मानसशास्त्रीय युद्धतंत्र : प्रत्यक्ष हिंसात्मक युद्धात अथवा ⇨ शीतयुद्ध परिस्थितीत शत्रुराष्ट्र किंवा प्रतिकूल वा विरोधी राष्ट्र अथवा अशा राष्ट्रांचे राष्ट्रगट, याच्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी, मानसशास्त्रीय सिद्धांतांचा शस्त्रास्त्रे म्हणून उपयोग करणे म्हणजे मानसशास्त्रीय युद्धतंत्र अशी स्थूल स्वरूपाची व्याख्या करता येईल. या युद्धतंत्राचा वापर राजकीय प्रचारयुद्ध, आर्थिक युद्ध, ⇨ इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्र वा ⇨ वायुयुद्धतंत्र इ. युद्धतंत्रांबरोबरच होतो. केवळ मानसशास्त्रीय युद्धतंत्र वापरून एखाद्या राष्ट्राने स्वार्थ व आपली राजकीय उद्दिष्टे साध्य केल्याचे अपवाद आढळतात. उदा., सप्टेंबर १९३९ पूर्वी हिटलरच्या नाझी जर्मनीने केलेला प्रदेशविस्तार.

युद्धाचे व संघर्षाचे मूळ मानसिक व जैव प्रेरणांत सापडते, म्हणून लढा देण्याचा व प्रतिकार करण्याचा मनोनिर्धारच उद्ध्वस्त करणे हे, मानसशास्त्रीय युद्धतंत्राचे खरेखुरे उद्दिष्ट असते. हिसांत्मक युद्धतंत्राने शत्रूचे लोक व आधिभौतिक संपत्तिसाधने नष्ट होतात आणि त्यांचे मनोधैर्य खच्ची झाल्यावर ते शरण येतात. मानसशास्त्रीय युद्धामागे व्यक्ती, समाज व राष्ट्र यांच्यातील भीती, संमोह, अज्ञान, काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर व अहंकार तसेच जगण्याची भावना या मानसिक व जैव प्रवृत्तींचा आणि मनोव्यापारांचा कौशल्याने उपयोग करून त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास भाग पाडण्याचा हेतू असतो. म्हणजे ‘शत्रूचे मन’ हे यात आघात-लक्ष्य असून त्याचा मानसिक पराभव करणे हे त्यामागील ध्येय असते. पाठपुरावा युद्ध (वॉर ऑफ परसुएशन) किंवा संभ्रम-युद्ध (वॉर ऑफ नर्व्ह्‌ज) वा रक्तहीन युद्ध (ब्लडलेस वॉर) असेही या युद्धप्रकारास म्हटले जाते. हिंसात्मक युद्धाबरोबर या युद्धतंत्राचाही अवलंब करण्यात येतो.

उद्दिष्टे : मानसशास्त्रीय युद्धतंत्राची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे असतात शत्रूचे सैनिक, सैनिकी अधिकारी, जनता, पुढारी, राज्यकर्ते इत्यादींचा युद्धाबद्दलचा उत्साह कमी करणे त्यांना त्यांच्या युद्ध लढण्याच्या निर्धारापासून परावृत्त करणे वा त्यांचे मनोधैर्य खच्ची करणे युद्धात विजय मिळणे अशक्य आहे युद्ध लांबवणे म्हणजे निष्कारण प्राण व संपत्ती यांची हानी पतकरणे होय, म्हणून त्वरेने युद्ध थांबवून शरण जाणे हाच श्रेयस्कर मार्ग आहे इ. कल्पना शत्रूवर बिंबवण्याचा प्रयत्न यात केला जातो.

१९६० च्या दशकातील यूरोप-अमेरिकेतील अण्वस्त्रविरोधी निदर्शनासंबंधीचे रशियन व्यंग्यचित्र.

स्वकीयांवर युद्धकार्याची यथार्थता व शुद्धता बिंबवणे त्यांचा युद्धोत्साह वृद्धिंगत करणे हाल अपेष्टा भोगत असतानाही विजय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार कायम ठेवणे व मनोधैर्य अचल राखणे युद्धलिप्त किंवा तटस्थ राष्ट्रांशी मित्रत्व जोडून, त्यांना आपले युद्धकार्य सत्य व न्याय्य तत्त्वांवर अधिष्ठित असल्याचे पटविणे, आपण लढत असलेले युद्ध हे धर्मयुद्ध (वा न्याय्ययुद्ध) असल्याने आम्हीच विजयी होणार हे त्यांना पटवून देऊन त्यांची सक्रिय सहानुभूती मिळविणे आणि हे न साधल्यास ती राष्ट्रे शत्रूशी संगनमत न करता तटस्थ राहतील अशी काळजी घेणे व त्यासाठी प्रसंगी मुत्सद्देगिरीचाही उपयोग करणे, असे नानाविध हेतू या युद्धतंत्रामागे असू शकतात.

प्राचीन चिनीतत्त्वज्ञ स्वुन्‌ज हात्याच्या युद्ध याग्रंथात सांगतो की,‘सर्व युद्धतंत्रांची मूळबैठक फसवणूक हीचअसते. सेनापतीचेमुख्य लक्ष शत्रुसेनापतीचे मन असते.लढाईची पूर्वतयारी म्हणजे शत्रूच्या मनावर हल्ला करणे त्याला फसवून आणि त्याच्या मनात गोंधळ निर्माण करून त्याची निर्णयक्षमता अस्थिर करणे, कौटिल्यानेही आपल्या अर्थशास्त्रात कूट-युद्धाच्या विवरणामध्ये मानसशास्त्रीय युद्धतंत्राचे अप्रत्यक्ष वर्णन केल्याचे आढळते.

इतिहास : मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा जनक कोण किंवा ते कधी व कोणी प्रचारात आणले हे सांगता येत नाही. मानवी संघर्ष, त्याची प्रक्रिया व परिणाम आणि त्या संघर्षाचा शेवट यांचे मूळ मानसिकच असते. उदा., मानसिक दृष्टीकोन, अस्मिता, मूल्यकल्पना, स्वभावविशेष व भावना इत्यादी. शत्रूला युद्धविन्मुख करण्यासाठी अनेक साधनांचा वापर पुरातन काळापासून रूढ आहे. उदा., तोंडाला व अंगाला रंग फासणे मोठ्या दाढीमिशा ठेवणे शत्रुविरुद्ध अक्राळविक्राळ शस्त्रे वापरणे उंच टोप, भडक व विचित्र वेष धारण करून आपला धिप्पाडपणा दाखविणे कर्णपटू रणवाद्यांचा गजर, आरडाओरडा किंवा भयंकर आवाज काढणे शिवीगाळी करणे वा मुखवटे धारण करणे इत्यादी. शत्रूच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य प्रचंड आहे, युद्धनेते व योद्धे युद्धप्रवीण व अजिंक्य आहेत, शत्रुनेते व योद्धे कच्चे आहेत, आपली शस्त्रास्त्रे प्रभावी व प्राणघातक आहेत. आपला अन्नसाठा भरपूर आहे, आम्ही करीत असलेले युद्ध हे धर्म व न्यायाधिष्ठित असल्याने देवदेवता आमच्या पक्षाच्या आहेत. त्यामुळे आम्ही अजिंक्य आहोत इ. स्वरूपाचा प्रचार केल्याची अनेक ऐतिहासिक उदाहरणे सापडतात. दाशराज्ञ युद्ध कौरव-पांडव युद्ध, यहुदी-फिलिस्तानी युद्धे धर्मयुद्धे ग्रीस-ट्रॉय युद्ध [→ ट्रोजन युद्ध] वगैरेंमधून हेच दिसून येते. अथर्ववेदातही संमोहनास्त्रादींचा वापर मानसशास्त्रीय स्वरूपाचाच दाखविला आहे. भगवद्‌गीतेच्या पहिल्या अध्यायावरील ज्ञानदेवांच्या भाष्यातही मानसशास्त्रीय युद्धतंत्राचे दाखले मिळतात तर गीतेतील युद्धपराङ्‌मुख व मोहग्रस्त अर्जुनाला श्रीकृष्णाने युद्धाला कसे प्रेरित केले हे पाहण्यासराखे आहे. श्रीकृष्णाचा उपदेश ऐकून अर्जुनाचा मोह नष्ट होऊन त्यास स्मृती प्राप्त झाली. तसेच पांडवांच्या बाजूला योगेश्वर कृष्ण व धनंजय पार्थ असल्याने, पांडवांनाच श्री व विजय मिळणार असे जे धृतराष्ट्रास संजय सांगतो, त्यातही मानसशास्त्रीय युद्धतंत्राचेच बीज आढळते. मुहंमद पैगंबराने मक्का मिळविण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा उपयोग केला, असे काही मुस्लिम इतिहासतंज्ञांचे म्हणणे आहे तर १६२२ मध्ये रोमन कॅथॉलिक पंथाने धर्मप्रसारासाठी जी संस्था स्थापन केली, तिच्यावरून ‘प्रॉपगँडा’[→ प्रचार] ही संज्ञा रूढ झाली असल्याचे दिसून येते. प्राचीन ग्रीक अलंकारशास्त्रात श्रोत्यांना लोकांच्या हितासाठी सत्यकथन करीत आहेत, किंवा त्यामागील आपला हेतू चांगला आहे, हे कसे पटवून द्यावे याचा ऊहापोह केला आहे. थ्यूसिडिडीझच्या इतिहासात व डिमॉस्थिनीझच्या प्रवचनातही तत्कालीन प्रचारतंत्राची माहिती मिळते. गौतम बुद्ध, कन्फ्यूशस यांनीही सत्यकथन, प्रभावी वक्तृत्व, लिखाण, भाषा इ. मुद्यांवर विवेचन केले आहे. ‘देवकीपुत्र कृष्ण हा तुझा शेवट करणार’,  ही आकाशवाणी ऐकून कंस भ्रमिष्ट झाला व त्याचा शेवट झाला. ही पौराणिक कथा या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखी आहे तर चंगीझखानाच्या विजयाचे मूळ शत्रूच्या मानसिक अधःपातात कसे सापडते, हे पाहाण्यासारखे आहे. मॅकिआव्हेलीने यूरोपात मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा पाया घातला की नाही याबद्दल एकवाक्यता नाही तथापि युद्धात सर्व प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या उपयोगात आणण्यास प्रत्यवाय नाही असे त्याचे मत होते.


छत्रपती शिवाजी महाराजांनी मोंगल किंवा विजापूरच्या सुलतानाला युद्धापासून पराङ्‌मुख करण्यासाठी जे डावपेच लढविले होते, त्यांत मानसशास्त्रीय सिद्धांताचे दर्शन घडते. त्यांच्यातील साहस व गतिशीलता यांमुळे शत्रूला ते जिकडेतिकडे दिसू लागले. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांनीही मोंगली सैन्याच्या मानसावर असाच आघात केला होता त्यामुळे शत्रूच्या घोड्यांनाही धनाजी-संताजी पाण्यात दिसत, असे म्हटले जाते. हाही एक मानसशास्त्रीय युद्धतंत्राचाच पैलू होता. लोकांच्या मिथ्यकथांवरील श्रद्धेचा फायदा घेऊन परकियांनी त्यांच्यावर विजय मिळविल्याची उदाहरणेही आढळतात. उदा., अलाउद्दीन खल्‌जीचे बिहारवरील आक्रमण व विजय ब्रिटिशांना हाकलून देण्यासाठी सूदानच्या मुहंमद अहमद (१८४३-१८८५) याने केलेला इस्लामी महदी आगमन संकल्पनेचा उपयोग. अशी अनेक प्रकारची उदाहरणे पहिल्या महायुद्धपूर्वकालीन [→ महायुद्ध, पहिले] इतिहासातही आढळतात. दुसऱ्या महायुद्धात [→ महायुद्ध, दुसरे] ब्रिटिश सैन्याने जर्मन सेनापती रोमेल यांचा घेतलेला धसका हे असेच एक आधुनिक उदाहरण आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रसिद्धी पावलेला जर्मन युद्धशास्त्रज्ञ ⇨ क्लाउझेव्हिट्स याने मानसशास्त्रीय युद्धतंत्रावर आपले स्वतंत्र विचार मांडले नाहीत तथापि युद्धातील पराजय आणि प्रदेश गमावल्यामुळे शत्रूचा युद्धनिर्धार ढासळतो, शत्रूला निःशस्त्र करण्यासाठी त्याचे मानसिक निःशस्त्रीकरण उपयुक्त ठरते विजय मिळणे अशक्य आहे किंवा त्यासाठी भारी मोल द्यावे लागेल, असे शत्रूला पटले की त्याचे मानसिक निःशस्त्रीकरण होते, असे त्याचे मत होते. त्यासाठी तो नेपोलियन व रशियाचा झार अलेक्झांडर यांच्यातील मानसिक द्वंद्वयुद्धाचे उदाहरण देतो.

पहिल्या महायुद्धात ग्रेट ब्रिटनने जर्मनीविरुद्ध हिंसात्मक युद्धतंत्र तसेच जर्मन नौसेना कमजोर असल्याने तिची आर्थिक नाकेबंदी यांसह पहिल्या प्रथम प्रचार युद्धतंत्र वापरले. कालातंराने आर्थिक  नाकेबंदीतंत्र हेच आर्थिक युद्धतंत्र [→ युद्ध व युद्धप्रक्रिया] म्हणून प्रसिद्ध झाले तथापि जर्मनीची ही आर्थिक नाकेबंदी नसून अमानुष व क्रूर ‘भूक-बंदी’ आहे असा प्रतिप्रचार करून तटस्थ राष्ट्रांची जर्मनीने सहानूभुती मिळविली. या प्रचार युद्धतंत्रात, आधुनिक रेडिओ वगैरेंसारखी निवेदन-माध्यमे नव्हती. मात्र प्रचारपत्रके, व्यंगचित्र व अफवा ही मानसिक प्रचारशस्त्रे वापरण्यात आली होती तर शत्रुराष्ट्रात पत्रके, पुस्तिका इ. साहित्य पोहचविण्यासाठी विमाने, फुगे इत्यादींचा वापर करण्यात आला होता. पहिल्या महायुद्धातील जर्मन पराभवाच्या कारणांची मीमांसा तत्कालीन जर्मन सेनापती व चीफ ऑफ स्टाफ लूडेन्डोर्फने त्याच्या Der Totale Kreig (संकुल किंवा निर्बंध युद्ध) या ग्रंथात केली आहे. त्याच्या मीमांसेप्रमाणे शत्रूच्या प्रचारतंत्रामुळे जर्मन राष्ट्राचा युद्धोत्साह व लढण्याची जिद्द दुबळी झाली. जर्मनीचा पराभव हा रणांगणावर झाला नाही, तर तो शत्रूच्या मानसिक शस्त्राघाताने झाला.

पहिल्या महायुद्धात रशियाला दोस्त राष्ट्रांपासून अलग पाडण्यासाठी, तसेच झारशाही व रशियाची प्रजा यांच्यात भेद करण्यासाठी, मार्क्सप्रणीत अनुयायी ⇨ लेनिन याला जर्मनीने रशियात आणून सोडले (१९१७) तत्पूर्वी त्याच्या क्रांतिवादी प्रचारामुळे रशियाचे सैन्य गतधैर्य होऊन युद्धाला विटलेच होते. झारशाही उलथून पाडल्यानंतर जर्मन सैन्यात बेदिली माजविण्यासाठी लेनिनने मानसिक अस्त्रांचा उपयोग केला तसेच जर्मनीची दोस्तराष्ट्रे व इंग्लंड, अमेरिका यांतील जनतेसाठी राजकीय प्रचार अस्त्रे त्याने वापरली. महायुद्ध हे भांडवलदारांनी व राज्यकर्त्यांनी त्यांच्या भल्यासाठी चालविले आहे त्यामुळे ते कामगार व श्रमिक यांच्या हिताविरुद्ध आहे, असा डांगोरा पिटून भांडवलशाही राष्ट्रांचे आपापसातील करारनामे व गुप्त तहमनामे यांना त्याने प्रसिद्धी दिली. या प्रचारामुळे भांडवलशाही राष्ट्रे आपापसात लढतील आणि बोल्शेव्हिक क्रांतीचे रक्षण होईल अशी त्याची अटकळ होती. हे महायुद्ध खंदकात न संपता पिछाडीवर संपेल असे त्याचे भाकीत होते तर निष्क्रीय प्रतिकार हा शस्त्र लढू न शकणाऱ्या सैन्यापेक्षा प्रभावी असतो, असा त्याचा प्रसिद्ध सिद्धांत आहे. ब्रेस्त-लिटॉफस्क (ब्रेस्त) तहाची बोलणी चालू असतानाच लेनिनने जर्मनीचे रशियावरील आक्रमण कामगार आणि श्रमिक सैन्य तसेच राजकीय प्रचार यांच्या बळाने परतवून लावले होते.


पहिल्या महायुद्धामुळे यूरोपीय जनतेला शारीरिक व मानसिक हाल आणि तणाव सोसावा लागला. युद्धोत्तर कालात चित्रपट, रेडिओ, ध्वनिवर्धक इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. ध्वनिवर्धकामुळे प्रचंड सभा भरविणे शक्य झाले. दोन महायुद्धांच्या मधील काळात यूरोपात इटली, जर्मनी व रशिया येथे एकपक्षीय हुकूमशाह्या प्रस्थापित झाल्या. त्यांनी वरील प्रचारमाध्यमांचा वापर करून लोकांच्या बुद्धिहीन व मनोविकृतिजन्य प्रेरणांचा राजकीय उद्दिष्टासाठी कौशल्याने उपयोग करून घेतला. गुप्त पोलीस [→ गेस्टापो] तसेच पक्ष व सेना यांचा दरारा आणि धाक तसेच जबरी शक्तीचाही उपयोग राष्ट्रांतर्गत तसेच परदेशांतही प्रचारकार्याकडे करून घेतला. हिटरलरने लूडेन्डोर्फच्या मतांना अनुसरून जर्मन जनतेचे आपल्या युद्धसज्जतेसाठी मतपरिवर्तन केले. प्रचाराने सर्व काही बरेवाईट साध्य करता येते एकच गोष्ट वारंवर जोरदारपणे सांगण्याने सर्वसामान्य लोक त्या गोष्टी खऱ्या मानतात इ. प्रचारतंत्राचा ऊहापोह हिटलरने त्याच्या Mein Kampf (म. शी. माझा लढा) या आत्मचरित्रात केला आहे. विरोधकांना गप्प बसविण्यासाठी त्यांची मुस्कटदाबी करणे किंवा त्यांना ⇨ बंधनागारातडांबणे अथवा त्यांना ठार मारणे इ. उपायही हुकूमशाहांनी वापरले आणि आजही वापरले जातात. तसेच १९२० सालापासून रेडिओ व १९२७ सालापासून बोलके चित्रपट या साधनांनी प्रचारकार्य सोपे केले. एकपक्षीय व एकनेता असलेल्या या राष्ट्रांत वरील प्रचारसाधनांच्या जोडीला सरकारनियंत्रित वर्तमानपत्रे, अभ्यवेक्षण, मिरवणुका, घोषणा, भाषणे, घोषवृंदवादन व गायन, नेत्यांची प्रचंड चित्रे इ. माध्यमांचा वापर करण्यात आला. राष्ट्रीयत्व व वांशिक उच्चनीचता या स्वार्थी तत्त्वांवर भर देऊन प्रतिकूल राष्ट्रांविरुद्ध द्वेष आणि घृणा त्यांनी निर्माण केली. आधुनिक मानसशास्त्रीय युद्धतंत्र हे नाझी जर्मनीत प्रस्थापित झाले. आता जगात कोणतेही राष्ट्र अशा प्रचारतंत्रापासून पराङ्‌मुख नाही.

दुसऱ्या महायुद्धातील प्रचारयुद्ध : दुसऱ्या महायुद्धाच्या कालात प्रचारमाध्यमांत खूपच प्रगती झाली होती. स्पेनच्या ⇨ यादवीयुद्धतील प्रचारतंत्राचा दाखला उपलब्ध झाला होता. नाझी प्रचारपद्धतीच्या स्वरूपाचे थोडेबहुत आकलन झाले होते. दूरगामी बाँबफेकी विमाने, रडार, गोंगाटजनक (जॅमिंग) व इलेक्ट्रॉनीय युद्धतंत्र ही नवी साधने आणि विद्या अवगत झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धातील प्रमुख युद्धमान राष्ट्रे म्हणजे जर्मनी, जपान, ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांच्या प्रचारतंत्राची माहिती आता उपलब्ध झाली आहे. मात्र रशियाच्या प्रचारतंत्राची माहिती अजूनही उपलब्ध झाली नाही तथापि ती फारशी वैशिष्ट्यपूर्ण किंवा वेगळी असेल असे वाटत नाही. त्या राष्ट्रांपैकी काहींच्या प्रचारतंत्राचे स्वरूप खालीलप्रमाणे होते.

जर्मनी :गोबेल्स हा प्रचारयुद्ध नेता होता. १९३९ सालापूर्वी जर्मनीच्या अंतर्गत संघटनेसाठी त्याने पुढील घोषणांवर खूप भर दिला होता : (१) जर्मन वंश हा सर्वश्रेष्ठ वंश आहे व तोच जगावर राज्य करणार (२) ऐतिहासिक दृष्ट्या हिटलर हाच सर्वश्रेष्ठ जर्मन आहे, म्हणून त्याच्यासाठी बलिदान करणे हेच श्रेयस्कर ठरते (३) व्हर्साय तहाचा धिःकार, (४) जर्मनीचा पराभव म्हणजे सर्व जगाचा पराभव. शत्रुराष्ट्राविरुद्ध केलेल्या प्रचारातही त्याने पुढीलप्रमाणे प्रचारतंत्र अवलंबिले. तेथील प्रजेत वांशिक आणि धार्मिक द्वेष-निर्मितीने भेद पाडणे, शासनविरुद्ध असंतोष पेटविणे, यूरोपीय संस्कृतीच्या रक्षणासाठी जर्मनी रशियाविरुद्ध लढत आहेत व अमेरिका आणि ब्रिटन हे स्टालिनचे बगलबच्चे आहेत या मुद्यांवर भर देणे, युद्धात विजय मिळणे अशक्य आहे हे दिसावयास लागल्यावर युद्ध अखेरपर्यंत न लढल्यास जर्मनीची तोडफोड होईल व त्याला ज्यूंचे दास व्हावे लागेल, रशियाची साम्यवादी निकृष्ट संस्कृती व शासन पतकरावे लागेल तथापि दोस्तराष्ट्रांच्या घनघोर बाँबहल्ल्यामुळे व त्यांतून टाकलेल्या पत्रकांमुळे नाझी सरकार संपूर्णतः विकृत व खोटा प्रचार करीत असल्याचे जर्मनांना कळून चुकले होते. शिवाय जर्मनीवर जेव्हा बाँबहल्ले होत त्यावेळी नाझी रेडिओ व प्रचार बंद पडे त्यामुळेही दोस्तराष्ट्रांचा रेडिओप्रचार किती सत्य व वास्तववादी आहे हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या व अनुभवलेल्या घटनांमुळे त्यांना पटे परंतु जर्मनांना अगतिक होऊन युद्धाला तोंड द्यावे लागले. शिवाय जर्मनीत नाझी पक्षाला प्रतिपक्ष नसल्याने वेळेवर युद्ध थांबविणे व शरणागती पतकरण्यास भाग पाडणे तेथील जनतेला अशक्य होऊन बसले होते. तसेच दोस्तांनीही ‘विनाअट शरणागती’ ची मागणी केल्याने युद्ध लांबतच गेले.

ब्रिटन : ब्रिटनचा प्रचार हा बहुतांशी सत्य व वास्तव होता. पराभव कबूल करूनही आशावाद, जोमदार प्रयत्न, स्वार्थत्याग व अंतिम विजयाची खात्री अशा भरीव मुद्यांवर त्यांचा भर असे. विन्स्टन चर्चिलची मे, जून व जुलै १९४० मधील ब्रिटिश जनतेला आणि जगाला उद्देशून केलेली भाषणे लक्षणीय आहेत.

अमेरिका : अमेरिकेचा युद्धप्रचार हा सत्य घटनांवर आधारित असल्याने विश्वासार्ह ठरला. जर्मनीवर विमानांमधून टाकलेल्या पत्रकांतून जर्मनांना जी माहिती मिळे, तिचा अनुभव येई त्यामुळे त्यांचा नाझी प्रचारावरील विश्वास उडाला. दोस्तराष्ट्रांच्या युद्धशक्तीचा अनुभव त्यांना त्यांच्यावर हजारो बाँबविमानांनी केलेल्या हल्ल्यामुळे पटे. जर्मन सैनिकांना ते शरण आल्यास उत्तम रीतीने वागविले जाईल याची हमी दिली जाई. यासाठी तोफगोळ्यातून प्रचारपत्रके जर्मन सैनिकांवर मारली जात.


जपान : शत्रुसैनिकांना उद्देशून केलेल्या जपानी प्रचारात शत्रुसैनिकांच्या लैंगिक भावना व ऐषआरामी जीवन इ. मुद्दे असत. उदा., लैंगिक भावना चेतविणे किंवा ऐषआरामी जीवनाचे प्रलोभन दाखविणे. झपाट्याने पादाक्रांत केलेल्या राष्ट्रांना (ब्रह्मदेश, इंडोचायना, फिलिपीन्स व पॅसिफिक महासागरी बेटे इ.) आपल्या बाजूला ठेवण्यासाठी जपानने पुढील प्रचारतंत्र वापरले होते : अमेरिका, फ्रान्स व ब्रिटन ही पिळवणूक करणारी साम्राज्यवादी राष्ट्रे आहेत‘आशियाई करिता आशिया’ या तत्त्वाला धरूनच जपान पाश्चात्यांविरुद्ध लढत आहे सर्वांना स्वराज्य व स्वातंत्र्य मिळेल आणि समतेने वागविण्यात येईल आशियाच्या सामूहिक सुखसंपदेसाठी सर्व आशियाई राष्ट्रांनी साम्राज्यवादी राष्ट्रांविरुद्ध जपानला मदत करावी इत्यादी तथापि प्रत्यक्ष आलेल्या कटू अनुभवांमुळे जपानला त्यांची सहानुभूती किंवा उत्स्फूर्त सहकार मिळणे दुरापास्त झाले.

अमेरिका व ब्रिटन यांनी जर्मनी व जपानवर केलेल्या बाँबहल्ल्याचा परिणाम त्या राष्ट्राची जनता, आर्थिक बळ व राज्यकर्ते यांच्यावर किती व कसा झाला युद्ध संपण्यास तो कितपत उपयोगी ठरला, याबद्दलची सविस्तर माहिती अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स् स्ट्रॅटेजिक बाँबिंग सर्व्हे व ब्रिटनच्या स्ट्रॅटेजिक एअर वॉर अगेन्स्ट जर्मनी :  १९३९–१९४५ या अहवालात मिळते. जपानवरील अणुबाँब हल्ल्यामागील नैतिकता व औचित्य यांवर बरीच चर्चा अद्यापही चालू आहे. १९४५ नंतर झालेले इंडोचायना विरुद्ध अमेरिका हे महत्त्वाचे युद्ध होय (१९५४–७५). या युद्धात राजकीय तसेच मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा वापर झाला त्याबरोबरच क्रांतियुद्धाला उपयुक्त असा गनिमी कावा, दहशतवाद इत्यादींचाही उपयोग उत्तर व्हिएटनामने केला. बऱ्याच अमेरिकी सैनिकांना दुर्बल करण्यासाठी त्यांना अफू व मादक पदार्थाची चटक लावण्यात उत्तर व्हिएटनाम यशस्वी झाले. राजकीय प्रचारामुळे अमेरिकी जनमतही तत्कालीन राज्यकर्त्यांकडून युद्ध बंद पाडण्यात यशस्वी ठरले. मलाया येथील क्रांतियुद्ध, सायप्रस, अल्जीरिया, दक्षिण किंवा लॅटिन अमेरिका, अरब-इझ्राएल युद्धे अशी काही मुक्ती संग्राम स्वरूपाची व इतर प्रकारची युद्धे झाली. ⇨ चे गेव्हारा, ⇨ फिडेल कास्ट्रो, रेजि डेब्रा, ⇨ माओ-त्से-तुंग इ. साम्यवादी क्रांतियुद्धातील मानसशास्त्रीय अथवा राजकीय युद्धतंत्रावर विचार प्रकट केले आहेत.

भारतीय हिंदू, बौद्ध व जैन तत्त्वज्ञान्यांनी मनाचे स्वरूप, कार्य  आणि  मनाचे  सामर्थ्य  यांविषयी  बहुमोल  व  मूलगामी स्वरूपाचे  सिद्धांत  मांडले  आहेत तथापि  त्या  सिद्धांतांचा  उपयोग त्यांनी  ज्यावेळी  परकीयांनी  व  म्लेंछांनी  (हूण,  मुस्लिम  इत्यादींनी ३०० ते १३०० या काळात) आक्रमणे केली त्यांविरुद्ध मनोभूमिका तयार करण्याकडे मात्र केला नाही. किंबहुना तत्कालीन हिंदू, बौद्ध व जैनधर्मीय राज्य आणि राजनीती प्रबंधकार अथवा प्रणेते उदा., कामंदक (इ. स. ५००) व सोमदेवसूरी (इ. स. ९६०) इत्यादींनी कौटिल्याच्या मतांचीच री ओढली होती. त्याला अपवाद म्हणजे सतराव्या  शतकातील  समर्थ  रामदास  स्वामी  यांचा  होता. त्यांच्याविचारांवर मात्र अप्रत्यक्षपणे मानसशास्त्रीय युद्धतंत्रात्मक सिद्धांतांची छाया पडलेली दिसते.

स्वतंत्र भारताला पाकिस्तान व चीनविरुद्ध संरक्षणात्मक युद्ध करणे भाग पडले तथापि त्या त्या प्रसंगी मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा जोरदार वापर भारताने केला होता, असे दिसत नाही. फक्त भारतीय प्रजेला चेतना देण्यासाठी स्फूर्तिगीते अथवा भाषणे मात्र ऐकविली गेली होती एवढेच. याउलट पाकिस्तानने स्वप्नरंजनात्मक असा एकतर्फी प्रचार भरपूर केला होता. जवाहरलाल नेहरू यांचे ⇨ भारत-पाकिस्तान संघर्ष (१९४८) व ⇨ भारत-चीन संघर्ष (१९६२) या प्रसंगीची भाषणे किंवा १९६५ च्या भारत किंवा १९६५ च्या भारत पाकिस्तान संघर्षाच्या वेळचे लालबहादूर शास्त्रींचे भाषण अथवा इंदिरा गांधींचे बांगला देश युद्धपूर्व व युद्धकाळात राष्ट्राला उद्देशून केलेले सत्यकथन आणि लोकसभेतील भाषणे यांच्यामुळे मानसशास्त्रीय युद्धतंत्र वापरण्याची आवश्यकता कदाचित भासली नसावी. भारत-चिनी युद्धात भारताचा जरी सैनिकी पराभव झाला असला, तरी भारताची एकजूट व एकात्मता तसेच राजकीय उद्दिष्टे यांची हानी मात्र झाली नाही.


मानसशास्त्रीय युद्धाचे तंत्र व मंत्र : मानसशास्त्रीय युद्धतंत्र प्रचारात्मक असले, तरी सर्वसाधारण प्रचार,  जनसंपर्क वा जाहिरात तंत्र यांच्यापेक्षा हे प्रचारतंत्र वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्यक्ष युद्धकालात व‘ना  शांतता ना युद्ध’ अशा शीतयुद्ध परिस्थितीत या युद्धतंत्राचा वापर करण्यात येत असून त्यात प्रायः पुढील बाबी असतात : (१) सत्यकथन, शुचिता व जीवनमूल्ये या मुद्यांना गौणत्व देण्यात येते. मात्र त्यांचा विसर पडल्यास  प्रचार प्रभाव निस्तेज ठरतो. (२) शत्रुराष्ट्राशिवाय इतर राष्ट्रांना उद्देशून केलेल्या प्रचाराबद्दल तेथील जनता व राज्यकर्ते नेहमीच साशंक असतात. कारण आजचा मित्र उद्या शत्रू बनू शकतो म्हणून हा प्रचार फार बारकाव्याने व तोलून-मापून करावा लागतो. (३) संदेहात्मक प्रचार उदा., ‘नरो वा कुंजरो वा’ हा कधी लाभदायक तर बऱ्याच वेळा तोट्याचा ठरतो. (४) श्रोते व प्रेक्षक यांच्याविषयी परिपूर्ण व अचूक ज्ञान नसल्यास प्रचार उलटण्याचाच दाट संभव असतो. (५) किरकोळ पराभवाचा गाजावाजा करून शत्रूची आक्रमणशीलता  नष्ट करण्यात येते. (६) राज्यकर्ते व युद्धनिर्देशक यांच्यापासून सर्वसामान्य प्रजेला अलग पाडण्यात येते किंवा  तिला त्यापासून उदासीन वा तटस्थ राखण्यात येते. या तंत्राला अंतःस्थ विजय (इंटरनल काँव्केस्ट) म्हणतात. आघाडीवरील सैनिकांची त्यांच्या सग्यासोयऱ्यांना वाटणारी काळजी, सैनिकांना वाटणारी मृत्यूची भीती, महागाई, रोगराई, युद्धातील चढउतार, हालअपेष्टा, सैनिकाला आपल्या कुटुंबाविषयी वाटणारी चिंता अशा बाबींचा कौशल्यपूर्ण उपयोग यात करण्यात येतो. अफवा हे प्रचारसाधन म्हणून याबाबतीत एक अमोध शस्त्र ठरते. (७) स्वदेशीय नागरिकांपासून प्रतिकूल घटनांची माहिती दाबून ठेवल्यास अफवा पसरतात त्यांच्यात असंतोष उफाळून येतो. १९६५ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात काश्मीरी प्रजेने भारताविरुद्ध उठाव केल्याचा तसेच न घडलेल्या लढायांत पाकिस्तानी सैन्य विजय मिळवीत असल्याचा उलट प्रचार पाकिस्तानने त्यावेळी केला होता. वास्तविक हा प्रचार वस्तुस्थितीच्या उलट होता. १९७१ सालच्या बांगला देश युद्धातही पाकिस्तानी प्रचार एकतर्फीच होता. (८) शत्रूविषयी द्वेष आणि घृणा निर्माण करण्यासाठी त्याच्याकडून झालेला अत्याचार व क्रूर घटना यांच्या आधारे अपप्रचार करण्यात येतो त्यामुळे आपण केलेल्या अत्याचाराला प्रत्युत्तरात्मक स्वरूप देण्याचा किंवा त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आपोआपच होतो. मात्र तो अंगलट येण्याचाही संभव असतो. (९) सत्यकथन आणि प्रचार यांचा अन्योन्य संबंधकाहीही नसतोप्रभावीप्रचार तोचकी जो एखाद्याला यश मिळवून देतो, असे काही प्रचारकांचे म्हणणे आहे. मात्र दूरगामी परिणामाच्या दृष्टीने ते खरे ठरत नाही. शत्रूच्या पराजयाचा सारखा प्रचार करीत राहिल्यास, शत्रूचा युद्धोत्साह कमी न होता तो वृद्धिंगत होण्याचीच शक्यता असते. (१०) आपल्या विजयाचा एकसारखा प्रचार करीत राहिल्यास आणि प्रसंगी एकाएकी पराभव झाल्यास आपला युद्धोत्साह एकदम ढासळण्याचा मोठा संभव असतो. १९६२ सालच्या भारत-चीन युद्धांमध्ये भारताला वारंवार पराभव पतकरावा लागला त्यामुळे ज्या लढायांत जय मिळविला  होता, त्यांना गौणत्व मिळाले. (११) पाकिस्तानच्या बाबतीत एक मुस्लिम सैनिक दहा हिंदी सैनिकांना भारी आहे, मुस्लिमांनी नेहमीच हिंदूचा पराभव केला आहे, अशा प्रकारचा प्रचार पाकिस्तानच्या पराभवास अंशतः कारणीभूत आहे. काश्मीरी बहुसंख्य प्रजा मुस्लिम असल्याने ती पाकिस्तानची बाजू घेईल, पाकिस्तान काश्मीरला मुक्त करीत आहे इ. प्रचारपद्धतीही अयशस्वी ठरली. कारण लोकांना इतिहास व प्रत्यक्ष अनुभव यांचे कधीही विस्मरण होत नसते. (१२) स्वदेशाची एकात्मता टिकविणे व शत्रुराष्ट्राच्या एकात्मतेचा (राज्यकर्ते आणि प्रजा, प्रजा व सैनिक, राज्यकर्ते आणि सेनापती यांच्यातील सामंजस्य, एकविचार व विश्वास) भेद करणे, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समतोलपणे कराव्या लागतात. (१३) प्रचार क्षेत्र हे केवळ स्वराष्ट्र व शत्रुराष्ट्र यांपुरतेच मर्यादित नसून सांप्रत ते जागतिक बनले आहे. शत्रूत भेद पाडण्यासाठी त्याला बरीच आमिषे देण्याचा प्रचार करण्यात येतो त्यामुळे तटस्थ किंवा दोस्तराष्ट्रे व स्वजन यांच्यात असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. प्रसंगी त्याचा परिणाम उलटा होऊन अशी राष्ट्रे शत्रूचा पक्ष घेण्याची व आपल्या राष्ट्रातच दुही निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. (१४) प्रचारात सूडाची व बदला घेण्याची भाषा असल्यास शत्रुराष्ट्रांतील शांततावादी व युद्धबंदीची खटपट करणाऱ्यांच्या कार्याला विरोध होण्याचा संभव असतो. (१५) मानसशास्त्रीय युद्ध प्रचारतंत्रात, शत्रुप्रचारातील प्रत्येक प्रचार मुद्याला प्रत्युत्तर देण्यात अर्थ नसतो. तो जेव्हा धडधडीत खोट्या व दांभिक गोष्टींचा प्रचार करतो तेव्हाच यथास्थित उत्तर देणे प्रभावी ठरते. परदेशी वार्ताहरांचा याबाबतीत विशेष उपयोग होतो. (१६) युद्धकालात रेडिओ, दूरदर्शन यांवर अभ्यवेक्षण लागू करणे अनिवार्य असते. ज्या राष्ट्रात अशा प्रकारच्या संस्था सरकारनियंत्रित नसतात. तेथे अभ्यवेक्षण लागू केल्यास प्रचार अतिपक्षपाती म्हणून अविश्वसनीय समजला जाण्याची भीती असते तथापि युद्धसंकटसमयी अभ्यवेक्षण लागू करणे आवश्यकच ठरते. बहुधा अशी माध्यमे स्वंयस्फूर्तीनेच अभ्यवेक्षण घालून घेतात. (१७) कृत्रिम उपग्रहामुळे इतर राष्ट्रांतील घडामोडींची माहिती मिळू शकते म्हणून शत्रूला माहिती न मिळू देण्याचा दंडक सांप्रत कालबाह्य व निरुपयोगी ठरत आहे, शिवाय तटस्थ राष्ट्राच्या प्रचारसंस्थांकडूनही माहितीचा प्रसार होऊ शकतो. (१८) दूरदर्शनवर नागरिकांच्या निर्धाराला व संवेदनाला धक्का देणाऱ्या घटनांचे प्रदर्शन करणे अनुचित ठरते. अशा प्रदर्शनास बंदी घालणे आवश्यक असते त्याबरोबरच अफवा व घबराट निर्माण होणार नाही अशी तजवीज करावी लागते. (१९) प्रचारकार्य ज्या मंत्रालयातर्फे होते, त्यास ‘सत्यकथन’ मंत्रालय असे कुचेष्टेने म्हटले जाते. प्रचारकार्यात ज्योतिषाचाही आधार घेतला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनमधील काही वर्तमानपत्रांतून पुढीलप्रमाणे प्रचार करण्यात येई ‘ग्रह वक्री असल्यामुळे प्रारंभी प्रारंभी ब्रिटनला जरी मार खावा लागत आहे, तरी अखेरीस ग्रहस्थिती अनुकूल होऊन ब्रिटनचाच विजय होणार!’ भारतात ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या कमी नाही. तेव्हा या भविष्यकथन साधनाचे अवलंबन व ज्योतिषी यांच्यावर कडक लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरते. (२०) प्रचार व शिक्षण यांच्यामधील भेद व त्यांची उद्दिष्टे लक्षात ठेवली पाहिजेत. (२१) प्रचारमाध्यम-निवड व प्रचार-वेळ यांची सैनिकी, आर्थिक व राजकीय परिस्थितीशी सांगड घालणे आवश्यक असते. (२२) आधुनिक प्रचारसाधने व प्रचारतंत्र यांच्या बहुजनसंपर्कशक्तीमुळे सर्वसाधारण बुद्धिमानांचीही मने जिंकणे सुकर झाले आहे. (२३) ज्या प्रचारात आगामी घटनांची चाहूल लागते तोच प्रचार उत्तम ठरतो. प्रचारात प्रारंभशीलता नसल्यास शत्रु-प्रचार वरचढ ठरून आपला उत्तरात्मक ठरतो व त्यामुळे तो लंगडा वाटण्याचा संभव असतो.


प्रचार-प्रकार :‘प्रकाश’, ‘धूसर’ व ‘कूट’ (‘कृष्ण’) असे प्रचारतंत्राचे तीन प्रकार असतात.

प्रकाश : यात प्रचार-प्रसारण हे अधिकृत व मान्यता पावलेल्या संस्थेकडून उदा., राज्यशासन किंवा त्या शासनाची प्रचार संस्था (यांत सैनिकी अधिपती व संबंधित संस्था असतात) यांच्यामार्फत होते. हे प्रसारण उघडउघड असते म्हणून याला ‘प्रकाश’ प्रचार म्हणतात.

‘धूसर’ : या प्रकारात प्रसारणाचे खरे उगमस्थान आणि प्रचारक यांची माहिती नसते. हे अफवा व संदेहात्मक प्रचार करण्याचे उत्तम माध्यम आहे. या प्रसारप्रकाराने विकृत किंवा भेदात्मक प्रबोधन (डिस-इन्फरमेशन) केले जाते. शांतता प्रचार याच प्रकारचा असतो. बर्ट्रड रसेल याचे ‘मृत होण्यापेक्षा लाल झालेले बरे’ (बेटर बी रेड दॅन डेड) ही घोषणा यादृष्टीने लक्षात घेण्यासारखी आहे.

कूट (‘कृष्ण’) : यामध्ये खरे उगम स्थान गुप्त ठेवून, त्रयस्थ उगमस्थानाकडून प्रचार केला जातो. शांतता तसेच युद्धपूर्व व युद्धकालात शत्रुराज्यकर्ते आणि प्रजा यांच्यात संघर्ष तसेच प्रतिकूल वातावरण निर्माण करण्यासाठी कूट प्रचार करण्याची पद्धत आहे. उदा., शांततावादी व युद्धविरोधी बुद्धिवंतांची ‘शांतता-चळवळ’, शत्रूराष्ट्रातील आपल्या सामाजिक व राजकीय मतप्रणालीला अनुकूल अशा व्यक्ती, पक्ष किंवा गट यांचा यात कौशल्याने उपयोग करण्यात येतो. उदा.,चेकोस्लोव्हाकियाची फाळणी करताना तेथील सूडेटन जर्मनांचे साहाय्य, स्पेन यादवी युद्धातील ⇨ पंचमस्तंभ, दुसऱ्या महायुद्धातील फ्रान्सचे साम्यवादी आणि साम्यवादी विरोधक म्हणून हिटलरवादी, भारतातील १९४२ च्या ‘छोडो भारत’ या चळवळीचे साम्यवादी टीकाकार इत्यादी.

प्रचार-तंत्र पातळ्या वा आघाड्या : मानसशास्त्रीय युद्धतंत्रामध्ये दोन पातळ्या किंवा आघाड्या असतात. एक म्हणजे सैनिक, सैनिकाधिपती व सैनिकी संघटना यांना गलितधैर्य तसेच युद्धविन्मुख करण्यासाठी केलेला प्रचार. यास ‘रणांगणीय आघाडी प्रचार’ असे म्हणतात तर दुसऱ्या प्रकारात प्रत्यक्ष युद्ध आघाडीमागे शत्रुराष्ट्रराज्यकर्ते व जनता यांना युद्धविन्मुख करण्यासाठी करण्यात येणारा प्रचार मोडतो. यालाच ‘दूरगामी प्रचार’ म्हणतात. या दोन्हीही आघाड्यांवर एकसमयावच्छेदेकरून प्रचार करण्यात येतो. तटस्थ राष्ट्रंना उद्देशून करावा लागणारा प्रचार हा दूरगामी-प्रचार आघाडीतच अंतर्भूत असतो.

प्रचार-संस्था, संघटन व अधःसंरचना : बहुतेक सर्व स्वतंत्र राष्ट्रांकडे प्रचारसंस्था, माहिती व संपर्कमाध्यमे असतात प्रचारातील अडचणी, त्याचा बरे-वाईटपणा व प्रभावक्षमता यांचा अमुभव त्यांच्या गाठीस असतोच तथापि युद्धकालात त्यांच्याकडील प्रचार-प्रसारण माध्यमे व साधने यांचे कालोचित आधुनिकीकरण करवून ती वाढवावी लागतात. मानसशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, तसेच लेखक, कवी, भाषाशास्त्रज्ञ, व्यंग्यचित्रकार, प्रचारतज्ञ इत्यादींचेही यथोचित सहाय्य घ्यावे लागते तर प्रतिकूल प्रचार-प्रसारणाची मुस्कटदाबी करण्यासाठी रेडिओ जॅमिंग वा केंद्राचेस्थान हुडकणारी बोधके इ. इलेक्ट्रॉनीय उपकरणे वापरावी लागतात.


आंतरराष्ट्रीय न्याय व संयुक्त राष्ट्र संघटना : आंतरराष्ट्रीय न्याय व संकेत हे जसे वायुयुद्धतंत्र, जैव व रासायानिक युद्धतंत्राबाबत आहेत तसे ते मानसशास्त्रीय युद्धतंत्राबाबत अद्याप तरी अस्तित्वात नाहीत. शत्रूने प्रथम केले म्हणून प्रत्युत्तर दिले या सबबीखाली युद्ध कायद्यांचे उल्लंघन केले जाते. उदा., शत्रुराष्ट्राच्या जनतेला दहशत बसावी म्हणून केलेले बाँबहल्ले, ओलीस ठेवणे [→ ओल] किंवा त्यांची कत्तल करणे, धमकावण्या देणे, सूडाची भाषा वापरणे, शत्रुसैन्याने विरोध थांबवावा किंवा शरण यावे म्हणून त्यांना प्रलोभने दाखविणे इत्यादी.

प्रतिकूल असलेल्या राष्ट्रांबद्दल जागतिक मत कलुषित करण्यासाठी जो प्रचार करतात, त्याचे नियंत्रण करणारी संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही. संयुक्त राष्ट्र संघाने ३ नोव्हेंबर १९४७ च्या ठरावाने शांतताविघातक व आक्रमणाला प्रोत्साहक प्रचाराची निर्भर्त्सना केली आहे, तसेच १७ नोव्हेंबर १९५० च्या ठरावाने पुढील बाबींबाबत जे धोरण आखले आहे, ते असे : (१) शांतताविरोधी प्रचाराचा निषेध करून विचार व ज्ञानसंपर्क वाढविण्याची शिफारस करणे, (२) संघर्ष वा आक्रमणप्रेरक प्रचार न करणे. (३) दुसऱ्याचे विचार वा संपर्क यांपासून जनतेला वंचित करणे आणि (४) अडथळे निर्माण करणे इ. निषिद्ध मानले आहे. वरील ठराव किंवा शिफारसी यांविरुद्ध बरीच राष्ट्रे वागत आहेत. प्रत्यक्ष युद्धकालातील किंवा शीत युद्धकालीन प्रकाश व कूट प्रचार-प्रकारांवर नियंत्रण ठेवणारी अथवा प्रचारनीति-नियमांचा भंग करणाऱ्या राष्ट्रास शिक्षा करू शकणारी आंतरराष्ट्रीय न्याय संस्था अस्तित्वात नाही.

सद्यस्थिती : सध्याचे जग हे संघर्षमय आहे. जगातील विविध राजकीय आणि सामाजिक मतप्रणाली हेच त्याचे कारण आहे. राष्ट्राराष्ट्रांत आर्थिक दृष्ट्या विकसित, विकसनशील व अविकसित असे भेद पडले आहेत. आण्विकअस्त्रयुक्त राष्ट्रे आपल्या संकुचित स्वार्थासाठी आजच्या ‘ना शांतता ना युद्ध’ या परिस्थितीत मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा वापर करीत आहेत. आधुनिक अण्ववस्त्रांची संस्कृतिनाशक शक्ती व पारंपरिक युद्धाची समग्र आण्विक युद्धात परिणती होण्याची शक्यता या भीतीपोटी, बलिष्ठ राष्ट्रे, अर्धविकसित, विकसनशील व अविकसित राष्ट्रांवर आपले वर्चस्व लादण्यासाठी ‘प्रतिपत्री युद्धे’ (प्रॉक्सी वॉर) काही काही राष्ट्रांत वा खंडात लढवीत आहेत. उदा., दक्षिण आणि मध्य अमेरिका. बलिष्ठ राष्ट्रे प्रतिकूल व शत्रूवत राष्ट्रांना युद्धविन्मुख करण्यासाठी किंवा त्यांवर आपली राजकीय, सामाजिक व आर्थिक संस्कृती लादण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी मानसशास्त्रीय युद्धतंत्राचा वापर करीत आहेत. म्हणून सद्यःस्थितीत या युद्धतंत्राला महत्त्व दिले जाते. याबरोबरच संयुक्त राष्ट्र संघटना आणि तिच्या शाखा यांचाही प्रचारस्थाने म्हणून उपयोग करण्यात येतो.

पहा : मेंदूप्रक्षाळण.

संदर्भ : 1. Aron, Raymond, War and Peace, London, 1996.  

             2. Brown, J. A. C. Techniques of Persuasion from Propaganda to Brainwashing, Harmondsworth, 1964.

             3. Calder, Angus, The People’s War in Britain : 1939-45, London, 1969.

             4. Clews, J. C. Communist Propaganda Techniques, Lomdon, 1964.

             5. Dunn, F. S. War and the Minds of Men, New York, 1951.

             6. Earle, E. M. Markers Modern Strategy, Princeton, 1971.

             7. Fest, J. C. The Face of the Third Reich, Harmondsworth, 1979.

             8. Griffith, S. B. Tzu-Sun : The Art  of War, Oxford, 1963.

             9. Grunberger, R.  A Social History of the Third Reich, Harmondsworth, 1974.

            10. Guevara, E. Che, Trans. Morray, J. P. Guerrilla Warfarce, New York, 1961.

            11. Kirkpatriek, J. J., The Strategy of Deception, Lomdon, 1964.

            12. Linebarger, P. M. A. Psychological Warfare, Washington, 1954.

            13. Semmel, Bernard, Ed.Marxism and the Science of War, New York, 1981.

            14. Wright, Quincy, Study of War, Chicago, 1964.

दीक्षित, हे. वि.