ब्लेअझसांद्रार, ब्लेअझ : (१ सप्टेंबर १८८७–२१ जानेवारी १९६१). स्विस साहित्यिक. फ्रेंचमध्ये लेखन. मूळ नाव फ्रेदेरीक सोझे. ब्लेअझ सांद्रार हे त्याचे टोपणनाव. जन्म स्वित्झर्लंडमधील ला शोद फों येथे. जगाच्या अनेक भागांत सतत केलेल्या भ्रमंतीमुळे तो स्वतःला जगाचा नागरिक समजत असे. साहसाची ओढ असलेले कृतिशील आयुष्य तो जगला आणि हीच साहसप्रियता, कृतिशीलता त्याच्या लेखनातून प्रकट झाली. कविता म्हणजे रचनेच्या धीट प्रयोगांतून शब्दांत सीलबंद केलेली कृति-शीलता, अशी त्याची कवितेबद्दलची धारणा होती. त्याने साहसी क्रियाशील जीवन व्यक्त करणारी ब्लेअझ सांद्रार नव-काव्यशैली निर्माण केली. अनेक प्रतिमांच्या, भावनांच्या आणि साहचरी कल्पनांच्या संभ्रमित करणाऱ्या कल्लोळातून, तसेच शब्दांच्या वैशिष्ट्यपूर्ण लयतालांतून त्याने आपला काव्याशय आविष्कृत केला. उत्स्फूर्तता आणि प्रक्षोभ ह्यांचे विलक्षण मिश्रण असलेल्या त्याच्या कवितांनी प्रभावित झालेले, तिचे अनुकरण करू पाहणारे अनुयायी त्याला लाभले. आपल्या प्रयोगशील कवितांनी साहित्यातील ⇨ अतिवास्तववादाची पायवाट तयार करणारा फ्रेंच कवी आणि कलासमीक्षक ⇨ गीयोम आपॉलिनेर (१८८०–१९१८) ह्याची मैत्रीही त्याला मिळाली. अतिवास्तववाद्यांविषयी सांद्रारला आस्था होती. तो जगभर हिंडलेला असल्यामुळे त्याचे बरेचसे लेखन प्रवासवर्णनात्मक आहे. ‘पेक्यूए अ न्यूयॉर्क’ (१९१२, इं. शी. ‘ईस्टर इन न्यूयॉर्क’ ) आणि ‘ला प्रो द ट्रान्स-सायबीरिएन एत द ला पेतित येहाने द फ्रान्स’ (१९१३, इं. शी.‘ द प्रोज ऑफ द ट्रान्स-सायबीरिअन अँड ऑफ लिटल झाने ऑफ फ्रान्स’) ह्या त्याच्या कवितांनाही प्रवासकथनाचे अंग आहे. शिवाय त्यांत प्रवासवर्णनात्मक संभाषण व विलाप यांचा संयोग दृग्गोचर होतो. त्याच्या विपुल लेखनातील विशेषतः आत्मचरित्रात्मक लेखनाचा त्याच्या समकालीनांवर मोठा प्रभाव पडला. स्यूटर्स गोल्ड (१९२५, इं. भा. १९२६), अंटार्क्टिक फ्यूग (२ भाग, १९२७, १९२९ इं. भा. १९४८), ब्यूरलिंग्युए (१९४८, इं. शी. ‘नॉकिंग अबाउट’ )ह्या कादंबऱ्यातून त्याने साहसी जीवनाचा आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना मानसिक लवचीकता प्राप्त करून घेणाऱ्यांचा गौरव केला आहे. एखाद्या महाकाव्यातील व्यक्तींसारखे, एका भव्य पातळीवरचे जीवन त्याने निर्मिलेल्या व्यक्तिरेखा जगतात.

समीक्षकांनी बराच काळ त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते तथापि बंडखोर आणि पुरोगामी प्रवृत्तीचे आघाडीचे थोर अमेरिकन लेखक ⇨ हेन्री मिलर सांद्रारकडे आधुनिक विद्वत्तेचे निग्रही लेखक म्हणून पाहतात. ‘ग्रांत प्रिक्स लित्येरेर द ला व्हिले द पॅरिस’ हा सन्मान त्याला प्राप्त झाला (१९६१). त्याच वर्षी पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

कुलकर्णी, अ. र.