खूर आणि नखर: कित्येक सस्तन प्राण्यांत पायांवरील पूर्णपणे घेरणाऱ्या बाह्यत्वचेच्या केराटीनमय [एका प्रकारच्या प्रथिनाने युक्त असलेल्या, → केराटिने] विस्ताराला खूर म्हणतात आणि पुष्कळ पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या हाताच्या अथवा पायाच्या बोटांच्या टोकावरील निमुळत्या होत जाणाऱ्‍या तीक्ष्ण टोक असलेल्या वाकड्या, जाड नखाला  नखर म्हणतात. नखर त्वचेच्या बाहेरील संरक्षक थरापासून तयार झालेले असतात. नखरांमध्ये उपयोगाप्रमाणे बदल होऊन खूर होतात. खूर व नखर हे दोन्ही दाट, तंतुमय शृंगी पदार्थाचे म्हणजे केराटिनाचे बनलेले असतात. केराटीन हे एक प्रकारचे अविद्राव्य ( न विरघळणारे) प्रथिन आहे. त्याची झीज व रासायनिक अपघटन (रेणूचे तुकडे होऊन साधे रेणू किंवा अणू तयार होणे) होत नाही.

आ. १. सरीसृपाचा नखर (बोटाच्या अग्राचा अनुदैर्घ्य छेद) : (१) अंग्विस, (२) कॉर्नियम, (३) मालपीगी स्तर, (४) सब-अंग्विस, (५) नखर.

सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी व सस्तन प्राण्यांत नखर असतात. सरीसृपांच्या नखरामध्ये (आ. १) एक पृष्ठीय व दुसरी अधर (खालची) अशा दोन शृंगी पट्टिका (तकटे) असतात. या पट्टिका नखराच्या अग्र टोकाशी येऊन मिळतात. पृष्ठीय पट्टिका ही थोडी उत्तल (बहिर्गोल) असून अधर पट्टिका सपाट असते. पृष्ठीय व अधर पट्टिकांना अनुक्रमे अंग्विस व सब-अंग्विस म्हणतात. या दोन्ही पट्टिका अधिचर्माच्या (त्वचेच्या बाह्य संरक्षक थराच्या) मालपीगी स्तरापासून (ज्या पेशींतील जीवद्रव्याच्या शृंगी पदार्थात बदल झालेला नाही अशा पेशींच्या बनलेल्या त्वचेच्या खोल थरापासून, मालपीगी या शास्त्रज्ञांच्या नावावरून) निर्माण होतात.

बहुतेक सर्व पक्ष्यांमध्ये पादांगुलींना नखर असतात. नखरांच्या कार्याप्रमाणेच त्यांचा आकार बदलतो. कोंबडीच्या मजबूत व बोथट नखरांचा उपयोग जमीन उकरण्याकडे होतो. ससाणा व घुबड यांच्या अंकुशासारख्या नखरांचा उपयोग भक्ष्यावर झडप घालून त्याला पकडण्यासाठी होतो. सुतार पक्ष्याचे नखर नाजूक असून त्याचा उपयोग खडबडीत पृष्ठभागावर चालण्यासाठी होतो.

काही प्राण्यात नखरांचे निर्मोचन (पहिले गळून त्याजागी नवे येण्याची क्रिया) आढळते.

आ. २. मांसाहारी सस्तन प्राण्याचा नखर : (अ) बोटाच्या अग्राचा अनुदैर्घ्य छेद, (आ) नखराचे अधर दृश्य : (१) अंग्विस, (२) सब-अंग्विस, (३) गादी.सस्तन प्राण्यांत नखराचे तीन प्रमुख भाग असतात. अंग्विस, सब-अंग्विस व पादांगुलीच्या टोकाला अधर भागात असलेला गादीसारखा (पॅड) भाग. या गादीवरील कॉर्नियल स्तर (शृंगस्तर) बराच जाड होतो. अंग्विस दोन्ही बाजूंनी दबला जाऊन वाकडा होतो. त्यामुळे सब-अंग्विस फार लहान होतो (आ.२). फेलिडो कुलातील प्राण्यांचे नखर प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणारे) व अणकुचीदार असतात. त्यांचा उपयोग शिकार करण्यासाठी व झाडावर चढण्यासाठी होतो  इतर वेळी नखर प्रत्याकृष्ट (आत ओढून घेतलेले) असतात. कुत्र्याचे नखर मांजरांच्या नखरांइतके अणकुचीदार नसतात आणि ते कायम बाहेर असतात. वटवाघूळ व स्लॉथ यांमध्ये नखर लांब आणि अंकुशासारखे असतात. या नखरांच्या साहाय्याने त्यांना झाडावर उलटे लटकता येते, पण जमिनीवर मुळीच चालता येत नाही.

नखरांची दोन वैशिष्ट्यपूर्ण रूपांतरे आढळून येतात. त्यांस खूर व नखे असे म्हणतात. खुरात अंग्विस अतिशय जाड व उत्तल होतो. त्याच्या बाजू अधर भागावर येऊन मिळतात व तो जमिनीला टेकतो. अंग्विसाच्या बाजूच्या कडांचा भाग सब-अंग्विस अधर बाजूने भरून काढतो. गादीसारख्या मऊ भागाचा टणक भाग होतो. एखाद्या जोड्याला रबराचा तळ बसवून घ्यावा असा या भागाचा उपयोग होतो. खुराच्या खाली हाडे, कंडरा (स्नायू एखाद्या कंकालाच्या म्हणजे हाडांच्या सापळ्याच्या भागाला अथवा दुसऱ्या स्नायूला जोडणारा तंतुमय पेशी समुहाचा रज्जू वा पट्ट), बंधनी (दोन अथवा अधिक हालणारी हाडे जोडणारा पेशीसमुहाचा मजबूत तंतुमय पट्ट), गादीसारखे लवचिक ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह), तंत्रिका (मज्जातंतू) व रक्तवाहिन्यांचे  दाट जाळे असते. खुरात तंत्रिका व रक्तवाहिन्या नसतात. उदा. घोड्याचा खूर (आ. ३).

आ. ३. घोड्याचा खूर : (अ) अनुदैर्घ्य छेद, (आ) अधर दृश्य : (१) अंग्विस, (२) सब-अंग्विस, (३) गादी.

खूर असलेल्या प्राण्यांचा समावेश ⇨ अंग्युलेटा  गणात केला जातो. अंग्युलेटाचे वर्गीकरण दोन गटांत केले जाते. (१) विषम पादांगुलीय (ज्यांच्या बोटांची अथवा खुरांची संख्या विषम असते असे प्राणी, पेरिसोडॅक्टिला), उदा., घोडा, टॅपीर, गेंडा व (२) सम पादांगुलीय (ज्यांच्या बोटांची किंवा खुरांची संख्या सम असते असे प्राणी, आर्टिओडॅक्टिला), उदा., डुक्कर, हिप्पोपोटॅमस, उंट, जिराफ, हरीण, गाय, म्हैस, यांमध्ये खुरांत भेग पडलेली असते. ज्या प्राण्यांना भक्ष्यासाठी कुरणात  पळावे लागते. त्यांच्या खुराचा जास्त विकास झालेला आढळतो.

जोशी, मीनाक्षी