मुंगूसवेल: (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फळे असेलेली फांदी, (३) फूल, (४) फळ.मुंगूसवेल : (नागवेल गु. मुंगूसवेल हि. सरहटी क. पाताळ गरूड इं. मुंगूस प्लँट सं. सर्पाक्षी लॅ. ऑफिओऱ्हायझा मुंगॉस कुल-रुबिएसी). हे उपक्षुपीय (काहीशी झुडपासारखी) ⇨ ओषधी ४५–५० सेंमी. उंच असून ब्रह्मदेशात आणि भारतात खासी टेकड्यांत ६१० मी. उंचीपर्यंत, प. घाटात वायनाड ते अन्नमलाई येथे, त्रावणकोर व तिरुनेलवेली टेकड्यांवर कमी उंचीच्या भागात आणि अंदमान व निकोबार बेटे येथे आढळते. याचे खोड दंडगोलाकार, काहीसे शाखायुक्त, बिनकाटेरी व गुळगुळीत असते किंवा त्यावर फार बारीक लव असते. पाने साधी, फार मोठी १०–२० सेंमी. लांब, समोरासमोर, दीर्घ वर्तुळाकार-भाल्यासारखी, लांबट टोकाची, तळाशी लांब व चिकटून बारीक होत आलेली (अधोगामी), वरून चकचकीत हिरवी व खालून फिकट असतात. उपपर्णे (तळाशी असलेली उपांगे) फार लहान असतात. फुले पांढरी असून काहीशा चवरीसारख्या वल्लरीवर [⟶ पुष्पबंध] येतात. बिंब ठळकपणे दिसतो बोंड १ सेंमी. रुंद, चिवट, लांबी १/३ सेंमी., बरेच चापट आणि संवर्तापेक्षा अधिक उंच असते. त्यात पुष्कळ, कोनीय, फिकट तपकिरी बिया असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रुबिएसीत (कदंब कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

मुंगूसवेलाची मुळे अतिशय कडू असतात व त्यांचा उपयोग शक्तिवर्धक म्हणून होऊ शकेल असे आढळले आहे ती कृमिघ्न व विषशामक असतात. ती विंचवाच्या व सर्पदंशाच्यावर गुणकारी नसल्याचे आधुनिक संशोधनाद्वारे आढळून आले आहे. सुश्रुतसंहितेत सर्प व वृश्चिक दंशावर गुणकारी असल्याचा उल्लेख आहे. त्यात स्टार्च, फिकट तपकिरी रेझीन व अल्प प्रमाणात अस्फटिकी अल्कलॉइड असते. पानांत व खोडात लेशमात्र प्रमाणात हायड्रोसायानिक अम्ल असते.

मुळे कर्करोगाच्या चिकिस्येत उपयुक्त असल्याचे मानतात. मुळे, पाने व साल यांचा काढा दीपक (भूक वाढविणारा) म्हणून देतात. पाने जखमांना लावण्यासाठी वापरतात. खोड खरबडून काढलेल्या भागापासून बनविलेल्या खळीचा उपयोग म्यान व गिटार बनविताना करतात.

संदर्भ :1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.

           2. Kirtikar, K . R Basu, B. D. Indian Medicinal Plants, Part II, New Delhi, 1975.

जमदाडे, ज. वि.