दमा : श्वासनलिकांचा संकोच (आकुंचन), त्यांच्या श्लेष्मकलेची (आतील भागावर असलेल्या ओलसर अस्तराची) सूज व पोकळीत साचणाऱ्या स्रावामुळे कष्टश्वसनाचे (श्वासोच्छ्‌वासात अडथळा येणारे) अधूनमधून येणारे जोरदार झटके ज्या श्वसन तंत्राच्या (श्वसनसंस्थेच्या) रोगात येतात त्याला दमा म्हणतात. हे झटके कधीकधी क्षुल्लक व अल्प काळ टिकणारे, तर काही वेळा तीव्र स्वरूपाचे आणि दीर्घ ताळ टिकणारेही असतात. या दीर्घ काळ टिकणाऱ्या झटक्यांना ‘सतत दमा’ असे म्हणतात.

श्वासनलिका संकोच हा हानिकारक पदार्थांच्या चेतावणीमुळे (उदा., सिगारेटचा धूर) होणारा एक शरीरक्रियात्मक परिणाम आहे. ऑक्सिजन व कार्बन डाय–ऑक्साइडाचे श्वासनलिकेतील हवेमधील प्रमाणही असाच परिणाम करीत असते परंतु हे परिणाम अत्यल्प असल्यामुळे त्यांची जाणीवही होत नाही. प्रत्येक वेळी श्वास आत घेताना श्वासनलिकांची अवकाशिका (पोकळी) विस्फारते व तो सोडताना आकुंचन होते. दम्यामध्ये श्लेष्मकलेची सूज, साचणारा स्राव व संकोच या तिन्हींमुळे उच्छ्‌वासामध्ये अडथळा येतो. आत शिरलेली सर्व हवा बाहेर टाकण्याकरिता शरीराला प्रयत्न करावा लागून कष्ट पडतात. उच्छ्‌वसन नेहमी निष्क्रिय असते, परंतु दम्यामध्ये ते कष्टसाध्य बनते.

कारणे : दम्याच्या कारणांविषयीचे संशोधन सतत चालू असूनही जगातील २% लोकांत आढळणाऱ्या या रोगाचे निश्चित कारण अजून समजले नाही. काही रोगकारके स्वतंत्र रीत्या किंवा मिळून दम्यास कारणीभूत होत असावीत. त्यांचे (१) अधिहर्षता [काही विशिष्ट पदार्थांमुळे शरीरातील कोशिकांवर–पेशींवर–होणारे अपसामान्य परिणाम ⟶ अलर्जी], (२) श्वसनमार्ग संक्रामण (सूक्ष्मजंतूंचे आक्रमण) आणि (३) मानसशास्त्रीय कारके असे वर्गीकरण करतात.

अधिहर्षता : दम्याच्या सर्व रोगकारकांमध्ये अधिहर्षता हा प्रमुख कारक समजला जातो. या विशिष्ट पदार्थांना हृष्यजने (ज्या पदार्थांमुळे अधिहर्षता होते ते पदार्थ) म्हणतात. परागकण, धूलिकण, बुरशी, पशूंच्या अंगावरील कोंड्याचे कण, पिसांचे सूक्ष्म तुकडे (केस), कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), सौंदर्यप्रसाधने, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ इत्यादींचा समावेश हृष्यजनांत होतो. या पदार्थांचा श्वासनलिकांच्या अरेखित (अनैच्छिक) स्नायूंवर परिणाम होण्यास ते श्वसनमार्गातून, आंत्रमार्गातून किंवा केवळ स्पर्शाद्वारे शरीराच्या सान्निध्यात यावे लागतात. परागजन्य दम्यामध्ये मोसमी चढउतार हे प्रमुख लक्षण असते. घरगुती धूलिकण कारणीभूत असल्यास बारा महिने टिकणारा दमा आढळतो. बहुतेक रोगी एकापेक्षा अधिक हृष्यजनांना संवेदनशील असतात.

श्वसनमार्ग संक्रामण : दम्याच्या रोगकारकांमध्ये सूक्ष्मजंतू संक्रामणाचे स्थान निश्चित झाले आहे. पुष्कळ वेळा अधिहर्षता आणि संक्रामण मिळून दम्यास कारणीभूत होतात. अनेक वेळा तीव्र श्वासनलिका शोथ (श्वासनलिकेची दाहयुक्त सूज), इन्फ्ल्यूएंझा, गोवर, डांग्या खाेकला यांसारख्या रोगांनंतर दमा उद्‌भवतो. नाक, नासाकोटरे (नाकाच्या पोकळ्या) आणि घसा यांचे संक्रामणजन्य विकार दम्याचा झटका आणण्यास कारणीभूत होतात. वाढत्या वयोमानाबरोबर सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणाचे प्रमाण वाढत जाते म्हणजेच सुरुवातीस दमा केवळ अधिहर्षताजन्य असला, तरी तो पुढेपुढे संक्रामणजन्य होत जातो. वयाच्या तिशीनंतर पन्नाशीपर्यंत जवळजवळ ७५ ते ८०% रोग्यांमध्ये सूक्ष्मजंतू संक्रामण नेहमी आढळते.


मानसशास्त्रीय कारके : मानसिक ताण, चिंता, उद्वेद वा विषण्णता यांसारख्या मानसशास्त्रीय कारकांचा व दम्याचा संबंध असावा. या कारकांमुळे दमा उद्‌भवतो वा तीच चिरकारी (दीर्घकाल टिकणाऱ्या) दम्याचा परिणाम असावीत, हे अजून निश्चित सांगता आलेले नाही.दम्याच्या ४०% रोग्यांमध्ये वरीलपैकी कोणती ना कोणती मानसिक विकृती आढळते. अशी विकृती दम्याचा जोर वाढविण्यास मदत करते.

इतर कारके : (अ)वय व लिंग : शैशवावस्था ते जरावस्था या कोणत्याही वयोमानात दमा उद्‌भवू शकतो. तीस वर्षे वयाखालील व्यक्तींमध्ये त्याचे प्रमाण सर्वांत जास्त आढळते. स्त्रियांत व पुरुषांत ते सारखेच आढळते.

(आ) आनुवंशिकता : आनुवंशिकता हे दम्याचे प्रकृत्तीकर कारण असावे. ४०% रोग्यांच्या कौटुंबिक 

दम्याचा श्वासनलिकेवरील परिणाम : (अ) निरोगी श्वासनलिका (आ) झटक्यातील श्वासनलिका संकोच व स्रावाने भरलेली अवकाशिका.

इतिहासात नातलगांत दमा असल्याचे आढळते. याशिवाय त्यांच्यामध्ये इसबासारख्या इतर अधिहर्षताजन्य विकृती असल्याचेही आढळते.

(इ) हवामान : दमट व धुकट हवा दम्याचा जोर वाढविण्यास मदत करते. याउलट कोरडी हवा दमेकऱ्‍यांना सुखावह असते.

लक्षणे व निदान : दम्याचा झटका दिवसा किंवा रात्री केव्हाही उद्‌भवतो परंतु रात्री उद्‌भवण्याचे प्रमाण अधिक आढळते. झटका काही मिनिटे, काही तास अथवा काही दिवस टिकून राहू शकतो. झटक्याची सुरुवात कोणतीही पूर्वसूचना न मिळता एकाएकीच होते. छातीत काहीसे अस्वस्थ वाटण्यापासून ते थेट कष्टश्वसन आणि गुदमरल्यासारखे होण्यापर्यंत श्वसनात बिघाड होतो. धाप लागून श्वासोच्छ्‍वास नीट होण्याकरिता रोगी धडपडतो. उठून, बसून, पाठ वाकवून, खांदे, छाती व डोके हलणार नाही अशी खबरदारी घेतो. असे करण्यामुळे उच्छ्‍वसन करणाऱ्या स्नायूंना मदत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे फुफ्फुसात अडकलेली हवा बाहेर फेकण्यास थोडीफार मदत होते. कष्टश्वसनाबरोबरच श्वसनक्रियेचे दुय्यम स्नायू उपयोगात आणले जातात व ते अंतःश्वसनाच्या वेळी स्पष्ट दिसतात. खोकला सुरुवातीस नसला, तरी कधीकधी बराच त्रासदायक असू शकतो. झटक्याच्या शेवटी शेवटी खोकल्याबरोबर कफ बाहेर पडू लागून रोग्यास हळूहळू आराम पडू लागतो.

अधूनमधून येणारे कष्टश्वसनाचे झटके, त्याबद्दल रोग्याकडून किंवा नातलगांकडून मिळालेली माहिती तसेच योग्य तपासणी निदानास पुरेशी असते. छातीच्या दोन्ही बाजूंमध्ये ऐकू येणारे विशिष्ट सूंसूं आवाज व उच्छवसनाची लांबलेली कालमर्यादा, पूर्वेतिहास, श्वासनलिकेच्या अवकाशिकेचा विस्फार करणाऱ्या औषधांचा चांगला परिणाम इत्यादींमुळे निदानास मदत होते.


उपद्रव व फलानुमान : दमा अनेक वर्षांनंतर फुफ्फुसांच्या काही विकृतींस कारणीभूत होतो. श्वासनलिकाशोथ, श्वासनलिकाविस्फार (श्वासनलिकांची अवकाशिका कायम स्वरूपाची व अपसामान्यतः विस्फारित होणारी विकृती), वायुकोशविस्फार (फुफ्फुसातील वायुकोशांच्या आकारमानात प्रमाणापेक्षा जादा वाढ होणे), फुफ्फुसपात (फुफ्फुसाच्या काही भागातील वायुकोश चेपून जाऊन होणारी वायुरहित अवस्था), सूक्ष्मजंतू संक्रामण व उजव्या बाजूचा हृद्‌पात (हृदयाच्या उजव्या निलयाचे कार्य नीट न झाल्यामुळे यकृत व प्लीहा यांमध्ये रक्ताधिक्य होऊन त्यांचे आकारमान वाढविणारी विकृती) इत्यादींचा समावेश होतो.

उपद्रवरहित दमा आयुर्मानावर परिणाम करीत नाही. बालवयात सुरू झालेला दमा कधीकधी तारुण्यवस्थेत आपोआप बरा होतो. प्रत्यक्ष दम्यामुळेच सहसा मृत्यू ओढवत नाही. मात्र सतत दम्यावर योग्य व तात्काळ उपचार न केल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता असते.

उपचार : तीव्र झटक्याकरिता श्वासनलिकेचा विस्फार करणारी औषधे उपयुक्त असतात. श्वासनलिकेचा संकोच नाहीसा करून त्यामधील रक्ताधिक्य व स्राव कमी करणारी आणि हे परिणाम अतिजलद घडवून आणणारी औषधे तात्काळ गुणकारी ठरतात. ही औषधे तोंडाने, अंतःक्षेपणाद्वारे (इंजेक्शनाद्वारे), नाकातील श्लेष्मकलेवर फवारा उडवून किंवा बस्तिमार्गे देता येतात. तोंडाने औषध घेतल्यास परिणाम होण्यास वेळ लागतो म्हणून फक्त सौम्य झटक्यात ही पद्धत वापरतात. बहुत करून अंतःक्षेपणे वापरतात. वारंवार झटका येणाऱ्या रोग्यांना झटका आटोक्यात येण्याकरिता औषधे घेण्याच्या तंत्राचे प्रशिक्षण देणे योग्य ठरते. या औषधांपैकी कोणते लागू पडेल, हे निश्चित सांगणे कठीण असते. व्यक्तिनुरूप फरक असतातच पण शिवाय त्याच रोग्यात त्याच औषधाचा तोच परिणाम नेहमी मिळेलच अशीही खात्री नसते.

ॲड्रेनॅलीन हायड्रोक्लोराइड, आयसोप्रोपिल आर्टेरिनॉल, ॲमिनोफायलीन, कॉर्टिकोस्टेरॉइडे, एफेड्रीन हायड्रोक्लोराइड किंवा सल्फेट इ. औषधे वापरतात. याशिवाय कफोत्सारके, जरूर पडल्यास ऑक्सिजन व योग्य त्या शांतक (मनःशांती करणाऱ्या) औषधांचाही उपयोग होतो.

प्रतिबंधात्मक उपचार : तीव्र झटक्यानंतरही कफोत्सारक औषधे व काही श्वासनलिका विस्फाटक औषधे चालू ठेवावीत. अनुभवाने किंवा विशिष्ट चाचणी परीक्षा केल्यानंतर ज्या हृष्यजनामुळे झटका येण्याचा संभव असतो ते टाळावेत. रात्री झटके येणारांनी पोटभर जेवण करू नये. धूम्रपान करू नये. कुत्री, मांजरे इ. पाळीव प्राण्यांचा संपर्क टाळावा. नाक, नासाकोटरे, घसा इत्यादींच्या विकृतींवर वेळीच इलाज करावा. मानसिक प्रक्षोभावर योग्य इलाज करावा.

मोहिले, ग. बा. भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय चिकित्सा : दमा पावसाळ्यात, थंडीत, पूर्वेकडचा वारा सुटला असता, ढग आले असता आणि कफकारक पदार्थ खाल्ले असता वाढतो. आडवे पडले असताना त्रास होतो. बसले असताना बरे वाटते.

ह्या रोग्याला प्रथम सैंधव आणि तेल घसा, मान, छाती, पाठ ह्यांना चोळून (चोपडून) गरम पाण्याने किंवा शर्करायुक्त दुधाने शेकावे. डाव्या स्तनाभोवतालचा (हृदयाभोवतालचा) भाग सोडून गळा वगैरे सर्व भाग शेकावा. ज्याला शेक वर्ज्य आहे त्यालासुद्धा श्वास वाढला असताना वरीलप्रमाणे थोडा शेक करावा. छाती व पाठीवर गरम दूध, पाणी ही शिंपडावी. हारोळी अथवा पोटीस ह्यांनीही जरुरीप्रमाणे शेकावे. ह्या शेकण्याने ताबडतोब बरे वाटते.


आम असेल तर लंघन घ्यावे. आहार स्निग्ध मांसरस, हिंग, बिडलोण, क्षार, सुंठ, मिरे, पिंपळी, महाळुंग, आम्लवेतस, पुष्करमूल, कचोरा ह्यांचा अन्नामध्ये उपयोग करावा. साठे तांदूळ, शाली, गहू, जव, मूग, कुळीथ यांपैकी मानवेल तो आहार व सात्म्य असेल तो आहार ठेवावा.

उपचार : कफ सुटा असल्यास दह्याच्या साईबरोबर गेळफळ देऊन ओकारी करवावी. वाताचे आधिक्य व कफ कमी असेल, तर आनूप प्राण्यांच्या मांसाच्या रसाबरोबर वरील द्रव्यांचा आहार घ्यावा. वेग आला असता गरम नारायण तेल गरम दुधाबरोबर १ तोळा पाजावे. शठ्यादि चूर्ण किंवा सुंठ आणि गूळ समभाग यांचे सेवन करावे. कफ अधिक असेल तर गाय, हत्ती, घोडा, डुक्कर, उंट, गाढव. चतुष्पादांचे चामडी, केस, हाडे, खूर, शिंगे ह्यांची मर्षा मध किंवा मध व तूप ह्यांबरोबर चाटवावी. आस्कंदाची मर्षा वरीलप्रमाणे चाटवावी. पित्त कफाचा संबंध असेल, तर सातविणीचा रस व शिरीष फुलांचा रस मध व पिंपळी यांबरोबर चाटवावा. सुंठ व गूळ ह्यांचे नस्ये द्यावे. लसूण, कांदा, गाजर ह्यांच्या मुळांचा रस किंवा चंदनाचा रस दुधाबरोबर नाकात घालावा. लोबान सत्व अतिशय उपयुक्त आहे.

पटवर्धन, शुभदा अ.

संदर्भ : 1. Scott, R. B. Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.

            2. Vakil, R. J. Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.