अधिवृक्क ग्रंथि : दोन्ही बाजूंच्या वृक्कांवर (मूत्रपिंडांवर) टोपीसारख्या असलेल्या ग्रंथींना ‘अधिवृक्क ग्रंथी’ असे म्हणतात. प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे दोन लहान, चपट्या आणि पिवळसर रंगाच्या या ग्रंथी उदरात असून त्या अंतःस्त्रावी ग्रंथी (आपला स्त्राव रक्तामध्ये सरळ सोडणाऱ्या ग्रंथी, →अंतःस्रावी ग्रंथी) आहेत. मनुष्यशरीरात प्रत्येक वृक्काच्या वरच्या टोकावर त्या असतात. प्रत्येक ग्रंथीभोवती संयोजी ऊतकाचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांचा समुदाय, →ऊतके, प्राण्यांतील) आवरण असते. दोन्ही ग्रंथींच्या आकारमानांत थोडा फरक असतो. स्त्री व पुरूष यांच्या ग्रंथींच्या आकारमानांतही फरक आढळतो. उजवी ग्रंथी काहीशी त्रिकोणाकृती असून, डावी सामान्यतः उजवीपेक्षा मोठी व अर्धचंद्राकृती असते. प्रत्येक ग्रंथीची लांबी सरासरी ३० ते ५० मिमी. व वजन सु. ७ ग्रॅ. असते.

अधिवृक्क ग्रंथीचा आडवा छेद घेतला, तर त्यात नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतील असे दोन भाग असतात. एक बाहेरचा भाग (बाह्यक) असून तो पिवळ्या रंगाचा असतो. त्याने ग्रंथीचा बराच भाग व्यापलेला असतो. दुसरा आतला भाग (मध्यक) गडद तांबडा किंवा मोतिया रंगाचा असतो. हा भाग लहान असून एकूण ग्रंथीचा फक्त दशांश भाग त्याने व्यापलेला असतो.

भ्रूणावस्थेतील (विकासाच्या पूर्व अवस्थेत असणाऱ्या बालजीवातील) विकासाच्या अभ्यासावरून असे दिसून येते की, अधिवृक्क ग्रंथींच्या दोन्ही भागांची उत्पत्ती अगदी भिन्न प्रकारची असते. जननग्रंथी ज्या भ्रूणकोशिकांपासून (भ्रूणाच्या सूक्ष्म घटकांपासून) उत्पन्न होतात, त्यांच्याशी निकट संबंध असणाऱ्या एका कोशिकापुंजापासून बाह्यक उत्पन्न होतो. बाह्यकाचे मुख्यतः तीन भाग असतात. बाहेरच्या भागाला अथवा स्तराला ‘गुच्छमंडल’ म्हणतात. हा स्तर पातळ असून स्तंभाकार कोशिकांच्या गोलाकार समूहांचा बनलेला असतो. या समूहाच्या भोवती केशिका (केसासारख्या अतिशय बारीक नलिका) असतात. मधल्या स्तराला स्तंभमंडल म्हणतात. बाह्यकाचा अधिकांश भाग या स्तराने व्यापिलेला असतो. हा स्तर मोठ्या बहुकोनी कोशिकांच्या स्तंभांचा बनलेला असून रक्तवाहिन्यांच्या विवरिकांचा (पोकळ्यांचा) त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध असतो. या रक्तवाहिन्या अरीय (एका समान केंद्रापासून बाहेर पसरलेल्या) असून त्या मध्यकापर्यंत गेलेल्या असतात. तिसरा स्तर मध्यकाच्या सीमेवर असून त्याला ‘जलमंडल’ असे म्हणतात. हा स्तर कोशिकारज्जूंच्या अनियमित जाळ्यांचा बनलेला असतो. दुसऱ्या व तिसऱ्या स्तरांच्या कोशिकांच्या जीवद्रव्यांत वसाभ (चरबीसारख्या पदार्थाचे, लिपॉइड) बिंदू पुष्कळ दिसतात. त्या मानाने पहिल्या स्तरात त्यांचे प्रमाण फार कमी असते. आ. १. अधिवृक्क ग्रंथीचा छेद. (१) बाह्यक, (२) बाह्यकाचा जालरूप भाग, (३) मध्यक.

मध्यकाची उत्पत्ती अगदी निराळ्या प्रकाराने होते. भ्रूणाच्या तंत्रिकीय (मज्जा) शिखरापासून कोशिकांचा एक गट अलग होऊन त्याच्यापासून मध्यकाची उत्पत्ती होते. अनुकंपी तंत्रिका तंत्राच्या [→तंत्रिका तंत्र] ‍गुच्छिका-कोशिकाही त्यांच्यापासूनच उत्पन्न होतात. मध्यकाला तंत्रिकांचा भरपूर पुरवठा असतो. मध्यकाच्या कोशिका मोठ्या आकाराच्या व अंडाकृती असून त्यांची मांडणी अनियमित असते. या कोशिकांचे समूह असून त्यांचा रक्तवाहिन्यांशी निकट संबंध असतो. त्या कोशिकांपैकी पुष्कळ कोशिका रंगद्रव्ये शोषून घेतात म्हणून रंगाकर्षी प्रतिक्रिया दर्शवितात. क्रोमियम लवणांच्या ऑक्सिडीकरणामुळे कोशिकांतील सूक्ष्म कणांचे अभिरंजन (रंगविल्या जाणे) होऊन कोशिका तपकिरी रंगाची दिसू लागते.

अधिवृक्क ग्रंथींच्या या दोन घटकांची उत्पत्तीच केवळ भिन्न असते, एवढेच नव्हे, तर त्यांची कार्येही भिन्न आहेत. बाह्यक देहधारणेला आवश्यक असून ते काढून टाकले तर मृत्यू ओढवतो. मध्यक काढून टाकल्यास त्याचे घातक परिणाम दिसत नाहीत.

आ. २. अधिवृक्क ग्रंथीचा छेद. (अ) छेद (आ) सूक्ष्म रचना. (१) संपुट, (२) गुच्छमंडल, (३) स्तंभमंडल (४) जालमंडल, (५) मध्यक.बाह्यकापासून जवळजवळ तीस रासायनिक संयुगे काढण्यात आलेली असून त्यांना स्टेरॉइड [→स्टेरॉल व स्टेरॉइडे] असे म्हणतात. ही स्टेरॉइडे प्रवर्तक जातीची असून ती रक्तामार्गे जाऊन शरीरात अन्यत्र कार्य घडवून आणतात. या तीस स्टोरॅइडांपैकी फक्त सातांच्या ठिकाणीच दैहिक क्रियाशीलता आढळते. त्या सर्वांना साधारणणे ‘कॉर्टिकॉइड’ असे म्हणतात व त्यांच्यामुळे होणाऱ्या परिणामाला ‘कॉर्टिकॉइड प्रभाव’ म्हणतात. या सातांपैकी कॉर्टिसोल, कॉर्टिकोस्टोरोन, कॉर्टिसोन, डेसॉक्सी कॉर्टिकोस्टेरोन, ॲल्डोस्टेरोन इ.महत्त्वाची प्रवर्तके होत. अधिवृक्क ग्रंथींतून बाहेर पडणाऱ्या रक्तात कॉर्टिसोल, कॉर्टिकोस्टेरोन व ॲल्डोस्टेरोन ही तीन प्रवर्तके मुख्य असतात. अंडाशयापासून स्रवणारे गर्भरक्षक हे प्रवर्तकही अधिवृक्कबाह्यकात असते, परंतु त्याची दैहिक क्रिया कॉर्टिकोस्टेरॉइडापेक्षा वेगळी असते. पौरुषजन आणि स्त्रीमदजन ही लिंगप्रवर्तके बाह्यकापासून काढता येतात, हे निदानाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे [→हॉर्मोने].

बाह्यकापासून उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकांची दैहिक क्रिया तीन प्रकारांची असते. ॲल्डोस्टेरोन खनिज पदार्थाच्या चयापचय-कार्यात (शरीरात सतत होणाऱ्या सर्व रासायनिक व भौतिक बदलांत) क्रियाशील असते. त्याच्या योगाने पाणी, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराइड यांच्या शरीरातील वाटपाचे नियमन होते व त्या पदार्थांचे रक्तातील प्रमाण थोड्याफार फरकाने कायम राखले जाते. सोडियम राखून ठेवणे व पोटॅशियमाचे उत्सर्जन करणे या दोन्ही क्रिया वाढविणारे ॲल्डोस्टेरोन हे प्रबल प्रवर्तक आहे.

कॉर्टिसोन व हायड्रोकॉर्टिसोन यांच्यामुळे कार्बनी पदार्थांच्या चयापचयावर प्रभाव पडतो. त्यांच्यामुळे रक्तातील साखर आणि यकृतातील मधुजन (एक प्रकारचा स्टार्च, ग्लायकोजेन) यांची सांद्रता वाढते आणि प्रथिनापासून नव्याने द्राक्षशर्करा (ग्लुकोज) उत्पन्न होण्याची क्रिया उद्दीपित होते. म्हणून या प्रवर्तकांना ‘ग्लायकोकॉर्टिकॉइड’ असे म्हणतात. या प्रवर्तकांमुळे वसेचा अपचय [→ चयापचय] वाढून त्यापासून कीटोन-पिंड उत्पन्न होतात. अधिह्रषतेमुळे (ॲलर्जीमुळे) उत्पन्न होणारी अवस्था व संश्लेषीजन रोग [→ कोलॅजेन रोग] यांसारख्या काही ऊतक-प्रतिक्रियांवर काही कॉर्टिकॉइड प्रवर्तकांचा उपयोग होतो. संधिवाताभ संधिशोथ (सांध्यांची सूज) व इतर सु. ५० संश्लेषीजन रोगांवर कॉर्टिसोन व हायड्रोकॉर्टिसोन यांचा फार हितावह परिणाम होतो. भौतिक आणि रासायनिक अभिघातामुळे (जखम किंवा शारीरिक इजेमुळे,→ अभिजात) रक्तवाहिन्या आणि कोशिकांमध्ये जे शोथोत्पादक परिणाम होतात त्यांवर कॉर्टिसोनाचा चांगला उपयोग होतो.

स्त्रीमदजन, पौरुषजन आणि गर्भरक्षक प्रवर्तके बाह्यकापासून उत्पन्न होत असली, तरी त्यांचा प्रत्यक्ष लैंगिक क्रियांशी प्राकृतावस्थेत (सामान्य अवस्थेत) फारसा संबंध नसतो. परंतु अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यकाच्या अर्बुदामध्ये (नवीन कोशिकांच्या प्रमाणाबाहेरील वाढीमुळे तयार झालेल्या व शरीरास निरुपयोगी असलेल्या गाठीमध्ये) त्यांचे प्रमाण फार वाढल्यामुळे स्त्रियांमध्ये पौरुषदर्शन व पुरुषांमध्ये वृषण (प्रजोत्पादन ग्रंथी) व शिश्न यांची वयाच्या मानाने फार लवकर वाढ होते आणि लैंगिक गौण लक्षणे लवकर दिसू लागतात.

अधिवृक्काच्या बाह्यकाच्या क्रियेवर पोष ग्रंथीमध्ये (एक अंतःस्त्रावी ग्रंथी,→ पोष ग्रंथि) उत्पन्न होणाऱ्या अधिवृक्कबाह्यक-पोषक प्रवर्तकाचे नियंत्रक असते. त्यालाच ‘ए. सी. टी. एच’.  (ॲड्रीनो-कॉर्टिको-ट्रोपिक हार्मोन) असे म्हणतात.

पूर्वी अधिवृक्क-विकाराने (ॲडिसन रोग) आजारी पडणाऱ्या रोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण शंभर टक्के होते. परंतु अलीकडे कॉर्टिसोन व हायड्रोकॉर्टिसोन आणि थोड्या प्रमाणात डेसॉक्सिकॉर्टिकोस्टेरोन किंवा ॲल्डोस्टेरोन दिल्यास रोगी आपले स्वाभाविक जीवन जगू शकतात, इतकेच नव्हे, तर शस्त्रक्रियेसारख्या गंभीर दिव्यातूनही पार पडू शकतात.


 अधिवृक्क ग्रंथींच्या मध्यकापासून एपिनेफ्रिन (ॲड्रेनॅलीन, अधिवृक्क प्रवर्तक) आणि नॉरएपिनेफ्रिन (नॉरॲड्रेनॅलीन, अधिवृक्क-ऋतप्रवर्तक) ही दोन प्रवर्तक उत्पन्न होतात. ही दोन्ही प्रवर्तके रासायनिक आणि जैव दृष्टीने सारखी असली तरी यांची शरीरामधील क्रियेची रीत व मर्यादा यांत फरक आहे. त्या प्रवर्तकांचे बाह्यकात उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही प्रवर्तकाशी साम्य नाही. या दोन्ही प्रवर्तकांची क्रिया अनुकंपी तंत्रिकेच्या उद्दीपनामुळे होणाऱ्या क्रियेसारखीच असते. फरक एवढाच की, अनुकंपी तंत्रिकोद्दीपनामुळे स्वेदग्रंथीचे (घर्मग्रंथीचे) जसे उद्दीपन होते तसे ते या प्रवर्तकांनी होत नाही.

राग, भीती वगैरे भावनांच्या उत्कटतेमुळे अधिवृक्क मध्यकात ही दोन्ही प्रवर्तके फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन रक्तात ओतली जातात. त्यामुळे अथवा एपिनेफ्रिनाच्या अंतःक्षेपणामुळे (इंजेक्शनामुळे) हृद्‍रोहिणीचे

प्रसरण होते, रक्तदाब वाढतो कंकाल (हाडांच्या सापळ्याशी संबंधित असलेल्या) स्नायूंतील रक्तवाहिन्या आणि श्वासनलिका स्नायू यांचे प्रसरण होते. उदरगुहेतील (उदराच्या पोकळीतील) रक्तवाहिन्यांचे संकोचन होते.

हृद्‍स्नायूंच्या आकुंचनाचा जोर वाढून हृदयातून अधिक रक्त जोराने रेटले जाते. थोडक्यात म्हणजे शरीरसंरक्षण आणि आक्रमण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ॲड्रेनॅलिनामुळे होतात. दम्याच्या विकारातही त्याचा चांगला उपयोग होतो.

ॲड्रेनॅलिनाच्या यकृतावरील प्रभावामुळे यकृतातील मधुजनाचे शर्करेत त्वरेने रूपांतर होऊन स्नायूंच्या कार्यासाठी अधिक शर्करा रक्तामार्गे उपलब्ध होते. स्नायूंच्या आकुंचनामुळे शर्करेचे दुग्धाम्लांत रूपांतर होते. रक्तातील रक्तकोशिका व बिंबाणू (पट्टिकेच्या आकाराचे पिंड) यांच्या संख्येत वाढ होते. विशेषतः रक्तातील लसीका कोशिकांची [→ लसीका तंत्र] संख्या वाढते.

नॉरएपिनेफ्रिनामुळे रक्तवाहिन्यांचे संकोचन होते व त्यामुळे रक्तदाब वाढतो. मात्र त्वचेतील रक्तवाहिन्यांचे संकोचन होत नाही.

अधिवृक्क ग्रंथीचे विकार : अधिवृक्काच्या दोन भागांची निर्मिती, रचना व कार्य भिन्न असल्यामुळे त्यांचे विकारही भिन्न आहेत.

(१) बाह्यक-विकार : बाह्यकामध्ये मुख्यतः तीन प्रकारांची प्रवर्तके उत्पन्न होतात : (अ) ग्लुकोकॉर्टिकॉइडे (मधुबाह्य-प्रवर्तके), (आ) मिनरल कॉर्टिकॉइडे (खनिज प्रवर्तके) व (इ) सेक्स कॉर्टिकॉइडे (लैंगिक-बाह्यक प्रवर्तके).

या तीन प्रवतर्कांच्या आधिक्यामुळे वा न्यूनतेमुळे उत्पन्न होणाऱ्या लक्षणसमूहांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले जाते : (अ) कुशिंगलक्षणसमूह (कुशिंग सिंड्रोम), (आ) अधिवृक्की-पुरुषीभवन (ॲड्रेनल व्हिरिलिझम), (इ) अधिवृक्की-स्त्रीभवन (ॲड्रेनल फेमिनायझेशन) व (ई) ॲडिसन रोग.

(अ) कुशिंगलक्षणसमूह : छाती, पोट व चेहरा या भागांवरील त्वचेखाली दुखरी वसा साठून राहते. अशक्तता, रक्तदाब वाढणे, मधुमेह, स्त्रियांमध्ये रजःस्राव कमी होणे, पुरूषांमध्ये क्लैब्य, अस्थिसुषिरता (अस्थी अधिक सच्छिद्र होऊन हलक्या होणे), प्रथिनचयविकृती (प्रथिनांवर शरीरात होणारी रासायनिक विक्रिया कमी होणे) ही लक्षणे कुशिंगलक्षणसमूहात मोडतात. या प्रकारात बहुधा बाह्यकात सौम्य अथवा मारक अर्बुद उत्पन्न झालेले असते. हा रोग बहुधा असाध्य आहे.

(आ) अधिवृक्की-पुरुषीभवन : स्त्रियांमध्ये प्रथम रजोदर्शनाच्या सुमारास या रोगाची लक्षणे दिसू लागतात. दाढीमिशा येणे, छाती, पोट, गुह्यभाग वगैरे ठिकाणी पुरुषांसारखे केस येऊ लागतात. रजःस्राव कमी अथवा बंद होतो. थोडक्यात म्हणजे बाह्यतः स्त्री पुरूषासारखी दिसू लागते.

या रोगाचे मूळ कारणही बहुधा बाह्यकातील अर्बुद असते व ते काढून टाकता आले तर सुधारणा होण्याची शक्यता असते. अन्यथा हा रोग मारक ठरतो. अलिकडे कॉर्टिकॉइडाची ५० ते १०० मिग्रॅ. एवढी मात्रा देतात. काही वेळा लक्षणे कमी होऊन रजःस्राव होऊ शकतो, असा अनुभव आहे. कॉर्टिकॉइड चालू असेपर्यंतच सुधारणा दिसते. हे औषध फार काळ व फार मोठ्या मात्रेने देण्यात धोका असतो.

(इ) अधिवृक्की-स्त्रीभवन : हा प्रकार अगदी क्वचित आढळतो. याची लक्षणे वरच्या उलट असतात म्हणजे रोग्याची मैथुनेच्छा कमी होणे. सर्वांगावर वसा साठून राहणे व स्त्रीत्वाची इतर लक्षणे दिसणे, ही होत.

(ई) ॲडिसन रोग : अतिशय निरुत्साह व शैथिल्य, हृदयक्रियेची अत्यंत क्षीणता, भूक मंदावणे, जठराचा थोड्याशा कारणानेही होणारा बिघाड व त्वचेची विशिष्ट विवर्णता (रंगहीनता) ही स्वतः ॲडिसन यांनी दिलेली या रोगाची प्रमुख लक्षणे होत [→ ॲडिसन रोग].

(२) मध्यक-विकार : मध्यकात उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकांचे प्रमाण तेथे उत्पन्न झालेल्या अर्बुदामुळे वाढते. त्यामुळे होणाऱ्या लक्षणामध्ये रक्तदाब अतिशय वाढतो. प्रवर्तके एकदम रक्तात मिसळल्यामुळे रक्तदाब एकाएकी वाढतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी तो ३०० मिमी. इतका वाढलेला दिसतो. परंतु हृदयाच्या प्रसरणाच्या वेळेचा रक्तदाब वाढलेला नसतो. उरोस्थीच्या मागे (छातीतील हाडाच्या मागे) वेदना होतात. रोगी फिकट दिसू लागून त्याला वारंवार फार घाम येतो. मळमळ, तीव्र डोकेदुखी, हात ओलसर, गार व काळे पडणे, थंडी भरून येणे, पायात पेटके येणे वगैरे लक्षणे दिसतात. रोगी अत्यंत चिंताग्रस्त दिसतो व त्याला मृत्यू समीप आल्याची भावना होते.

क्वचित प्रसंगी रक्तदाब कायमचाच वाढलेला दिसतो. अशा वेळी मारक रक्तदाबापासून निदान करणे कठीण होते.

या विकारात अधिवृक्काच्या मध्यकात कृष्णरंजी-कोशिका (विशिष्ट अभिरंजक द्रव्यामुळे काळ्या होणाऱ्या कोशिकांनी युक्त असलेले) अर्बुद उत्पन्न झालेले असते व त्यावर शस्त्रक्रिया करणेही फार धोक्याचे असते.

संदर्भ : 1. Beckman, H. Pharmacology : the Nature, Action and Use of Drugs, Philadelphia 1961.

           2. Best, C. H. Taylor, N. B. The Physiological Basis of Medical Practice, Baltimore,1961.

           3. Gray, H. Anatomy, London, 1962.

           4. Harrison, T. R. Adams, R. D. Bennett, I. L. Resnik, W. E. Thorn, G.W. Wintrobe, M. M. Principlesof Internal Medicine, Tokyo, 1961.

ढमढेरे, वा. रा.

अधिवृक्क ग्रंथी : (१) अधिवृक्क ग्रंथी, (२) वृक्क, (३) मूत्रवाहिनी, (४) मूत्राशय.