फ्रीड्रिक ऑगस्ट फोन हायेकहायेक, फ्रीड्रिक ऑगस्ट फोन : (८ मे १८९९–२३ मार्च १९९२). प्रसिद्ध ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञव अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. त्याचा जन्म ऑस्ट्रियातील व्हिएन्ना या शहरात झाला. केन्सप्रणीत चढउतार तसेच आर्थिक, सामाजिक व सं स्था त्म क घडामोडींच्यापरस्परसंबंधांच्या सूक्ष्म व नावीन्य-पूर्ण विश्लेषणाबद्दल स्वीडिश अर्थतज्ज्ञ कार्ल गन्नार मीर्दाल याच्याबरोबर नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९७४).

 

हायेकने व्हिएन्ना विद्यापीठात कायदा, मानसशास्त्र यांच्या अध्ययनाबरोबर मुख्यत्वे अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करून पीएच्.डी. संपादित केली (१९२३). पुढे त्याने न्यूयॉर्क विद्यापीठात अध्ययन व संशोधन केले (१९२३-२४). त्याची ऑस्ट्रियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक सायन्स या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यानंतर तो लंडनला गेला. तेथे त्याने युनिव्हर्सिटी ऑफ लंडन आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स येेथे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले (१९३१). त्याला इंग्लंडमध्ये ब्रिटिश नागरिकत्व प्राप्त झाले (१९३८). नंतर तो शिकागो विद्यापीठात (अ.सं.सं.) सामाजिक व नीतिशास्त्राचा प्राध्यापक होता (१९५०–६२). पुढे त्याने फ्रिबर्ग विद्यापीठात निवृत्तीपर्यंतअध्यापन केले. (१९६२–६८).

 

हायेकचे संशोधन काहीसे रूढिप्रिय, पारंपरिक, पूर्वसूरींच्या मतांवर भिस्त ठेवणारे व तिचे प्रकटीकरण करणारे असून मुक्त अर्थव्यवस्थे-तील वृद्धी, कृत्रिम चलनफुगवटा, बेकारी, मंदी या आर्थिक समस्यांच्या बाबतीत शासनाची भूमिका विशद करणारे व शासकीय नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते. द रोड टू सर्फ्डम (१९४४) या ग्रंथातून त्याने देशांतर्गत आपत्तीच्या प्रसंगी शासकीय नियंत्रण वा वर्चस्व अधोरेखित केले. या बाबतीत त्याने काही सहज आणि क्रमवार करता येतील अशा शासकीय सुधारणा सुचविल्या. एका अर्थाने तो विसाव्या शतकाचा सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व राजकीय विश्लेषक मानला जातो. त्याच्या मते, बाजारपेठेतील वस्तूंच्या बदलत्या किंमती समाजाला विशिष्ट संदेश देतात व त्यामुळे व्यक्तींना आपल्या खर्चाचे नियोजन करणे व भविष्यकालीन योजनांमध्ये समन्वय साधणे शक्य होते. अर्थव्यवस्थेबरोबरच त्याने न्यायदान, मानसशास्त्र, समाजशास्त्र अशा विविध विषयांसंबंधी आपले विचार मांडले. पहिल्या जागतिक युद्धामध्ये सक्तीच्या लष्करी सेवांतर्गत( कॉन्स्क्रिप्शन) तो सहभागी झाला. त्याच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील सेवेबद्दल १९८४ मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर हिच्या शिफारशीनुसार दुसऱ्या एलिझाबेथ राणीने त्याची नियुक्ती सदस्य, ऑर्डर ऑफ कंपॅनियन्स ऑफ ऑनर या सन्माननीय पदावर केली. अमेरिकेचा तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश याच्या हस्ते ‘यू. एस्. प्रेशिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमङ्ख (१९९१) हा किताब त्याला प्रदान करण्यात आला. याशिवाय त्याला काही विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट देऊन गौरविले.

 

हायेकने अनेक अर्थशास्त्रीय ग्रंथांचे लेखन केले. त्यांपैकी प्राइसेस अँड प्रॉडक्शन (१९३१), मॉनेटरी थिअरी अँड ट्रेड सायकल (१९३३), प्रॉफिट्स, इंटरेस्ट अँड इन्व्हेस्ट्मेन्ट (१९३९), द प्युअर थिअरी ऑफ कॅपिटल (१९४१), इन्डिव्हिड्यूअलिझम अँड इकॉनॉमिक ऑर्डर (१९४८), द कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी (१९६०), लॉ, लेजिस्लेशन अँड लिबर्टी (तीन खंड १९७३, ७६, ७९), अनइम्प्लॉयमेंट अँड मॉनेटरी पॉलिसी : गव्हर्न्मेन्ट ॲझ जनरेटर ऑफ द बिझनेस सायकल (१९७९), द फेटल कन्सीट (१९८८) इ. मान्यवर व महत्त्वाचे ग्रंथ होत.

 

हायेकचे वृद्धापकाळाने फ्रिबर्ग येथे निधन झाले.

चौधरी, जयवंत