रवंथ करणे : गाई, म्हशी, मेंढ्या इ. प्राणी शाकाहारी असून गवत, लहान झुडपे, झाडपाला यांवर आपली उपजीविका करतात. हे प्राणी अन्न खाऊन झाल्यावर विश्रांती घेत असताना गिळलेले अन्न गाईचा आमाशय: याचे चार कोष्ठ दाखविले आहेत: (१) ग्रसिका, (२) रोमंथिका, (३) जालिका, (४) भंजिका, (५) जठराशय, (६) आंत्र-रोमंथी प्राण्याचे खाद्य ग्रसिकेतून (अ)रोमंथिकेत जाते, तेथून ते पुन्हा ग्रसिकेतून (आ) मुखात येते व त्याचे चांगले चर्वण झाल्यावर ग्रसिकेतून (इ) जालिकेत जाते. नंतर ते जालिकेतून भंजिकेत, तेथून जठराशयात व नंतर आंत्रात जाते. अन्नाचा मार्ग बाणांनी दाखविला आहे.

गाईचा आमाशय : याचे चार कोष्ठ दाखविले आहेत: (१) ग्रसिका, (२) रोमंथिका, (३) जालिका, (४) भंजिका, (५) जठराशय, (६) आंत्र-रोमंथी प्राण्याचे खाद्य ग्रसिकेतून (अ)रोमंथिकेत जाते, तेथून ते पुन्हा ग्रसिकेतून (आ) मुखात येते व त्याचे चांगले चर्वण झाल्यावर ग्रसिकेतून (इ) जालिकेत जाते. नंतर ते जालिकेतून भंजिकेत, तेथून जठराशयात व नंतर आंत्रात जाते. अन्नाचा मार्ग बाणांनी दाखविला आहे.घासा-घासाने पुन्हा तोंडात आणून अगदी बारीक चावून पुन्हा गिळतात. या क्रियेला रवंथ करणे म्हणतात. हरणे, जिराफ, उंट वगैरे प्राणीदेखील शाकाहारी असून रवंथ करणारे आहेत. खालेल्या अन्नामधून या प्राण्यांच्या पोषणाकरिता मुख्यतः सेल्युलोजाचा पुरवठा होतो. शिवाय, या वनस्पतींत न पचणारे किंवा अगदी हळूहळू पचणारे द्रव्य पुष्कळच असल्यामुळे पोषणाकरिता आवश्यक असणारे पदार्थ मिळविण्याकरिता या प्राण्यांना शाकान्न फार मोठ्या प्रमाणात खाणे जरूरीचे असते. सेल्युलोजाचे पचन या प्राण्यांच्या शरीरातील ग्रंथींच्या स्रावामुळे न होता अन्ननालात राहणाऱ्या असंख्य सूक्ष्मजंतूंच्या योगाने होते. सूक्ष्मजंतूंमुळे या गुंतागुंतीच्या कार्बोहायड्रेटाचे (सेल्युलोजाचे) अपघटन (रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होऊन जे पदार्थ उत्पन्न होतात, त्यांचे सहज सात्मीकरण (पोषक द्रव्यांचे जीवद्रव्यात रूपांतर) होऊन त्यांचा शरीराला उपयोग होतो. याकरिता शाकाहारी प्राण्यांमध्ये आहारनालाचे (अन्ननलिकेचे) काही भाग मोठे व गुंतागुंतीचे झालेले असतात. खाल्लेले अन्न या भागांमधून लगेच पुढे न जाता काही काळ तेथेच राहते. पचनक्रिया घडवून आणणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या कार्याकरिता लागणारे अनुकूलतम तापमान, आर्द्रता व अम्लता या भागांत कायम टिकून असतात.

रोमंथी (रवंथ करणाऱ्या) प्राण्यांमध्ये या कार्याकरिता आमाशयाचे चार भाग पडलेले असतात. हे सगळे भाग पिशवीसारखे असतात.मुखगुहेपासून निघणारी ग्रसिका (अन्न वाहून नेणारी मांसल नलिका) आमाशयाच्या पहिल्या भागात उघडते. याला रोमंथिका म्हणतात. हा भाग आमाशयाच्या इतर तीन भागांपेक्षा पुष्कळच मोठा (एकूण घनफळाच्या सु. ८०%) असतो. दुसऱ्या भागाला जालिका म्हणतात. याच्या श्र्लेष्मकलेवर (पातळ बुळबळीत अस्तरावर) खळगे असल्यामुळे तो मधाच्या पोळ्यासारखा दिसतो. याच्या पुढचा तिसरा भाग भंजिका हा होय. आमाशयाचा चौथा व शेवटचा भाग जठराशय होय. याच्या श्र्लेष्मकलेत असंख्य ग्रंथी असतात. हे खरे जठर होय.

प्राणी चरत असताना घाईघाईने गिळलेले अन्न रोमंथिकेत जाते किंवा आधी जालिकेत जाऊन नंतर रोमंथिकेत येते. हा भाग बराच मोठा असल्यामुळे यात बरेच अन्न राहू शकते. रोमंथिकेच्या भित्तीच्या दर मिनिटाला होणाऱ्या आकुंचनामुळे अन्न घुसळले जाऊन लाळेबरोबर चांगले मिसळते. रोमंथी प्राणी काही वेळ चरून चर्वण न केलेल्या अन्नाने रोमंथिका भरून घेतो आणि स्वस्थ बसून रवंथ करतो म्हणजे प्रत्येक वेळी थोडे थोडे अन्न रोमंथिकेमधून जालिकेत येते व तेथे त्याचे अन्नगोलक किंवा गोळे बनतात. एक प्रकारच्या चूषण (अंशतः निर्वात निर्माण करून पदार्थ ओढून घेण्याच्या) क्रियेने हे गोळे एकामागून एक याप्रमाणे परत तोंडात येतात व तेथे त्यांचे पूर्ण चर्वण होऊन अन्न जालिकेत जाते. तिच्यातून ते परत रोमंथिकेत किंवा पुढच्या भागात म्हणजे भंजिकेत जाते. अशा प्रकारे अन्न अगदी बारीक दळले जाते. भंजिकेमध्ये अगदी पातळ पटलिका पुष्कळ असतात. त्यांच्यामधून जात असताना अन्न गाळले जाते. मोठे कण किंवा तुकडे मागे राहतात आणि अन्नाचे फक्त्त सूक्ष्मकणच पुढे जठराशयात जातात. जठराशयाच्या कार्याची तुलना रवंथ न करणाऱ्या प्राण्यांच्या आमाशयाशी करता येईल. दोहोंत तेच पाचक स्राव उत्पन्न होतात. काही परिस्थितीत सगळी रवंथक्रिया लघुपंथित होते. उदा., गाईचे वासरू पीत असताना काही स्नायूंच्या आकुंचनाने ग्रसिकेच्या भित्तीत एक खातिका (खाच) तयार होते व तिच्यातून दूध सरळ भंजिकेत जाते.

अन्न बारीक दळले गेल्यामुळे सूक्ष्मजंतूंच्या क्रियेकरिता फार मोठा पृष्ठभाग उपलब्ध होतो अन्न गिळताना मोठ्या प्रमाणात लाळ उत्पन्न होते तिच्यात एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारी प्रथिने) नसतात पण सोडियम बायकार्बोनेट व इतर लवणे असल्यामुळे त्यांच्या योगाने सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे उत्पन्न झालेल्या अम्लांचे उदासिनीकरण होते. शिवाय, प्राण्यांच्या शरीराचे तापमान व रोमंथिकेच्या खोल भागात हवेचा असणारा जवळजवळ अभाव यांच्यामुळे सूक्ष्मजंतूंच्या क्रियेला आवश्यक असणारी आदर्श स्थिती उत्पन्न झालेली असते.

रोमंथिकेत सूक्ष्मजंतूंमुळे घडून येणारी मुख्य क्रिया म्हणजे सेल्युलोज व संबद्ध जटिल कार्बोहायड्रेट यांच्या अपघटनाने ॲसिटिक, प्रोपिऑनिक व ब्युटिरिक या अम्लांसारखी साधी कार्बनी अम्ले व वायू (मिथेन व कार्बन डाय-ऑक्साइड) उत्पन्न होणे ही होय. ही अम्ले रोमंथिकेच्या भित्तीमधून शोषली जाऊन रक्त्तात मिसळतात. अशा प्रकारे सेल्युलोजपासून ऊर्जेचा पुरवठा होतो. शिवाय प्रथिने व बहुतकरून काही कार्बोहायड्रेटे सूक्ष्मजंतूत साठविली जातात आणि पुढे आंत्रात (आतड्यात) त्यांचे पचन होते. प्राण्यांच्या जीवनाला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे रोमंथिकेत असणारे सूक्ष्मजंतू संश्र्लेषणाने (साध्या संयुगांच्या वा मूलद्रव्यांच्या संयोगाने) उत्पन्न करू शकतात.

रोमंथी प्राण्यांच्या आहारनालाचे इतर भाग शाकाहारी नसलेल्या प्राण्यांच्या आहारनालाच्या त्या भागांप्रमाणेच असतात. जठराशयानंतर लघ्वांत्र (लहान आतडे) व बृहदांत्र (मोठे आतडे) असते. या प्राण्यांचे अंधनाल (बृहदांत्राच्या सुरुवातीस असणारा पिशवीसारखा भाग) व बृहदांत्र काहीसे मोठे असतात आणि ज्या पदार्थांचे रोमंथिकेत पचन झालेले नसते त्यांचे या भागात सूक्ष्मजंतूंच्या क्रियेने बव्हंशी पचन होते. यावरून असे दिसून येईल की, रोमंथी प्राण्यांमध्ये सेल्युलोजाच्या पचनाकरिता कार्यक्षम रचना असते.

पहा : पचन तंत्र.

कर्वे, ज. नी.