पॅर्स, सँ-जॉन : (३१ मार्च १८८७ –२० सप्टेंबर १९७५). नोबेल पारितोषिक सन्मान लाभलेला फ्रेंच कवी आणि मुत्सद्दी. खरे नाव आलेक्सी सँ लेजे. वेस्ट इंडीजमधील ग्वादलूप या फ्रेंच वसाहतीत, एका प्रतिष्ठित कुटुंबात त्याचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी तो फ्रान्समध्ये आला. दक्षिण फ्रान्समधील पो या शहरी त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर बोर्दो विद्यापीठात रोमन कायदा आणि ग्रीक तत्त्वज्ञान ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला. १९१४ मध्ये फ्रान्सच्या परराष्ट्रखात्यात त्याने प्रवेश केला. ह्या सेवेत असतानाही त्याचे काव्यलेखन चालूच होते. १९१९ मध्ये त्याचा एलाज हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. १९१६ ते १९२१ ह्या काळात पीकिंग येथील फ्रेंच वकिलातीतील प्रमुख सचिव म्हणून त्याने भरीव कामगिरी केली. ह्या पदावर असताना चीनप्रमाणेच कोरिया, मंगोलिया आणि जपान ह्या देशांतही त्याने प्रवास केला. फ्रान्सच्या परराष्ट्रखात्यात सेक्रेटरी-जनरल ह्या पदापर्यंत तो चढला तथापि पॅरिस पडल्यानंतर नाझींचा अनुनय करण्याचे नाकारल्यामुळे त्याला त्याच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर देशत्याग करून तो अमेरिकेस आला. जर्मनप्रणीत व्हिशी सरकारने त्याचे फ्रेंच नागरिकत्व रद्द केले. अमेरिकेत असताना, तेथील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ मध्ये फ्रेंच साहित्यविषयक सल्लागार म्हणून त्याने काम केले. ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’  चे सदस्यत्वही त्याला देण्यात आले होते. फ्रान्स मुक्त झाल्यानंतर त्याला त्याचे फ्रेंच नागरिकत्व पुन्हा देण्यात आले तथापि १९५९ पर्यंत तो अमेरिकेतच होता. फ्रान्समध्ये परतल्यावर देशाकडून त्याचे सहर्ष स्वागत झाले. ह्याच साली त्याला साहित्याचे ‘ग्रां प्री’ हे पारितोषिक देण्यात आले. १९६० मध्ये साहित्याच्या नोबेल पारितोषिकाचा तो मानकरी ठरला. १९६७ मध्ये ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट‌्स अँड लेटर्स’ ने काव्याचे पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला. झीअ येथे तो निधन पावला.

एलाज  ह्या पॅर्सच्या उपर्युक्त काव्यसंग्रहात तारुण्यसुलभ जीवनासक्तीचा प्रत्यय येतो. आनाबाझ (१९२४), एक्झिल (१९४२), व्हां (१९४६), आमॅर (१९५७) आणि क्रोनीक (१९६०) हे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह. पॅर्सने कित्येक वर्षे फ्रान्सच्या बाहेर वास्तव्य केल्यामुळे फ्रान्सपेक्षा बाहेरील वाचकांनाच त्याची अधिक ओळख होती. व्हालेरी व क्लोदेल या कवींनंतर फ्रेंच काव्याचा अस्त झाला, असे मानणाऱ्यांना पॅर्सच्या काव्याने विस्मित करून सोडले. पॅर्सचे काव्य म्हणजे आधुनिक काळातील एक श्रेष्ठ व भव्य असा प्रयोग आहे. विविध शैलींनी व प्रतिमांनी नटलेल्या त्याच्या काव्यात कधी प्रक्षुब्ध भाव-विचारांचा तर कधी गूढगहन गांभीर्याचा प्रत्यय येतो. विश्वाच्या सर्व खंडांतून व इतिहासाच्या विविध युगांतून वाचकाला घेऊन जाणारा असा तो एक अवर्णनीय प्रतीकात्मक प्रवास आहे. आधुनिक मानवाच्या अनेकविध व उत्कट अनुभवांचे सारच पॅर्सच्या काव्यात सामावले आहे. त्याच्याच शब्दांत सांगावयाचे, तर जेव्हा धार्मिक मिथ्यकथांचा (पुराणांचा) विनाश होतो, तेव्हा काव्य हेच दिव्यत्वाचे पर्यायी आश्रयस्थान उरते. पॅर्सच्या काव्याचा नायक आधुनिक मानव होय. स्वतःवर व अखिल विश्वावर विजय मिळविणारा व आपली नियती आपणच घडविणारा असा हा मानव आहे.  

पॅर्सचे काव्य सामान्यतः दुर्बोध असले, तरी त्यातून महाकाव्याच्या भव्यतेचा प्रत्यय येतो. त्याची भाषा प्रभावी, प्रतिमा-प्रतीकांनी समृद्ध झालेली आहे. एक प्रकारच्या धार्मिक गूढवादाचा अंतःसूर पॅर्सच्या कवितेत आहे. रँबो आणि पॉल क्लोदेल ह्यांच्या कवितेशी ती केव्हा केव्हा जवळची वाटते. अफाट, भयप्रद, गूढ आणि सुंदर अशा विश्वाला आशयाच्या कक्षेत आणण्याची ओढ ह्या कवितेला आहे.  

सरदेसाय, मनोहरराय