बाबिरूसा : हा डुकराचा जातीचा वन्य प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बाबिरूसा बाबिरूसा असे आहे. हा प्राणी फक्त सेलेबिस, बुरू, सूलू वगैरे बेटांत सापडतो. दमट अरण्ये व वेताच्या बेटांत आणि नद्या व सरोवरे यांच्या काठी हा राहतो. डोक्यासकट शरीराची लांबी ८७-१॰६सेंमी. असते शेपटी २७-३२ सेंमी. असून तिच्या टोकावर झुपका नसतो खांद्यापाशी उंची ६५-८॰ सेंमी. असते पाय तुलनेने लांब असतात कातडी खडबडीत किंवा नितळ असून तपकिरी-करड्या रंगाची असते तिच्यावर अगदी तुरळक केस असतात व तिला सैल घड्या पडलेल्या असतात शरीराची खालची बाजू फिक्कट रंगाची असते.वरच्या आणि खालच्या जबड्यांतील सुळ्यांची होणारी अतिवृद्धी (असामान्य वाढ) हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. सुळे वाढून त्यांचे सुळके बनलेले असतात व ते सतत वाढत असतात. ते फक्त दंतिनाचे (कठीण, लवचिक, कॅल्शियमयुक्त पदार्थांचे) झालेले असून दंतवल्काचा (दातावरील कठीण पदार्थाच्या थराचा एनॅमलाचा) पूर्णपणे अभाव असतो. बाबिरूसाचे वरचे सुळके वरच्या भागातून बाहेर येतात व मागच्या बाजूकडे वाकडे होऊन कपाळाला टेकतात. खालच्या जबड्यातील सुळके मुखाच्या बाजूने बाहेर आलेले असून ते वरच्या दिशेला वाढत जाऊन नंतर मागे वळतात.बाबिरूसाचा पाठलाग केला असता तो वरच्या सुळक्यांनी फांदीला लोंबकळतो असे पूर्वीचे शिकारी सांगत असत पण याच्या कोणत्याही सुळक्यांचा काहीच उपयोग नाही. त्यांचा शस्त्रासारखाही उपयोग करता येत नाही. बाबिरूसांच्या झुंजीत पुष्कळदा सुळके तुटतात. भरमसाट वाढ झालेले हे सुळे आहेत, असे हल्लीच्या शास्त्रज्ञांचे मत आहे.

बाबिरूसा (बाबिरूसा बाबिरूसा )

बाबिरूसा निशाचर आहेत. यांचे कौटुंबिक गट असून गटात नर पुढे आणि मादी व पिल्ले त्याच्या मागे असतात. झाडाझुडपांची मुळे, लहान फळे, अळ्या इत्यादींवर हे निर्वाह करतात. मुळे उकरून काढण्याचे काम बहुधा नराचे असते आणि मादी व पिल्ले ती खातात. हा वेगान पळू शकतो. याची दृष्टी व श्रवणशक्ती अतिशयतीव्र असते.

 मादीला दर खेपेस दोन पिल्ले होतात. गर्भावधी सु. ५ महिन्यांचा असतो. सेलेबिस वगैरे बेटांतील मूळ रहिवाशी मांसाकरिता याची शिकार करतात किंवा मोठाली जाळी पसरून त्यांत बरेच बाबिरूसा एकदम पकडतात. यांची पिल्ले पकडून पाळतात. कायद्याने जरी बाबिरूसाला संरक्षण मिळाले असले, तरी तो निर्वंश होण्याच्या मार्गावर आहे.

जोशी, मीनाक्षी.