जॉन हंटर

हंटर, जॉन : (१३ फेब्रुवारी १७२८-१६ ऑक्टोबर १७९३). ब्रिटिश शस्त्रक्रियाविशारद आणि शरीररचना-विकृतिविज्ञानाचे जनक, तसेच विज्ञानामधील अनुसंधान व प्रयोगात्मता यांचे समर्थक. त्यांनी जीवविज्ञान, शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि विकृतिविज्ञान या विषयांतील अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर तुलनात्मक अभ्यास व प्रयोग केले.

हंटर यांचा जन्म लाँग काल्डरवुड (लॅनार्कशर, स्कॉटलंड ) येथेझाला. त्यांनी कुठलेही औपचारिक विद्यापीठीय शिक्षण पूर्ण केले नाही. अठराव्या शतकात प्रत्येक शस्त्रक्रियाविशारदाच्या बाबतीत ही सामान्य परिस्थिती होती. १७४८ मध्ये ते लंडनला ⇨ विल्यम हंटर या आपल्या प्रख्यात प्रसूतितज्ञ भावाकडे गेले आणि शरीररचनाशास्त्र व शरीर- विच्छेदनाच्या अभ्यासक्रमासाठी साहाय्यक म्हणून काम करू लागले. जवळपास ११ वर्षे ते आपल्या भावाकडे शरीररचनाशास्त्र शिकले. १७४९-५० मध्ये ते चेलेसी रुग्णालयात विल्यम चेसलडन यांच्याकडे शस्त्रक्रिया तंत्र शिकले.

हंटर यांनी दिलेल्या व्याख्यानांमुळे त्यांची १७५३ मध्ये सर्जन्स हॉल येथे विशेष तज्ञ म्हणून निवड झाली. त्यांनी १७७० सालापासून शस्त्रक्रिया तंत्राचे नियम व सेवा यांवर खासगी व्याख्याने देण्यास सुरुवात केली. सेंट जॉर्ज इस्पितळात त्यांची १७५८ मध्ये शस्त्रक्रियाविशारदम्हणून निवड झाली. १७६८ पासून तेथे अध्यापनाचे काम देखील त्यांनी केले. १७६० मध्ये त्यांनी सै न्या चे विशेष शस्त्रक्रिया-विशारद म्हणून काम पा ह ण्या ससु रु वा त केली. १७६३ मध्ये ते लंडनला परतले व शेवटपर्यंत तेथेच त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. किंग जॉर्ज तिसरे यांचे विशेष वैद्य (राजवैद्य) म्हणून त्यांना १७७६ मध्ये सन्मानित करण्यात आले.

हंटर यांनी शस्त्रक्रिया तंत्रामध्ये केवळ विशेष योगदान दिले नाही,तर त्यास व्यावसायिक नैतिकता व प्रतिष्ठा देखील मिळवून दिली. त्यांनी दाखवून दिले की, ⇨ परमा व ⇨ उपदंश हे गुप्तरोग एकाच रोगाचे प्रकार आहेत. परमा झालेल्या माणसाची लस (पू) व्यक्तीच्या शरीरात( असे म्हटले जाते की स्वतःच्या शरीरात) टोचून त्यांनी असे दाखविले की, त्या व्यक्तीत दोन्ही रोगांची लक्षणे दिसून येतात.

हंटर यांचे पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत : नॅचरल हिस्टरी ऑफ ह्यूमन टीथ (१७७१), ट्रीटिज ऑन व्हेनेरल डिसीज (१७८६) आणि ऑब्झर्वेशन्स ऑन सर्टन पार्ट्स ऑफ ॲनिमल ओइकोनॉमी (१७८६). अ ट्रीटिज ऑन द ब्लड, इन्फ्लेमेशन अँड गन-शॉट वुण्ड्सहा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर १७९४ मध्ये प्रकाशित झाला. १७९९ मध्ये संसदेने रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्ससाठी हंटर यांनी गोळा केलेलेशरीररचना व विकृतिविज्ञानासंबंधीचेे अवशेष खरेदी केले.

हंटर यांचे लंडन (इंग्लंड) येथे निधन झाले.

कानिटकर, बा. मो.

Close Menu
Skip to content