माखली (सेपिया)माखली : मॉलस्क (मृदुकाय प्राण्यांच्या) संघातील सागरी प्राणी. दक्षिण कोकणात याला ‘कवठी माकूळ’ म्हणतात.

माखलीचे वास्तव्य उथळ पाण्यात खबदाडीच्या जागेत असते पण अनेक वेळा हे वाळूत बिळे करून राहताना आढळतात. कित्येक वेळा समुद्रात सु. ३ ते ४ हजार मी. खोलीपर्यंत हा आढळतो. माखलीचा संचार विषुववृत्तीय आणि समशीतोष्ण कटिबंधात दिसतो. वर्षातील ठराविक काळात ते नियमितपणे स्थलांतर करीत असताना दिसतात. या काळात ते समुद्रात खोलवर गेलेले आढळतात. या स्थलांतराचा त्यांच्या प्रजोत्पादनाशी काही संबंध असावा .

माखली साधारणतः १५ ते २० सेंमी. लांबीचे असतात, काही जातींत ही लांबी थोडे मी. असते. आपणाकडे मिळणारा सेपिया रौक्सी या जातीचा माखली ६० सेंमी. पेक्षा अधिक लांबीचा आहे. तो प्रामुख्याने हिंदी महासागरात आढळतो. सेपिया प्रजातीखेरीज सेपिएला, हेमिसेपियस व इतर प्रजातींतील प्राण्यांचा माखलीमध्ये समावेश होतो. त्यांच्या सु. १०० जाती माहीत आहेत.

माखलीच्या शरीराच्या लांबीपेक्षा याच्या डोक्यावर असणाऱ्या बाहूंची व संस्पर्शकांची (स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे किंवा चिकटणे इ. कार्यांसाठी उपयोगी पडणाऱ्या लांब, सडपातळ व लवचिक इंद्रियांची) लांबी जास्त असते. हे बाहू व संस्पर्शक आकुंचन आणि प्रसरण पावतात. त्यांचा अन्न पकडण्यासाठी व संरक्षणासाठी उपयोग होतो. याच्या शरीराचा आकार लांबट गोल ढालीसारखा असतो. पाठीवर झीब्र्‌याप्रमाणे पण निरनिराळ्या रंगांचे पट्टे असतात. खालचा भाग पांढरट किंवा पिवळसर असतो. माखलीची शरीररचना द्विपार्श्वसममिती (ज्या स्थितीत एखाद्या प्राण्याच्या शरीराचे फक्त एकाच पातळीत विभागून दोन सारखे अर्धे भाग करता येतात ती स्थिती) दाखविते. अंतर्गत इंद्रियांत सुद्धा ही सममिती आढळते.

माखलीच्या शरीराचे डोके आणि कबंध (धड) असे दोन भाग पडतात. त्या दोहोंमध्ये निमुळती मान असते. डोक्याचा भाग गोलाकार असतो. पुढील भागात तोंड, त्याच्याभोवती दहा बाहूंचे वलय व दोन्ही बाजूंस तेजस्वी डोळे असतात. डोक्यावर असणाऱ्या बाहूंची रचना जोड्या-जोड्यांची असते. त्यांच्यापैकी चौथी जोडी इतरांपेक्षा वेगळ्या आकाराची असते. त्या जोडीस संस्पर्शक म्हणतात. इतर बाहू सुरुवातीस जाड व टोकाकडे निमुळते होताना दिसतात. त्यांच्या आतल्या भागावर खोलगट चूषक (शोषण करणारे अवयव) असतात. ते सर्व बाहू भागावर पसरलेले असतात. संस्पर्शकाचे स्वरूप मात्र वेगळेच असते. त्याचा आकार टोकाकडे गदेसारखा मोठा असतो. त्यांच्यावर फक्त टोकासच तेवढे चूषक दिसतात. संस्पर्शक जेव्हा प्रसरण पावतात तेव्हा ते शरीरापेक्षा किती तरी लांब होतात. तसेच जेव्हा ते आकुंचन पावतात तेव्हा त्यांच्या साठी असलेल्या खोबणीत बसतात. माखलीच्या नरामध्ये डाव्या बाजूच्या संस्पर्शकावर चूषक जवळजवळ नसतात. त्याला निषेचक बाहू (शुक्राणूंचे म्हणजे पुं-जनन पेशींचे मादीत सेचन करणारा नराचा रूपांतरित बाहू) म्हणतात. यामुळे आपणास नर व मादी सहजपणे ओळखता येतात.

माखलीचे बाहू व मृदूकाय संघातील इतर प्राण्यांचा पाद (पाय) यांत थोडेफार साधर्म्य दिसते म्हणून या वर्गास सेफॅलोपोडा म्हणजे शीर्षपाद (डोक्यावर पाय असणाऱ्या प्राण्यांचा वर्ग) असे नाव आहे. याचे डोळे फारच तीक्ष्ण असतात. ते शरीराच्या मानाने बरेच मोठे वाटतात. बाहूंच्या वलयात तोंड असते. तोंडात पोपटाच्या चोचीच्या आकाराचे एकमेकांवर बसणारे दोन जबडे असतात. त्यांच्या सहाय्याने हा प्राणी आपल्या भक्ष्याचे कठीण कवच फोडतो.

धडाचा भाग लांबट गोल असतो. त्यावर त्वचेचे जाड आवरण असते. हे आवरण मानेभोवती एका विशिष्ट प्रकारे गुंडाळलेले दिसते. त्या आवरणाखाली डोक्याचा भाग बऱ्याच वेळेस लपलेला दिसतो. पोटाखालील भागात एक लांब नरसाळ्याच्या आकाराची नलिका असते. तीमधून शरीराला नको असणारे उत्सर्जक पदार्थ, विष्ठा, शुक्राणू, अंडी आणि भुरकट रंगाचा शाईसारखा द्रव बाहेर टाकला जातो. हा अवयव प्राण्यास हालचालीस व पोहण्यास मदत करतो व त्याचबरोबर भुरकट द्रव पाण्यात मिसळल्याने शत्रूंची फसगत होते ते निराळेच. काही शास्त्रज्ञांच्या मते हे नरसाळे म्हणजे रूपांतरित पादच आहे. याच्याबरोबरच धडाच्या दोन्ही बाजूंस कातडीचा पातळ आणि बाहेर आलेला भाग दिसतो. त्याच्या सहाय्याने माखली पोहू शकतो.

माखलीच्या शरीरात पाठीकडच्या बाजूस कातडीच्या खाली कवच असते. त्याचा आकार लांबट पानासारखा व एका कडेस टोकदार असतो. कवचाचा मुख्य गाभा चुनखडीसारख्या (कॅल्शियम कार्बोनेट) पदार्थाच्या पातळ थरापासून तयार होतो आणि निरनिराळ्या थरांमध्ये असणाऱ्या पोकळीत वायू भरलेला असतो.

माखलीची अंडी लांबट गोल व दोन्ही टोकांकडे निमुळती असतात. त्यांच्या वरच्या आवरणाचा रंग पिवळा असतो. अंडी नेहमीच मोठ्या संख्येने (काही शेकडे) एका समूहात घातली जातात. ती एकमेकांस चिकटलेली असतात. तसेच ती प्रवाळांचे तुकडे किंवा इतर सागरी प्राण्यांच्या शरीरावर किंवा वनस्पतींना चिकटलेली असतात. अंडी घातल्यानंतर त्यांची काळजी निसर्गच घेतो.

खेकडे, शेवंडे, झिंगे, मासे व इतर काही सागरी प्राणी हे माखलीचे अन्न होय. संस्पर्शकाच्या सहाय्याने भक्ष्य पकडले जाते. नंतर ते बाहुवलयात आणले जाते. सगळे बाहू आपल्या चूषकांच्या सहाय्याने भक्ष्य पकडून ठेवतात. त्यावर कठीण बळकट जबडे चालवले जातात व अन्नाचे तुकडे होतात. मुशी (शार्क), देवमासे, शिंशुक, सूसू हे माखलीचे शत्रू होत. मोठे मासेही माखली खातात.

भारत, चीन, जपान, इटली आणि ग्रीस या देशांत माखली खातात. नरसाळ्यासारख्या नलिकेतून बाहेर टाकलेला भुरकट रंगाचा द्रव शाई म्हणून वापरला जातो. कवचाचा उपयोग दंतमंजन करण्यास किंवा काही यंत्रांचे महत्त्वाचे भाग साफ करण्यासाठी व ठसे घेण्यासाठी करतात. त्याचा खत म्हणूनसुद्धा उपयोग होतो. काही पाळीव पक्ष्यांना (कॅनरी पक्षी, लव्हबर्ड इ.) कवचाचे तुकडे शरीरवाढीस आवश्यक म्हणून चारतात, तर आयुर्वेदिक औषधांत त्याचा कानफुटी व इतर तक्रारींत उपयोग केला जातो. त्याला समुद्रफेन किंवा समुद्रशोष म्हणतात. ते अम्लतारोधी, स्तंभक (आकुंचन करणारे), शामक असते. मच्छीमारीत माखलीच्या तुकड्यांचा आमिष म्हणून उपयोग करतात.

सेपिया ॲ‌क्युलिएटा, से. रोस्ट्रॅटा, से. रौक्सी व सेपिएला इनर्मिस या माखलीच्या खाद्य जाती भारताच्या समुद्रात आढळतात. त्यांची नियमित मच्छीमारी चालत नाही. नेहमीच्या मच्छीमारीत त्या हाती लागतात. माखली लहान मासे मोठ्या प्रमाणावर खातात. त्यामुळे त्यांच्या मच्छीमारीचा विकास करणे जरूरीचे आहे.

से. ऑफिसिनॅलिस ही माखलीची सर्व परिचित यूरोपीय जाती असून ती ६० सेंमी. लांब असते. से. फॅराओनिससे. लॅटिमॅनस या इंडो-पॅसिफिक जातींचा प्रसार सर्वत्र आहे.

आधुनिक माखलीचा उदय मायोसीन कल्पात (सु. २ कोटी वर्षांपूर्वी) झाला. बेलोसेपिया या बेलेम्नाइटासारख्या पूर्वजांपासून त्यांचा क्रमविकास (उत्क्रांती) झाला आहे. बेलोसेपिया पूर्व इओसीन कल्पातील (सु. ५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) सागरांत राहत होते.

पहा : सेफॅलोपोडा.

जोशी, मा. वि. जमदाडे, ज. वि.