पारशी धर्म : (जरथुश्त्री धर्म) . जगातील प्राचीन आणि महत्त्वाच्या धर्मांत पारशी धर्माची गणना होते. आज पारशी धर्माचे अनुयायी संख्येने थोडे (सु. एक लाख) असले, तरी त्यामुळे त्या धर्माचे महत्त्व कमी होत नाही. ह्या धर्माच्या संस्थापकाचे नाव⇨जरथुश्त्र. ज्या अभ्यासकांनी ह्या नावाचे समीकरण संस्कृत ‘जरदुष्ट्र’शी मानले त्यांनी त्याचा अर्थ ‘ज्याचे उंट म्हातारे आहेत’ असा केला. ह्या नावाचे ‘उत्तम स्तुती करणारा’, ‘उत्तम हृदय असलेला’, ‘ज्याचे तेज सोनेरी आहे असा’ किंवा ‘(कुशलतेने) उंट हाकणारा’ असेही अर्थ करण्यात आले आहेत. प्रस्तुत लेखकाने ‘जरथुश्त्र’ चा अर्थ ‘गायी-बैलांचा वृद्ध त्राता’ असा केला आहे. ग्रीक भाषेत ह्या धर्मसंस्थापकाचे नाव झोरोऑस्टर (झोरोआस्ट्रस) ह्या रूपात रूढ झाले आणि त्यावरून इंग्रजी भाषेत हा धर्म झोरोअँस्ट्रीयन रिलिजन ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. ह्या धर्माचा उदय इराणमध्ये इ.स.पू. सातव्या शतकात होऊन त्याची भरभराट ससान घराण्याच्या अंतापर्यंत म्हणजे सु. बाराशे-तेराशे वर्षे झाली. ससान राजवटीत (२२६-६५२) हा इराणचा राष्ट्रधर्म होता.

ह्या धर्माचा उदय होण्यापूर्वी इराणमध्ये अनेक देवदेवतांवर विश्वास असणारा धर्म प्रचलित होता. ह्यांपैकी काही देवदेवता मानवी जीवनास स्पर्श करणाऱ्या निसर्गशक्ती होत्या. तसेच तत्कालीन लोकांचा मंत्र-तंत्र व जादूटोण्यावरही विश्वास होता. देवदेवतांना आणि इतर अतिमानवी शक्तींना संतोषविण्यासाठी पशुयाग करून इच्छित साध्य करून घ्यावे, अशा प्रकारचे धर्माचे स्वरूप होते. ह्या यज्ञयागात हओमाला (संस्कृत-सोम) विशेष महत्त्व होते. पशुयागामुळे प्राण्यांना होणाऱ्या पीडेला अवेस्तातील यस्न २९ मध्ये बैलाच्या आत्म्याने केलेल्या आक्रंदनाच्या रूपात जरथुश्त्राने वाचा फोडली आहे. ह्या यस्नात गायी-बैलांचा त्राता म्हणून जरथुश्त्राचे नाव ऐकू येते.

जरथुश्त्राचा जन्म इ. स. पू. ६३० ते ६१८ च्या दरम्यान झाला होता, असे परंपरागत मत आहे आणि ते बहुतेक विद्वानांना मान्य आहे. तो बहुधा पुरोहितकुलात जन्माला आला असावा. जरथुश्त्राचे कुलनाम स्पितम, वडिलांचे नाव पोउरुषस्प (संस्कृत-परुषाश्व) आणि आईचे नाव दोग्धोवा किंवा दुग्धोवा (सं.- दुग्धवा ? ). वयाच्या तिसाव्या वर्षी जरथुश्त्राला ज्ञानप्राप्ती झाली व तो आपल्याला मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना शिकवू लागला. प्रथम त्याला तत्कालीन धर्मगुरू व शासनकर्ते यांचा खूप विरोध झाला. त्याने अगदी निराशेचे क्षण अनुभवले असावे असे ‘ मी आता कोणत्या देशी जाऊ, कुणीकडे माझे पाय वळवू ? मला माझ्या गावात समाधान नाही, द्रोहात रमणाऱ्या, राज्यकर्त्यांपासूनही नाही’ (यस्न ४६.१), अशा त्याने काढलेल्या उद‌्गारांवरून वाटते. अखेर तो आपले गाव सोडून इराणच्या उत्तरपूर्व विभागात गेला. तिथे अर्यनम् वएजो (ख्वारेझम्. हल्ली इराण, अफगाणिस्तान व सोव्हिएट तुर्कस्तान यांच्या हद्दी जिथे मिळतात तो भाग) येथील विश्तास्प (हखामनी सम्राट डरायस ह्याचा पिता विश्तास्प ही वेगळी व्यक्ती आहे) नावाच्या कविकुलातील राजाने त्याला आश्रय दिला. तिथपासून जरथुश्त्राला अनुयायी मिळत गेले व त्याच्या शिकवणीचा प्रसार होऊ लागला. जरथुश्त्र हा पाश्चात्त्य राष्ट्रांना ज्ञात झालेला पहिला पौर्वात्य तत्त्ववेत्ता होय.

जरथुश्त्री धर्माची माहिती मुख्यत्वे अवेस्ता भाषेत लिहिलेल्या पारशी लोकांच्या⇨अवैस्तानामक धर्मग्रंथात व ससान राजवटीत लिहिल्या गेलेल्या पेहलवी भाषेतील वाङ्मयात आढळते. ह्याखेरीज ग्रीक इतिहासकार व प्रवासी यांनीही ह्या धर्माविषयी त्यांच्या लेखनात माहिती दिली आहे. उपलब्ध अवेस्ताग्रंथ मूळ अवेस्ताच्या सु. एक तृतीयांश इतकाच आहे. जरथुश्त्री धर्माची संपूर्ण माहिती मिळवण्याच्या दृष्टीने ही फार मोठी हानी झालेली आहे. अवेस्ताधर्मग्रंथात जो भाग ‘गाथा’ ह्या नावाने ओळखला जातो तो त्यातील सर्वांत प्राचीन भाग असून जरथुश्त्राची शिकवण समजून घेण्याच्या दृष्टीने तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गाथा ह्या खुद्द जरथुश्त्रीच्या तोंडच्या असून त्या मूळ रूपात परंपरेने टिकवून ठेवल्या असल्याचे मानले जाते. त्यामुळे गाथांना पारशी धार्मिक वाङ्मयात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अवेस्ताचा गाथांखेरीज इतर जो भाग आहे, तो जरथुश्त्राच्या नंतर इ. स. पू. पाचवे – तिसरे शतक ह्या काळात जरथुश्त्राच्या अनुयायांनी लिहिला आहे. जरथुश्त्राच्या जीवनात त्याने कुठलेही चमत्कार घडवून आणले असल्याचे अगर त्याच्या जन्माच्या वेळी चमत्कार घडल्याचे उल्लेख गाथांत नाहीत. तसे उल्लेख पेहलवी वाङ्मयात मात्र आहेत.

जरथुश्त्राची शिकवण एकेश्वरवादी आहे. त्याच्या काळी प्रचलित असलेल्या धर्मात अनेक देवदेवता मानल्या जात. त्या साऱ्यांना खोटे देव ठरवून जरथुश्त्राने एकच देव असल्याचे मानले आणि त्याला त्याने⇨अहुर मज्द असे नाव दिले. ऋग्वेदाच्या प्राचीन भागात ‘असुर’ व ‘देव’ हे दोन शब्द चांगल्या अर्थाने येतात. ऋग्वेदाच्या अखेरीपासून संस्कृत भाषेत ‘असुर’ ह्या शब्दाला देवविरोधी दुष्ट शक्ती असा अर्थ प्राप्त झाला. ‘देव’ हा शब्द चांगल्या अर्थाने रूढ राहिला. अवेस्तात नेमके उलटे घडले. सार्यां अवेस्तात अहुर हा शब्द चांगल्या म्हणजे आपण ज्याला देव म्हणू त्या अर्थी वापरलेला आढळतो आणि ‘दएव’ हा अहुराला विरोध करणारा असा त्याचा अर्थ होतो. प्रस्तुत नोंद जरथुश्त्र धर्माविषयी असली, तरी मराठी भाषेतील संकेतानुसार देव हा शब्द चांगल्या अर्थी येथे वापरला आहे. अहुर मज्द हा सर्वज्ञ व सर्वशक्तिमान असल्याचे जरथुश्त्राने मानले. अहुर मज्द ह्या नावाच्या अर्थाविषयी अभ्यासकांत मतभेद आहेत. एका मताप्रमाणे ज्या एका मूळ अमूर्त कल्पनेने ऋग्वेदात ‘असुर वरुण’ ह्या नावाने देवताकार घेतला तिने अवेस्तात अहुर मज्द ह्या नावाने देवताकार घेतला. अहुर मज्द ह्याचा अर्थ ‘देव प्रज्ञा’ किंवा ‘मेधा’ (लॉर्ड विजडम). ह्या मताचे पुरस्कर्ते सारासार विवेकबुद्धी ह्या अमूर्त कल्पनेला जरथुश्त्राने देवपण दिले, असे मानतात. दुसर्याह मताच्या पुरस्कर्त्यांच्या मते गाथांत अहुरो मज्दाऑ अशा शब्दप्रयोगाऐवजी मज्दाऑ अहुरो असा प्रयोग जास्त वेळा आढळत असल्यामुळे, जरथुश्त्र देवाल संबोधण्यासाठी मज्दा आणि अहुर ह्या दोन शब्दांचा स्वतंत्रपणे उपयोग करीत असे, असे म्हणणे यथार्थ होईल. जरथुश्त्राच्या देवाचे नाव ‘अहुर’. त्याला तो मज्दा ह्या नावानेही संबोधी. ही दोन नावे केव्हा एकत्र, पण बहुशः निरनिराळी वापरलेली आढळतात. ‘मज्दाऑ अहुरो’ ह्याचा अर्थ ‘मेधावी अहुर’ (वाइझ लॉर्ड) असा होतो.


अहुर मज्दाच्या वर्णनातील काही भाग ऋग्वेदातील देवतांच्या वर्णनाची आठवण करून देतो. उदा., जसे सूर्य हा अहुर मज्दाचा डोळा आहे असे अवेस्तात म्हंटले आहे तसे सूर्याला मित्र व वरुण यांचा डोळा असल्याचे ऋग्वेदात म्हटले आहे (७.६३.१). अहुर मज्दाने विश्वाची उत्पत्ती केली आणि तिथपासूनच ह्या जगात एक सत् व असत् यांचे दीर्घकाळ टिकणारे द्वंद्व सुरू झाले. हे द्वंद्व अहुर मज्द किंवा त्याचा मुख्य मदतनीस स्पँता मइन्यू आणि त्यांचा विरोधक⇨अंग्रो-मइन्यू (पेहलवी अहरिमन) यांच्यात होते. ह्या दोन तत्त्वांना ‘यम’ असे म्हटले असल्याने ती एकाच वेळी उत्पन्न झाली आहेत. विश्वात जे काही सात्त्विक, श्रीमत् व पुण्यशील आहे, त्यांचे प्रतिनिधित्व स्पँता मइन्यू हे तत्त्व करते, तर जे काही तामसी, अश्रीर व पापमय आहे त्यांचे प्रतिनिधित्व अंग्रो-मइन्यू हे तत्त्व करते. अंग्रो-मइन्यूची सारी खटपट अहुर मज्दाच्या सृष्टीचा व जे जे प्रकाशमय आहे त्याचा नाश करण्याची असते. स्पँता मइन्यू व अंग्रो-मइन्यू यांच्या संघर्षात जरथुश्त्राने मानवावर एक मोठी कामगिरी सोपविली आहे. ह्या दोन तत्त्वांच्या झगड्यात मानवाची भूमिका त्रयस्थाची वा बघ्याची नसून तो आपल्या कृतींनी त्यांत प्रत्यक्ष भाग घेत असतो. यस्न ३० मध्ये ह्याचे सुरेख उद‌्बोधन जरथुश्त्राने केले आहे. तो म्हणतो, की मानवाने सदैव जागरूक राहून ह्या दोन तत्त्वांपैकी कोणाचा पक्ष स्वीकारायचा ह्याची निवड केली पाहिजे. ही निवड करावयाची जबाबदारी व स्वातंत्र्य जरथुश्त्राने सर्वस्वी मानवावर सोपविले आहे आणि जरथुश्त्राच्या शिकवणीतला हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शहाणे आहेत ते चांगल्या मार्गाची म्हणजे स्पँता मइन्यूच्या पक्षाची निवड करतात व मूर्ख असतात ते वाईट मार्गाची म्हणजेच अंग्रो-मइन्यूच्या पक्षाची निवड करतात. पूर्वीच्या खोट्या देवांनी निवडकरण्यात चूक केली आणि ते अंग्रो-मइन्यूच्या पक्षाला जाऊन मिळाले. अशा प्रकारे हे सारे देव अहुर मज्दाचे विरोधक बनले. मानवाच्या प्रत्येक विचारात, उक्तीत व कृतीत त्याने कोणता पक्ष स्वीकारला आहे, हे प्रत्ययास येते. अंग्रो-मइन्यूने साऱ्यात जगाचा नाश करण्याचा घाट घातला होता पण स्पँता मइन्यूने त्याचे मदतनीस व सत्प्रवृत्त मानवांच्या साहाय्याने त्याला सामना दिला. त्यामुळे अहुर मज्दाला संतोष वाटला. परंतु ह्या दोन तत्त्वांतील युद्ध अजून संपलेले नाही. म्हणून मानवाला गाफील राहून चालणार नाही. हे युद्ध अजून चालूच आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. त्यासाठी स्पँता मइन्यूची बाजू बळकट व्हायला हवी. हे काम मानव त्याच्या सद्वर्तनाने करीत असतो. जेव्हा जेव्हा तो चांगले विचार, उच्चार व आचार करतो, तेव्हा तेव्हा प्रत्येक खेपेस तो स्पँता मइन्यूचे राज्य वाढवीत असतो पण त्याने त्याउलट आचरण केल्यास तो अंग्रो-मइन्यूचे राज्य वाढवतो.

सत् व असत् शक्तींचा हा झगडा जरथुश्त्री संप्रदायाप्रमाणे एकंदर १२००० वर्षे चालणार असून ह्या कालखंडाचे एकंदर चार समभाग कल्पिण्यात आले आहेत. पैकी शेवटचा भाग जरथुश्त्राच्या जन्मापासून सुरू झाला असल्याचे मानण्यात येते. जरथुश्त्राच्या जन्मापासून तीन हजार वर्षे पूर्ण होतील (पैकी सु. २,६०० वर्षे पूर्ण झाली आहेत) तेव्हा अंग्रो-मइन्यू त्याची शेवटची लढाई स्पँता मइन्यूशी देईल आणि तीत तो निश्चयपूर्वक हरेल, असा जरथुश्त्राचा विश्वास आहे. त्या क्षणानंतर मात्र विश्वात झगडा उरणार नाही आणि सतचे साम्राज्य चिरकाल टिकून राहील.

स्पँता मइन्यू आणि अंग्रो-मइन्यू यांच्या लढ्यात अखेरचा विजय स्पँता मइन्यूचाच व्हावयाचा, हा जरथुश्त्राचा सिद्धांत आहे. हे जरी खरे असले, तरी ह्या सिद्धांताच्या प्रतिपादनातील धोका जरथुश्त्राने ओळखला आहे. ह्या सिद्धांतावर विसंबलेला आणि आचारविचारांचे स्वातंत्र्य मिळालेला माणूस ‘अंती जय सतचा होणार हे ठरलेलेच आहे, मग मला आता वाटेल तसे वागण्यास हरकत नाही’, अशी बेजबाबदारीची भाषा बोलू लागेल. म्हणून ह्या सिद्धांतताला क्वचित दृढ विश्वासाचे रूप देऊन मानवाने नेहमी चांगल्या मार्गाची निवड करावी, असतप्रवृत्त होऊ नये, अशी जरथुश्त्राने मानवाकडे मागणी केली आहे. अखेर सतचा विजय नक्की असला, तरी तो एका प्रकारे मानवाच्या विशुद्धाचरणावर अवलंबून आहे, असा जरथुश्त्राचा आग्रह आहे. एका बाजूने विजयाची खात्री आणि तरीही त्यासाठी मानवाच्या सद्ववर्तनाची आवश्यकता, ह्यांत समतोल ठेवण्याचे अवघड काम जरथुश्त्राने केले आहे.

अहुर मज्द व स्पँता मइन्यू ह्या दोघांना त्यांनी चालविलेल्या लढ्यात दैवी अंश ज्यांच्यात आहे असे अतिमानवी साहाय्यकर्ते आहेत. अहुर मज्दाच्या साहाय्यकर्त्यांना अमेश स्पँत म्हणजे ‘अमर पुण्यात्मे’ (होली इंमॉर्टल्स) असे नाव आहे. ह्या अमेश स्पँतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : वोहु मनह् (वसु मनः) ‘चांगले मन’, अश वहिश्त (ऋत् वसिष्ठ) ‘उत्कृष्ट सत्य’, ख्शथ्र वइर्य (क्षत्र वरणीय) ‘निवड करण्यास योग्य असे राज्य’, आर्मईति (अरमति) ‘भक्ति’, हउर्वतात् (सर्वतात्) ‘पूर्णता’, ‘अमेरेतात्’ (अमृत) ‘अमृतत्त्व’. अहुर मज्द व स्पँता मइन्यू हे केव्हा एकत्र तर केव्हा निराळे असे आढळतात. अमेश स्पँतांपैकी पहिले दोघे वोहु मनह् व अश वहिश्त यांना अहुर मज्दाचे पुत्र कल्पिले आहे. अमेश स्पँतांची संख्या सहा असल्याने काही विद्वानांनी त्यांचे वरुण, मित्र, अर्यमा, भग, अंश आणि दक्ष ह्या सहा वैदिक आदित्यांशी साम्य कल्पिले आहे पण ही चुकीची समजूत आहे. ह्या अमेश स्पँतांशी सामना देताना अंग्रो-मइन्यूदेखील अक मनह ‘वाईट मन’, इंद्र ह्यांसारख्या सहा तुल्यबल साहाय्यकांना मदतीस घेतो.

जरथुश्त्राच्या शिकवणीत स्पँता मइन्यूच्या मदतीला अमेश स्पँतांची कल्पना असली, तरी ते देव मात्र नव्हते. जरथुश्त्राने अनेक देवदेवतांना मुळी मानलेच नाही. तसेच त्याने यज्ञयाग करून देवांना संतोषविण्याच्या पद्धतीसही मानले नाही. अशा यज्ञांत जे पशूंचे बळी दिले जात किंवा सोमाच्या आहुती दिल्या जात, त्यांचा त्याने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

जरथुश्त्राने अहुर मज्द हा एकच देव मानला असला, तरी त्याने जगाच्या आरंभापासून अस्तित्वात असलेल्या स्पँता मइन्यू आणि अंग्रो-मइन्यू ह्या दोन परस्परविरोधी शक्ती मानल्याने तो अद्वैतवादी होता की द्वैतवादी होता, असा एक वादाचा प्रश्न आहे. काहींच्या मते त्याने अहुर मज्दाखेरीज बाकी साऱ्यांना खोटे देव ठरवल्याने वर उल्लेखिलेल्या दोन शक्तींच्या वरचे स्थान अहुर मज्दाचे असल्याने तो एकेश्वरवादी होता तर काहींच्या मते जरथुश्त्राचा सारा रोखच मुळी एकेश्वरवादाच्या विरुद्ध होता आणि ही गोष्ट त्याने विश्वाच्या आरंभापासून दोन शक्तींचा झगडा सुरू असल्याचे मानले आहे, त्यावरून सिद्ध होते. एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी ती अशी, की जरथुश्त्राने मानलेले द्वैत हे नैतिक पातळीवरचे (एथिकल ड्यूॲलिझम) आहे आणि ते त्याने स्वतः विचार करून जगाला दिले आहे. हे ज्ञान त्याने कोणा गुरूपासून मिळवलेले नाही.

जरथुश्त्राने जरी परंपरागत चालत आलेल्या देवदेवतांविरुद्ध व यज्ञयागांविरुद्ध बंड पुकारून त्यांची धर्मातून हकालपट्टी केली असली, तरी त्याच्या निधनानंतर काही काळातच (इ.स.पू. ४००) ह्यांपैकी काहींना पुन्हा धर्मात स्थान देण्यात आले. हे कसे घडून आले, जरथुश्त्राने ज्यांचा धिक्कार केला त्यांचा त्याच्या अनुयायांनी स्वीकार कसा केला, ह्याचे अभ्यासकांना आश्चर्य वाटत आले आहे आणि त्यांनी आपापल्यापरी ह्या घटनेचा खुलासा करण्याचा प्रयत्नही केला आहे. एक मत असे आहे की इराणच्या निरनिराळ्या प्रांतांचा एका पर्शियन साम्राज्यात समावेश झाला व त्यामुळे जरथुश्त्राच्या नंतरच्या काळात त्याच्या एकेश्वरवादात अनेकदेवतावाद सामावून घेण्यात आला. जरथुश्त्री धर्मांत मागाहून आलेल्या ह्या यझतांत (यज्ञार्ह शक्ती), मिथूर (मित्र), हओम (सोम), अर्द्वी सूरा अनाहिता (आपोदेवता), आतर् (अग्नी), वेरेथरघन (वृत्रघ्न), स्त्रओश, रश्नू इत्यादिकांचा समावेश आहे आणि त्यांच्यासाठी स्तुतिपर सूक्ते रचण्यात आली आहेत. अवेस्ताचा जो ‘यश्त’ म्हणून भाग आहे त्यात त्या सूक्तांचा अंतर्भाव केला गेला आहे. ह्यांपैकी मिथ्र यश्त हे सर्वात मोठे असून त्या देवतेचे करारदेवता किंवा संधिदेवता (कॉन्ट्रॅक्ट डीइटी) असे असलेले स्वरूप त्यात चांगले प्रतिबिंबित झाले आहे. त्यातील काही भागाचे ऋग्वेदातील मित्राच्या वर्णनाशी असलेले साम्य लक्षणीय आहे. हओम यश्तमधील एका भागात (यश्त ९) सोमरस पिळून त्याची आहुती देण्याच्या परंपरेची माहिती खुद्द हओमानेच जरथुश्त्राच्या विनंतीवरून दिली आहे. त्यावरून ही परंपरा विवस्वान ह्या पहिल्या मर्त्यापासून सुरू झाली आणि त्या परंपरेत चौथ्या क्रमांकाचे नाव जरथुश्त्राचा पिता पोउरूषस्प ह्याचे आहे. हे वाचत असताना भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला योगविद्येच्या परंपरेची सुरूवात पहिली चार नावे घेऊन (भगवान-विवस्वान-मनू-इक्ष्वाकू) सांगितली त्याची आठवण होते. जरथुश्त्री धर्मात झालेल्या समन्वयामुळे मिथरादी देवांना जरी पुन्हा यझताचे स्थान मिळाले, तरी इंद्र, नाङ्हइथ्य (नासत्य) हे मात्र खोटे देव म्हणून धर्माबाहेरच राहिले.


अहुर मज्दाला प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्याला प्रश्न विचारून ज्ञान मिळविण्याची जरथुश्त्राची तळमळ गाथांत दिसते. सन्मार्ग किंवा ऋजू मार्गाचे ज्ञान अश (ऋत) व वहिश्त मइन्यू (वसिष्ठ मन्यू) कडून मिळावे, असे तो म्हणतो (यस्न ३३.६). सृष्टीच्या उत्पत्तीविषयी व तिच्या स्थितीविषयी कुतूहल साऱ्यांना असते, तसे ते जरथुश्त्रालाही होते. म्हणून गाथांत त्याविषयी तो अहुर मज्दाला प्रश्न विचारतो (यस्न ४४.४). असाच प्रश्न ऋग्वेदातही ‘को अद्धा वेद क इह प्रवोचत् कुत आजाता कुत इयं विसृष्टीः ‘ (१०.१२९.६) अशा स्वरूपात आढळतो. जरथुश्त्राची उश्ता अहृमाइ यहृमाइ उश्ता कहमाइचित् वसॅखशयांस् मज्दाओ दायात् अहुरो ‘स्वराट् अहुर मज्दा ज्याची जशी इच्छा असेल तसे त्यास देवो’ यस्न ४३.१ मधील ही प्रार्थना ज्ञानेश्वरांच्या ‘जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात’ ह्या ओवीची (ज्ञानेश्वरी १८.१७९६) आठवण करून देते.

जरथुश्त्री धर्मातील फरवशींची कल्पना ही त्या धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. हे फरवशी (संस्कृत धातू प्रवर्त्) म्हणजे मानवांचे रक्षण करणारे देवदूत (गार्डियन एन्जल्स) आहेत. प्रत्येक मानवाच्या जन्मापूर्वीही त्याचा फरवशी अस्तित्वात असतो आणि मानवाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याशी तो एकरूप होतो. प्रत्येक जीवात्म्याची फरवशी ही जणू त्याची एक अतिरिक्त प्रतिकृती असते.

मानवाची सत्कृत्ये जास्त असली, तर मृत्यूनंतर तो स्वर्गात जातो आणि त्याने दुष्कृत्ये जास्त केली असली, तर तो नरकात जातो. जरथुश्त्राच्या शिकवणीत क्षमेला स्थान नाही. केलेल्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा ही भोगलीच पाहिजे, असे त्याचे मत होते. पारशी लोक पृथ्वी, पाणी व अग्नी यांना अतिशय पवित्र मानीत असल्यामुळे मृतदेहाने त्यांना विटाळण्याची कल्पना त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यामुळे मृतदेहाचे दहन किंवा दफन करण्याऐवजी तो एका विशिष्ट ठिकाणी पक्ष्यांना भक्ष्य म्हणून ठेवण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे [→दख्म].

जरथुश्त्राच्या शिकवणीत मनाच्या व शरीराच्या पावित्र्यरक्षणाला अतिशय महत्त्व आहे. शरीर कुठल्याही कारणाने- विशेषतः मृतदेहाच्या संसर्गाने- अपवित्र होऊ देता कामा नये, ह्यावर त्या धर्मात कटाक्ष आहे. पावित्र्यरक्षणासाठी अतिशय बारीक-सारीक सूचना अवेस्ताचा जो ‘वेंदिदाद’ नावाचा भाग आहे त्यात आढळतात.

पारशी लोकांच्या धार्मिक आचारात अहुर मज्द व यझत यांची पूजाअर्चा करणे, रोज अवेस्ता ह्या धर्मग्रंथातील थोड्या भागाचे पठन करणे, पवित्र अग्नीचे रक्षण करणे, अग्निमंदिरातील [→अग्यारी] अग्नीवर दिवसातून पाच वेळा चंदन वाहणे, वयाच्या बारा ते पंधराव्या वर्षापर्यंत कुश्ती बांधून⇨नवजोत (यज्ञोपवीत) समारंभ करणे (किंबहुना नवजोत झाल्यावरच कुणीही खरा जरथुश्त्री होतो), गृहस्थाश्रम पतकरून प्रजोत्पादन करणे ह्या गोष्टींचा समावेश होतो. तापसी वृत्ती बाळगून अपरिग्रही जीवन जगणे किंवा आजन्म ब्रह्मचर्य पालन करणे, यांना पारशी धर्मात स्थान नाही.

वैयक्तिक आचारविचारांच्या बाबतीत पारशी धर्मात ऋजुता, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा ह्या गुणांना प्राधान्य आहे. द्रोह किंवा कपटाने वागणे ह्याला जरथुश्त्राचा कडवा विरोध होता. एक सामाजिक कर्तव्य म्हणून ज्यांना जरूर आहे त्यांना दान देणे आणि पाहुण्याचा आदरसत्कार करणे, ह्यांना ह्या धर्मात गौरवाचे स्थान आहे. भटक्या जीवनाचा त्याग करावा, अहुर मज्दाची मानवाला मिळालेली गाय ही श्रेष्ठ देणगी असल्यामुळे तिचा वध न करता पशुपालन करावे आणि शेतीभाती करावी ह्या गोष्टींना जरथुश्त्राने सर्वोत्तम मानले आहे.

जरथुश्त्री धर्माची स्थापना होऊन त्याचा प्रसार होऊ लागल्यावर त्याला दोन मोठ्या तडाख्यांना तोंड द्यावे लागले. पहिला तडाखा शिकंदर बादशाहने इराणवर स्वारी केली (इ.स.पू. ३३०) तेव्हा बसला. त्यावेळी चामड्यावर लिहून ठेवलेल्या समग्र अवेस्ताच्या दोन प्रती नष्ट झाल्या. त्यानंतरच्या पार्थिअन राजवटीत ह्या धर्माने पुन्हा आपला जम बसवण्यास सुरुवात केली परंतु त्याची खरी भरभराट ससान राजवटीत झाली. त्यावेळी जरथुश्त्राचा धर्म हा इराणचा खरा राष्ट्रीय धर्म झाला. हखामनी राजवटीतील डरायसच्या प्राचीन पर्शियन भाषेत लिहिल्या गेलेल्या शिलालेखात अहुर मज्दाचा उल्लेख आढळतो पण जरथुश्त्राचा आढळत नाही. त्यामुळे ते घराणे नेमके जरथुश्त्राचे अनुयायी होते की नाही, ह्याविषयी संशय व्यक्त करण्यात आला आहे. ससान राजवटीत मात्र हा केवळ इराणचाच राष्ट्रधर्म होऊन राहिला नाही, तर त्याचा इराणबाहेरही प्रसार झाला. मिथ्रर देवतेच्या पूजेचा प्रसार साऱ्या रोमन साम्राज्यात विशेषतः सैनिकांत झाला होता.

जरथुश्त्री धर्माला दुसरा तडाखा इराणवर झालेल्या इस्लामी आक्रमणामुळे इ. स. ६५२ मध्ये बसला. हा तडाखा पहिल्यापेक्षा फार जोराचा होता. ह्या आक्रमणानंतर इराणमधील जरथुश्त्री लोकांचे धर्मांतर झपाट्याने होऊ लागले आणि थोड्याच काळात हा धर्म इराणमधून जवळजवळ नामशेष झाला. काही तुरळक जरथुश्त्री लोक पूर्वीपासून इराणात आजही आहेत. त्यांना ‘गबार’ (अरेबिक-काफीर) असे म्हणतात. सुदैवाने इ.स.च्या सातव्या शतकात काही जरथुश्त्री लोकांनी आपला धर्म टिकवण्यासाठी देशांतर केले आणि ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गुजरातेत येऊन पोहोचले. तिथून ते काहीसे उत्तरेकडे, काहीसे दक्षिणेकडे पसरले आणि आज त्यांची वस्ती मुख्यत्वे गुजरात-महाराष्ट्रात आहे. त्यांना येथे पारशी नावाने ओळखतात.

ह्या धर्मात जोपासण्यासारखी काही चिरंतन तत्त्वे असल्यामुळे व त्याचे अनुयायी सत्प्रवृत्त राहिल्यामुळे हा धर्म देशांतर करावे लागले, तरी आपली उज्ज्वल परंपरा टिकवून आजही जिवंत राहिला आहे.

संदर्भ : 1. Duchesne- Guillemin, Jacques Trans. Henning, M. The Hymns of Zarathushtra, London, 1952. 2. Gray, Louis H. The Foundations of the Iranian Religions, Bombay, 1925. 3. Henning,W.B.Zoroaster : Politician or witch-Doctor?,London,1951.4.Jackson, A.V.W.Zoroaster, the Prophet of Ancient  Iran, New York, 1899.5. , Zaehner R.C.The Dawn and Twillight of Zoroastrianism, London, 1961.

मेहेंदळे, म. अ.