पुर्‌किन्ये, योहान्नेस एव्हांग्गेलिस्टा : (१७ डिसेंबर १७८७–२८ जुलै १८६९). झेक शरीरक्रियावैज्ञानिक. त्यांचे चेकोस्लोव्हाकियातील मूळ नाव ‘यान पुर्‌कायने’ असे होते. ते शरीरक्रियाविज्ञानासंबंधीच्या, विशेषेकरून ऊतकविज्ञानातील (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांच्या म्हणजे ऊतकांच्या सूक्ष्म अध्ययनातील) संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहेत. ऊतकांच्या अभ्यासाकरिता ⇨ सूक्ष्मछेदक (मायक्रोटोम) नावाचे उपकरण उपयोगात आणणारे ते पहिले शास्त्रज्ञ होत.

त्यांचा जन्म चेकोस्लोव्हाकियातील लिबोचोव्हिस येथे झाला. माध्यमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. धर्मशास्त्र शिकवीत असतानाच त्यांना एकाएकीच वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा झाली. त्यामुळे प्राग विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी १८१९ मध्ये वैद्यकीय पदवी मिळविली. पदवी मिळविल्यानंतर वैद्यकीय व्यवसायाऐवजी ते वैद्यकातील शास्त्रीय संशोधनाकडे आकर्षित झाले. याशिवाय वैद्यकातील शिक्षकपेशाची त्यांना अधिक आवड होती. प्राग येथे त्यांना काही वर्षे शारीर (शरीररचना विज्ञान) विभागात कुशल प्रेतच्छेदक व साहाय्यक म्हणून काम केले. १८२३ मध्ये ब्रेसलाऊ विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या शास्त्राकडे बघण्याचा त्यांच्या काळात रूढ असलेला दृष्टिकोन त्यांना पटत नव्हता. भौतिकी व रसायनशास्त्र या शास्त्रांप्रमाणेच शरीरक्रियाविज्ञान हेही निरीक्षण व प्रयोग यांवर अवलंबून असणारे शास्त्र आहे, असे त्यांचे मत होते. त्यांच्या या मतप्रणालीला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तसेच वैयक्तिक संशोधन कार्यात अडचणी उत्पन्न झाल्यामुळे त्यांना या विषयाकरिता स्वतंत्र विभाग असावा असे वाटू लागले. काही वर्षांनंतर १८३९ मध्ये शरीरक्रियाविज्ञानाकरिता स्वतंत्र विभाग स्थापन करणे त्यांना शक्य झाले. त्यांनी केलेल्या निरनिराळ्या संशोधनांसंबंधी थोडक्यात माहिती खाली दिली आहे.

त्यांनी बोटांच्या ठशांतील वलयरेषांचा अभ्यास करून त्यांचे महत्त्व १८२३ साली दाखवून दिले [→ बोटांचे ठसे]. काही कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठभागावर असणाऱ्या अतिसूक्ष्म केसासारख्या प्रवर्धांच्या (वाढींच्या) हालचालीचा [पक्ष्माभिकीय हालचालीचा ® पश्माभिका] त्यांनी प्रथम अभ्यास केला (१८३५). त्वचा व तीमधील निरनिराळ्या सूक्ष्म ग्रंथींची रचना, अस्थिरचना, दंतिनरचना (दात ज्या कठीण पदार्थाचे बनलेले असतात त्याची रचना). उपास्थिकोशिकांची (कूर्चेतील कोशिकांची) रचना यांचा त्यांनी सूक्ष्मदर्शकीय अभ्यास केला. ‘प्रोटोप्लाझम’ हा ⇨ जीवद्रव्य या अर्थाचा कोशिकांच्या अंतर्रचनेचे वर्णन करणारा शब्द त्यांनी प्रथम वापरला. निमस्तिष्क बाह्यकातील [® तंत्रिका तंत्र] नासपतीच्या आकाराच्या मोठ्या कोशिका त्यांनी प्रथम वर्णिल्या. त्यांना आजही ‘पुर्‌किन्ये कोशिका’ म्हणतात. हृदयाच्या स्नायुरचनेचा त्यांनी सूक्ष्मदर्शकीय अभ्यास केला. हृदयाच्या एका भागातून दुसऱ्यात चेतनाकारक आवेग (विक्षोभ निर्माण करणारे तरंग) वाहून नेणारे विशिष्ट तंतू ‘पुर्‌किन्ये तंतू’ वा ‘पुर्‌किन्ये ऊतक’ म्हणूनच ओळखले जातात. पक्ष्यांच्या अंड्यांचा अभ्यास करून त्यांनी पीतकातील (अंड्यामधील पोषक द्रव्यातील) भ्रूणवाढ होणारी विशिष्ट जागा शोधिली व तिला

‘जर्मिनल व्हेसिकल’ (जनन पुटिका) असे नाव दिले. ‘पुर्‌किन्ये पुटिका’ म्हणूनही तिला दुसरे नाव देण्यात आले आहे. त्यांनी डोळा व दृष्टी यांवरही संशोधन केले. निळ्या व तांबड्या रंगांच्या तेजस्वीपणात अंधारामध्ये होणारा बदल हा आविष्कार ‘पुर्‌किन्ये आविष्कार’ म्हणून ओळखला जातो. डोळ्यातील जालपटलामधील रक्तवाहिन्यांमुळे निर्माण होणाऱ्या सावल्यांना ‘पुर्‌किन्ये आकृती’ आणि स्वच्छमंडल (बुबुळाच्या पुढचा पारदर्शक भाग) व भिंग यांच्या पृष्ठभागांवरून होणाऱ्या परवर्तनांना ‘पुर्‌किन्ये प्रतिमा’ म्हणतात.

त्यांनी १८५० सालानंतर प्राग विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले व तेथेही त्यांनी शरीरक्रियाविज्ञानाकरिता स्वतंत्र विभाग स्थापन केला. तेथे त्यांनी आपल्या देशबांधवांमध्ये शिक्षणाच्या, विशेषेकरुन शास्त्रविषयक ज्ञानाच्या प्रसाराकरिता बरेच प्रयत्न केले. त्यांच्या काळात जर्मन किंवा इतर कोणतीतरी समृद्ध भाषा ज्ञात असल्याशिवाय शास्त्राभ्यास करणे अशक्य असे. त्यांनी १८५३ मध्ये झेक भाषेतच शास्त्रीय विषयांना वाहिलेले Ziwa नावाचे नियतकालिक सुरू केले. ते प्राग येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.