पोष ग्रंथि : (पिट्यूटरी ग्लॅंड). पोष ग्रंथी ही सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या शरीरात आढळणारी एक महत्त्वाची ⇨ अंतःस्त्रावी ग्रंथी असून तिच्यापासून स्रवणाऱ्या हॉर्मोनांच्या [उत्तेजक स्रावांच्या→हॉर्मोने] द्वारे ती इतर सर्व अंतःस्रावी ग्रंथींवर व अनेक अत्यावश्यक चयापचय प्रक्रियांवर (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींवर) नियंत्रण ठेवते म्हणून तिला ‘अंतःस्रावी ग्रंथिवृंदाचा नेता’ म्हटले जाते. मानवात ही ग्रंथी पिंगट तांबूस रंगाची, अंडाकृती, सु. ०·५ ग्रॅ. वजनाची असून तिची लांबी १ सेंमी.पेक्षा कमीच असते. तिची रुंदी सु. १·५ सेंमी. व जाडी ०·६ सेंमी. असते. मेंदूच्या मूलप्रदेशात कवटीच्या जतुकास्थीच्या (तळाशी असणाऱ्या हाडाच्या) खोगिरासारख्या आकाराच्या खोलगट भागात ती असून मेंदूच्या अधोथॅलॅमस [→ तंत्रिका तंत्र] या भागास एका देठाने जोडलेली असते. अग्रखंड व पश्चखंड अशा दोन स्पष्ट खंडांत या ग्रंथीची विभागणी झालेली असते. या दोन्हींची रचना व उत्पत्ती भिन्न असतात. दोहोंच्या मध्ये असलेल्या भागाला मध्यखंड ही संज्ञा असून तो मानवात इतर प्राण्यांच्या तुलनेने अत्यंत अल्प प्रमाणात असतो.

अग्रखंडाची उत्पत्ती भ्रूणाच्या घशाच्या अंतस्त्वचेपासून ऊर्ध्व दिशेने निघालेल्या अंतर्वलनापासून (ज्याला एम्. एच्. राटके या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून ‘राटके पिशवी’ असे म्हणतात) होते, तर पश्चखंड अधोथॅलॅमसापासून फुटलेल्या कळीसारख्या भागापासून तयार होतो. या उत्पत्तीवरून अग्रखंडात स्राव ग्रंथीप्रमाणे असलेल्या रचनेचे तसेच पश्चखंडात असलेल्या तंत्रिका ऊतकांचे (समान रचना व कार्य असलेल्या मज्‍जापेशींच्या समूहांचे) स्पष्टीकरण मिळते.

अग्रखंड पुढील सात महत्त्वाची हॉर्मोने स्रवतो व शरीराच्या चयापचयात महत्त्वाचा भाग घेतो : (१) वृद्धी हॉर्मोन : हे शरीराची वाढ, चयापचय व प्रथिननिर्मिती यांत भाग घेते. (२) अधिवृक्क बाह्यक उद्दीपक हॉर्मोन : (ॲड्रीनो-कॉर्टिकोट्रोपिक हॉर्मोन ए सी टी एच). अधिवृक्क ग्रंथीच्या बाह्यक भागात निर्माण होणाऱ्या स्टेरॉइड हॉर्मोनांचे नियंत्रण करते [→अधिवृक्क ग्रंथि]. (३) अवटू ग्रंथी उद्दीपक हॉर्मोन : (थायरोट्रोपीन). अवटू ग्रंथीतील ‘थायरॉक्सिन’ या क्रियाशील द्रव्याचे नियंत्रण करते [→अवटु ग्रंथि]. (४) दुग्धस्रावक हॉर्मोन : (प्रोलॅक्टिन). हे हॉर्मोन स्तन ग्रंथीची वाढ व दुग्धस्राव यांचे  नियंत्रण करते. (५) पीतपिंडकर (ल्युटिनायझिंग) हॉर्मोन. (६) पुटकोद्दीपक (फॉलिकल- स्टिम्युलेटिंग) हॉर्मोन. (७) पीतपिंडपोषक (ल्युटिओट्रोपिक) हॉर्मोन. शेवटची तीन हॉर्मोने पुं- व स्त्री-जनन ग्रंथींतील हॉर्मोनांच्या उत्पत्तीचे उद्दीपन [→पौरुषजन प्रगर्भरक्षी स्त्रीमदजन]व जनन प्रक्रिया यांच्याशी संबंधित आहेत.

आ. १. पोष ग्रंथी : (१) अग्रखंड, (२) पश्चखंड, (३) अधोथॅलॅमसाला ग्रंथी जोडणारा देठ, (४) अधोथॅलॅमस.

पश्चखंड दोन हॉर्मोने स्रवतो. मूत्रोत्सर्जनास प्रतिबंध करणारे हॉर्मोन शरीरातील पाण्याच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवते व शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राखते. तसेच रोहिणिकांच्या आकुंचनाने रक्तदाब वाढविते. याला अँटिडाययूरेटिक हॉर्मोन किंवा व्हॅसोप्रेसीन असे म्हणतात. गर्भाशय-संकोचक (ऑक्सिटोसीन) हॉर्मोन हे स्तनातील दूध चोषण क्रियेच्या वेळी बोंडीकडे ढकलण्यास मदत करते व प्रसूतीसमयी गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचनास साहाय्य करते.

इतिहास : अँड्रिअस व्हिसेलिअस (१५१४—६४) या बेल्जियम शारीरविज्ञांनी या ग्रंथीला ‘पिट्यूटरी’ हे नाव दिले. ही ग्रंथी नाकातील श्लेष्मा स्रवते अशी त्यांची समजूत होती. फ्रॅंसिसकस सिल्व्हिअस (१६१४—७२) व रेमॉं व्हयसांस (१६४१—१७१६) या फ्रेंच शारीरविज्ञांची कल्पना ही ग्रंथी मस्तिष्क-मेरुद्रव (मेंदू व मेरुरज्‍जू यांना यांत्रिक आधार म्हणून उपयोगी पडणारा द्रव) स्रवते अशी होती. १६७२ मध्ये रिचर्ड लोअर या इंग्लिश शारीरविज्ञानी ही ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी आहे, हे प्रथम प्रतिपादन केले. प्येअर मारी या फ्रेंच वैद्यांनी १८८६ मध्ये पोष ग्रंथीचे अर्बुद (नवीन कोशिकांची अत्यधिक वाढ झाल्याने निर्माण होणारी गाठ) आणि महाकायता (शरीराची प्रमाणबाह्य वाढ होणे) यांचा अन्वय लावला. तेव्हापासून या ग्रंथीच्या आधुनिक संशोधनास सुरुवात झाली. १८९४ मध्ये जी. ऑलिव्हर व ई. ए. शेफर या इंग्लिश शास्त्रज्ञांनी पोष ग्रंथीचा अर्क टोचल्यास रक्तदाब वाढतो, हे दाखवून दिले. १८९६ मध्ये डब्ल्यू. एच्. व्हॉवेल या अमेरिकन शरीरक्रियाविज्ञांनी रक्तदाब आधिक्यास कारण असलेला पदार्थ फक्त पश्चखंडाच्या अर्कात आहे असे दाखविले. १९०६ मध्ये हेन्‍री डेल यांनी या अर्काने गर्भाशयाचे आकुंचन होते हेही दाखविले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकन तंत्रिका शस्त्रक्रियाविशारद एच्. कुशिंग यांनी कुत्र्यातील पोष ग्रंथी व माणसातील पोष ग्रंथीची अर्बुदे शस्त्रक्रियेने काढली. १९२९ मध्ये अमेरिकन शारीरविज्ञ एच्. एस्. एव्हान्झ यांनी पोष ग्रंथीच्या अग्रखंडातील शरीराच्या वाढीस उत्तेजन देणाच्या हॉर्मोनांची कल्पना मांडली व पुढे वीस वर्षांनी वृद्धी हॉर्मोन शुद्ध स्वरूपात वेगळे करून दाखविले. नंतरच्या काळात पोष ग्रंथीची विविध हॉर्मोने वेगळी करणे आणि ओळखणे यांत यश मिळविण्यात आले. तसेच पोष ग्रंथी व इतर अंतःस्रावी ग्रंथी यांच्यातील अन्योन्यभाव उलगडून दाखविला गेला.

अधोथॅलॅमसाचे पोष ग्रंथीवरील नियंत्रण : पोष ग्रंथी सर्वस्वी अधोथॅलॅमसाच्या नियंत्रणाखाली स्वतःचे कार्य करीत असते. तिच्या नेहमीच्या स्थानातून काढून पोष ग्रंथीचे अन्यत्र प्रतिरोपण केल्यास तिची सर्व प्रकारची हॉर्मोने स्रवण्याची (दुग्धस्रावक सोडून) गती कमी होते. काही बाबतीत ती शून्यावर येते. पश्चखंडाचे नियंत्रण अधोथॅलॅमसामधून निघणाऱ्या व पश्चखंडात पोहोचणाऱ्या तंत्रिका तंतूकडून होते, तर अग्रखंडाचे नियंत्रण अधोथॅलॅमसाच्या हॉर्मोने मुक्त करणाऱ्या व त्यास प्रतिबंध करणाऱ्या द्रव्यांकडून होते. ही द्रव्ये अधोथॅलॅमस स्रवतो व अधोथॅलॅमस-पोष ग्रंथी यांच्या दरम्यानच्या सूक्ष्मवाहिन्यांच्या जाळ्यातून वाहत ती अग्रखंडात येतात. अग्रखंडात ही मुक्तिद्रव्ये किंवा प्रतिबंधक द्रव्ये हॉर्मोने स्रवणाऱ्या कोशिकांवर परिणाम घडवून स्रवणक्रियेचे नियंत्रण करतात.


तंत्रिका तंत्राच्या (मज्‍जासंस्थेच्या) जवळजवळ सर्व भागांतून अधोथॅलॅमसाकडे संदेश येत असतात. शारीरिक वेदना, आनंद वा दु:खाचा अनुभव यांचे संदेश अधोथॅलॅमसाकडे त्वरित येतात. इतर संवेदनांप्रमाणेच रक्तातील पोषक द्रव्ये, लवणे, पाणी, इतर अतःस्रावांचे प्रमाण इत्यादींनी अधोथॅलॅमसाचा विशिष्ट भाग चेतविला किंवा दबला जातो. अशा प्रकारे अधोथॅलॅमस शरीरस्वास्थ्यासंबंधी माहिती गोळा करणारे एक केंद्र असते. या सर्व माहितीचा उपयोग पोष ग्रंथीच्या हॉर्मोनांच्या नियंत्रणासाठी केला जातो.

अग्रखंड : पोष ग्रंथीचा अग्रखंड विविध प्रकारच्या कोशिकांचा बनलेला असतो. स्रवल्या जाणाऱ्या प्रत्येक हॉर्मोनासाठी वेगळ्या प्रकारच्या कोशिका असतात. विशिष्ठ रंजनक्रियेद्वारा या कोशिका वेगवेगळ्या ओळखता येतात. यास फक्त एक अपवाद आहे आणि तो म्हणजे एकाच प्रकारच्या कोशिका पुटकोद्दीपक हॉर्मोन व पीतपिंडकर हॉर्मोन स्रवतात. नेहमीच्या ऊतक-रंजन क्रियेद्वारे या कोशिकांचे पुढील प्रकार आढळतात : (१) अम्लाकर्षी कोशिका : या अम्लधर्मी रंजकाने गडद लाल रंगतात. (२) क्षारकाकर्षी कोशिका : या क्षारकधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण तयार होण्याचा गुणधर्म असणारा) म्हणजेच निळा रंजक धारण करतात. त्यांना नीलाकर्षीही म्हणता येईल. (३) रंजक विरागी कोशिका : या वरील दोहोंपैकी कोणताच रंजक धारण करीत नाहीत. [→रंजक, जीवविज्ञानीय].

अम्लाकर्षी कोशिका वृद्धी हॉर्मोन व दुग्धस्रावक हॉर्मोन स्रवतात. क्षारकाकर्षी किंवा नीलाकर्षी कोशिका पुटकोद्दीपक, पीतपिंडकर व अवटू ग्रंथी उद्दीपक हॉर्मोने स्रवतात. रंजक विरागी कोशिका अधिवृक्क वाह्यक उद्दीपक हॉर्मोन स्रवतात.

अधोथॅलॅमस व पोष ग्रंथीतील प्रवेशवाहिनी जाल : अग्रखंडास रक्ताचा मुबलक पुरवठा होतो. स्रावक कोशिका-कोशिकांतून सूक्ष्म केशवाहिन्या व केशविवरिका (सूक्ष्म पोकळ्या) असतात. यांत येणारे रक्त अधोथॅलॅमसामधील केशवाहिन्यांतून वाहत आलेले असते. अधोथॅलॅमसाच्या ऊतकातून ते प्रवेशवाहिन्यांद्वारे पोष ग्रंथीतील रक्तविवरिकांत येऊन दाखल होते. अथोथॅलॅमसाच्या मध्य फुगवट्यात त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या लहान रोहिणीस शाखा फुटतात. या रोहिणीद्वारे आलेले रक्त प्रवेशवाहिन्या एकत्र करतात. प्रवेशवाहिन्या पोष ग्रंथीच्या देठावाटे अग्रखंडात प्रवेश करतात आणि नंतर केशवाहिन्यांत व विवरिकांत विलीन होऊन अधोथॅलॅमसामधून आणलेले रक्त पुरवतात.

अथोथॅलॅमसामधील मुक्तिकारक व प्रतिरोधक हॉर्मोने : अधोथॅलॅमसामधील तंत्रिका कोशिकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या विशिष्ट हॉर्मोने निर्माण करतात. ही हॉर्मोने पोष ग्रंथीच्या अग्रखंडातील हॉर्मोने स्रवण्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात. अग्रखंडातील हॉर्मोने मुक्त करणे किंवा मुक्त होण्यास प्रतिबंध करणे ही कार्ये ही हॉर्मोने करतात. या तंत्रिका कोशिका अधोथॅलॅमसाच्या निरनिराळ्या भागांत विखुरलेल्या असतात. त्यांचे धागे मध्य फुगवट्यात येऊन पोहोचतात. मध्य फुगवट्यातील भागच पुढे पोष ग्रंथीच्या देठात शिरतो. इतर सर्व ठिकाणच्या तंत्रिका तंतूंच्या अग्रांचे कार्य एक तंत्रिका कोशिकेचा संदेश दुसऱ्या कोशिकेस प्रेषित करणे हे असते परंतु येथे मात्र तंत्रिका तंतूंची अग्रे आजूबाजूच्या ऊतकद्रवात मुक्तिकारक किंवा उत्तेजक अथवा प्रतिरोधक हॉर्मोन स्रवतात. ही हॉर्मोने ताबडतोब केशवाहिन्यांत शिरतात व अग्रखंडातील केशविवरांत एकदम येऊन दाखल होतात.

अग्रखंडाच्या प्रत्येक हॉर्मोनागणिक अधोथॅलॅमसाचे एक मुक्त करणारे हॉर्मोन असते. काही हॉर्मोनांसाठी संबंधित प्रतिरोधक हॉर्मोन असते. प्रतिरोधक हॉर्मोन संबंधित हॉर्मोन स्रवण्यास प्रतिबंध करते. बहुसंख्य हॉर्मोनांच्या बाबत मुक्तिकारक हॉर्मोन महत्त्वाचे असते, तर दुग्धस्रावक हॉर्मोनाच्या बाबत प्रतिरोधक हॉर्मोनच बहुतांशी नियंत्रण करते. यांपैकी अधोथॅलॅमसाची महत्त्वाची हॉर्मोने पुढीलप्रमाणे आहेत : (१) अवटू ग्रंथी उद्दीपक हॉर्मोन मुक्तिकारक (टी आर एफ), (२) अधिवृक्क बाह्यक उद्दीपक हॉर्मोन मुक्तिकारक (सी आर एफ), (३) वृद्धी हॉर्मोन मुक्तिकारक (जी आर एफ), (४) पुटकोद्दीपक हॉर्मोन मुक्तिकारक (एल आर एफ), (५) पीतपिंडकर हॉर्मोन मुक्तिकारक (एफ आर एफ), (६) दुग्धस्रावक हॉर्मोन प्रतिरोधक. या महत्त्वाच्या हॉर्मोनांखेरीज त्वचेमध्ये आढळणाऱ्या कृष्णरंजक (मेलॅनीन) या काळ्या रंगद्रव्याच्या निर्मितीस व शरीरात वितरण करण्यास कृष्णरंजी कोशिकांना उद्दीपित करण्यासाठी कारणीभूत होणारे कृष्णरंजी कोशिका उद्दीपक हॉर्मोन (मेलॅनोसाइट-स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) पोष ग्रंथीच्या अग्रखंडातून (काहींच्या मते मध्य खंडातून) स्रवण्यास चेतना देणारे हॉर्मोन आणि इतर काही प्रतिरोधक हॉर्मोने अथोथॅलॅमस स्रवते.


 अग्रखंडाच्या हॉर्मोनांची कार्ये : वृद्धी हॉर्मोन वगळता इतर सर्व हॉर्मोने विशिष्ट लक्ष्य ग्रंथींवर कार्य करतात. अवटू ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथींचा बाह्यक भाग, अंडकोश (स्त्री-जनन ग्रंथी), वृषण (पुं-जनन ग्रंथी) व स्तन ग्रंथी यांवर अग्रखंडाची संबंधित हॉर्मोने कार्यरत होऊन त्यांना उद्दीपित करतात व त्यांच्या स्रावांद्वारे इच्छित परिणाम घडवून आणतात. लक्ष्य ग्रंथीच्या स्रावाची पातळी रक्तात गरजेपेक्षा अधिक वाढली, तर ती अग्रखंडास अधिक उद्दीपक हॉर्मोन स्रवण्यास प्रतिबंध करते. लक्ष्य ग्रंथीच्या स्रावाची पातळी कमी झाली, तर त्यामुळे अग्रखंडास उद्दीपक हॉर्मोन अधिक प्रमाणात स्रवण्याचा संदेश अधोथॅलॅमसाकडून मिळतो. अधिक प्रमाणात उद्दीपक हॉर्मोन स्रवले जाऊन लक्ष्य ग्रंथी अधिक चेतवली जाते [→अधिवृक्क ग्रंथि अवटु ग्रंथि अंडकोश वृषण स्तन दुग्धस्रवण व स्तनपान]. वृद्धी हॉर्मोन मात्र इतर कोणत्याही लक्ष्य ग्रंथीमार्फत कार्य करीत नसून ते प्रत्यक्षतः सर्व शरीरभर सर्वच ऊतकांवर परिणाम घडवून आणते.

वृद्धी हॉर्मोन : याला शरीरचेतना हॉर्मोन (सोमॅटोट्रोफिक हॉर्मोन किंवा सोमॅट्रोपीन) असेही नाव आहे. हे हॉर्मोन एक लहान आकारमानाचे प्रथिन असून त्याचा रेणुभार २१,५०० आहे. एका शृंखलेत ओवलेल्या १८८ ॲमिनो अग्लांनी [→ॲमिनो अम्ले] त्यांचा रेणू बनलेला असतो. वृद्धिक्षम अशा शरीरातील सर्व ऊतकांची वृद्धी हे हॉर्मोन घडवून आणू शकते. ते कोशिकेचे आकारमान व त्यांची संख्या या दोन्हींत वाढ घडवून आणू शकते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांचे आकारमान वाढते. अस्थींच्या बाबतीत अग्रप्रवर्ध (वाढ होत असलेल्या लांब हाडाच्या टोकाशी असलेला व ज्यामुळे हाडाची वाढ होते असा भाग) व मध्यप्रवर्थ (अस्थीचे शरीर किंवा दंड) यांचा संयोग झाल्यानंतर (हे तारुण्यावस्थेच्या सुरुवातीस घडून येते) अस्थींची लांबी वाढू शकत नाही. तत्पूर्वी वृद्धी हॉर्मोनाचे प्रमाण शरीरात वाढल्यास अस्थी लांब-उंच होतात.

आ. २. पोष ग्रंथीच्या अग्रखंडाच्या हॉर्मोनांची कार्य

 शरीरावर होणारे काही परिणाम : शरीरातील सर्व प्रकारच्या कोशिकांतील प्रथिननिर्मिती या हॉर्मोनामुळे वाढते. कार्बोहायड्रेटांचा वापर सर्वत्र कमी प्रमाणात होतो मेद (चरबी) अधिक प्रमाणात हालविण्यात येते व ऊर्जेसाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. थोडक्यात म्हणजे त्यामुळे प्रथिननिर्मिती वाढते, कार्बोहायड्रेटांचा संचय होतो व मेदसाठा वापरला जातो. प्रथिननिर्मितीमुळेच मुख्यतः वृद्धीचा वेग वाढतो. वृद्धीचा हॉर्मोनाचा अस्थी व उपास्थी (कूर्चा) यांच्यावर होणारा परिणाम प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्षपणे होतो. यकृत व बहुधा वृक्क (मूत्रपिंड) यांच्यात या हॉर्मोनामुळे सोमॅटोमेडीन नावाचा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ अस्थी व उपास्थी यांवर प्रत्यक्ष कार्य करून वृद्धी वाढवितो. सोमॅटोमेडीन हे उपास्थी प्रथिन व संश्लेषीजन (त्वचा, उपास्थी व अस्थी यांमधील मुख्य आधारभूत प्रथिन कोलॅजेन) यांच्या संचयासाठी आवश्यक असते. उपास्थी व अस्थी यांच्या वाढीकरिता या दोन्ही प्रथिनांची गरज असते. अस्थींची अग्रप्रवर्धे व मध्यप्रवर्धे यांच्या संयोगानंतर वृद्धी हॉर्मोनाच्या प्रभावाने त्यांची लांबी वाढू शकत नाही परंतु जाडी वाढते व अस्थी जाड होतात. म्हणून यौवनावस्थेनंतर वृद्धी हॉर्मोनाचे प्रमाण वाढल्यास उंची न वाढता हाडे फक्त जाड होतात.

वृद्धी हॉर्मोन प्रथिनांची निर्मिती आणि संचय नक्की कशा प्रकारे वाढवितो हे ज्ञात नाही परंतु त्याच्या प्रभावाने कोशिकावरणातून ॲमिनो अम्ले सुलभतेने आत शिरू शकतात म्हणून कोशिकांतर्गत भागात ॲमिनो अम्लांचे प्रमाण वाढते आणि परिणामी प्रथिननिर्मिती वाढत असावी. याशिवाय रिबोसोमावर [→ कोशिका]प्रत्यक्ष परिणाम घडवून आणून रिबोन्यूक्लिइक अम्लाची [→न्यूक्लिइक अम्ले]निर्मिती वाढवूनही ते प्रथिननिर्मितीस हातभार लावीत असते. खेरीज ऊर्जानिर्मितीसाठी प्रथिने व ॲमिनो अम्लांचा वापर थांबतो, तसेच त्यांचे अपघटनही (रेणूचे तुकडे होण्याची क्रियाही) कमी प्रमाणात होते.

वृद्धी हॉर्मोनांमध्ये कधीकधी मेदांचा ऊर्जेसाठी होणारा वापर खूपच वाढल्यामुळे रक्तात कीटोनांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे ⇨ कीटोनांचे आधिक्य (कीटोसीस) हा विकार उद्‌भवतो.


कार्बोहायड्रेटाच्या चयापचयावरील परिणाम : ग्लुकोज या शर्करेच्या चयापचयावर वृद्धी हॉर्मोनाचे तीन प्रमुख परिणाम होतात. ऊर्जेसाठी ग्लुकोजाचा वापर कमी होतो. ग्लायकोजेनाचा कोशिकेत मोठ्या प्रमाणात संचय होतो. कोशिकेकडून रक्तातील ग्लुकोज घेण्याचे प्रमाण कमी होते. मेदाचा वापर वाढल्यामुळे ग्लुकोजाचा वापर कमी होतो असे असले, तरी ग्लुकोजाचा वापर नक्की कमी कसा होतो याचा खुलासा अद्याप झालेला नाही. ग्लुकोज वापरले जात नसल्यामुळे ते कोशिकेत शिरते, त्याचे त्वरित ग्लायकोजेनात रूपांतर केले जाते त्यामुळे ग्लायकोजेनाचा संचय वाढतो. ग्लायकोजेनाने कोशिका संपृक्त झाली (जास्तीत जास्त प्रमाण झाले) म्हणजे मगच कोशिकेकडून ग्लुकोज घेणे हळूहळू कमी होते (सुरुवातीस ग्लुकोज घेण्याचे प्रमाण वाढते पण नंतर ते कमी होते). कोशिकेद्वारे ग्लुकोज घेणे कमी झाले म्हणजे रक्तातील ग्लुकोजाची (म्हणजेच साखरेची) पातळी वाढते. ही वाढ नेहेमीच्या पातळीपेक्षा ५०—१००% अधिक असू शकते. वृद्धी हॉर्मोनाच्या परिणामकारकतेसाठी शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलीन व कार्बोहायड्रेटे यांचा पुरवठा असावा लागतो. त्यांच्या अभावी पुरेशी वाढ होऊ शकत नाही. वृद्धी हॉर्मोनामुळे रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण वाढते व त्यामुळे ⇨ अग्निपिंडातील बीटा कोशिका उद्दीपित होऊन अधिक प्रमाणात इन्शुलीन स्रवले जाते. याबरोबरच वृद्धी हॉर्मोनाच्या प्रत्यक्ष उद्दीपनामुळेही बीटा कोशिका उद्दीपित होतात. दोन्हींचा परिणाम म्हणून बीटा कोशिका अतिउद्दीपित होऊन त्या मागोमाग अकार्यक्षम होतात व ⇨मधुमेह निर्माण होतो. म्हणून या परिणामास ‘मधुमेहकारक परिणाम’ म्हटले जाते. याशिवाय अधिवृक्क बाह्यक उद्दीपक, अवटू ग्रंथी उद्दीपक व दुग्धस्रावक ही अग्रखंडाची इतर तीन हॉर्मोनेही मधुमेह निर्मितीस हातभार लावू शकतात. त्यातल्या त्यात या दृष्टीने अधिवृक्क बाह्यक उद्दीपक हॉर्मोन महत्त्वाचे आहे. त्यामुळे हायड्रोकॉर्टिसोन [कॉर्टिसोल→ अधिवृक्क ग्रंथि]अधिकतेने स्रवले जाते. हायड्रोकॉर्टिसोन हे संयुग रक्तातील साखर वाढविणारे आहे. पोष ग्रंथीमुळे हा जो मधुमेह निर्माण होतो त्यास ‘पोप ग्रंथिजन्य मधुमेह’ म्हणतात. यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या बाह्य इन्शुलीन रक्तशर्करा खाली आणण्यास असमर्थ ठरते. [→चयापचय].

नियंत्रण : वृद्धी हॉर्मोन फक्त वाढीच्या कालखंडात स्रवले जाते, तारुण्य प्राप्त झाल्यावर ते रक्तात सापडत नाही, असा पूर्वी समज होता परंतु हे चुकीचे आहे असे नंतर सिद्ध झाले. लहानपणी ज्या प्रमाणात ते स्रवले जाते जवळजवळ तितक्याच प्रमाणात ते तारुण्यावस्था प्राप्त झाल्यानंतरच्या काळातही स्रवले जाते. व्यक्तीचे पोषण व शारीरिक ताण यांच्या स्थितीप्रमाणे त्याच्या स्रवण्यात दर मिनिटात किंवा क्षणोक्षणी सूक्ष्म बदल होतात. उपासमार, भूक, शर्करान्यूनत्व, व्यायाम, उद्दीपन, दुखापत इत्यादींनी त्याच्या प्रमाणात वाढ होते. गरज संपल्यावर त्याच्या स्रवणाचे प्रमाण कमी होते. प्रौढ निरोगी व्यक्तीत त्याचे प्रमाण दर मिलि. रक्तात ३ मिलिमायक्रोग्रॅम (१ मिलिमायक्रोग्रॅम = १०-९ ग्रॅम) एवढे असते, तर लहान मुलात ५ मिलिमायक्रोग्रॅम एवढे असते. शरीरातील प्रथिनांचा किंवा कार्बोहायड्रेटांचा संचय कमी झाल्यास यात ५० मिलिमायक्रोग्रॅम (दर मिलि. रक्तात) वाढ होऊ शकते. तीव्र स्थितीतील शर्करान्यूनत्वासारख्या विकृतीने हे हॉर्मोन स्रवण्यास जोरदार उत्तेजन मिळते, तर दीर्घकालीन विकारांपैकी प्रथिनन्यूनत्वासारख्या गोष्टीने वृद्धी हॉर्मोन स्रवण्यास चेतना मिळते. रक्तातील शर्करेमुळे त्याची पातळी झपाट्याने कमीअधिक होते असली, तरी कोशिकेतील प्रथिनसंचयाची पातळी त्याच्या नियंत्रणात मोठा भाग घेते. हे नियंत्रण चक्र पुढीलप्रमाणे असण्याची शक्यता आहे. अपुऱ्या आहारामुळे ऊतकांत प्रथिनन्यूनत्व होते. त्यामुळे हॉर्मो मोठ्या प्रमाणात स्रवले जाते आणि नव्या प्रथिननिर्मितीस चालना मिळते. त्याच वेळी कोशिकेतील प्रथिनांच्या अपघटनाचे प्रमाण कमी होऊन संचयाचे प्रमाण वाढते. मेदव्यय वाढल्यामुळे ऊर्जेसाठी प्रथिनांचा वापर होणे थांबते. कोशिका प्रथिनाने संपृक्त झाली की, वृद्धी हॉर्मोन स्रवण्याचे प्रमाण कमी होते व पूर्वपदावर येते.

कृष्णरंजी कोशिका उद्दीपक हॉमोन : वरील हॉर्मोनांखेरीज अग्रखंड कृष्णरंजी कोशिकांना उद्दीपित करणारे आणखी एक हॉर्मोन सूक्ष्म प्रमाणात स्रवते. कृष्णरंजी कोशिका बाह्यत्वचेतील सर्वांत खालच्या थरात (जननस्तरात किंवा आद्यस्तरात) असतात. या कोशिका कृष्णरंजक हे रंगद्रव्य निर्माण करतात. या रंगद्रव्यामुळे त्वचेस तिचा रंग प्राप्त होतो. या हॉर्मोनामुळे कृष्णरंजक कोशिकांना अधिक रंगद्रव्य निर्माण करण्यास उद्दीपित केले जाते.

पश्चखंड : पोष ग्रंथीचा पश्चखंड मुख्यतः ‘पोष कोशिका’ नावाच्या तंत्रिका कोशिकांचा बनलेला असतो. या कोशिकांबरोबरच पश्चखंडात अधोथॅलॅमसामधून येणारे तंत्रिका तंतू व तंत्रिका तंतूंची अग्रे असतात. पोषकोशिका मुख्यतः या तंत्रिका तंतूंना आधार देण्याचे कार्य करतात. हे तंत्रिका तंतू अधोथॅलॅमसामधील अधिदृक् फुली (सुप्रा-ऑप्टिक) व पराविवर (पॅरा-व्हेंट्रिक्युलर) या केंद्रकांतील तंत्रिका कोशिकांपासून निघतात व देठावाटे पोष ग्रंथीत येतात. यांची अग्रे गुठळीसारखी असून ती केशवाहिन्यांच्या पृष्ठभागावर असतात. ही अग्रे तेथेच पश्चखंडाची हॉर्मोने स्रवतात. पश्चखंड मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोन व गर्भाशय-संकोचक हॉर्मोन अशी दोन हॉर्मोने स्रवतो. मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोनालाच वाहिनी-संकोचक (व्हॅसोप्रेसीन) असेही नाव आहे. ही दोन्ही हॉर्मोने मूळ तंत्रिका कोशिकांत तयार होतात. वाहक प्रथिनास बद्ध होऊन ते तंत्रिका तंतूंमधून वहात पोष ग्रंथीत येतात व तंतु-अग्रावर मुक्त होतात. मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोन मुख्यतः अधिदृक् फुली केंद्रकात तर गर्भाशय-संकोचक मुख्यतः पराविवर केंद्रकात तयार होतात. संबंधित केंद्रक थोड्या प्रमाणात दुसरे हॉर्मोनही तयार करू शकते. सर्वसाधारण परिस्थितीत दोन्ही हॉर्मोने पश्चखंडातील तंत्रिका अग्रात मोठ्या प्रमाणात संचित केली जातात. जेव्हा केंद्रकाकडून संदेश येतो तेव्हा गरजेप्रमाणे ही हॉर्मोने स्रवली जातात. स्रवल्यानंतर केशवाहिन्या ही हॉर्मोने रक्तात शोषून घेतात व सर्वत्र पोहोचवितात.

मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोन : हे हॉर्मोन अत्यंत सूक्ष्म मात्रेतही वृक्काला मूत्र स्रवण्यास प्रतिबंध करते व मूत्रनिर्मितीचे प्रमाण ताबडतोब कमी होते. हे हॉर्मोन उपस्थित नसेल, तर वृक्कातील मूत्रवाहिन्यांचा व काही प्रमाणात हेनले पाश (केसातील आकड्यासारख्या आकाराच्या मूत्रोत्सर्जक नलिकेने तयार झालेल्या व एफ्. जी. जे. हेनले या जर्मन शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारा पाश) आणि दूरस्थ नालिकांचा [→मूत्रोत्सर्जक तंत्र]अंतःस्तर पाण्याच्या संचरणास प्रतिबंध करतो (अंतःस्तर पाण्यास अपार्य होतो). यामुळे मूत्रातील पाण्याचे पुनर्शोषण होऊ शकत नाही म्हणून मूत्रातून पाणी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत राहते व लघवीस खूप होते. याउलट मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोन उपस्थित असेल, तर अंतःस्तराची पाण्यासंबंधीची पार्यता व पाण्याची संचरणक्षमता वाढते. वाहिनीमधील मूत्रातील बहुतेक पाणी पुन्हा रक्तात शोषून घेतले जाते व मूत्राचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारे पाण्याची बचत केली जाते. हे कार्य नक्की कसे होते ते ज्ञात नाही परंतु यासंबंधीचा प्रचलित विचार पुढीलप्रमाणे आहे. प्रथम हॉर्मोन मूत्रवाहिनीच्या कोशिकांवर निक्षेपित होते (साचते). त्यामुळे या कोशिकांत मोठ्या प्रमाणात ॲडिनोसीन मोनोफॉस्फेट (ए एम पी) हे न्यूक्लिओटाइड [→न्यूक्लिइक अम्ले] निर्माण केले जाते. हे न्यूक्लिओटाइड कोशिकावरणातील छिद्रे उघडते आणि कोशिका व बाह्यभाग यांच्या दरम्यान पाण्याची वाहतूक मोकळेपणाने होऊ देते.


मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोनाचे नियंत्रण अधोथॅलॅमसामधून येणाऱ्या रक्तातील लवण प्रमाणावरून केले जाते. लवण प्रमाण अधिक असल्यास हॉर्मोन प्रमाणात स्रवले जाते व पाण्याचे उत्सर्जन थांबविले जाते. याउलट रक्तात लवण प्रमाण कमी असल्यास हॉर्मोन स्रवले जात नाही, पाणी अधिक प्रमाणात उत्सर्जित केले जाते व रक्ताची लवण पातळी वाढविली जाते. नको असलेल्या हॉर्मोनाचा ताबडतोब नाश केला जातो. अशा प्रकारे काही मिनिटांत रक्तातील हॉर्मोनाची पातळी मोठ्या प्रमाणात कमीजास्त केली जाते. अधिदृक् फुली केंद्रकातील कोशिका अशा प्रकारे रक्तातील तर्षण दाबाचे [→तर्षण] नियमन करतात यामुळे त्यांना तर्षणग्राहक असेही नाव आहे. पाण्याच्या उत्सर्जनाबरोबरच रक्तातील लवणांचे प्रमाण कमीअधिक होत असल्याने या हॉर्मोनामुळे शरीरातील सोडियम रेणूच्या प्रमाणाचे व पर्यायाने रक्तातील तर्षण दाबाचेही नियमन होते.

याखेरीज हे हॉर्मोन रक्तवाहिन्यांचा संकोच घडवून आणते व रक्तदाब वाढविते. रक्ताचे एकूण घनफळ व दाब कमी झाल्यासही मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोन अधिक प्रमाणात स्रवले जाते व रक्तदाब वाढविण्यास मदत केली जाते. यासाठीच त्याला ‘वाहिनी-संकोचक’अशी संज्ञा आहे. वेदना, इजा, काळजी, मॉर्फीन, संमोहक द्रव्ये, शामक औषधे इत्यादींनी हे हॉर्मोन स्रवण्याचे प्रमाण वाढते, तर मद्यामुळे त्याचे प्रमाण कमी होते. जेव्हा हे हॉर्मोन स्रवण्यात केंद्रकातील कोशिकांचा नाश झाल्यामुळे व्यत्यय येतो व हॉर्मोन स्रवले जात नाही त्या वेळी लघवीस खूप होते. या विकारास ⇨बहुमूत्रमेह म्हणतात. अशा रुग्णांना दिवसाकाठी ६ ते १२ लिटर एवढी लघवी होते. मूत्राचे विशिष्ट गुरुत्व १·००२—१·००६ याच्यावर जात नाही. रुग्णात जलन्यूनत्व उद्‌भवते, खूप तहान लागते आणि उपचाराविना गंभीर स्थिती उद्‌भवते. अशा रुग्णांना पश्चखंडाची भुकटी नाकाद्वारे हुंगण्यास दिल्यास अथवा कृत्रिम रीत्या तयार केलेला स्राव दिल्यास ताबडतोब आराम पडतो.

 गर्भाशय-संकोचक हॉर्मोन : हे हॉर्मोन गर्भाशयाचे आकुंचन घडवून आणते. त्यातल्यात्यात ते गर्भाधारणेच्या अखेरीस गर्भधारित गर्भाशयाचे जोरदार आकुंचन घडविते. यामुळे पुष्कळ तज्ञांच्या मते नैसर्गिक प्रसूतीमध्येही हे हॉर्मोन भाग घेत असावे. मूत्रोत्सर्जन प्रतिबंधक हॉर्मोनही संकोचक हॉर्मोनापेक्षा कमी प्रमाणात परंतु काही अंशी गर्भाशयाचे आकुंचन घडवून आणते. संकोचक हॉर्मोन याखेरीज दूध येण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग घेते. या हॉर्मोनामुळे दुग्धकोशातून दूध दुग्धवाहिनीत ढकलले जाते आणि बालकाच्या चूषणक्रियेस उपलब्ध होते. स्तन ग्रंथीची बोंडी बालकाच्या दूध पिण्याच्या क्रियेत ओढली जाते. ही संवेदना मस्तिष्क स्तंभावाटे [→तंत्रिका तंत्र] अधोथॅलॅमसामध्ये येते व संकोचक हॉर्मोन मुक्त केले जाते. रक्ताद्वारे ते स्तनांत येते आणि दुग्धकोशांबाहेर असलेल्या स्नायूंचे आकुंचन घडवून दूध दुग्धवाहिन्यांत ढकलण्याचे कार्य करविते. संभोगसमयी होत असलेल्या उद्दीपनामुळे स्त्रीत हे हॉर्मोन अधिकतेने स्रवले जाते. या वेळी ते अंडाच्या (प्रजोत्पत्तिक्षम कोशिकेच्या) निषेचन क्रियेत (फलन क्रियेत) भाग घेत असल्याची शक्यता आहे.

ही दोन्ही हॉर्मोन प्रथिने असून आठ ॲमिनो अम्लांची बनलेली असतात. दोघांत फक्त दोन ॲमिनो अम्ले वेगळी असून हा फरक वगळता दोघांची संरचना सारखीच आहे.

पोष ग्रंथीच्या विकृती : सकल पोष ग्रंथी न्यूनत्व : यात अग्रखंडाच्या सर्वच हॉर्मोनांचे न्यूनत्व असते. हे न्यूनत्व जन्मापासून असू शकते किंवा कोणत्याही वयात निर्माण होते. लहानपणातच न्यूनत्व निर्माण झाल्यास व्यक्ती खुजी अथवा बुटकी होते. या बुटकेपणात वाढ खुंटलेली असते पण अवयवांची एकमेकांशी योग्य प्रमाण ठेवूनच वाढ होते. दहा वर्षे वय असलेल्या मुलाची वाढ चार ते पाच वर्षांच्या मुलाएवढी असते, तर तोच मुलगा वीस वर्षांचा झाल्यावर त्याच्या शरीराची वाढ ७ ते १० वर्षाच्या मुलाएवढी असते. या बुटकेपणात विशिष्ट अवटू किंवा अधिवृक्क बाह्यक ग्रंथी न्यूनत्व सहसा आढळत नाही. शरीरच एकूण लहान असते व त्याची या हॉर्मोनांची गरज कमी असते. गरजेपुरते ती उपलब्ध असतात. त्याप्रमाणेच मानसिक वाढ खुंटत नाही वा मतिमंदत्व आढळत नाही परंतु या व्यक्तींना तारुण्य कधीच प्राप्त होत नाही. जनन ग्रंथी उद्दीपक हॉर्मोने पुरेशा प्रमाणात कधीच स्रवली जात नाहीत. त्यामुळे लैंगिक इंद्रियांची व लक्षणांची पूर्ण वाढ कधीच होत नाही. काही बुटक्यांत (सु. १/३) मात्र न्युनत्व वृद्धी हॉर्मोनापुरतेच असते. अशा बुटक्यांची लैंगिक वाढ झालेली आढळते.


प्रौढातील पोष ग्रंथी न्यूनत्व : प्रौढात या ग्रंथीचे न्यूनत्व मुख्यतः राटके पिशवीचे अर्बुद (क्रेनियोफॅरिंजियोमा) आणि रंजकविरागी कोशिकांचे अर्बुद या अर्बुदांमुळे पोष ग्रंथी दाबली जाऊन दाबामुळे अग्रखंडाचा नाश झाल्यामुळे किंवा तिच्या रक्तवाहिन्यांत गाठ निर्माण होऊन रक्तपुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे ओढवते. अशा प्रकारची रक्तपुरवठ्यातील कमतरता स्त्रीमध्ये प्रसूतीनंतर निर्माण झालेल्या रक्ताभिसरण न्यूनत्वामुळे उद्‌भवते. अवटू न्यूनत्व, अधिवृक्क ग्रंथीच्या ग्लुकोकॉर्टिकॉइडांची कमतरता व जनन ग्रंथी उद्दीपक हॉर्मोनांची कमतरता यांमुळे पोष ग्रंथी न्यूनत्वाचे प्रमुख परिणाम उद्‌भवतात. अशी व्यक्ती निरुत्साही असते, तिचे वजन एकसारखे वाढत असते व वैवाहिक संबंधातही ती निरुत्साही असते. अवटू व कॉर्टिसोन यांच्या उपचारांनी लिंगकार्याखेरीज इतर दृष्ट्या रुग्ण सुधारतो.

महाकायता : ही विकृती तारुण्यावस्थेपूर्वी अधिक प्रमाणात वृद्धी हॉर्मोनाची निर्मिती होऊ लागल्यास उद्‌भवते. अग्रखंडातील अम्लाकर्षी कोशिका अधिक प्रमाणात कार्य करू लागतात. क्वचित त्यांचे अर्बुदही तयार होते. याचा परिणाम म्हणून अधिक प्रमाणात वृद्धी हॉर्मोनाची निर्मिती होऊ लागते. शरीरातील अस्थीसह सर्वच ऊतकांची मोठ्या वेगाने वाढ होते. लांब अस्थीतील अग्रप्रवर्धांचा संयोग झाला नसल्यास व्यक्तीची उंची वाढते. उंची २—२·२५ मी.पर्यंत वाढू शकते व महाकाय निर्माण होतो. अशा प्रकारे महाकायता निर्माण होण्यासाठी तारुण्यावस्थेपूर्वी अम्लाकर्षी कोशिकांची वृद्धी व्हावयास हवी. अशा महाकायी व्यक्तीत शर्कराधिक्य असते. १०% रुग्णांत अखेरीस बीटा कोशिकांच्या नाशामुळे व अन्य परिणामामुळे मधुमेह निर्माण होतो. दुर्दैवाने सर्वच महाकायी व्यक्तींत उपचार न केल्यास शेवटी सकल पोष ग्रंथी न्यूनत्व ओढवते. कारण महाकायता बहुधा अम्लाकर्षी कोशिका अर्बुदामुळे निर्माण होते. या अर्बुदाची वाढ अखेरीस संपूर्ण ग्रंथीचा नाश करते व त्याची परिणती अखेर अकाली मृत्यूत होते. वेळीच निदान झाल्यास गॅमा प्रारणाच्या [→किरणोत्सर्ग] उपचाराने या विकृतीची प्रगती थांबविता येते.

आ. ३. अतिकायता : मोठे नाक , खालचा मोठा जबडा व हाताचे पंजे ठळकपणे दिसत आहे

अतिकायता : अम्लाकर्षी कोशिकांचे अर्बुद जेव्हा तारुण्यावस्थेनंतर म्हणजेच अस्थींच्या अग्रप्रवर्धाचा मध्यप्रवर्धाशी संयोग झाल्यानंतर उद्‌भवते तेव्हा त्या व्यक्तीची उंची वाढू शकत नाही परंतु मृदू ऊतके वाढत राहतात. अस्थींची जाडी वाढते. या अवस्थेस ‘अतिकायता’ म्हणतात. हाताच्या पंजांची, पायाच्या तळव्यांची लहान हाडे आणि कवटी, नाक, कपाळ, जबडा इ. ठिकाणची हाडे मोठी होतात कारण या हाडांची वाढ तारुण्यप्राप्तीनंतर थांबत नाही. जबडा मोठा होऊन पुढे येतो, भालप्रदेश पुढे येतो, नाक नेहमीच्या दुप्पट मोठे होते, पायासाठी मोठे जोडे लागतात, बोटे खूप जाड होतात तसेज पंजा नेहमीच्या दुप्पट मोठा होतो. याबरोबरच मणक्यातील बदलामुळे पाठीत कुबड येते. जीभ, यकृत, वृक्क इ. अवयवही मोठे होतात.

कुशिंग विकार (किंवा लक्षणसमूह) : (एच्. कुशिंग या अमेरिकन तंत्रिका शस्त्रक्रियाविशारदांच्या नावावरून ओळखण्यात येणारा लक्षणसमूह). हा विकार अधिवृक्क बाह्यक ग्रंथीच्या अतिवृद्धीमुळे हायड्रोकॉर्टिसोन मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे उद्‌भवतो. यातील काही रुग्णांत पोष ग्रंथीतील क्षारकधर्मी कोशिकांचे अर्बुद जबाबदार असते, तर काहींत अधिवृक्क ग्रंथीचे अर्बुद किंवा अतिवृद्धी जबाबदार असते. दोहोंत लक्षणे एकच असतात. पोष ग्रंथीचे क्षारकधर्मी अर्बुद असल्यास रक्तातील संबंधित उद्दीपक हॉर्मोनाची पातळी वाढलेली असते व पोष ग्रंथी नष्ट केल्यास विकार बरा होतो. गोल वाटोळा चेहरा, लट्ठपणा, मान, पाठ इ. जागी मेदसंचय, लाल व पातळ त्वचा, वाढलेला रक्तदाब, पायावर सूज, वाढलेली रक्तशर्करा इ. लक्षणे या विकारात प्रामुख्याने आढळतात.

फ्रलिख लक्षणसमूह : (आल्फ्रेट फ्रलिख या ऑस्ट्रियन तंत्रिकाविकारविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारा लक्षणसमूह). अधोथॅलॅमसाच्या काही भागास इजा पोहोचल्यास पोष ग्रंथीचा अग्रखंड जनन ग्रंथी उद्दीपक हॉर्मोन स्रवत नाही. हे तारुण्यावस्थेपूर्वी घडल्यास नपुंसकत्व निर्माण होते. यासोबतच अधोथॅलॅमसामधील क्षुधा केंद्रकाच्या परिणामामुळे अती खादाडपणा उद्‌भवतो. त्यामुळे अशा व्यक्तीत नपुंसकत्वाबरोबरच लठ्ठपणा उद्‌भवतो.

पहा : हॉर्मोने.

संदर्भ : 1. Brobeck, J. R., Ed., Best and Taylor’s Physiological Basis of Medical Practice, New Delhi, 1975.

            2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.

            3. Harris, G. W. Donovan, B. T. The Pituitary Gland, 3 Vols., Washington, D. C., 1965.

शिरोडकर, शा.ना. कुलकर्णी, श्यामकांत