म्हैस : सस्तन प्राण्यांच्या समखुरी गणाच्या (ज्यांच्या प्रत्येक पायावरील खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या गणाच्या आर्टिओडॅक्टिला गणाच्या) गोकुलातील (बोव्हिडी) बोव्हिनी उपकुलात म्हशीचा समावेश होतो. या उपकुलातील बॉस प्रजातीमध्ये टॉरिन (वशिंड असलेली व नसलेली गाईगुरे), बिबोव्हाइन (गवा किंवा गौर, गयाळ, बानटिंग), बिसोंटिंन (याक, यूरोपातील बायसन व अमेरिकेतील बायसन), लेप्टोबोव्हाइन (डोक्याच्या मध्यभागी उंचवटा असलेल्या गाईगुरांचे पूर्वज-आता नामशेष) व ब्यूबॅलिन (रानटी व पाळीव म्हशी) या उपप्रजातींचा समावेश होतो. या उपप्रजातींपैकी टॉरिन, बिबोव्हाइन व बिसोंटिन या उपप्रजातींतील काही प्राण्यांचे संयोग सफल झाले आहेत उदा., वशिंड नसलेली गाईगुरे व अमेरिकन बायसन यांपासून कॅटलो आणि याक व वशिंड असलेल्या गाईगुरांपासून गलँग. मात्र म्हशीचा समावेश ज्या ब्यूबॅलिन उपप्रजातीत करतात त्या उपकुलातील प्राण्यांचा संयोग सफल होऊ शकलेला नाही. याचे कारण म्हशीच्या शरीरातील कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) फक्त ४८ गुणसूत्रे (एका पिढीतून पुढच्या पिढीत आनुवंशिक गुणधर्म नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) असतात, तर इतर उपगणातील प्राण्यांच्या कोशिकेत ६० गुणसूत्रे असतात. म्हणूनच आर्. माग्रेगर (१९४१) यांच्या मते म्हशीचा अंतर्भाव बॉस प्रजातीमध्ये न करता बफेलस या नावाने निराळी प्रजाती मानणे योग्य होईल. तथापि शास्त्रीय लेखनात पाळीव म्हशीचा उल्लेख ब्यूबॅलस ब्यूबॅलीस या नावाने केला जातो.

सहाव्या शतकामध्ये मध्य यूरोपातून आलेल्या रानटी टोळ्यांच्या आक्रमणाबरोबर इटलीमध्ये म्हशींचा प्रवेश झाला. त्या वेळी तिला ब्यूबॅलस हे नाव उत्तर आफ्रिकेतील एका हरिणाच्या जातीवरून देण्यात आले. ब्यूबॅलस या शब्दाचे बफेलो हे इंग्रजी भ्रष्टरूप झाले. अमेरिकेचा शोध लागल्यावर तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो म्हणण्यात येऊ लागले. त्या वेळी आशियातील म्हशींची अलगता दाखविण्यासाठी बफेलो या शब्दामागे तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावण्यात येऊ लागला. अमेरिकेतील बायसन पशूंना सामान्यपणे बफेलो म्हणून संबोधिले जाते परंतु वास्तविकपणे हे प्राणी म्हशी नाहीत.

उत्त्पती व इतिहास : म्हशीच्या उत्पत्तीचा इतिहास तितकासा स्पष्ट नाही. यूरोपातील उत्खननात रवंथ करणाऱ्या प्राण्यांतील हरिणासारख्या प्राण्यांचे एक ते अडीच कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळातील जीवाश्म (शिळारूप अवशेष) मिळालेले आहेत पण या काळात गाय, शेळी व मेंढी या प्राण्यांचा काहीच विकास झाला असल्याचे दिसत नाही. त्यामानाने हे प्राणी अलीकडीलच होत. उत्तर भारतामधील शिवालिक टेकड्यांमध्ये सापडलेल्या प्लायोसीन काळातील (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) जीवाश्मांचा भारतीय वन्य म्हशीं (आरनी) आणि टॅमॅरो व ॲनोआ या म्हशींच्या असलेल्या साम्यावरून म्हशींच्या उत्पत्तीबाबत संगती लावता येते. हल्ली अस्तित्वात असलेल्या वन्य म्हशींच्या चार जातींपैकी–भारतीय वन्य म्हैस आरनी (ब्यू. आरनी), फिलीपीन्समधील मिंडोरो बेटावरील टॅमॅरो (ब्यू. मिंडोरेन्सीस), इंडोनेशियातील सूलावेसी बेटावरील ॲनोआ अथवा सेलेबीझ (ब्यू. डिप्रेसीकॉर्निस) या तीन जातींची उत्त्पती भारताच्या ईशान्य भागामध्ये (आसाम-नेपाळ) असलेल्या रानटी म्हशीपासून झाली असावी, असे त्यांच्यामध्ये आढळून येणाऱ्या साम्यावरून दिसून येते. आफ्रिकेतील वन्य म्हैस (ब्यू. काफेर) या जातीची उत्पत्ती मात्र बॉस अँटिक्वस या आता नामशेष झालल्या पण इतिहासपूर्व काळामध्ये अल्जेरियापासून केप भागापर्यत आफ्रिका खंडात अस्तित्वात असलेल्या जातीपासून झाली असावी, असे आर्. लिडेकर याचे मत आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते आफ्रिकन म्हैस ही आशियातील रानटी जातीपेक्षा बरीच वेगळी असल्यामुळे तिची सिन्‌सेरस अशी निराळी प्रजाती मानणे व तिचा शास्त्रीय उल्लेख सिन्‌सेरस काफेर असा करणे उचित होईल. ब्यूबॅलससिन्‌सेरस या दोन प्रजातींतील म्हशींमध्ये खालील फरक आढळून येतात. ब्यूबॅलस प्रजातीतील म्हशींच्या पाठीच्या मध्यभागातील आणि पुठ्ठ्यापासून मानेपर्यंत केस पुढे वळलेले असतात, तर सिन्‌सेरस प्रजातीतील म्हशींमध्ये ते मागे वळलेले असतात. ब्यूबॅलस म्हशींचे (आशियातील म्हशींचे) कान त्यामानाने लहान असतात आणि कवटी लांबट व चिंचोळी असते, शिंगे कमी जाड असतात तर अफ्रिकन म्हशींचे कान मोठे व लोंबते, कवटी आखूड व रुंद आणि शिंगे बुंध्यामध्ये जाड व वजनदार असतात. वर उल्लेखिलेल्या चार रानटी म्हशींच्या पैकी फक्त भारतीय रानटी म्हैस तेवढी माणसाळली गेली व तिच्यापासून अस्तित्वात आलेल्या अनेक जातींचा भारतामध्ये, तसेच पाकिस्तानात आणि जगामध्ये अनेक देशांत प्रसार झाला. इतर तिन्ही जातींच्या म्हशी आजतागायत रानटी अवस्थेत आहेत. त्या जातींचा व माणसाळलेल्या म्हशींचा संयोग होऊ शकतो की काय याविषयी काही माहिती उपलब्ध नाही.

म्हैस हा प्राणी निश्चितपणे केव्हा आणि कोठे माणसाळविण्यात आला याविषयी खात्रीलायक पुरावा उपलब्ध नाही. पुरातत्त्वविद्येच्या अभ्यासामध्ये सापडलेल्या पुराव्यांवरून इ. स. पू. २५०० ते ३००० वर्षांपूर्वी भारतामध्ये व त्यानंतर १००० वर्षांनी चीनमध्ये त्या माणसाळल्या गेल्या असाव्यात, असे अनुमान निघते. काहींच्या मते चीन मधील माणसाळलेल्या म्हशी भारतातूनच गेल्या असाव्यात व त्यांतील काही जंगलात पळून गेल्यावर पुन्हा रानटी झाल्या. उत्तर श्रीलंकेमध्ये आढळणाऱ्या वन्य म्हशींच्या बाबतीत असेच घडले असावे तथापि चीनमधील म्हशी दलदलवासी आहेत व भारतामधील नदीवीसी आहेत, हे विचारात घेता हे शक्य वाटत नाही. याउलट चीनमध्ये माणसाळलेल्या म्हशींचा थायलंड, कंबोडीया, व्हिएटनाम आणि पॅसिफिक समुद्रातील इतर बेटांवर प्रसार झाला असावा. वायव्य सरहद्दीकडून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांतील लोकांना म्हैस हा प्राणी माहीत नसावा पण सिंधू संस्कृतीतील (इ. स. पू. २५००–१५००) लोकांना वन्य व माणसाळलेल्या म्हशी माहीत असाव्यात. दिल्ली येथील वस्तुसंग्रहालयात त्या काळच्या एका स्मृतिचिन्हावर म्हशीचे चित्र आहे.

असे असले, तरी इ. स. पू. ४००० वर्षांपूर्वीच्या काळामध्येही भारताखेरीज अन्य देशांत पाळीव म्हशी अस्तित्वात असाव्यात, असाही एक मतप्रवाह आहे. मध्यपूर्वेकडील देशांमध्ये, आफ्रिकेमध्ये व यूरोपातील काही देशांमध्ये पाळीव म्हशी भारतातून गेल्या असाव्यात असे मानण्यात येत असले, तरी अलीकडे मेसोपोटेमिया (हल्लीचा इराक, सिरिया व तुर्कस्तानचा दक्षिणेकडील भाग) व इराण येथील उत्खननांत सापडलेल्या अकेडीअन राजघराण्याच्या (इ. स. पू. २५०० ते २१००) मुद्रेवर नदीवर दोन म्हशींना पाणी पाजले जात आहे असे चित्र आहे. यावरून कदाचित वन्य म्हशीपासून माणसाळविण्यात आलेल्या म्हशी या वेळी या भागात असाव्यात, असे अनुमान निघते. तथापि भारतामधील पाळीव म्हशींच्या जाति-वैशिष्ट्यांची छाप कुठल्याना कुठल्या रीतीने जगातील सर्व पाळीव म्हशींमध्ये आढळून येते, हे लक्षात घेता भारताच्या ईशान्येकडील (आसाम, नेपाळ) या भागातील आरनी या रानटी म्हशी व दक्षिण चीनमधील वन्य म्हशी या जगात आज आढळणाऱ्या सर्व म्हशींचे पूर्वज असावेत, असा निष्कर्ष निघतो.


वैदिक वाङ्‍मयामध्ये जागोजागी गाईचा उल्लेख आहे तसा म्हशीचा आढळत नाही. पुराणात मात्र म्हशीचा उल्लेख आहे. यमाचे वाहन रेडा आहे व दुर्गादेवीने रेड्याच्या रूपातील महिषासुराचा वध केल्याचे वर्णन आहे. कौटिल्यांच्या अर्थशास्त्रामध्ये (इ. स. पू. चौथे शतक) गाईंच्या दुधापेक्षा म्हशीच्या दूधापासून १/५ पट अधिक तूप होऊ शकते, असे लिहिले आहे. आंध्र प्रदेशातील काही शिल्पांमध्ये म्हशींचा उपयोग मोठाले दगडी खांब ओढण्यासाठी केला जात आहे, असे दाखविले आहे (म्हशींचा असा उपयोग ३००० ते ४००० वर्षांपूर्वी केला जात होता). इ. स. तेराव्या शतकापर्यंत म्हशींचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला होता. मार्को पोलो या इटालियन प्रवाशांनी (इ. स. १२८९–९३) भारतामध्ये केलेल्या प्रवासाच्या वर्णनामध्ये म्हशीच्या कातड्याचा उल्लेख आहे.

प्राचीन तमिळ वाङ्‍मयात पाळीव म्हशींचा उल्लेख आहे पण वन्य म्हशींचा नाही. भारतीय वन्य म्हशी नेपाळ, गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या खोऱ्यांतून पूर्व आसाममापासून उत्तर प्रदेशापर्यंतच्या भागात म्हणजे बिहार, बंगाल व ओरिसा या राज्यांमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या काळातही बऱ्याच संख्येने होत्या. दक्षिण भारतामध्ये त्या नव्हत्या असे दिसते. जे. फिशर यांच्या अंदाजाप्रमाणे १९६५ च्या सुमारास या म्हशींची संख्या २,००० च्या आसपास असावी.

वर्गीकरण : शरीराच्या ठेवणीतील काही वैशिष्ट्ये व परिस्थितीकीय गरजा लक्षात घेऊन माग्रेगर यांनी पाळीव म्हशींचे नदीवासी म्हशी (रिव्हर बफेलो) व दलदलवासी म्हशी (स्वॅम्प बफेलो) असे दोन वर्ग केले आहेत. सर्वसाधारणपणे १५० ते २०० सेंमी. व त्यापेक्षा अधिक पाऊस पडणाऱ्या उष्ण कटिबंधातील दमट हवामान असलेल्या प्रदेशात ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएटनाम, कंबोडिया, चीन, मलेशिया, इंडोनेशिया व फिलिपीन्स या देशांत दलदलवासी म्हशी आढळून येतात. श्रीलंकेमधील म्हशीही दलदलवासीच आहेत पण एम्. फहिमुद्दीन यांच्या मताप्रमाणे त्या नदीवासीच आहेत, कारण त्यांच्या अंगावर दलदलवासीपेक्षा अधिक केस असतात. भारत, पाकिस्तान व मध्यपूर्वेकडील त्यामानाने कमी पाऊस असलेल्या कोरड्या हवामानातील देशांमध्ये नदीवासी म्हशी प्रामुख्याने दिसून येतात. तमिळनाडूमध्ये काही भागांमध्ये दलदलवासी म्हशी आढळून येतात. भारत आणि ब्रह्मदेश यांना विभागणाऱ्या पर्वतराजींच्या पूर्वेकडील प्रदेशात दलदलवासी व पश्चिमेकडील प्रदेशात नदीवासी अशी ढोबळ प्रादेशिक विभागणी करता येईल. शरीराची ठेवण, आकारमान, शिंगांची रचना इ. काही बाबतींत दोन्ही वर्गांमधील वेगळेपण स्पष्ट असले, तरी जीववैज्ञानिकदृष्ट्या या भिन्न जाती नाहीत, हे एकाच जातीचे दोन प्रकार आहेत.

दलदलवासी म्हशींच्या त्वचेचा रंग जन्माच्या वेळी करडा असतो पण पुढे दगडी पाटीसारखा फिकट काळा होतो तर नदीवासींचा काळाभोर असतो. तसेच या म्हशींच्या अंगावरील पांढऱ्या केसांचे बुंदके (मोठे ठिपके) सामान्यतः कपाळावर, चेहऱ्यावर व शेपटीच्या गोंड्यामध्ये असतात. दलदलवासीमध्ये असे बुंदके घुटण्याच्या व ढोपराच्या खाली, जबड्याखाली व मानेच्या खालच्या टोकाला असतात. सामान्यपणे ५% दलदलवासी म्हशींचा रंग करडा असतो. दलदलवासी म्हशींची शिंगे बाजून उगवतात व आडवी वाढून नंतर वयाप्रमाणे अर्धगोलाकार वळण घेतात परंतु सर्वसाधारणपणे कपाळाच्या रेषेतच असतात. नदीवासी म्हशींची शिंगे उगवताच खाली व मागे वळलेली व वयोमानाप्रमाणे पुन्हा वर चढल्यासारखी पण सर्वसाधारणपणे शरीराशी आडव्या समांतर रेषेतच वाढतात. दलदलवासी म्हशी माजावर आल्या असताना दंगेखोर बनून दुसऱ्या म्हशीवर चढतात. नदीवासी त्यामानाने अगदीच शांत रहातात, त्यामुळे माजावर आलेली म्हैस ओळखणे कठीण होते. दलदलवासी म्हशींना चिखल प्रिय आहे तर नदीवासींना पाणी. दलदलवासींचा मुख्यत्त्वे भातशेतीच्या कामासाठी उपयोग करतात. दुग्धोत्पादनाच्या धंद्यासाठी त्यांचा फारसा उपयोग करीत नाहीत. याउलट नदीवासी प्रामुख्याने दुग्धोत्पादनासाठीच पाळल्या जातात. दलदलवासी व नदीवासी म्हशी यांचा संयोग फलदाई होत नाही, असा चुकीचा समज आहे. फिलिपीन्स, थायलंड, मलेशिया व इंडोनेशिया या देशांमध्ये दलदलवासी म्हशींचा नदीवासी जातीच्या (मुरा इ.) रेड्यांशी संयोग करून दुग्धोत्पादन वाढ करण्याच्या दृष्टीने संकरित म्हशींची पैदास करण्याचे चालू आहेत. संकरित म्हशी दुग्धोत्पादन व शेतकाम या दोन्ही गुणांमध्ये स्थानिक दलदलवासी म्हशींपेक्षा सरस असल्याचे दिसून आले आहे.

संख्या व भौगोलिक प्रसार : विषुववृत्ताच्या दक्षिण व उत्तरेच्या ३०° अक्षांशांमधील प्रदेशात जगातील ८०% म्हशींची संख्या विखुरलेली आहे. प्रायः उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील हा प्राणी आहे. जागतिक अन्न व शेती संघटनेच्या १९८२ च्या अहवालानुसार जगातील म्हशींची संख्या १२·२ कोटी आहे. यातील यूरोपमध्ये ४·४ लाख, रशिया ३·३ लाख, लॅटिन अमेरिका ५·७८ लाख, मध्यपूर्वेकडील देशांमध्ये ३९·१२ लाख, तर भारत, पाकिस्तान, चीन व पूर्वेकडील देशांमध्ये ११·८३ कोटींच्या आसपास (९२%) याप्रमाणे विभागलेली आहे. जगातील म्हशींची निम्मी संख्या (६·२० कोटी) भारतामध्ये आहे. त्याखालोखाल १·८३ कोटी म्हशी चीनमध्ये व १·४६ कोटी पाकिस्तान व बांगलादेशामध्ये आहेत. रशियामधील म्हशी मुख्यत्वे आझरबैजान या प्रजासत्ताकामध्ये आहेत व त्यांची संख्या १९५० नंतर वाढतच आहे. लॅटिन अमेरिकेतील बहुसंख्य म्हशी ब्राझीलमधील मॅराझो बेटावर असून त्या मुख्यत्वे दूध व मांस यांकरिता पाळल्या जातात. येथे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रथमतः त्यांची आयात करण्यात आली. तसेच यूरोपातील बल्गेरिया, ग्रीस, रूमानिया व यूगोस्लाव्हिया या देशांतही म्हशींचा प्रसार गेल्या एकदोन शतकांतच झाला असावा. स्थलांतर करून ऑस्ट्रेलियामध्ये राहण्यास आलेल्या लोकांना मांसाचा पुरवठा करण्याकरिता इंडोनेशियामधून १८२४ च्या सुमारास दलदलवासी म्हशींची प्रथमतः आयात करण्यात आली परंतु त्या तेथे रुळू शकल्या नाहीत, परिणामी त्यांना जंगलात सोडून देण्यात आले व डब्ल्यू. आर्. क्रॉक्रिल यांच्या अंदाजाप्रमाणे आजमितीला उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये अशा २ लाख म्हशी अस्तित्वात असाव्यात.

इंग्लंडमध्ये तिसऱ्या हेन्रींचे भाऊ अर्ल ऑफ कॉर्नवॉल यांनी म्हशी पाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. यूरोपमधील काही देशांमध्ये म्हशींची संख्या १९५० नंतर वाढत असल्याचे दिसून आले आहे.

वैशिष्ट्ये : म्हशीचे हाडपेर गाईंच्या मानाने मोठे असून शरीरयष्टी धिप्पाड असते. धडाचा आकार पिंपासारखा फुगीर व भरीव दिसतो. शिंगांचा आकार तलवारीप्रमाणे किंवा विळ्याप्रमाणे असून त्यांची लांबी व वळण ही जातिवैशिष्ट्याप्रमाणे निरनिराळी असतात. शिंगे चपटी, जाड व वजनदार असतात व त्यांचा आडवा छेद त्रिकोणी दिसतो. ती कपाळाच्या बाजूने उगवलेली असतात. वशिंड गाईप्रमाणे स्पष्ट व उठावदार असत नाही कारण म्हशींच्या या भागातील मणक्यांची उंची कमी असते. मात्र वशिंडाची लांबी अधिक असते. म्हशीला फारशी कंबळ (मानेची पोळी) असत नाही. तिचे दंत्यसूत्र २ (कृं ०/३, सु ०/१, उदा ३/३, दा ३/३) = ३२ असे गाईप्रमाणेच आहे [→ दात].  


सामान्यतः म्हशींचा रंग काळा किंवा गर्द करडा असतो परंतु ईजिप्तमधील काळ्याभोर रंगापासून थायलंडमधील पांढऱ्या पिंगट रंगापर्यंतच्या अनेक रंगांच्या छटा आढळतात. त्वचेचा रंगही सामान्यपणे काळाच असतो. चीन, थायलंड, फिलिपीन्स, इंडोनेशिया या देशांतील दलदलवासी म्हशींची त्वचा विवर्ण असते. ही विवर्णता खरीखुरी रंजकहीनता नव्हे, तर ती जीनांच्या (गुणसूत्रामधील आनुवंशिक घटकांच्या एककांच्या) अप्रकट गुणधर्मांमुळे आहे असे मानतात. त्वचेचा रंग व केसांचा रंग यांवर सूर्यापासून येणाऱ्या उष्णतेचे शोषण अवलंबून असते. भारतातील म्हशींचा रंग काळा असतो. काही भुऱ्या रंगाच्या म्हशी आढळतात. काळ्या रंगाच्या म्हशी सूर्याच्या उष्णतेचे शोषण जास्त प्रमाणात करतात. भारतातील मुरा जातीच्या म्हशींचा रंग त्यांना घरात बांधून ठेवल्यास तांबूस दिसू लागतो व पुन्हा उन्हात सोडल्यास पूर्वीसारखा काळा होतो. सूर्यकिरणांमुळे त्वचेतील टायरोसीनेज हे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिन) क्रियाशील होते, त्यामुळे फिनॉलिक संयुगांचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] होत असल्यामुळे हे घडत असावे. 

म्हशीची त्वचा जाड, चिवट व अंगाबरोबर घट्ट असते. तिची जाडी ६ ते ८ मिमी. असते व ही गाईच्या त्वचेच्या दुप्पट आहे. त्वचेची जाडी वयोमानाप्रमाणे वाढते तशीच ती नरामध्ये अधिक असते. म्हशीच्या त्वचेचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अधस्त्वचेची (त्वचेखालील संयोजी ऊतकाची–दोन कोशिकांमध्ये तंतुमय आधारद्रव्य असलेल्या कोशिकांच्या समूहाची) जाडी एकंदर त्वचेच्या जाडीच्या १·५ ते २% असते. ही जाडी गाईगुरात १·२% असते. त्वचेतील शृंगी (केराटीन या कठीण द्रव्याचा) थर गाईगुरांच्या दुप्पट असतो. रंगद्रव्य कण अधस्त्वचेमध्ये असतात. गाईगुरांपेक्षा म्हशीच्या अंगावर केस कमी असतात. नवजात रेडकाच्या अंगावरील लव दाट व लांब असते. गाईंच्या एका ५ चौ. सेंमी. त्वचेवर ३,००० केशपुटक (केसांचे मूळ जेथे असते ते त्वचेवरील खोलगट भाग) असतात, तर म्हशीमध्ये ही संख्या २०० पेक्षा कमी असते. एका केशपुटकामध्ये एक स्वेद ग्रंथी (घाम स्त्रवणारी ग्रंथी) व एक तैल ग्रंथी असते म्हणजे म्हशीच्या त्वचेमध्ये स्वेद ग्रंथी बऱ्याच कमी असतात. शिवाय त्यांचे आकारमान लहान असते. जाड त्वचा व तिचा काळा रंग, वजनाच्या मानाने कमी असलेले क्षेत्रफळ, स्वेद ग्रंथींची कमी असलेली संख्या या सर्व कारणांनी शरीराबाहेर उष्णता टाकण्याची म्हशीची क्षमता कमी राहते म्हणूनच कडक उन्हाळा त्यांना मानवत नाही व याच कारणासाठी त्यांना पाण्यामध्ये डुंबण्याची आवश्यकता असते.

म्हशीची आयुर्मर्यादा सर्वसामान्यपणे ७ ते ११ वर्षे आहे. क्रॉक्रिल यांच्या म्हणण्याप्रमाणे दलदलवासी म्हशी २५ वर्षे वयापर्यंत काम करताना दिसतात. बाल्कन द्वीपकल्पातील देशांत त्या ४० वर्षे जगल्याची अनेक उदाहरणे आहेत. गाईच्या व म्हशीच्या पचन तंत्रामध्ये (पचन संस्थेमध्ये) जवळजवळ काहीही फरक नाही. तथापि जाडाभरडा तंतुमय चारा खाऊन म्हशी गाईंपेक्षा चांगल्या तऱ्हेने तग धरू शकतात. चराऊ रानांच्या प्रतीच्या बाबतीत त्या गाईंसारख्या चोखंदळ असत नाहीत. पचनक्रियेमध्ये भाग घेणारे म्हशीच्या रोमंथिकेतील (पोटाच्या चार कप्प्यांपैकी एका कप्प्यातील) जीवजंतू गाईप्रमाणेच असतात परंतु म्हशीच्या रोमंथिकेत बाष्पनशील वसाम्लांचे (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या वसाम्लांचे) विशेषतः ॲसिटिक अम्लाची संहती (प्रमाण)जास्त असते व हे अम्ल दुधातील चरबीच्या संश्लेषणामध्ये (घटकांपासून तयार होणाऱ्या क्रियेमध्ये) महत्त्वाचे कार्य करते. म्हशीच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात चरबी असते त्याचे हे एक कारण असावे. ऊर्जा मिळण्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास एका अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, पशुखाद्याचे दुधासारख्या अन्नामध्ये रूपांतर करण्याच्या बाबतीत गाय व म्हैस हे दोन्हीही प्राणी सारखेच कार्यक्षम आहेत. मात्र दुधाच्या उत्पादनाचा लिटरच्या हिशोबात विचार करता गाय अधिक कार्यक्षम असल्याचे दिसून येते. म्हशींना लागणाऱ्या खाद्यपदार्थांतील विविध अन्नघटकांच्या प्रमाणाचा पोषणशास्त्राच्या दृष्टिकोनातून फारसा अभ्यास झालेला नाही. गाईंच्या बाबतीतील अशा अभ्यासावरून ठरविलेली आहार सूत्रे प्रमाण धरूनच म्हशींचा आहार ठरविण्याची पद्धत आहे. खाल्लेल्या खाद्याच्या प्रत्येक सुक्या एककाच्या संदर्भात म्हशींना पिण्याचे पाणी गाईइतकेच लागते. तथापि नुसत्या पाण्याचाच विचार केला, तर म्हशीला गाईपेक्षा ते अधिक लागते. सर्वसाधारणपणे म्हशीला दिवसाला २५ ते ४५ लि. पिण्याचे पाणी लागते. हे प्रमाण वय व हवामान यांवर अवलंबून असते. रवंथ करण्याच्या क्रियेतील हालचालींना म्हशीला गाईपेक्षा दीडपट अधिक वेळ लागतो.

पर्यावरणातील उष्णतेमध्ये वाढ झाल्यास म्हशींच्या जठाराशयातील स्त्राव कमी होतो व त्याची अम्लताही कमी होते. ४०°–४२° से. तापमानामध्ये त्यातील मुक्त हायड्रोक्लोरिक अम्ल नाहीसे होते. म्हशीला सावलीमध्ये नेल्यास किंवा अंगावर पाणी मारल्यास हा स्त्राव पुन्हा सुरू होतो. उष्णतेमुळे होणाऱ्या ताणामुळे म्हशींच्या पचन तंत्रातील अरेखित (अनैच्छिक) स्नायूंचे आकुंचन कमी वेळा होते, तसेच अग्निपिंडातील व लघ्वांत्रामधील (लहान आतड्यांमधील) स्त्राव कमी होतो आणि त्यामुळे पचनक्रियेतील कार्यक्षमता कमी होते.

अभिजाती : पाश्चात्य देशांमध्ये पाळीव जनावरांच्या अभिजातींची वैशिष्ट्ये अजमावून त्यांच्या उत्पादनांच्या नोंदी, कळपांच्या वंशावळी व पशुपालकांच्या संघटना इ. मार्फत अभिजातींची वैशिष्ट्ये व गुणविशेष अभ्यासून गाई, मेंढ्या, डुकरे यांच्या अभिजाती एकोणिसाव्या शतकात अस्तित्वात आल्या. म्हशींच्या बाबतीत असा अभ्यास पौर्वात्य देशांमध्ये अगदी अलीकडे केला गेला. भारतामध्ये एफ्. वेअर, ए. ऑलव्हर, ईजिप्तमध्ये ई. एस्. ई. हफीज व एम्. एच्. झाकी आणि फिलिपीन्समध्ये व्ही. विलेगास या शास्त्रज्ञांनी विसाव्या शतकाच्या माध्यमाच्या सुमारास या अभ्यासास सुरुवात केली. असे असले तरी भारत व पाकिस्तान या देशांत १०–१२ अभिजाती अस्तित्वात आहेत.

भारतातील अभिजाती : मुरा : हरियाणा राज्यातील रोहटक, कर्नाळ, हिस्सार व गुरगाव हे जिल्हे व दिल्लीच्या आसपासच्या भागात या अभिजातीची जातिवंत जनावरे आढळतात. दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली ही अभिजाती आहे. म्हशींचे आकारमान विस्तृत असते पण त्यामानाने डोके लहान व मान आखूड असते. यांचा वर्ण काळाभोर असतो. डोके, शेपटीचा गोंडा व पाय यांवर क्वचित पांढरा रंग असू शकतो. आखूड आणि जवळजवळ संपूर्ण व अरुंद वेढा असलेली शिंगे हे या जातीचे वैशिष्ट्य आहे. स्थानिक म्हशींच्या उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने भारतात इतरत्र या अभिजातीच्या रेड्यांचा प्रजननासाठी बऱ्याच प्रमाणात वापर होत आहे. तसेच फिलिपीन्स, मलेशिया, श्रीलंका इ. काही देशांमध्ये यांची निर्यात झालेली आहे. एका दुग्धकाळात या म्हशी सरासरीने १,५९० ते २,३०० किग्रॅ. दूध देतात व दुधातील चरबीचे प्रमाण ७% असते. काही निवडक म्हशी ३,००० किग्रॅ. पर्यंतही दूध देतात. इंडीयन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था या अभिजातीच्या म्हशींच्या कळपांच्या नोंदी करते. (सरासरी वजन-रेडा ५६६·९ किग्रॅ., म्हैस ४३०·९ किग्रॅ.).


निली रावी : पूर्वी निली व रावी या दोन अभिजाती मानण्यात येत होत्या, परंतु अधिकृत रित्या ही आता एक अभिजाती समजण्यात येते व निली रावी म्हणून ओळखली जाते. त्यातल्या त्यात निली अभिजातीच्या म्हशी पाकिस्तानमध्ये सतलज नदीच्या खोऱ्यातील प्रदेशात व भारतात फिरोजपूर (पंजाब राज्य) या जिल्ह्यात आढळतात. सतलज नदीच्या पाण्याच्या निळ्या रंगावरून निली हे नाव पडले आहे. रावी नदीच्या खोऱ्यातील पाकिस्तानातील प्रदेश व भारतातील अमृतसर जिल्हा हे रावी अभिजातीच्या म्हशींचे माहेरघर आहे. या दोन्ही अभिजातींच्या म्हशी वस्तुतः मुरा अभिजातीच्या म्हशींचे भौगोलिक विभेद आहेत असे मानतात. आकारमान, चेहऱ्याची ठेवण व कपाळ यांमध्ये थोडाफार फरक आढळतो इतकेच. रावीपेक्षा निली म्हशी लांबीला थोड्या जास्त आहेत पण रावी म्हशींचे हाडपेर मजबूत असल्यामुळे त्याचे सरासरी वजन निलीपेक्षा जास्त आहे. दोन्हींचा रंग सामान्यतः काळा असतो पण भुऱ्या रंगाच्या काही म्हशी आढळतात. तसेच टवकारलेले मोठे डोळे आणि नासाग्र, पाय व शेपटीचा गोंडा पांढरा असून शेपटी घोट्याच्याच खालपर्यंत पोहोचणारी लांब सडक असते. नाही म्हणायला रावी म्हशीच्या डोळ्याच्या खोबणीचे हाड उठावदार असल्यामुळे कपाळाच्या खालच्या बाजूस लहानशी खोबण स्पष्ट दिसते तशी ती निली म्हशीमध्ये दिसत नाही. ही एकच बाब या दोन अभिजातींमधील वैशिष्ट्यपूर्ण फरक मानतात. निली अभिजातीच्या म्हशींचे एका दुग्धकाळातील (२५० दिवस) सरासरी दुग्धोत्पादन १,५९० किग्रॅ. असते तर रावीचे १,८१८ किग्रॅ. असते. (सरासरी वजन-निली रेडा ५८९·७ किग्रॅ., म्हैस ४५३·६ किग्रॅ. रावी रेडा ६८० किग्रॅ. म्हैस ६३५ किग्रॅ.).

जाफराबादी : गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यातील जाफराबाद येथील ही मूळची अभिजाती आहे. जाफराबाद व गीरच्या जंगलाचा १,३०० चौ. किमी. चा भाग या ठिकाणी या अभिजातीच्या म्हशी आढळतात. या भागातील मालधारी लोकांच्या १३५ वसाहतींमध्ये या अभिजातीच्या २,५०० म्हशी आहेत. प्रायः जंगलात उगवलेल्या जाड्याभरड्या गवतावरच या म्हशींची गुजराण होते. सामान्यतः या म्हशी काळ्या रंगाच्या असून त्यांचे डोके, कपाळ व मान अतिशय भव्य आणि उठावदार असते. शिंगे मोठी, जाडजूड असून त्यांचे वळण प्रथम खाली व मानेस समांतर आणि नंतर वर टोकाशी आत वळलेली असतात. या म्हशी दिवसाला १६ ते १८ किग्रॅ. दूध देतात. टोणगे वा रेडे यांचा ओढकामासाठी उपयोग करतात. या म्हशींना थोडीफार कंबळ दिसते. (सरासरी वजन-रेडा ५८९·६ किग्रॅ. म्हैस ४५३·६ किग्रॅ.).

सुरती : गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्याच्या नडियाद, आणंद व बोर्सद ह्या तालुक्यांत तसेच त्या लगतच्या मही आणि साबरमती या नद्यांच्या मधील भाग व बडोदे जिल्हा या भागात या अभिजातीच्या म्हशी आढळतात. मुंबईच्या आसपासच्या ग्रामीण भागामध्येही त्या बऱ्याच प्रमाणात पाळल्या जातात.

मध्यम चणीच्या या म्हशी बांधेसूद असून अन्य अभिजातींच्या मानाने चपळ असतात. पाय आखूड असल्यामुळे त्यांचा बांधा ठुसका वाटतो. रंगाने या करड्या किंवा भुऱ्या असतात. जबड्याभोवती व मानेभोवती पांढरे पट्टे हे या अभिजातीचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यांच्या मध्यम आकारमानामुळे आहाराच्या मानाने दुग्धोत्पादन किफायतशीर ठरते. सरासरीने एका दुग्धोत्पादनात त्या १,६५८ किग्रॅ. दूध देतात व दुधातील चरबीचे प्रमाण ७·५% असते. या अभिजातीच्या काही जातिवंत म्हशी १० महिन्यांमध्ये २,५०० किग्रॅ. पर्यंतही दूध देतात. (सरासरी वजन रेडा ४९८·९ किग्रॅ. म्हैस ४०८·२ किग्रॅ.).

मेहसाणा (म्हैसाणा) : या अभिजातीच्या म्हशी गुजरात राज्याच्या मेहसाणा व बडोदे या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आढळतात. या अभिजातीची उत्पत्ती सुरती व मुरा या अभिजातींच्या म्हशीपासून झाली असावी. रंगाने सुरतीप्रमाणे भुऱ्या किंवा करड्या (हरणा रंग) अथवा मुराप्रमाणे काळ्या असतात. आकारमानही या दोन जातींच्या दरम्यान असते. शिंगे मुराप्रमाणे पण कमी वेटोळे असलेली असतात. शरीर लांबट असून पाय बारीक असतात. डोके भरदार व जड असते. या म्हशी लवकर वयात येतात व त्यांच्या दुग्धोत्पादनात सातत्य असते आणि प्रजननही नियमित असल्यामुळे नागरी भागात त्यांचा बराच प्रसार झालेला आहे. एका दुग्धकाळातील (३०० दिवस) सरासरी दुग्धोत्पादन १, ३५० ते १,८२५ किग्रॅ. असते. (सरासरी वजन रेडा ५६६·९ किग्रॅ. म्हैस ४३०·९ किग्रॅ.).

नागपुरी : (एलिचपुरी, पंढरपुरी). महाराष्ट्र राज्यातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये तसेच सोलापूर जिल्हा व महाराष्ट्रालगतचा आंध्र व मध्य प्रदेशाच्या भागामध्ये या म्हशी आढळतात. डोंगराळ प्रदेशातील जंगली निकृष्ट गवतावर त्या उत्तम तऱ्हेने तग धरू शकतात, त्यामुळे दुष्काळी भागामध्ये दुग्धोत्पादनासाठी त्या उपयुक्त आहेत. यांची शिंगे अतिशय लांब (क्वचित २ ते २·५ मी. लांब), चपटी, खांद्यापर्यंत पोहोचणारी व वर वळलेली असतात. शिंगावर मळसूत्राप्रमाणे वेटोळी दिसतात. शिंगांच्या वैशिष्ट्यामुळे त्या सहज ओळखू येतात. म्हशींची ही अभिजाती प्राचीन असावी कारण आंध्र प्रदेशामधील काही शिल्पांवर त्यांच्या आकृती आढळतात. वर्णाने या काळ्या असून काही वेळा चेहरा, पाय व शेपटीचा गोंडा पांढरा असतो. या म्हशी दिवसाला ५·५ ते ७·५ किग्रॅ. दूध देतात. मंद ओढकामासाठी या अभिजातींच्या रेड्यांचा उपयोग करतात. (सरासरी वजन-रेडा ५२० किग्रॅ., म्हैस ४०० किग्रॅ.).

तोडा : निलगिरी टेकड्यांच्या टापूमधील ही म्हशींची अभिजाती असून तेथील तोडा या आदिवासी जमातीच्या सांस्कृतिक जीवनामध्ये विशेषतः जन्म, मृत्यू, लग्नकार्य इ. प्रसंगांच्या वेळी या अभिजातीच्या म्हशींना महत्त्व आहे. भारतीय द्वीपकल्पातील इतर म्हशींपेक्षा दिसायला ह्या अगदी वेगळ्या आहेत. शरीर (धड) लांब असून त्यांची छाती विस्तृत व भरदार असते. पाय आखूड पण मजबूत असतात व त्या चांगल्याच ताकदवान असतात. शिंगे मोठी, लांब असून प्रथमतः आत, नंतर बाहेर व शेवटी पुढे वळलेली असतात. शिंगाचे हे वळण वैशिष्ट्यपूर्ण आहे. या म्हशींच्या मानेवर, वशिंडाच्या जागी (यांना वशिंड जवळजवळ नसतेच) व पाठीच्या कण्याजवळ आयाळीप्रमाणे दाट केस असतात, त्यामुळे त्या गव्यासारख्या दिसतात. यांचा स्वभाव तापट व खुनाशी असतो. वन्य म्हशीप्रमाणे या माणसावर चाल करून जातात. या म्हशी दिवसाला ४·५ ते ७ किग्रॅ. दूध देतात.

इतर देशांतील अभिजाती : पाकिस्तानमधील रावी व निली या म्हशींच्या अभिजातींची माहिती वर आलेली आहे. याशिवाय कुंधी नावाची एक म्हशीची अभिजाती पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध आहे. सिंधू नदीच्या तीरावरील भातशेतीच्या प्रदेशातील ही अभिजाती आहे. मुरा अभिजातीच्या म्हशींची ही एक उपअभिजातीच मानली जाते. मुरा अभिजातीच्या म्हशीपेक्षा थोडे उंचावलेले भव्य कपाळ व पसरट चेहरा असलेल्या या म्हशींचा रंग काळाभोर असतो पण करड्या रंगाच्या काही म्हशीही आढळून येतात. शिंगे बुंध्याशी जाड, प्रथम मागे व नंतर वर वळलेली, मुरापेक्षा थाडा सैलसर वेढा असलेली गळाच्या आकड्यासारखी असतात. शिंगाच्या या आकारावरून कुंधी हे नाव पडले आहे. डोळे लहान व चमकदार असतात. दर दिवसाला सरासरीने ९ किग्रॅ. दूध देतात. या अभिजातीच्या काही उत्तम दुधाळ म्हशी १८ किग्रॅ. पर्यंतही दूध देतात. रेड्यांच्या ओढकामासाठी तसेच भातशेतीच्या कामासाठीही उपयोग करतात. (वजन ४५० किग्रॅ. च्या आसपास असते).


मध्यपूर्वेकडील व भूमध्य समुद्राच्या आसपासच्या पूर्व यूरोपमधील देशांमध्ये भारतीय उपखंडामधून १,००० वर्षांपूर्वीपासून म्हशींचा प्रसार झाला असला, तरी अद्याप या देशांत उल्लेखनीय अशा म्हशींच्या अभिजाती निर्माण झालेल्या दिसत नाहीत. भौगोलिक परिस्थिती व व्यवस्थापनातील फरक यांच्याशी जुळते घेणाऱ्या म्हशींचे काही विभेद प्रकार दिसतात इतकेच.

उत्तर ईजिप्तमध्ये सैदी व दक्षिण ईजिप्तमध्ये मैनौफी, बेहेरी व बेलेदे अशा चार प्रकारच्या म्हशी संयुक्त अरब प्रजासत्ताकामध्ये दिसून येतात. यांतील मेनौफी प्रकारच्या म्हशी संख्येने जास्त असून नाईल नदीच्या दोआबामध्ये मेनौफी प्रांतातच आढळतात. हा मुख्यत्त्वे कापूस पिकविणारा भाग आहे व तेथे चराऊ रानांची कमतरता आहे. त्यामुळे म्हशी मध्यम आकारमानाच्या असतात. यांचे सरासरी वजन ६१६·८ किग्रॅ. असते. बेहेरी प्रकारच्या म्हशींच्या अंगावर, तोंडावर व खांद्यावर मऊ केस असतात. सर्वसामान्यपणे या चारी प्रकारांतील म्हशी ईजिप्शियन म्हशी म्हणूनच ओळखल्या जातात.

ब्राझीलमधील मॅराझो बेटावर काळ्या व तांबूस अशा दोन प्रकारच्या म्हशी आहेत. काळ्या म्हशी दुधासाठी व तांबूस म्हशी मांसासाठी उपयोगी आहेत. 

आग्नेय आशियातील देशांमध्ये असलेल्या दलदलवासी म्हशींच्या म्हणण्यासारख्या अभिजाती अस्तित्वात नाहीत परंतु उत्तर थायलंडमधील क्वाइतुई व क्वाइकाम या उल्लेखनीय अभिजाती आहेत. पहिल्या रंगाने काळ्या असून त्यांचे सरासरी वजन ४५० किग्रॅ. च्या आसपास असते, तर दुसऱ्या करड्या रंगाच्या आहेत व त्यांचे सरासरी वजन ३५० किग्रॅ. इतके असते. दक्षिण थायलंडमधील क्वाइज्वान या अभिजातीच्या म्हशी चणीने खुजा असून त्यांचे सरासरी वजन ३५० किग्रॅ. असते. इंडोनेशियामध्ये म्हशींच्या सूबा आणि सोएमबौरा या दोन अभिजाती आहेत.

प्रजनन : म्हशींची प्रजननातील कार्यक्षमता ही अनेक बाबींवर अवलंबून आहे. त्यांतील काही आनुवंशिक तर काही पर्यावरणावर अवलंबून आहेत. गाईच्या मानाने म्हैस हा उशीरा वयात येणारा प्राणी आहे. भारतामध्ये पारड्या २४ ते ३० महिन्यांच्या झाल्यावर प्रजननासाठी वापरण्याची प्रथा आहे. सैद्धांतिक दृष्ट्या म्हैस हा विशिष्ट मोसमातच माजावर येणाऱ्या प्राण्यांपैकी नाही, तरीसुद्धा बहुसंख्य म्हशी वर्षातील ८ महिनेच माजावर येत राहतात, असे दिसून येते. उन्हाळ्यामध्ये माजावर येणाऱ्या म्हशींचे प्रमाण अल्प असते. तथापि पंजाब कृषी विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार उन्हाळ्यामध्ये त्यांच्या राहण्याचा गोठा थंड ठेवल्यास किंवा त्यांची पाण्यात डुंबण्याची व्यवस्था केल्यास आणि खाद्यामद्ये कॅरोटीन (अ जीवनसत्त्वाचे पूर्वद्रव्य) आणि कॅल्शियम, फॉस्फरस, तांबे व कोबाल्ट ह्या लेश मूलद्रव्यांचा पुरवठा केल्यास म्हशी वर्षभर माजावर येतात, असे दिसून आले आहे. भारतामध्ये म्हशींचा माजावर येण्याचा काळ सप्टेंबर ते फेब्रुवारी असा आहे. त्यामुळे ७०% म्हशी जुलै-ऑगस्ट ते नोव्हेंबरच्या दरम्यान वितात. पाकिस्तानमध्ये हा काळ एक महिना अलीकडे असतो.

सामान्यपणे म्हशींच्या ऋतुचक्राचा काळ २१ दिवसांचा आहे परंतु ईजिप्शियन म्हशीमध्ये तो २७ दिवसांचा असू शकतो. ऋतुकाल १२ ते ३६ तासांचा आहे मात्र फिलिपीन्समधील कारबोमध्ये ३ ते ५ दिवसांचा असू शकतो. येथे स्थानिक दलदलवासी म्हशींना कारबो म्हणतात. अलीकडे आयात केलेल्या नदीवासी म्हशींनाही आता कारबो ह्याच नावाने संबोधले जाते. म्हशीमध्ये ऋतूकालातील लक्षणे तितकीशी स्पष्ट असत नाहीत. विशेषतः या काळात योनिमार्गातून बाहेर येणारा श्लेष्मल उत्सर्ग (बुळबुळीत स्त्राव) फारसा असत नाही, त्यामुळे माजावर आलेली म्हैस ओळखणे कठीण जाते, त्यातच सामान्यतः त्यांचा ऋतुकाल संध्याकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत असतो (८४% म्हशींमध्ये), परिणामी दोन ती वेळा (सरासरीने १·५ ते २) संयोग अगर कृत्रिम रीत्या वीर्यसेचन केल्यावरच ती गाभण राहते. यावर उपाय म्हणून अलीकडे ⇨ प्रोस्टाग्लॅंडीन यासारख्या द्रव्याचा व हॉर्मोनाचा (उत्तेजत स्त्रावाचा) उपयोग करून विवक्षित वेळी ती माजावर येईल अशी तजवीज करतात. हॉर्मोनाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) केल्यावर तिसऱ्या किंवा चवथ्या दिवशी ती माजावर येते. अंडमोचन (अंडाशयातून अंड बाहेर पडणे) बहुधा उजव्या बाजूच्या अंडाशयातून होते व ते ऋतूकालातच होत असावे. भारतातील म्हशीमध्ये ऋतुकालानंतर १० तासांत अंडमोचन होते, असे दिसून आले आहे. ईजिप्शियन व यूरोपातील म्हशींचा गर्भावधी सरासरीने ३१६ दिवसांचा आहे, तर भारतीय म्हशींचा ३०७ दिवसांचा आहे. दलदलवासी म्हशींचा हा काळ ३२४ ते ३३० दिवसांचा आहे. प्रसूतीनंतर २ ते ३ महिन्यांच्या कालावधीत ऋतुचक्रास सुरुवात होते. दोन वेतांतील अंतर ४२५ ते ५०० दिवसांचे असू शकते. गर्भावधी, तसेच प्रसूतीनंतर माजावर येण्याचा काळ आनुवंशिक गुणधर्म (जात), व्यवस्थापन व पर्यावरणाचा परिणाम यांमुळे कमीजास्ती होतो, असे आढळून येते. ईजिप्तमध्ये १९७८ साली केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, योग्य व्यवस्थापन व संतुलित खाद्य यांमुळे म्हशीच्या पहिल्या वेताचे वय १२ महिने कमी करता आले. सर्वसाधारणपणे दुग्धशाळेतील म्हशीचा दुग्धकाल २८० ते ३०० दिवसांचा असतो. याउलट ग्रामीण भागातील विशेषतः अभिजातीच्या नसलेल्या म्हशीमध्ये हा काळ २०० दिवसाइतका कमी असतो. म्हशीची अभिजाती, व्यवस्थापन, व्याल्यानंतर माजावर येण्याचा काळ यांवर दुग्धकाल अवलूंन असतो. गाईच्या मानाने म्हशीची प्रजोत्पादनक्षमता कनिष्ठ दर्जाची आहे याचे कारण तिचे गर्भधारणेचे प्रमाण कमी व अनियमित आहे. माज अव्यक्त असल्यामुळे अयोग्य काळी संयोग, अंतस्त्रावी ग्रंथी दोष (जिचा स्त्राव रक्तात सरळ मिसळतो अशा वाहिनीविहीन ग्रंथीतील दोष), बऱ्याच वेळा स्थायी स्वरूपात राहणारी पीतपिंड ग्रंथी (अंडमोचनानंतर त्या जागी तयार होणारी ग्रंथी), पुटक द्रवार्बुदे (अंडाशयातील पुटकावर आलेल्या द्रवयुक्त गाठी) इ. कारणांमुळे हे घडत असावे असे दिसून आले आहे.

नैसर्गिक पद्धतीने प्रजननासाठी ६० म्हशींच्या मागे एक रेडा (वळू) ठेवतात. कृत्रीम वीर्यसेचन पद्धतीने अर्थातच यापेक्षा किती तरी अधिक म्हशींना एक वळू ठेवल्यास चालते. भारतामध्ये सर्वसाधारणपणे टोणगे दोन वर्षे वयाला प्रजननक्षम होतात. तथापि त्यांचा प्रजननासाठी ३ ते ३·५ वर्षांचे झाल्यावरच वापर करतात. रशियामध्ये ते २ वर्षे वयाचे तर ईजिप्तमध्ये ३–५ वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यावरच प्रजननासाठी वापर करतात. रेड्याच्या एका स्खलनामध्ये साधारणपणे ३ ते ४ मिलि. रेत असते व त्यात २० ते २०० कोटी शुक्राणू (पुं-जननकोशिका) असतात. रेड्यातील रेताशय कमी खंडकीय असून वळू बैलापेक्षा लहान (१/६ आकारमानाचा) असतो. तसेच वृषण (पुं-जनन ग्रंथी) व पूरक ग्रंथीही लहान असतात. बहुधा यामुळेच रेताचे एका स्खलनातील परिमाण कमी असावे. दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने भारतामधील बहुतेक राज्यांमध्ये अनेक कृत्रिम वीर्यसेचन केंद्रांमध्ये मुरा जातीच्या वळूंचे वीर्यसेचन करण्यासाठी सोय करण्यात आली आहे आहे. कृत्रिम वीर्यसेचनाद्वारे भारतामध्ये पहिले म्हशीचे रेडकू अलाहाबाद येथील कृषी संस्थेमध्ये १९४३ मध्ये जन्मले. म्हशींमध्ये जुळ्यांचे प्रमाण अत्यल्प असते. दहा हजारावर म्हशींच्या केलेल्या एका पहाणीत नदीवासी म्हशींमध्ये हे प्रमाण ०·०६% तर दलदलवासी म्हशींमध्ये ०·०१५% आढळून आले. [→ पशुप्रजनन वीर्यसेचन, कृत्रिम].


रेडकामध्ये मृत्यूचे प्रमाण बरेच आहे. काही ठिकाणी हे ८०% पर्यंत आढळते. नागरी भागात पाळल्या जाणाऱ्या म्हशींच्या रेडकांची आर्थिक दृष्टिकोनातून पुरेशी काळजी घेतली जात नाही हे एक कारण त्यामागे आहे. गाईपेक्षा म्हशीपासून तिच्या रेडकाची फारकत करणे सोपे जाते. तिला रेडकाशिवाय पान्हवण्याची सवय चटकन लागते. मेलेल्या रेडक्याच्या कातड्यात पेंढा भरून दूध काढण्याच्या वेळी पान्हवण्यासाठी ते तिला दाखविण्यासाची प्रथा काही ठिकाणी आहे. 

म्हशींच्या संगोपनामध्ये त्यांना उष्णता सहन होत नसल्यामुळे निवाऱ्याची सोय करणे जरूर आहे. डुंबण्यासाठी पाण्याची सोय असल्यास किंवा दूध काढण्याआधी नळाने अंगावर रोज पाणी उडविल्यास त्या अधिक कार्यक्षम राहून उत्पादनत घट होत नाही, क्वचित थोडीफार वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

दुग्धोत्पादनातील म्हशीचे स्थान : अन्न व शेती संघटनेच्या १९८२ च्या अहवालानुसार जगातील दुग्धोत्पादनाच्या (४८·२२ कोटी टन) संदर्भात म्हशीपासून मिळणारे दूध अवघे ५% होते. असे असले, तरी भारतामध्ये म्हशीपेक्षा गाईंची संख्या जवळजवळ तिप्पट असूनसुद्धा गाईंच्या दुधाचे उत्पादन १·३८ कोटी टन झाले, तर म्हशीच्या दुधाचे १·८० कोटी टन झाले. पाकिस्तानमध्येही हे उत्पादन अनुक्रमे २२ लाख व ६५ लाख टन झाले. म्हशींचे प्रजनन विशिष्ट मोसमात होत असल्यामुळे दुग्धोत्पादनात त्यानुसार फेरफार होतात. याउलट गाईचे दूध सातत्याने मिळण्यास अडचण पडत नाही.

म्हशीच्या दुधातील चरबीचे प्रमाण तिची जात, दुग्धकालातील समय, वय व आहार यांवर अवलंबून असते. भारतामधील म्हशींच्या दुधातील चरबीचे प्रमाण ६·५ ते ८·०% असते. फिलिपीन्स व चीन येथील म्हशींच्या दुधातील हेच प्रमाण अनुक्रमे १० व १२% असते. म्हशींच्या दुधातील एकूण घनपदार्थांच्या बाबतीत असाच फरक दिसून येतो. सर्वसाधारणपणे नदीवासी म्हशींच्या दुधातील हे प्रमाण १४ ते १७%, तर दलदलवासी म्हशींमध्ये १८% असते. म्हशींना गाईपेक्षा जरी अधिक चारादाणा लागत असला, तरी म्हशीच्या दुधातील चरबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे (गाईच्या दुधातील हे प्रमाण ३·७ ते ४·७% असते) नागरी भागामध्ये जेथे दूध व दुग्धजन्य पदार्थांना उठाव आहे त्या ठिकाणी म्हशीच्या दुधाला अधिक भाव मिळून दुग्धव्यवसाय किफायतशीर होतो. म्हशींच्या दुधातील चरबीच्या प्रमाणाचा फायदा घेऊन अलिकडे दूध पुरवठा वाढविण्यासाठी त्यात पाणी व चरबीरहित दुधाची भुकटी मिसळून मानकित (प्रमाणित) दूध तयार करतात.

भारताच्या केंद्र शासनाच्या १९५५ च्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याप्रमाणे म्हशीच्या दुधामध्ये ५% यापेक्षा कमी चरबी (मात्र दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, आसाम, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये ६·०% पेक्षा कमी) व ९·०% पेक्षा कमी चरबीरहित घनपदार्थ असता कामा नयेत. म्हशीचे दूध पचनास जड असून त्याच्या सेवनाने बुद्धिमांद्य येते, असा भारतीयांमध्ये समज आहे. याबाबत जे. एन्. वॉर्नर (१९५१) यांनी असे स्पष्टीकरण केले आहे की, म्हशीपेक्षा गाईच्या दूधातील चरबीच्या गोलिका लहान असल्यामुळे तिच्यावर पाचक रसांचा परिणाम घडविण्यासाठी विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो व त्यामुळे तिचे पचन पूर्णतया होऊ शकते. तसेच ए. के. अय्यर यांनी असा विचार मांडला आहे की, माणसाच्या मेंदूच्या पांढऱ्या भागामध्ये जी फॉस्फोलिपॉयडे असतात तीच गाईच्या दुधामध्ये आहेत (म्हशीच्या दुधात ती नसतात) त्यामुळे मेदुच्या वाढीस गाईच्या दुधाचा उपयोग होतो. म्हशीच्या दुधामध्ये कॅरोटीन हे अ जीवनसत्त्वाचे पूर्वद्रव्य नावालाच असते, तर गाईच्या दुधामध्ये ते बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे तिच्या दुधाला व त्यापासून बनविलेल्या लोण्याला पिवळट रंग येतो. भारतातील देशी गाईपेक्षा म्हशीचे दुध काढणे सोपे असते कारण त्या शांत असल्यामुळे लवकर पान्हावतात.

दुग्धोत्पादनाच्या दृष्टीकोनातून म्हशींचे प्रजनन करणाऱ्या भारतामधील मुंबईजवळील आरे गौळीवाडा व गुजरात राज्यातील खेडा जिल्हातील आणंद येथील दुग्धोत्पादकांचा सहकारी संघ या योजना प्रसिद्ध आहेत. आरे येथे मुख्येत्वे मुरा जातीच्या म्हशी पाळल्या जातात, तर आणंद येथे सुरती म्हशी पाळल्या जातात. महाराष्ट्र शासनाने आरे येथे म्हशींसाठी अद्ययावत गोठे अल्पभाड्याने उपलब्ध करून दिलेले आहेत. शिवाय चारावैरण, पशुवैद्यकीय मदत, कृत्रिम वीर्यसेचनाची सोय इ. व्यवस्था योग्य खर्चात मिळण्याची तरतूदही केली आहे. याच्या बदल्यात म्हशींच्या मालकांनी ठराविक दराने शासनास दूध पुरविलेच पाहिजे असे त्याच्यावर बंधन आहे. गोळा झालेले दुधाचे ⇨ पाश्चरीकरण करुन करून ते मुंबईतील ग्राहकांना पुरविले जाते. [→ दुग्धव्यवसाय].

खेडा जिल्हा सहकारी संघाचे ८·४ लक्ष शेतकरी सभासद आहेत. पशुखाद्य, पशुवैद्यकीय मदत, कृत्रिम वीर्यसेचनाची सोय इ. गोष्टी त्यांच्या दारी देण्यात येतात व बदल्यात दूध विकत घेतले जाते. आणंद येथे दुधावर प्रक्रिया करण्याचे संयंत्र बसविले असून म्हशीच्या दुधापासून दुधभुकटी तयार करणारी जगातील ही पहिली संस्था आहे.

याशिवाय देशातील लष्करी दुग्धशाळा, हरिनघट्टा (कलकत्ता), विशाखापटनम् येथील शासकीय कृषिक्षेत्र व तमिळनाडूमधील माधवराम गौळीवाडा येथे दुग्धोत्पादनासाठी म्हशींच्या प्रजननाचे कार्य चालू आहे.

मांसोत्पादन : सामान्यपणे मांसोत्पादनासाठी म्हशी पाळण्याची प्रथा नाही. दलदलवासी म्हशी मुख्यत्वे शेतीच्या कामासाठी, तर नदीवासी दुग्धोत्पादनासाठी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादन वा शेतीची कामे यासाठी त्यांची उपयुक्तता संपल्यावर त्यांना मांसासाठी मारण्यात येते. मात्र अलिकडे बल्गेरिया, यूगोस्लाव्हिया, मलेशिया, इटली व ईजिप्त या देशांमध्ये खास मांसोत्पादनासाठी म्हशींची पैदास करण्याचे प्रयत्न फलदायी होत आहेत असे दिसते. अशा म्हशींची वाढ मांसोत्पादक गाईगुरांच्या वाढीच्या मानाने सावकाश होते. पहिल्या वर्षात गाईगुरांचे वजन १० पटींनी वाढते, तर म्हशींच्या रेडकांचे ८ पटच वाढते.

म्हशींच्या वजनाच्या ३५% भाग खाण्यायोग्य मांस असते. मात्र वर उल्लेखिलेल्या खास मांसोत्पादक म्हशींमध्ये ५०% भाग खाण्यायोग्य मांस असते व ते गाईगुरांच्या मांसाइतके चांगले असते. सामान्यपणे म्हशींचे मांस गोमांसापेक्षा भरड असते. याचे कारण म्हशीच्या स्नायूमधील तंतू जाड असतात व त्यांमध्ये केंद्रकांची (कोशिकांतील कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या जटिल गोलसर पुंजांची) संख्याही विपुल असते. म्हशींची चरबी पांढऱ्या रंगाची व कोरडी असते व ती स्नायुतंतूमध्ये विखुरलेली असत नाही. यामुळे मांस चवदार असत नाही. दोन वर्षे वयाच्या वरील पारडीचे वा टोणग्याचे मांस जून होते. तथापि ४ ते ६ आठवड्यांच्या रेडकांचे मांस वासराच्या मांसाइतके (व्हील) चविष्ट असते. म्हशीचे कातडे अखाद्य मानतात. तरीसुद्धा नेपाळ व थायलंडमधील काही भागात कातड्याच्या पट्ट्या कापून त्या पाण्यात शिजवून दीर्घकाळ उन्हात वाळवितात व तळून त्यांचा खाण्यासाठी उपयोग करतात. यांना बफेलोचिप्स म्हणतात. भारतामधून १९७४ सालापासून म्हशीच्या मांसाची थोड्या प्रमाणात मध्यपूर्वेकडील देशांमध्ये निर्यात होऊ लागली आहे. म्हशीच्या मांसाचे जगातील उत्पादन १९८२ मध्ये १३·५२ लाख टन झाले, तर भारतामधील हे उत्पादन १·३२ लाख टन इतके झाले.


चलशक्ती : ज्या कामामध्ये वेगाचा प्रश्न उद्‌भवत नाही अशा अवजड सामानाच्या वाहतुकीसाठी टोणग्यांचा वा रेड्यांचा चांगला उपयोग होतो. त्यांचा वेग ताशी ३ ते ३·५ किमी. असतो (बैलांचा वेग ४·८ ते ६·४ किमी. असतो.) आग्नेय आशियातील देशांमध्ये भातशेतीच्या कामाला म्हशींचा सर्रास वापर करतात. भारतामध्येही भातांच्या खाचरात चिखलातील कामे म्हशी व टोणगे बैलापेक्षा अधिक कार्यक्षमतेने करू शकतात, असे दिसून येते. मात्र इतरत्र भारतामध्ये म्हशींना कामाला लावण्याची फारशी प्रथा नाही. म्हशींना रोजी ३ ते ३·५ तास कामाला लावले, तरी दुग्धोत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत नाही, असे दिसून आले आहे. यांखेरीज मोटेसाठी, घाण्याला व रहाटाला, पिकांच्या मळणीसाठी, विटा बनविण्यासाठी चिखल तुडविण्याच्या कामी, ओढकामासाठी टोणग्यांचा वा रेड्यांचा उपयोग करतात. खोंडाप्रमाणे टोणगे खच्ची करण्याची प्रथा आहे. रेडे बैलापेक्षा दुप्पट वजन ओढून नेऊ शकतात. दलदलवासी म्हशी नदीवासीपेक्षा गरीब असतात. त्यामुळे त्यांची देखभाल बव्हंशी मुलांच्यावर सोपविली जाते. ईजिप्शियन म्हशी त्यामानाने दंगेखोर असतात व म्हणून त्यांचे पाय कातड्याच्या पट्‌ट्यांनी बांधून ठेवतात.

कातडी व हाडे : भारतामध्ये म्हशींच्या संख्येच्या १० ते १२% कातडी प्रतिवर्षी उपलब्ध होतात (अदमासे ६० लक्ष कातडी). म्हशींची कातडी जाड असल्यामुळे कमावल्यावर त्यांचा अनेक तऱ्हांनी उपयोग करतात. त्यांपासून मोटा, खोगीर, बुटाचे तळवे, औद्योगिक उपयोगासाठी पट्टे इ. वस्तूंचे उत्पादन करतात. हाडे व शिंगे यांचा उपयोग विविध वस्तू बनविण्यासाठी होतोच, शिवाय अस्थिपिष्टाचा उपयोग पशुखाद्यामध्ये घालण्यासाठी तसेच खतासाठी प्रामुख्याने केला जातो. [→ खाटीकखाना चर्मोद्योग].

रोगराई : गाईंना होणारे जवळजवळ सर्व नैमित्तिक व सांसर्गिक रोग म्हशींना होतात [→ याग]. काही विशिष्ट सांसर्गिक रोगांची लक्षणे व तीव्रता यांमध्ये फरक दिसून येतो इतकेच. भारत व इंडोचायना (व्हिएटनाम, कंबोडीया) येथील म्हशींना ⇨ लाळ रोग सौम्य प्रमाणात होतो, पण मलेशिया व फिलिपीन्समधील म्हशींना तो गाईगुरांइतकाच तीव्र स्वरूपात होतो. म्हशींच्या पारडींमध्ये (रेडकांमध्ये) तीन महिन्यापर्यंत मृत्यूचे प्रमाण बरेच (६७·८%) आहे. यातील काही मृत्यू त्यांचे दूध लवकर तोडल्यामुळे व त्यांची काळजी न घेतल्यामुळे होतात हे खरे असले, तरी पचन तंत्राच्या विकारामुळेही (कृमीमुळे) बरेच मृत्यू होतात. म्हशींच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे म्हशींच्या रेडकांना पचन तंत्राचे विकार जास्त प्रमाणात होतात. ब्रूसिलोसिस [→ गाय] व ⇨ गळसुजी रोग म्हशींना अधिक तीव्रतेने होतात. प्रजीवामुळे (एककोशिय जीवामुळे) होणारा ⇨ सरा नावाचा रोग म्हशींना बऱ्याच प्रमाणात व चिरकारी (दीर्घकालीन) स्वरूपात होतो. ईजिप्शियन म्हशींना ⇨

बुळकांड्या रोगाची बाधा भारतीय म्हशींइतकी तीव्रतेने होत नाही तसेच त्यांच्यामध्ये क्षयरोगाचे प्रमाणही कमी आहे. पाण्याकडे व पाणथळ जागेकडे म्हशींचा ओढा अधिक असल्यामुळे फॅसिओला हेपॅटिकाफॅ. जायगँटिका या यकृतपर्णकृमींमुळे होणारे विकार म्हशींना बऱ्याच प्रमाणात होतात.

स्तनशोथ : म्हशींमध्ये विशेषतः दुग्धशाळेतील म्हशीमध्ये स्तनशोथ (स्तनाची दाहयुक्त सूज) या रोगाचे प्रमाण ५·३% आहे, असे भारत व ईजिप्त येथील पाहणीत आढळून आले आहे. प्रायः अनेक प्रकारच्या सुक्ष्मजंतूंमुळे होणारा हा रोग असून आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. [→ स्तनशोथ].

मायक्रोफायलेरीयासिस : गाईगुरांपेक्षा म्हशींमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा नेमॅटोडा (सूत्रकृमी) संघातील फायलेरीया प्रजातीमुळे होणारा हा एक संक्रामक रोग असून तमिळनाडू, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश येथील दलदलीच्या, उष्ण दमट भागामध्ये आढळून आला आहे. रोगाने लागण झालेल्या म्हशींपैकी ३० ते ५०% म्हशी मरण पावतात. डास, पिसवा यांसारखे कीटक रोगवाहक असून त्यांच्यामुळे रोगप्रसार होतो. सूक्ष्मदर्शकाने रक्त तपासणी करून रोगनिदान करता येते. रक्तक्षय, ताप, कमालीचा अशक्तपणा, दुग्धोत्पादनात घट किंवा संपूर्ण आटणे, पोटाखाली शोफ (द्रवयुक्त सूज) इ. लक्षणे दिसून येतात. कधीकधी मायक्रोफायलेरीया मेंदूपर्यंत पोहोचतात व रोगी म्हैस गोल गोल फिरणे, समोरच्या भिंतीवर धडक घेणे अशी लक्षणेही दिसतात. कॅरिसाईड गोळ्या किंवा युनिकार्‌बॅझीन व अँथिओमलीन या औषधांची अंतःक्षेपणे हे उपचार वेळीच केल्यास म्हैस बरी होते.

गोचिडजन्य रोग : म्हशींना कमी प्रमाणात होतात याचे कारण त्यांची त्वचा जाड असल्यामुळे गोचिड्यांना चावा घेणे अवघड जात असावे, हे आहे. म्हशींच्या रेडकांना गोलकृमीमुळे (ॲस्कॅरिॲसिस) होणारे विकार अधिक प्रमाणात आढळतात. इतकेच नव्हे, तर जन्मापूर्वीही रेडकांना गोलकृमीची बाधा झाल्याचे दिसून येते.

म्हशींना होणाऱ्या रोगराईच्या संदर्भात सांसर्गिक काळपुळी, गळसुजी, बुळकांड्या, फऱ्या रोग, लाळ रोग व सरा या रोगांच्या स्वतंत्र नोंदी पहाव्यात. 

पहा: दुग्धव्यवसाय दूध पशुप्रजनन.

संदर्भ : 1. Cockrill, W. Ross, The Husbandary and Health of Domestic Buffalo, Rome, 1974.

             2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. Vl, Suppliement Livestock including  Poultry, New Delhi, 1970.

             3. Fahimuddin, F. Domestic Water Buffalo, New Delhi, 1975.

             4. McDowell, R. E. Improvement of Livestock Production in Warm Climates, San Francisco, 1972.

             5. Williamson, C. Payne, W. J. A. An Introduction to Animal Husbandry in Tropics, London,  1960.

ताटके, म. बा. दीक्षित, श्री. गं.

सुरती (रेडा)जाफराबादीमुरामेहसाणा (म्हैसाणा)नागपुरी (पंढरपुरी) 

निली