बास – २: पर्सिफॉर्मीस गणातील सेरॅनिडी व सेंट्रार्किडी या दोन मत्स्यकुलांतील पुष्कळ माशांना हे नाव दिले जाते. सेरॅनिडी कुलांतील मासे मुख्यत्वे समुद्रात राहणारे आहेत, तर सेंट्रार्किडी कुलातील मासे गोड्या पाण्यात आढळतात.  

काळा बास (मायक्रॉप्टेरस सामॉडिस)सागरी बास उष्ण कटिबंधातील समुद्राच्या उथळ पाण्यात राहतात. यांपैकी पारलाब्राक्स वंशात सागरी शैवलात किंवा रेतीत राहणारे बास मासे आहेत. हे मासे मेक्सिकोजवळचा पॅसिफिक महासागर व दक्षिण कॅलिफोर्नियाचा किनारा या प्रदेशांत आढळतात. ते  मांसाहारी आहेत. ते खेकडे, झिंगे यांसारख्या इतर सागरी प्राण्यांवर निर्वाह करतात. यांची लांबी सरासरी ३० सेंमी. असते. या माशांची शिकार केली जाते व त्यांचा व इतर काही जातींचा अन्न म्हणूनही उपयोग होतो. सेरॅनिडी कुलात सु. ४०० जाती आहेत. त्यांपैकी काही जातींतील मासे गोड्या पाण्यातही आढळतात. यांच्या पृष्ठवंशात (पाठीच्या कण्यात) २४ मणके असतात व ३ गुदकंटक (गुदभागाजवळील बारीक काटे) असतात.

उत्तर अमेरिकेतील पट्ट्याच्या बासचे रॉक्सस सॅक्सॅटिलीस वजन ५० किग्रॅ. असते. याची मादी  वसंत ऋतूत गोड्या पाण्यात अंडी घालते. अमेरिकेच्या उत्तर भागात पांढरा बास (रॉ. क्रियॉप्स) तर दक्षिण भागात पिवळा बास (रॉ. मिसिसिपिएन्सिस) आढळतात. उष्ण प्रदेशातील समुद्रात कधीकधी सु. १.८ मी. लांबीचे मोठाले बासही आढळतात. यांचा रंग काळपट असतो. हे मासे जगात इतरत्रही आढळतात. पूर्ण वाढ झालेली मादी एका वेळी १०,००,००० अंडी घालते. ही अंडी समुद्राजवळ नदीच्या मुखात किंवा मचुळ पाण्यात घातली जातात. अंड्यांचे वजन पाण्यापेक्षा जास्त असते. दोनतीन दिवसांत अंड्यांतून पिले बाहेर येतात. मोठाल्या माशाचे वजन ४५ किग्रॅ. पेक्षा जास्त  व लांबी १.८ मी. पर्यंत असते. या माशाची जशी शिकार केली जाते, तसेच जाळी टाकून किंवा गळाच्या साहाय्याने ते पकडले जातात.

सेरॅनिडी कुलातील सेरॅनिस स्क्रिबा व से. कॅब्रिला या दोन जातींचे मासे उभयलिंगी (नर व मादीची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असणारी अवस्था असलेले) आहेत. हे काळ्या समुद्रात आढळतात. अंडकोश व वृषण एकाच माशात बरोबर वाढतात आणि यथाकाल स्वनिषेचन (स्वफलन) होते.

सेंट्रार्किडी कुलातील मासे गोड्या पाण्यात आढळतात. मायक्रॉप्टेरस या वंशातील सहा जाती नित्य आढळणाऱ्या आहेत. यांतील मोठ्या तोंडाचा बास (मायक्रॉप्टेरस सामॉडिस) सर्वत्र आढळतो व याचे वजन ९ किग्रॅ. इतके असते व रंग काळा असतो. लहान तोंडाचा बास (मा. डोलोमीई) हा उत्तर अमेरिकेच्या पूर्वभागातील गोड्या पाण्यात आढळतो. ठिपक्यांचा बास (मा. पंक्च्युलेटस) उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागात आढळतो. वसंत ऋतूत समुद्राच्या पाण्यातील शैवलाच्या बुडाशी वाळूत खड्डे करून मादी त्यात १,००० ते २५,००० अंडी घालते. ३ ते ६ दिवसांत पिले बाहेर येतात. बरेच दिवस नर पिलांची काळजी घेतो.

काळा सागरी बास (सेंट्रोप्रिस्टिस स्ट्राएटस) अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आढळतो. याच्या अंड्यांपासून माद्या तयार होतात व या माद्या सु. पाच वर्षांच्या झाल्या म्हणजे त्यांतील काहींचे क्रियाशील नरात रूपांतर होते, हे ह्या बासचे वैशिष्ट्य होय.

जमदाडे, ज. वि.