गाब्रिएला मीस्त्रालमीस्त्राल, गाब्रिएला : (७ एप्रिल १८८९–१० जानेवारी १९५७). चिलिअन कवयित्री. मूळ नाव लुसीला गोदॉय आल्कायागा. काव्यलेखन स्पॅनिश भाषेत. उत्तर चिलीतील व्हिकुनां ह्या लहानशा गावी तिचा जन्म झाला. तिचे आईवडील अध्यापनक्षेत्रातले. ती लहान असतानाच तिच्या वडिलांनी तिच्या आईचा त्याग केला. तिच्या आईने आणि सावत्र बहिणीने तिला शिक्षण दिले. ती स्वतःही पुढे शिक्षिका बनली आणि नंतर प्राध्यापिकाही झाली. शिक्षणतज्ञ म्हणूनही ती मान्यता पावली. राजनैतिक सेवेच्या निमित्ताने माद्रिद, नीस, जिनोआ इ. ठिकाणी तिचे वास्तव्य झाले. युएन्‌ओ आणि लीग ऑफ नेशन्स येथेही सामाजिक-सांस्कृतिक समित्यांवर कामे करून तेथे तिने आपला ठसा उमटवला. प्रियकराच्या आत्महत्येमुळे तिच्या आयुष्यातील उत्कट प्रेमानुभव संपुष्टात आल्यामुळे ती अविवाहित राहिली होती.

‘सॉनेतोस दे ला मूएर्ते’ (इं. शी. सॉनेट्‌स ऑफ डेथ) ह्या नावाने तिने लिहिलेल्या तीन सुनीतांमुळे कवयित्री म्हणून तिला प्रथम कीर्ती मिळाली (१९१४). गाब्रिएला मीस्त्राल हे टोपण नाव तिने त्याच वेळी घेतले. गाब्रिएले दान्नून्त्स्यो (विख्यात इटालियन कवी) व फ्रेदेरिक मीस्त्राल (श्रेष्ठ प्रॉव्हांसाल कवी) ह्या आपल्या दोन आवडत्या कवींच्या नावांच्या आधारे तिने हे टोपण नाव तयार केले होते.

देसोलासियॉन (१९२२, इं. शी. डिझोलेशन), तेर्नुरा (१९२४, इं. शी. टेंडरनेस), ताला (१९३८, इं. शी. फेलिंग ऑफ ट्रीझ) आणि लागार (१९५४, इं. शी. द वाइन प्रेस हे तिचे काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत.

संपलेल्या प्रेमानुभवांचे पडसाद तिच्या ‘दोलॉर’ सारख्या कवितेतून प्रकर्षाने प्रत्ययास येतात. तसेच अतृप्त राहिलेल्या मातृत्वाच्या कोमल भावनांनाही तिने आपल्या कवितांतून वाट करून दिली आहे. मृत्यूची सततची जाणीव, मानवी सुखदुःखांशी समरसता आणि धार्मिक भावना ह्यांचेही दर्शन तिच्या कवितांतून घडते. लँगस्टन ह्यूज आणि डोरीस डाना ह्यांनी तिच्या वेचक कवितांचे इंग्रजी अनुवाद केले आहेत (अनुक्रमे १९५७ १९७१).

१९४५ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन तिच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारी ती पहिली लॅटिन-अमेरिकन महिला होय. हेंपस्टेड, न्यूयॉर्क येथे तिचे निधन झाले.

संदर्भ : 1. Anderson, H. M. Trans Gabriela Mistral The Poet and Her Work, New York, 1964.

2. Pan American Union, Gabriela Mistral, 1889-1957, Washington, 1958.

3. Preston, M. G. A. A Study of Significant Variants in the Poetry of Gabriela Mistral, Washington, 1964.

टोणगावकर, विजया