दूफू : (७१२–७७०). श्रेष्ठ चिनी कवी. होनान प्रांतातील शीआंगयांग येथे जन्म. त्याचे आजोबाही एक नामवंत कवी होते. वयाच्या सातव्या वर्षापासूनच त्याने यमके जुळवायला सुरुवात केली. तथापि सरकारनियुक्त परीक्षांत मात्र त्याला वारंवार अपयश आले. वयाच्या ४४ व्या वर्षी तो सैन्यात भरती झाला आणि लाढाईत शत्रूच्या हाती सापडला. पुढे त्याने कैदेतून पलायन केले. त्याला ७५७ मध्ये कामावरून दूर करण्यात आले. त्या भ्रमनिरास झालेल्या अवस्थेत त्याने छांग आन हे राजधानीचे शहर सोडले व दक्षिण आणि पूर्व चीनच्या दौऱ्यावर तो निघाला. दौऱ्यावर असतानाच अतिरिक्त मद्यपानामुळे हूनान येथे तो मृत्यू पावला.

दू फूची काव्यनिर्मिती विपुल आहे. त्याच्या १,४०० कविता उपलब्ध असल्या, तरी प्रत्यक्षात त्याने बऱ्याच कविता लिहिल्याचे सांगतात. त्याच्या कविता म्हणजे त्याचे आत्मचरित्र, राजकीय भाष्य आणि साहित्यिक टीका होय. त्यांना ‘काव्यबद्ध इतिहास’ असेही म्हटले जाते. लयबद्धता हा त्याच्या काव्याचा प्रधान गुण होय. युद्ध हा त्याच्या काव्याचा एक प्रमुख विषय. अत्यंत जोमदार शैलीत त्याने युद्ध आणि युद्धातील विजय यांचा धि:कार केला. परंतु त्याच्या देशावर जेव्हा परचक्र आले, तेव्हा त्याचे अंतःकरण देशप्रेमाने धगगधू लागले. ‘जेव्हा धरा आणि स्वर्ग, दिवसांमागून दिवस, रक्तबंबाळ झाली तेव्हा दरबारातून लढायला कोणी बाहेर पडले काय?’ अशी तो पृच्छा करतो. त्याची ही राज्यकर्त्या वर्गावरील टीका अत्यंत स्पष्ट व सडेतोड आहे. सामाजिक विषमतेमधील अन्यायालाही त्याने कवितेतून वाचा फोडली. त्याविषयीची त्याची एक चतुरोक्ती प्रसिद्ध आहे : ‘लाल दरवाज्याच्या आत (म्हणजे श्रीमंतांच्या प्रासादात) मांस आणि दारू कुजून जात असतात आणि थंडीने गारठून गेलेले सांगाडे रस्त्यावर पडलेले असतात’. काव्यांतर्गत निराशेचा हा सूर हे त्याच्या स्वतःच्या जीवनातील अनुभतींचेचे प्रतिबिंब हाते. ‘पूर्वेकडील सागरामध्ये विश्वशुद्धी’ करण्याची सुरुवातीच्या काळात त्याची स्वप्नाळू व काव्यात्म महत्त्वाकांक्षा होती. प्रचंड ग्रंथसंभाराच्या व्यासंगाने व प्रतिभेने त्याला लाभलेल्या ईश्वरी काव्यशक्तीच्या सहयोगाने आपल्या ध्येयस्वप्नांना मूर्तरूप देण्याची त्याची आकांक्षा त्याच्या उत्तरकालीन आयुष्यात सफळ होऊ शकली नाही. जी मूल्ये त्याने उरीपोटी जतन केली त्यांच्यासाठी लढण्याचे एक हत्यार म्हणजे कविता, असे त्याने मानले. त्याच्या काव्यातील उदात्त व विशाल अशा दृष्टिकोणामुळे त्याला चीनमध्ये ऋषितुल्य प्रतिष्ठा लाभली.

संदर्भ : Hung, William, Tu Fu : China’s Greatest Poet, London, 1952.

जुंग, थान (इं.) शिरोडकर, द. स. (म.)