व्हस्येव्हलत ईलऱ्यॉनव्हिच पूडॉव्हकिन

पूडॉव्हकिन, व्हस्येव्हलत ईलऱ्यॉनव्हिच : ( ? फेब्रुवारी १८९३ – ३० जून १९५३). जागतिक कीर्तीचा रशियन चित्रपट दिग्दर्शक व तंत्रविशारद. रशियातील पेंझा या गावी जन्म. त्याची जन्मतारीख ६ की २१ फेब्रुवारी याबद्दल अनिश्चितता आहे.

पहिल्या महायुद्धात त्याने भाग घेतला होता. त्या वेळी जखमी होऊन तीन वर्षे त्याला बंदिवासात काढावी लागली. कैदेतून मुक्त होताच तो रसायनशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला तथापि त्याचा ओढा रंगभूमीकडेच होता. ⇨ ग्रिफिथच्या इंटॉलरन्स ( १९१६) या चित्रपटामुळे प्रभावित होऊन मॉस्कोमधील स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सिनेमॅटोग्राफी या संस्थेत त्याने प्रवेश मिळविला. या संस्थेतील कूलेशोव्ह या चित्रपटतंत्रज्ञाबरोबर काम करण्याची संधी त्याला लाभली. तेथे चित्रपटीय संकलनात नवे तंत्र योजून दृश्य चित्रांचा मानसिक–भावनिक परिणाम कसा साधता येईल, याचा पूडॉव्हकिनने मागोवा घेतला. मेकॅनिक्स ऑफ द ब्रेन (१९२६) हा त्याचा पहिला चित्रपट. त्यात माणसाच्या क्रिया व प्रतिक्रिया यांसंबंधीच्या आपल्या कल्पना त्याने साकार केल्या. गॉर्कीच्या कादंबरीवर आधारलेला मदर (१९२६), द एंड ऑफ सेंट पीटर्झबर्ग (१९२७) व स्टॉर्म ओव्हर एशिया (१९२८) ही पूडॉव्हकिनची प्रसिद्ध चित्रपटत्रयी. त्यात अनुक्रमे कामगार माता, रशियन क्रांतीतील (१९१७) शेतकरी सैनिक व एक मंगोलियन शिकारी यांची क्रांतिकारक जीवनचित्रे सादर केली आहेत. मदर या चित्रपटात दृश्यमिश्रणाचे तंत्र योजून त्याने गुंतागुंतीच्या कल्पना साकार केल्या. डेझर्टर (१९३३) व ड्‌मिरल नाखिमॉव्ह (१९४६) हे त्याने दिग्दर्शित केलेले बोलपट होत. जनरल सुव्हॉरॉव्ह (१९४१) हा बोलपट मात्र पूडॉव्हकिन व एम्. डॉलर यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केला होता.

फिल्म टेक्‍निक (१९३३) आणि फिल्म क्टिंग (१९३५) ही पूडॉव्हकिनची पुस्तके मूलतः रशियातील चित्रपटविषयक अभ्यासक्रमासाठी लिहिलेली आहेत. त्यांतून चित्रपटातील दृश्ये, दिग्दर्शन, अभिनय, संकलन यांसंबंधीच्या त्याच्या कल्पना विशद केलेल्या आढळतात. मुख्यतः चित्रपटातून पात्रांच्या मनःस्थितीचे दर्शन घडविण्यासाठी छायाचित्रण व चित्रसंकलन यांतील तांत्रिक कौशल्य विकसित करण्याचे पूडॉव्हकिनचे कार्य महत्त्वाचे आहे. मानसशास्त्राची बैठक ठेवून चित्तथरारक चित्रपट काढणाऱ्या ⇨ ल्फ्रेड हिचकॉकसारख्या नंतरच्या दिग्दर्शकांवर पूडॉव्हकिनच्याच कल्पनांचा प्रभाव आढळतो. दृश्यमिश्रणाच्या तंत्राचा जनक ग्रिफिथ की कूलेशोव्ह की पूडॉव्हकिन असा वाद असला, तरी पूडॉव्हकिनने या तंत्राला विकसित केले, हे निश्चितच. रशियन मूकपटाच्या ⇨ आयसेन्स्तीन, डोव्ह्‌झेंको व व्हर्टोव्ह या आद्य निर्मात्यांपैकी पूडॉव्हकिन हा एक होता. मॉस्को येथे तो मरण पावला.

जाधव, रा. ग. जोशी, चंद्रहास