पारेअतो, व्हिलफ्रेदो : ( १५ जुलै १८४८ – १९ ऑगस्ट १९२३). इटालियन अर्थशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ. पॅरीस येथे जन्म. वडील राफाएल हे मॅझिनीचे अनुयायी असल्याने १८३६ मध्ये त्यांनी एका फ्रेंच स्त्रीशी विवाह केला. व्हिलफ्रेदोच्या जन्मानंतर दहा वर्षांनी राफाएल मायदेशी परतले. व्हिलफ्रेदोचे प्राथमिक शिक्षण पॅरीसमध्ये झाले त्याने तुरीनाच्या ‘ पोलीतेक्निक इ न्स्टिट्यूट ‘ मधून अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण केला (१८६९). १८७०-९२ या काळात व्हिलफ्रेदो अभियंता म्हणून काम करीत होता. इटलीतील दोन रेल्वे कंपन्यांमध्ये त्याने संचालक म्हणून व फ्लॉरेन्समधील एका लोखंड निर्मितिउद्योगात व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. १८८९ मध्ये त्याने दीना बकुन्यिन नावाच्या रशियन युवतीशी विवाह केला व्यवस्थापकीय संचालकपद सोडून दिले व सल्लागार म्हणून तो व्यवसाय करू लागला.

इटालियन अर्थशास्त्रज्ञ माफ्फेओ पांतालेओनी (१८५७-१९२४) याचा प्युअर इकॉनॉमिक्स हा ग्रंथ व लेआँ व्हालराचा सामान्य आर्थिक समतोल सिद्धांत यांमुळे तो अतिशय प्रभावित झाला. १८९३ मध्ये व्हालराच्या सेवानिवृत्तीनंतर तो लोझॅन विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक झाला.

व्हिलफ्रेदो पारेअतो

पारेअतोचे एक चुलते १८९८ मध्ये मरण पावले त्यांच्याकडून पारेअतोला बरीच संपत्ती मिळाली. १९०७ मध्ये लोझॅन येथील अर्थशास्त्र अध्यासनाचा त्याने राजीनामा दिला आणि स्वित्झर्लंडमधील सेलिग्नी येथेच तो स्थायिक झाला व २३ वर्षांची मैत्रीण जेन रेगीस हिच्याबरोबर राहू लागला. १९२३ मध्ये पारेअतोला आपल्या पत्नीपासून घटस्फोट मिळाल्यावर त्याने जेनी रेगीस ह्या आपल्या मैत्रिणीशीच विवाह केला. परंतु त्याच वर्षी त्याचे निधन झाले. मृत्यूपूर्वी काही काळ (१९२२) इटलीच्या फॅसिस्ट शासनाने पारेअतोला ‘सीनेटर ऑफ द किंग्डम ऑफ इटली’ हे बिरुद बहाल केले होते. लोझॅन विद्यापीठात मुसोलिनी हा पारेअतोचा विद्यार्थी होता व त्याच्यावर पारेअतोच्या विचारांचा प्रभावही होता.

द कोर्स ऑफ इकॉनॉमी पॉलिटिक्स (१९९६-९७), द मॅन्युअल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स (१९२६) व एन्सायक्लोपीडिया ऑफ मॅथॅमॅटिकल सायन्सेस मधील मॅथॅमॅटिकल इकॉनॉमी हा लेख, हे पारेअतोचे अर्थशास्त्रविषयक प्रमुख कार्य. त्याचे अर्थशास्त्रावर अनेक लेख, निबंधही प्रसिद्ध झाले. कोर्सचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे  सांख्यिकी यांनी समृद्ध असलेला पहिलाच अर्थशास्त्रीय ग्रंथ समजण्यात येतो. कोर्समध्येच पारेअतोचा अतिशय टीका झालेला प्राप्ति-विभाजनाचा सिद्धांत विस्ताराने देण्यात आला आहे. द मॅन्युअल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स हा ग्रंथ कोर्सपेक्षा अधिक वैचारिक असून त्यात त्याच्या विस्तृत गणितीय परिशिष्टांचा समावेश आहे. या ग्रंथात त्याने अर्थशास्त्राचा विशुद्ध सिद्धांत तसेच ‘कमाल समाधान देणारा प्रेरणा सिद्धांत’ मांडला आहे.

पारेअतोने अर्थशास्त्राला शास्त्रीय अधिष्ठान मिळवून दिले याशिवाय सामाजिक घटना व आर्थिक घटना यांचे एकात्मीकरण निर्देशांक फलनाची व्याख्या व मागणी सिद्धांत कमाल कार्यक्षमतेची पायाभूत मांडणी आणि प्राप्ति-विभाजन सिद्धांत या विषयांत त्याने मोलाची भर घातली. समाजविज्ञानाच्या मोठ्या चौकटीत पारेअतोने आर्थिक सिद्धांतांना बसविले. आर्थिक व सामाजिक घटना परस्परावलंबी असतात, म्हणून आर्थिक सिद्धांत म्हणजे एका मोठ्या वर्तुळाचा एक लहानसा भाग होत, असे त्याचे मत होते. मूळ संख्यावाचक उपयोगिता (कार्डिनल युटिलिटी) व क्रमसंख्यावाचक उपयोगिता (ऑर्डिनल युटिलिटी) या संकल्पनांमध्ये स्पष्ट फरक दाखविणारा पारेअतो हा पहिला अर्थशस्त्रज्ञ होय. मूळ संख्यावाचक उपयोगिता निर्देशांकाचा आधार न घेता निर्देशांक फलन संकल्पनेचा (म्हणजेच क्रमसंख्यावाचक उपयोगितेचा) उपयोग करून आर्थिक समतोलसिद्धांताचे विवेचन करता येते, हे पारेअतोने दाखवून दिले. आत्मनिरीक्षक तर्काचा वा युक्तिवादाचा वापर करून मागणीचे अनुभवाधिष्ठित नियम मांडणारा व त्यांवरून सामान्य मागणी सिद्धांत मांडणारा तो पहिला अर्थशास्त्रज्ञ होय. समतुष्टी वक्र (इनाडिफरन्स कर्व्ह) या विश्लेषणकारी साधनाचा पारेअतोनेच प्रथम आर्थिक क्षेत्रात उपयोग केला परंतु १९३० पर्यंत हे तंत्र लोकप्रिय झाले नाही.

पारेअतोच्या सर्व सिद्धांतांमध्ये ‘कमाल कार्यक्षमता सिद्धांत’ किंवा ‘समाजाला कमाल समाधान देणारा सिद्धांत’ (मॅक्झिमम ऑफेलिमिटी फॉर द सोसायटी) हा महत्त्वाचा समजण्यात येतो. ‘कमाल साधनसंपत्तीचे वाटप’ या नावानेही तो ओळखला जातो. एका व्यक्तीचे निर्देशांक फलन कमी केल्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीचे निर्देशांक फलन वाढविता येत नाही, अशी अवस्था पारेअतोच्या मते कमाल कार्यक्षमतेची अवस्था होय. आर्थिक इष्टतमांच्या सामान्य सिद्धांताला ही व्याख्या पाया ठरली असून या सामान्य सिद्धांतामध्ये व्यवस्थापनाचे इष्टतम, लोकसंख्येचे इष्टतम, भांडवलवादी इष्टतम यांचा समावेश होतो. अर्थशास्त्रीय सांख्यिकीमध्ये ‘पारेअतो नियमा’ च्या रूपाने पारेअतोने अत्यंत मोलाची भर घातली आहे. तो नियम असा : “सामाजिक व राजकीय संख्या आणि करयोजना याच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांना न जुमानता उत्पन्नामध्ये एकाच तऱ्हेने वाटले जाण्याची अनिवार्य प्रवृत्ती असते” हा नियम अनुभवजन्य असून त्यायोगे विषमतेचा सोईस्कर असा निर्देशांक काढला जातो.

अर्थशास्त्राच्या विकासावर पारेअतोच्या विचारांचा प्रभाव फार उशिरा पडल्याचे व तोही इटली आणि फ्रान्स यांपुरताच मर्यादित असल्याचे जाणवते. शुंपेटर या अर्थशास्त्रज्ञाच्या मते ह गोष्टी खरोखरीच आश्चर्यकारक समजली पाहिजे कारण सैद्धांतिक अर्थशास्त्रामध्ये जे अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले, त्यांची बीजे पारेअतोच्या विचारांत होती. लेआँ व्हालरा आणि अर्व्हिंग फिशर यांच्याबरोबरच पारेअतोलाही आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानण्यात येते.

अर्थशास्त्रीय तत्त्वांचा व नियमांचा उपयोग करूनही काही समस्या उलगडता येत नाहीत, हे दिसून आल्यावर पारेअतोने आपले लक्ष समाजशस्त्राकडे वळविले. १९१६ मध्ये त्याने आपला सर्वश्रेष्ठ ग्रंथ Trattato di Sociologia generale (इं.भा. द माइंड अँड सोसायटी खंड १- नॉनलॉजिकल काँडक्ट खंड- २ थिअरी ऑफ रेसिडयूज खंड ३- थिअरी ऑफ डेरिव्हेशन्स आणि खंड ४- द जनरल फॉर्म ऑफ सोसायटी) चा खंडांमध्ये प्रसिद्ध केला. यामध्ये त्याने वैयक्तिक व सामाजिक कृतींचे समीक्षण केले असून त्यांचे आधार ठरविले आहेत समाधानाचा आर्थिक दृष्टिकोण  ‘उपयोगिता’ (युटिलिटी) या संज्ञेने व्यक्त करून पारेअतोने असे मूलभूत विधान मांडले की, कमाल समाधानाचा विचार केवळ विभाजनात्मक भूमिकेवरूनच करता येणे शक्य असून, समाजातील वैयक्तिक समाधानाचे एकवटीकरण केले म्हणजेच एकूण कमाल समाधानाचा विचार करता येतो. नंतर पारेअतोने अर्थव्यवस्थेतील दोन प्रकारच्या बदलांचे स्पष्टीकरण केले पहिल्या प्रकारच्या बदलांचा परिणाम समाजातील सर्वजणांवर एकाच दिशेने होतो, दुसऱ्या प्रकारच्या बदलांमुळे काहींची आर्थिक स्थिती सुधारते, तर काहींची अधिकच बिघडते. या ठिकाणी पारेअतोने कल्याणकारी अर्थशास्त्राच्या मर्यादा प्रथम दाखवून दिल्या.

अभिजन (एलिट्स) किंवा सत्ताधारी समूहांसंबंधीचा पारेअतोचा सिद्धांत महत्त्वाचा आहे. शासनसत्ता ही एका सत्ताधारी अभिजनवर्गाच्या हाती असते व अधिक प्रबळ अभिजनवर्ग पुढे आला, की त्याच्या हाती सत्ता जाते. राजेशाही, सरंजामशाही किंवा लोकशाही हे खरे शासनप्रकार नव्हेत उलट त्यांच्या नावाखाली सत्तेवर असलेला प्रबळ अभिजनवर्गच खरा शास्ता असतो, असे पारेअतोचे मत आहे. सत्ताबदल हा चक्रनेमिक्रमाने अभिजनवर्गात होणाऱ्या बदलांमुळे होतो, हा त्याचा सिद्धांत होता म्हणजे एका प्रबल गटाची जागा दुसरा प्रबळ गट घेत असतो. सत्ताधारी अभिजनवर्गाच्या आक्रमक प्रवृत्तीला सिंह(‘लायन्स’) प्रवृत्ती व बहुजनवर्गाच्या धोरणी प्रवृत्तीला शृगाल (‘फॉक्सेस’) प्रवृत्ती अशी नावे त्याने दिलेली आहेत. बहुजनवर्ग हा सत्तासंपादनासाठी अनुकूल परिस्थिती व संधी शोधत असतो. तथापि या दोन्ही वर्गांचे राजकीय वर्तन हे मूलतः भावनाधिष्ठित व तर्कशुद्धतेला डावलणारे असते, असे पारेअतोचे मत आहे. हे दोन्ही वर्ग केवळ आपापल्या पूर्वकालीन वर्तनाचे समर्थन करण्यासाठी व भविष्यकालीन ध्येयधोरणांचा पाठपुरावा करण्यासाठी ही विवेकबुद्धी वापरतात. मात्र ही ध्येयधोरणे विवेकबुद्धीने नव्हे, तर आपापल्या भावनिक गरजा लक्षात घेऊन ठरविलेली असतात. पारेअतोची अभिजनवादी विचारप्रणाली आधुनिक राजकीय विचारांत महत्त्वाची ठरली आहे. पारेअतो सेलिग्नी येथे निधन पावला.

संदर्भ : 1.  Bosquet, G.H. Work of Vilfredo Pareto, Minneapolis, 1928,

2. Homans, G.C. Curtis, Jr., C.P. An Introduction to Pareto : His Sociology, New York, 1970.

3.  Meisel, J.H. Pareto and Mosca, Englewood Cliffs, 1965,

4.  Schumpeter, J.A. Ten Great Economists : from Marx to Keynes, New York, 1965.

गद्रे, वि. रा.