               [मज्‍जाशाखा ⟶ तंत्रिका तंत्र ] पुरवठा करतात. उदरगुहीय तंतुजालापासून निघणार्‍या या शाखा यकृत रोहिणी व तिच्या शाखांबरोबरच पित्तमार्गाकडे जातात. पित्ताशयाच्या मधल्या भित्तिथरात स्वायत्त तंतुजाल विखुरलेले असते. उजव्या मध्यपटल तंत्रिकेचे काही तंतू याच मार्गाने पित्ताशयापर्यंत गेलेले असल्यामुळे पित्ताशय विकृतीतील वेदना उजव्या खांद्यात जाणवतात.

पित्ताशयाजवळच्या वाहिन्या व रक्तवाहिन्या यांच्या रचना अनेक प्रकारच्या असल्यामुळे या भागातील शस्त्रक्रिया ( उदा., पित्ताशयोच्छेदन–पित्ताशय संपूर्णपणे काढून टाकणे–) करताना शस्त्रक्रियाविशारदाला फार काळजी ध्यावी लागते.

पित्ताशयाचे कार्य व पित्तरस आंत्रमार्गात येण्याची यंत्रणा : ज्या वेळी ग्रहणीत व वरच्या आंत्रमार्गात अन्न नसते त्या वेळी म्हणजे दोन किंवा तीन अन्नग्रहणांच्या दरम्यान यकृतात सतत तयार होणारा पित्तरस जरूर लागेतोपर्यंत साठवण्याचे कार्य पित्ताशय करते. जवळजवळ ८०० ते १,००० मिलि. पित्तरस दररोज तयार होतो आणि पित्ताशयाची धारणक्षमता फक्त ३० ते ५० मिलि. असल्यामुळे शक्य तेवढा पित्तरस साठवण्याकरिता त्याचे सांद्रण करणारी (तीव्रता वाढविण्याकरिता घटक एकत्रित करणारी) पित्ताशयाची आतली रचना उपयुक्त असते. त्याची धारणक्षमताही चोवीस तासांतील निम्मे उत्पादन साठवण्याइतपत वाढू शकते कारण काही पदार्थ सतत अभिशोषिले जातात. नेहमी प्राकृतावस्थेत (सर्वसाधारण अवस्थेत) जवळजवळ पाच पट सांद्रण होते परंतु ते १० ते १२ पटींनी वाढविण्याची पित्ताशयाची क्षमता असते [  ⟶ पित्तरस ].

पित्ताशयातील पित्तरस ग्रहणीत येण्याकरिता दोन प्रमुख गोष्टींची गरज असते : (अ) ओडी परिसंकोची शिथिल असला पाहिजे व (आ) पित्ताशयाची इतकी जोरदार आकुंचने व्हावयास हवीत की, ज्यामपळे विशिष्ट दाब उत्पन्न होऊन पित्तरस पित्तनलिकेतून खाली ढकलला जाईल. अन्नग्रहणानंतर, विशेषेकरून अधिक वसायुक्त (स्‍निग्ध पदार्थयुक्त) अन्नग्रहणानंतर वरील दोन्ही क्रिया पुढील रीतीने साध्य होतात. (१) अन्नातील वसा व प्रथिने लघ्वांत्रात (लहान आतड्यात) येताच आंत्रश्लेष्मकलास्तरापासून ‘कोलेसिस्टोकिनीन’ नावाचे एंझाइम (जीवनरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारा प्रथिनयुक्त पदार्थ) स्रवू लागते. हा स्राव लघ्वांत्राच्या वरच्या भागातून अधिक स्रवतो. या एंझाइमाचे रक्ताद्वारे अभिशोषण होऊन ते पित्ताशयापर्यंत जाताच त्याचे स्‍नायू आकुंचन पावून पाहिजे तेवढा दाब तयार होतो व त्यामुळे पित्तरस ग्रहणीत ढकलला जातो. (२) जठररसाच्या उत्पादनाच्या मस्तिष्क टप्प्यांमध्ये [ ⟶पचन तंत्र ] प्राणेशा तंत्रिकेतून (मेंदूपासून निघणार्‍या दहाव्या तंत्रिकेतून) जाणारी उद्दीपने किंवा इतर आंत्रात (आतड्याच्या एका भागातील क्रियेमुळे दुसर्‍या भागात होणारी) ⇨ प्रतिक्षेपी क्रिया पित्ताशयाची सौम्य आकुंचने उत्पन्न करतात व त्यामुळे  पित्तरस ग्रहणीत जाण्यास मदत होते. (३) जेव्हा पित्ताशय भित्ती आकुंचन पावते तेव्हाच ओडी परिसंकोची शिथिल पडतो. हा परिणाम पित्ताशयापासून उत्पन्न होणार्‍या तंत्रिकाजन्य किंवा स्‍नायुजन्य प्रतिक्षेपी क्रियेमुळे होत असावा. अंशत: परिणाम कोलेसिस्टोकिनिनाच्या ओडी परिसंकोचीवर होणार्‍या प्रत्यक्ष परिणामाचाही भाग असावा. (४) ग्रहणीत अन्न येताच ग्रहणी भित्तीच्या हालचाली (क्रमसंकोच) वाढतात. क्रमसंकोच तरंग जेव्हा ओडी परिसंकोचीच्या स्थानी येतात तेव्हा तो शिथिल पडून पित्तरस ग्रहणीत फवारल्यासारखा फेकला जातो.

सारांश, पित्ताशयातील सांद्रित पित्तरस कोलेसिस्टोकिनिनाच्या चेतावणीनुसार वेळोवेळी ग्रहणीत फेकला जातो.


पित्ताशयचित्रण : उदरगुहेच्या साध्या क्ष-किरण चित्रणात पित्ताशय दिसत नाही कारण ते क्ष-किरणांना अपारदर्शी नसते. यकृताचा पित्तरसातून काही पदार्थ उत्सर्जित करण्याचा गुणधर्म आणि पित्तशयाचा पित्तरस साठविण्याचा व तो सांद्रित करण्याचा गुणधर्म यांचा उपयोग करून पित्ताशयाचे क्ष-किरण चित्रण करणे शक्य झाले आहे. १९२४ मध्ये ई. ए. ग्रेअम आणि डब्‍ल्यू. एच्. कोल या शास्त्रज्ञांनी पित्ताशयाचे क्ष-किरण चित्रण प्रथम साध्य करून दाखवून पित्तमार्गाच्या रोगनिदानाचे किंबहुना क्ष-किरण निदानाचे नवे पर्व सुरू केले. त्याकरिता त्यांनी आयोडाइडयुक्त कार्बनी रंजकाचा उपयोग केला होता. आज आयडॉप्‍थॅलीन, फिनिओडोल, आयसोपॅनोइक अम्‍ल, आयोडिपामाइड यांसारखी अनेक आयोडिनयुक्त संयुगे वापरात आहेत. ती तोंडाने किंवा नीलेतून अंत:क्षेपणाने (इंजेक्शनाने) देता येतात. ही संयुगे पित्तातून उत्सर्जित होतात व पित्ताशयात पित्तरसाबरोबर सांद्रित केली जातात आणि ती अपारदर्शी असल्यामुळे पित्ताशयाचा आकार, विस्तार व हालचाल क्ष-किरण चित्रणात स्पष्ट दिसतात. आंत्रमार्गातून ही रंजके अभिशोषित झाल्यानंतरही जर क्ष-किरण चित्रणात पित्ताशय दिसले नाही, तर पित्ताशय नलिकारोध किंवा पित्ताशय कर्कशीभवन (चिरकारी शोथामुळे भित्ती कठीण बनून पित्तरसाचे नेहमीप्रमाणे सांद्रण न होणे) यासारखी विकृती असल्याचे निदान करता येते.

सोडियम आयोडिपामाइड हे रंजक पित्तमार्गातून जाताना त्याचे सांद्रण न होताही क्ष-किरण चित्रणात सहज दिसू शकेल. ते नीलेतून अंत:क्षेपणाने देऊन पित्तवाहिनीचित्रण व पित्ताशयचित्रण या दोन्ही तपासण्या करता येतात. हे रंजक निरनिराळ्या पद्धतींनी वापरता येते व त्यामुळे पद्धतीनुसार निरनिराळे पित्तवाहिनीचित्रणाचे प्रकारही प्रचलित आहेत. यांपैकी काही अती धोकादायक असून अनिवार्य ठरल्यासच वापरतात. यकृतकार्य प्राकृतिक असल्यास व रक्तद्रवातील पित्तरुणाचे प्रमाण प्रतिशत २ मिग्रॅ.पेक्षा कमी असल्यास आयोडिपामाइड मिथिलग्‍लुकामाइन (बिलिग्रॅफीन) नावाच्या रंजकामुळे उत्तम क्ष-किरण चित्रण मिळते. पित्तमार्गावरील शस्त्रक्रिया चालू असतानाच कधीकधी पित्तवाहिन्यांचा खुलेपणा स्पष्ट दिसण्याकरिता क्ष-किरण चित्रणाचा उपयोग करावा लागतो. त्याकरिता डायोडोन हे क्ष-किरणांना अपारदर्शी असलेले अक्षोभक संयुग यकृतबाह्य वाहिन्यांत अंत:क्षेपणाने देतात.

पित्ताशयचित्रण आणि पित्तवाहिनीचित्रण यांच्या तंत्रात बर्‍याच सुधारणा झाल्या असून शस्त्रक्रियापूर्व क्ष-किरण तपासणीप्रमाणे शस्त्रक्रिया चालू असतानाच आणि शस्त्रक्रिया-पश्च म्हणजे शस्त्रक्रिया संपताच शस्त्रक्रियाविशारदाला संपूर्ण पित्तमार्गाचे विशेषेकरून यकृतबाह्य पित्तवाहिन्यांचे दर्शन होणे सहज शक्य झाले आहे.

विकार : पित्ताशयाच्या विकारांमध्ये पित्ताशयशोथ (पित्ताशयाची दाहयुक्त सूज) व पित्ताश्मरी हे दोन महत्त्वाचे विकार असून कर्करोग व इतर अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणार्‍या व शरीरक्रियेस निरूपयोगी असणार्‍या गाठी) हे त्या मानाने कमी महत्त्वाचे विकार आहेत. यांशिवाय अपघाताने किंवा पित्ताश्मरी फार मोठा झाल्याने पित्ताशय फाटणे किंवा त्यास भेक पडणे असे अगदी क्‍वचित दिसणारे विकार आहेत, ‘पित्ताश्मरी’ या विषयावर स्वतंत्र नोंद हे. प्रस्तुत नोंदीत पित्ताशयशोथाविषयी माहिती दिली आहे.

पित्ताशयशोथ : पित्ताशयशोथाचे दोन प्रकार आढळतात : (१) तीव्र आणि (२) चिरकारी (दीर्घकालीन).

तीव्र पित्ताशयशोथ : पित्ताशयातील पित्तरसाच्या निर्गममार्गात अडथळा किंवा रोध उत्पन्न झाल्यास या प्रकारचा पित्ताशयशोथ होतो. ९० ते ९६ % रोग्यांमध्ये पित्ताश्मरी पित्ताशयाच्या ग्रीवेतील भागात किंवा पित्ताशयनलिकेत अडकून पडलेला आढळतो. या अडथळ्यामुळे पित्तरस व इतर स्राव (श्लेष्मा) साचत जातात. त्यातील पित्तलवणे पित्ताशय भित्तीवर दुष्परिणाम करतात. संचयामुळे पित्ताशयाचे आकारमान हळूहळू वाढत जाते व परिणामी भित्तीच्या रक्तपुरवठ्यातच व्यत्यय येतो. क्‍वचित वेळा पित्ताशय नलिकेला पीळ पडणे, घडी पडणे वा मुडपणे ही तिच्या रोधाला कारणीभूत असतात. कधीकधी अग्निपिंडरसातील एंझाइमे पित्तमार्गात प्रत्यावर्तित झाल्यामुळे (जोराने परत आल्यामुळे) तीव्र पित्ताशयशोथ उद्‌भवतो. ही एंझाइमे पित्तरसामुळे कार्यान्वित होऊन ‘रासायनिक’ पित्ताशयशोथ उत्पन्न करतात.

केवळ सूक्ष्मजंतु-संक्रामणामुळेच उद्‌भवणारा पित्ताशयशोथ सहसा उद्‌भवत नाही. ज्या काळात ⇨ आंत्रज्वर (टायफॉइड ज्वर) अधिक प्रमाणात आढळत होता त्या काळात या रोगाच्या ०·२ ते १ % रोग्यांमध्ये तीव्र पित्ताशयशोथ नेहमी आढळत असे. क्‍लोरँफिनिकॉल या आंत्रज्वरावरील गुणकारी औषधाच्या वापरानंतर पित्ताशयशोथाचे प्रमाण शून्यावर आले आहे. केवळ सूक्ष्मजंतुजन्य पित्ताशयशोथाला ‘अश्मरीहीन पित्ताशयशोथ’ म्हणतात.

तीव्र पित्ताशयशोथामध्ये सूक्ष्मजंतु-संक्रामण नेहमी दुय्यम प्रकारचे असते म्हणजे अगोदर शोथ उत्पन्न होतो व नंतर  सूक्ष्मजंतु-संक्रामण होते.

रोगलक्षणांमध्ये उदरगुहेच्या उजव्या वरच्या भागात तीव्र वेदना होणे, मळमळणे, उलट्या, ज्वर आणि अत्यल्प प्रमाणात कावीळ उद्‌भवणे यांचा समावेश होतो. वेदना रात्रीच्या शेवटच्या प्रहरी वा पहाटेस बहुतकरून जडान्न सेवनानंतर सुरू होतात व हळूहळू वाढत जातात. वेदना सुरू झाल्यानंतर न थांबता सारख्या चालूच राहतात. कधीकधी उजवा खांदा किंवा पाठीची उजवी व वरची बाजू येथेही वेदना जाणवतात. थंडी वाजून ताप येतो. कावीळ २०% रोग्यांमध्ये आढळते. उजव्या बरगडीखाली तपासणाऱ्याने दाबून धरले असताना व रोग्याला खोल श्वास घेण्यास सांगितल्यास श्वास घेत असताना कळ येऊन क्षणभर श्वसन बंद पडते. या लक्षणाला जे. बी. मर्फी (१८५७–१९१६) या अमेरिकन शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून ‘मर्फी लक्षण’ म्हणतात. तपासणाऱ्याच्या हाताला नेहमी न लागणारे यकृत किंचितसे वाढून त्याची कड लागते व तेथे दाबल्यास दुखते.

निदानाकरिता कधीकधी साधे क्ष-किरण चित्रण उपयुक्त ठरते. उदरगुहेच्या अशा साध्या चित्रणात क्ष-किरणांना अपारदर्शी असणारे अश्मरी स्पष्ट दिसू शकतात. नीला अंत:क्षेपणाने क्ष-किरण वाहिनी–चित्रण करणे अत्यंत उपयुक्त असते. अपारदर्शी औषध पित्ताशयात साचून ते स्पष्ट दिसल्यास तीव्र पित्ताशयशोथ नसल्याचे समजले जाते. फक्त वाहिन्या औषधाने भरलेल्या दिसणे परंतु पित्ताशय अजिबात न दिसणे हे तीव्र पित्ताशयशोथाचे खात्रीचे लक्षण समजतात.

व्यवच्छेदक (निराळेपणा ओळखण्याच्या) निदानामध्ये तीव्र अग्‍निपिंडशोथ, तीव्र आंत्रपुच्छशोथ (अँपेंडिसायटीस) आणि पचनज व्रणाचे छिद्रण (पचनज व्रण) या विकृतींचा समावेश होतो. उपद्रवांमध्ये (अनुषंगाने होणाऱ्या इतर विकारांमध्ये) तीव्र पित्ताशयकोथ (ग्रस्त भागाचा मृत्यू होऊन तो सडू लागणे), पूयपित्ताशय (पित्ताशयात पू साचणे), पित्ताशय छिद्रण इत्यादींचा समावेश होतो.

चिकित्सेकरिता रोग्यास रुग्णालयात दाखल करणे जरूर असते कारण रोगाचा क्रम अनिश्चित स्वरूपाचा असतो. वेदना, उलट्या, मळमळ यांवर योग्य इलाज ताबडतोब सुरू केल्यास आणि रोगस्वरूप सौम्य असल्यास काही दिवसांतच रोग्यास आराम पडतो. सूक्ष्मजंतुसंक्रामणाची शक्यता असल्यास टेट्रासायक्‍लीन, क्‍लोरँफिनिकॉल किंवा अँम्पिसिलीन यांसारखी प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देतात. रोग्यास चांगले बरे वाटल्यानंतर ४ ते ६ आठवड्यांनंतर तोंडाने औषधे देऊन पित्ताशयचित्रण करता येते. अशा तपासणीत पित्ताशय न दिसल्यास किंवा पित्ताश्मरी आढळल्यास रोग्यास ऐच्छिक शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगतात. कारण रोग पुन्हा उद्‍भवून तीव्र उपद्रव होण्याचा संभव नेहमीच असतो.


वरील औषधोपचारानंतरही ३६ ते ४८ तासांनंतर रोगाचा जोर कमी न झाल्यास ज्वर, वेदना आणि रक्तातील पांढऱ्या कोशिकांची वाढ होत असल्याचे आढळल्यास निकडीची शस्त्रक्रिया करावी लागते. रोगाच्या तीव्रतेनुसार पित्ताशयोच्छेदन किंवा पित्ताशय छिद्रीकरण प्रथम करून नंतर त्याचे उच्छेदन करणे या शस्त्रक्रियांचा अवलंब करतात.

चिरकारी पित्ताशयशोथ : तीव्र पित्ताशयशोथानंतर पुष्कळ वेळा चिरकारी पित्ताशयशोथ उत्पन्न होतो परंतु हा विकार नकळत उत्पन्न होतो. त्याबरोबरच पुष्कळ वेळा पित्ताश्मरी असतातच किंबहुना ‘पित्ताश्मरीहीन चिरकारी पित्ताशयशोथ’असूच शकत नाही, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बॅसिलस टायफोसस आणि साल्मोनेला पॅराटायफाय हे सूक्ष्मजंतू कधीकधी या विकारास कारणीभूत असतात. अलीकडे चिरकारी पित्ताशयशोथ ही संज्ञा पित्ताश्मरी, सूक्ष्मजंतु-संक्रामण किंवा कोलेस्टेरॉलाचा निक्षेप (संचय) यांपैकी कोणत्याही कारणाने उद्‌भवणाऱ्या चिरकारी पित्ताशयशोथाला मिळून वापरतात.

या विकृतीत पित्ताशयाचे संकोचन होते व त्याच्या भित्ती जाड व कधीकधी कॅल्सिभूत (कॅल्शियमाची लवणे साचून कठीण होणे) होतात. पित्तरस गढूळ बनून त्यात पैत्तिक पातळ चिखलासारखा पदार्थ मिश्रित असतो. एक किंवा अधिक पित्ताश्मरी हमखास आढळतात. रोगलक्षणे अनिश्चित स्वरूपाची असतात. सर्वसाधारणपणे अपचन हे लक्षण नेहमी आढळते. अधिजठर भागातील अस्वस्थता किंवा फुगल्यासारखे वाटणे (विशेषेकरून वसायुक्त अन्नसेवनानंतर) आणि ढेकर आल्यानंतर काही काळ आराम पडणे, उदरवायू तयार होणे, हृद्‌ दाह (छातीच्या पुरोहृद्‌ भागात किंवा उरोस्थीच्या मागे जळजळणे) इ. लक्षणे आढळतात. पित्ताशय जेथे असते तो उदरभाग हाताने दाबून पाहिल्यास वेदना होतात व ‘मर्फी लक्षण’ मिळते. रोगनिदानाकरिता उदरगुहेचे साधे क्ष-किरण चित्रण किंवा पित्ताशयचित्रण उपयुक्त असते.

चिकित्सेमध्ये केवळ औषधी उपचारांचा अवलंब जेव्हा रोगनिदान अनिश्चित असते तेव्हा किंवा शस्त्रक्रियाविरोधी लक्षणे आढळल्यास करतात. औषधी उपचार केवळ उपशामक असतात व रोगी कधीच बरा होत नाही. योग्य वेळी पित्ताशयोच्छेदन शस्त्रक्रिया करणे हितावह असते.

संदर्भ : 1.Beeson, P. B. McDermott, W., Ed. Textbook of Medicine, Philadelphia, 1975.

   2. Davidson, S. MacLeod, J., Ed. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1971.

   3. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1976.

   4. Vakil, R. J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.

   5. Warwick, R. Williams, P. L., Ed. Gray’s Anatomy, Edinburgh, 1973.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.