तांबट (किरमिजी छातीचा).

तांबट : हा पक्षी चिमणीपेक्षा थोडा मोठा असतो. शरीर गुबगुबीत, थोडे बसके असून लांबी १५ सेंमी. असते. याचे शास्त्रीय नाव मेगॅलेमा हीमासेफॅला  आहे. कॅपिटोनिडी या पक्षिकुलात याचा समावेश होतो.

याचा रंग गवती हिरवा असतो डोक्याचा वरचा भाग काळा, छाती  व कपाळ किरमिजी आणि हनुवटी व गळा पिवळ्या रंगाचा असतो खालचा भाग पिवळसर असून त्यावर हिरव्या रेषा असतात शेपटी तोकडी असून तिचे टोक छाटल्याप्रमाणे दिसते डोळ्याच्या वर व खाली पिवळे पट्टे असतात, एक काळा पट्टा नाकपुडीपासून निघून डोळ्यांतून गेलेला असतो चोच जाड, काळी पाय लाल आणि नखर (नख्या) काळे असतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. हे एकएकटे हिंडतात किंवा यांची लहान विस्कळित टोळकी असतात.

सबंध भारतात हा पक्षी आढळतो, पण कच्छ आणि दक्षिण मलबारात तो दुर्मिळ आहे. यांखेरीज श्रीलंका, मलाया द्वीपकल्प, सुमात्रा आणि फिलीपीन्स बेटांतही तो सापडतो.

हा वृक्षवासी पक्षी असून जमिनीवर केव्हाही उतरत नाही. वड, पिंपळ, उंबर यांची व या जातीच्या इतर झाडांची फळे हा खातो यामुळे फळांनी भरलेल्या अशा जातीच्या झाडांवर तो नेहमी आढळतो, मग ती झाडे भरवस्तीत असोत किंवा रानात असोत. कधीकधी हा पंख असलेल्या वाळव्या पकडून खातो, पुष्कळ लोकांनी हा पक्षी पाहिलेला नसला, तरी त्याचा आवाज त्यांच्या ओळखीचा असतो. भांडी घडविण्याकरिता तांबट हातोडीने पत्रा ठोकीत असताना जो टोंक टोंक असा आवाज होत असतो, तसाच याचा आवाज असतो. झाडावर उंच ठिकाणी बसून प्रथम हळूहळू पण नंतर मोठ्याने टोंक टोंक असा आवाज तो काढतो. ओरडताना उजवीकडे आणि डावीकडे तो एकसारखी मान वळवीत असल्यामुळे दर वेळी आवाज वेगवेगळ्या दिशांनी येतो, असा भास होतो. एकदा सुरू झाले म्हणजे याचे ओरडणे बराच वेळ चालू असते.

यांचा विणीचा हंगाम जानेवारीपासून जूनपर्यंत असतो. झाडाच्या एखाद्या वाळक्या फांदीला खालच्या बाजूने वाटोळे भोक पाडून आत ०·३ मी. लांबीचे बीळ तो तयार करतो, हेच याचे घरटे होय. या घरट्यात मादी ३-४ लांबोडकी, गुळगुळीत, पांढरी अंडी घालते. बीळ तयार करणे, अंडी उबविणे व पिल्लांना खाऊ घालणे ही कामे नर व मादी दोघेही करतात.

कर्वे, ज. नी.