हंसक : फिनिकॉप्टेरीफॉर्मिस गणाच्या फिनिकॉप्टेरिडी या एकमेव पक्षिकुलात समाविष्ट असणाऱ्या उंच, गुलाबी रंगाच्या आणि जाडबाकदार चोच असणाऱ्या सहा जातींच्या पक्ष्यांना हंसक म्हणतात. हंसकाचेपाय लांब, बारीक व गुलाबी असून बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात, तर मान सुरईच्या आकाराची व आकर्षक असून पंख मोठे असतात आणि शेपूट लहान असते. त्यांची उंची ९०-१५० सेंमी.असते. त्यांचा आढळ उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत आहे. भारतात आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव फिनिकॉप्टेरस रोझियस आहे. हंसकाचे जगभरात पुढील प्रमुख प्रकार आहेत : छोटा हंसक (फिनिकॉप्टेरसमायनर), मोठा (अमेरिकन) हंसक (फिनिकॉप्टेरस रबर), चिलियन हंसक (फिनिकॉप्टेरस चायलेन्सिस), अँडियन हंसक (फिनिकोपॅरस अँडिनस) व प्यूना हंसक (फिनिकोपॅरस जेमेसी).

हंसकांच्या विविध जाती व चोचींचे प्रकार : (१) मोठा (अमेरिकन) हंसक (फिनिकॉप्टेरस रबर ), (२) मोठा (भारतीय) हंसक (फिनिकॉप्टेरस रोझियस ), (३) चिलियन हंसक (फिनिकॉप्टेरस चायलेन्सिस ), (४)छोटा हंसक (फिनिकॉप्टेरस मायनर ), (५) अँडियन हंसक (फिनिकोपॅरस अँडिनस ), (६) प्यूना हंसक (फिनिकोपॅरस जेमेसी ).

हंसक हा अत्यंत समूहनिष्ठ (कळपात राहणारा) पक्षी आहे. तेउडताना शेकडोंच्या संख्येने मोठमोठ्या आकाराच्या वक्राकार माळा तयार करतात किंवा पाण्यालगतच्या किनाऱ्यावर दाटीवाटीने अडचणीच्या जागांत फिरतात. पूर्व आफ्रिकेतील सरोवरांच्या काठी प्रजननाच्या काळात लाखोंच्या संख्येने छोटे हंसक जमा होतात. उडत असताना हंसक अत्यंत देखणे दृश्य निर्माण करतात. मान व पाय सरळ रेषेत ताणलेले असताना काळ्या रंगांत पांढरा आणि गुलाबी रंगांचे छेद निर्माण होतात. आपली लांब मान शरीरावर योग्य रीतीने वाकवून बसलेले असताना हंसकाचे थवे देखणे दिसतात. ते बऱ्याचदा एका पायावर उभे असलेलेही दिसतात, त्याला ‘बकध्यान’ असेही संबोधले जाते. त्यांच्या या सवयी-संबंधी अनेक कारणे दिली जातात. जसे शरीराचे तापमान नियंत्रण, ऊर्जेची बचत किंवा फक्त पाय कोरडे करण्यासाठी देखील ते एका पायावर उभे राहत असावेत.

हंसकाच्या विणीचा हंगाम पावसाळ्यामध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) असतो. या काळात ते फार मोठ्या वसाहती स्थापन करून घरटी बांधतात. पावसाच्या पाण्यात घरटी बुडाल्यास विणीचा काळ पुढे (फेब्रुवारी – एप्रिल) ढकलला जातो किंवा त्यावर्षी वीण अजिबात होत नाही. त्यांची घरटी निरुंद पाणथळ जागेत २५-३५ सेंमी उंचीचे शंक्वाकार चिखलाने बनविलेले खोलगट उंचवटे असतात. खडूसारख्या पांढऱ्या रंगांची एक किंवा दोन अंडी नर व मादी मिळून एक महिन्यापर्यंत घरट्यात उबवतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर धुरकट पांढऱ्या रंगाची पिले दोन-तीन दिवसांतच घरट्याबाहेर पडू लागतात. सुमारे दोन महिने नर-मादी अर्धवट पचन झालेले अन्न चोचीतून बाहेर काढून पिलांना भरवितात. सुरुवातीला पांढरी असणारी पिले वाढत्या वयासोबत गुलाबी पिसांनी भरून जातात.

हंसकाची चोच बोजड असली तरी तिची रचना असामान्य असते. ती मध्यावरून टोकाकडे एकदम खाली वाकलेली असल्यामुळे तिच्यावर कुबड आल्यासारखे दिसते. चोचीच्या कडांच्या लगेच आत दातांसारखे आडवे कंगोरे असतात. चोचीची एकूण रचना गाळण्यासारखी असते. झिंगे, लहान खेकडे, कृमी, कीटक व त्यांचे डिंभ आणि इतर जैव पदार्थांचे (डायाटम शैवाल, नील-हरित शैवाल इ.) लहान-मोठे कण हे यांचे भक्ष्य होय. उथळ पाण्यात हिंडून तळाशी असलेल्या चिखलातून ते भक्ष्य मिळवितात. हंसक आपली मान खाली वाकवून सबंध डोके पाण्यात बुडवितो त्यामुळे चोच उलटी होते आणि तिने तो चिखल ढवळतो चोचीच्या पोकळीत शिरलेले चिखलयुक्त पाणी जीभ व कंगोरे यांच्या साहाय्याने गाळले जाते पाणी चोचीतून बाहेर पडते आणि चिखलात असलेले कृमी वगैरे अन्नपदार्थ चोचीत राहतात.

हंसकाचा गुलाबी रंग त्याच्या अन्नात असणाऱ्या कॅरोटिनॉइड या रंगद्रव्यामुळे आलेला असतो. प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या हंसकांच्या अन्नातून अशा रंगद्रव्यांचा पुरवठा केला जातो, जेणेकरून त्यांच्या पिसांचा रंग फिकट पडणार नाही.

मोठा (अमेरिकन) हंसक ही जाती आफ्रिका, दक्षिण यूरोप आणि आशिया येथे आढळते. ही जाती मोठ्या थव्यांत अटलांटिक समुद्र आणि मेक्सिकोच्या आखाती आणि अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय भागात प्रजननासाठी गोळा होते. मोठ्या हंसकाच्या पुढील दोन उपजाती आहेत : कॅरिबियन हंसक (फि. रबर रबर) आणि जुन्या जगातील हंसक (फि.रबर रोझियस). अमेरिकन हंसक हा मोठा हंसक व चिलियन हंसकयांच्याशी निकटचे साधर्म्य असणारा आहे.

चिलियन हंसक मुख्यतः समुद्रकिनाऱ्यापासून दूरच्या भागात आढळतात. दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वताच्या उंचावरील भागात अँडियन हंसक आणि प्यूना हंसक या दोन लहान जाती आढळतात.अँडियन हंसकाच्या पिवळ्या पायांवर गुलाबी रंगाचा पट्टा असतो. प्यूना हंसक ही जाती नष्ट झाल्याचे मानले जात होते परंतु १९५६ मध्येअँडीज पर्वताच्या सुदूर भागात त्यांची संख्या आढळून आली. छोटाहंसक याचा आढळ पूर्व आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेचा काही भाग, मादागास्कर आणि भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. हा आकाराने लहान असून रंगाने गडद असतो.

प्राचीन रोममध्ये हंसकाची जीभ दुर्मिळ स्वादाकरिता खाल्ली जात असे. हंसकाची आयुर्मऱ्यादा नैसर्गिक अधिवासात सु. ३३ वर्षे, तर कृत्रिम (पाळीव) अधिवासात सु. ४५ वर्षांएवढी असते.

कर्वे, ज. नि.


प्यूना हंसक (फिनिकोपॅरस जेमेसी) अँडियन हंसक (फिनिकोपॅरस अँडिनस) अमेरिकन हंसक (फिनिकॉप्टेरस रबर)
चिलियन हंसक (फिनिकॉप्टेरस चायलेन्सिस)   छोटा हंसक (फिनिकॉप्टेरस मायनर)