अल्ट्रामरीन : हे पूर्वी लॅपिस लॅझुली या नैसर्गिक उपरत्नापासून (कमी मौल्यवान असलेल्या रत्नापासून) बनवीत असत. हे बनविण्याची पंधराव्या शतकात वर्णन केलेली पध्दत पुढीलप्रमाणे आहे : चूर्ण केलेले खनिज लॅपिस लॅझुली, मधमाश्यांचे मेण, रेझीन, गम मॅस्टिक (रुमा मस्तकी या झाडापासून मिळणारा रेझीनयुक्त निःस्राव), जवसाचे तेल यांचे मिश्रण विरल क्षारीय विद्रावात घोटतात. ही पेस्ट अधूनमधून ढवळली जाते व त्याकरिता पुष्कळ दिवस लागतात. या काळात कॅल्साइट व पायराइट तेल प्रावस्थेत राहतात व निळे सूक्ष्म कण क्षारीय विद्रावात जाऊन तळाशी निक्षेपित होतात.

आधुनिक काळात सर्व अल्ट्रामरीन रंगद्रव्ये कृत्रिम रीतीने भट्टीचा उपयोग करून बनविली जातात, तरी त्यांचे रासायनिक संघटन व संरचना नैसर्गिक अल्ट्रामरिनाप्रमाणेच असते. संश्लेषित अल्ट्रामरिनासाठी केओलिन, सिलिका, सोडियम कार्बोनेट, गंधक व रेझीन यांचे मिश्रण बाहेरून तापविला जाणारा कक्ष असलेल्या किंवा तत्सम भट्टीत तापविले जाते. अल्ट्रामरीत हे एका विशिष्ट संघटनाचे संयुग नसल्याने घटकांचे प्रमाण कमीजास्त करून निरनिराळ्या छटांची रंगद्रव्ये तयार करता येतात. नेहमीच्या निळ्या अल्ट्रामरिनाकरिता पुढील घटक वापरतात : भाजलेले केओलीन ३०%, सोडियम कार्बोनेट ३८%, गंधक ३०%, सिलिका ४% व रेझीन ४%. भट्टीचे तापमान ८००° से. इतके चार-पाच दिवस ठेवले जाते व नंतर ती थंड होऊ दिली जाते. या काळात प्राथमिक हिरव्या अल्ट्रामरिनाचे हवेमुळे ऑक्सिडीभवन होते. भट्टीचे तापमान बाहेरील वातावरणाइतके झाल्यावर ‘कच्च्या’ रूपातील अल्ट्रामरिनाला अंतिम छटा प्राप्त होते. भट्टीतील माल लहान मोठ्या कणिका रूपात असून त्यात २०-२५% सोडियम सल्फेट असते. सोडियम सल्फेटाचे निक्षालन करून (द्रव विद्रावकात विरघळून टाकून) अविद्राव्य अल्ट्रामरीन पाण्यात ८ ते २४ तास दळले जाते. आवश्यक ते गुणधर्म मिळण्यासाठी हा काळ कमीजास्त केला जातो. अशा प्रकारे तयार झालेले रंगद्रव्य कण गुरुत्वाकर्षणाने निरनिराळ्या आकारमानांत अलग केले जातात. काही ठिकाणी याकरिता केंद्रोत्सारणासारखे आधुनिक तंत्र वापरले जाते. याप्रमाणे निरनिराळ्या छटा पण एकच रासायनिक संघटन असलेली अल्ट्रामरीन रंगद्रव्ये मिळतात आणि त्यांचा संबंध दळण्याकरिता दिलेला वेळ व तळाशी बसण्यासाठी लागणारा काळ यांच्याशी असतो.

अल्ट्रामरिनांचा झिओलाइटांशी निकट संबंध आहे व त्यामुळे त्यांचे गुणधर्म पण तसे आढळतात [→ झिओलाइट गट]. नैसर्गिक झिओलाइट ही एक प्रकारची खनिजे असून त्यांचे संघटन क्षारीय ॲल्युमिनो सिलिकेटे असे असते आणि [(Si, Al)n O2n] यांची त्रिमितीय जालके आणि समतोल ऋणायन (विद्रावातून विद्युत्‌ प्रवाह जाऊ दिला असता ऋणाग्राकडे जाणारे धन विद्युत्‌ भारित आयन) यांनी ती बनलेली असतात. त्यांची संरचना अनावृत (खुली) असून ते पाणी, वायू, अल्कोहॉले इ. अस्थिर स्वरूपात बांधून घेऊ शकतात. आणखी विशेष म्हणजे त्यातील ऋणायनांचा विद्रावातील इतर ऋणायनांबरोबर विनियम होऊ शकतो. यामुळे ती अफेनद (साबणाचा फेस ज्यात होऊ शकत नाही अशा) पाण्याचे फेनद पाण्यात रूपांतर करण्यासाठी वापरतात. याप्रमाणे निळ्या अल्ट्रमरिनाची सिल्व्हर नायट्रेटाबरोबर विक्रिया केल्यास अल्ट्रामरिनातील सोडियमाची जागा चांदी घेऊ शकते. सिल्व्हर अल्ट्रामरिनाचा रंग पिवळा असून त्यापासून इतर अल्ट्रामरीन रंगद्रव्ये वरीलप्रमाणे बनविता येतात.

अल्ट्रामरीन क्षार विद्रावात स्थिर असून अम्ल विद्रावात त्याचे अपघटन होते (रेणूचे तुकडे होऊन साध्या रेणूत वा अणूंत रूपांतर होते) अल्ट्रामरीन पाण्यात विरघळल्यावर लगेच विखुरते व त्यामुळे कपड्याच्या धुलाईत ‘नीळ’ म्हणून त्याचा पारंपारिक उपयोग केला जातो. निळ्या प्रकाशाच्या बाबतीत अल्ट्रामरिनाची परावर्तनशीलता उत्तम असल्याने प्रकाशातील पिवळ्या भागाचे उदासिनीकरण होऊन कपडे पांढरे शुभ्र दिसतात. ३-४ मायक्रॉन सरासरी व्यास असलेले अल्ट्रामरिनाचे कण गडद छटा देतात पण त्यांची रंजनक्षमता कमी असते. ७.५-१.० मायक्रॉन व्यास असलेले कण फिकट छटा देतात पण त्यांची रंजनक्षमता जास्त असते. यामुळे गडद छटा व जास्त रंजनक्षमता किंवा फिकट छटा व कमी रंजनक्षमता असलेली अल्ट्रामरीन रंगद्रव्ये बनविता येत नाहीत.

अल्ट्रामरीन प्रकाशाची क्रिया होण्यापासून संरक्षण देते पण अम्ल वातावरणात रंगछटा लवकर खराब होते. याला लागणारा कालावधी जास्त करून वाहकाच्या संघटनावर अवलंबून असतो. साधारणपणे ज्या वाहकात फिनॉल-फॉर्माल्डिहाइड रेझिनाचे प्रमाण जास्त आहे त्यात अल्ट्रामरीन सर्वांत जास्त स्थिर असते. उदासीन वाहकात अल्ट्रामरीन २५०° से. तापमानापर्यंत स्थिर राहते.

कॅडमियम रंगद्रव्ये : मुख्यतः कॅडमियम सल्फाइड, कॅडमियम सल्फोसिलिनाइड व कॅडमियम यलो लिथोपोन ही रंगद्रव्ये म्हणून वापरली जातात.

कॅडमियम सल्फाइड हे पिवळे रंगद्रव्य ग्रीनोकाइट खनिज म्हणून काही भागांत सापडते परंतु व्यापारी उत्पादनाकरिता कॅडमियम संयुगाच्या विद्रावात हायड्रोजन सल्फाइड किंवा सोडियम सल्फाइड घालून ते अवक्षेपित केले जाते. प्रक्रियेवर योग्य नियंत्रण ठेवल्यास लेमन रंगापासून नारिंगी रंगापर्यंतच्या विविध छटा तयार करता येतात.

रेड कॅडमियम सल्फो-सिलिनाइडे ही कॅडमियम सल्फेटाच्या पाण्यातील विद्रावात क्षार सल्फाइड व सिलिनाइड घालून तयार करतात. त्यांचे रंग गडद असून त्यांची अपादर्शकता व रंजनक्षमता चांगली असते. सर्वसाधारण संघटन 3CdS 2CdSe असून जसे सिलिनियमाचे संघटनातील प्रमाण वाढते, तशी रंगछटा नारिंगीपासून चमकदार तांबड्या किंवा गडद अंजिरी रंगापर्यंत बदलते.

कॅडमियम यलो लिथोपोन ही रंगद्रव्ये नेहमीच्या लिथोपोनाप्रमाणे कॅडमियम सल्फाइड व बेरियम सल्फेट यांच्या सह-अवक्षेपण क्रियेने तयार केली जातात. संघटनामध्ये काळजीपूर्वक बदल करून निरनिराळ्या आकर्षक रंगछटा मिळविता येतात.

कॅडमियम रंगद्रव्ये उष्णता व रासायनिक विक्रिया रोधक आहेत. ५००° से. तापमानाचाही त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, तसेच अकार्बनी अम्ले व त्यांचे विरल विद्राव यांच्या विक्रियेला ती रोधक आहेत परंतु ही रंगद्रव्ये शुद्ध रूपात महाग असल्याने लिथोपोनांचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. त्यांच्या अपारदर्शकता, अविद्राव्यता, प्रकाश व उष्णता रोधकता, क्षाररोधतका इ. गुणांमुळे अथवा हे गुण जेथे आवश्यक आहेत तेथे त्यांचा विशेष उपयोग केला जातो.

रेड लेड किंवा शेंदूर : प्राचीन काळापासून उपलब्ध व वापरात असलेल्या या रंगद्रव्याचे सर्वसाधारण संघटन Pb3O4 अथवा 2PbO.PbO2 असे आहे. हे रंगद्रव्य लिथार्ज (PbO) हवेच्या प्रवाहामध्ये भट्टीत ४८०° – ५१०° से. तापमानावर २४ तास भाजून तयार केले जाते. तयार मालाची गुणवत्ता तापमान, भट्टीतील परिस्थिती व कच्चा माल यांवर अवलंबून असते.

याचे विशिष्ट गुरुत्व ९, अपारदर्शकता चांगली व रंजनक्षमता कमी असते. जवसाच्या तेलाबरोबर घट्ट, लवचिक पटल तयार होते व ते धातूच्या पृष्ठभागास घट्ट पकडू शकते. जवसाच्या तेलाबरोबरची विक्रिया Pb3O4 या घटकाच्या प्रमाणावर अवलंबून असते आणि ते बऱ्याच प्रमाणात असले, तर तयार केलेले संधारण १४ दिवसांपर्यंत वापरण्यायोग्य राहते. हे मुख्यतः संरक्षक रंगलेपात वापरले जाते. वातावरणात याची रंगछटा बदलत जाते त्यामुळे ते पोलादाच्या व लोखंडाच्या कामावर पहिला हात द्यावयाच्या रंगलेपात वापरले जाते [→ शेंदूर ].


व्हर्मिलियन : हे रंगद्रव्य हिंगूळ (सिनॅवार) या नैसर्गिक खनिजांपासून मिळते. याचे संघटन मुख्यतः मर्क्युरी सल्फाइड (HgS) असून चमकदार लाल रंगद्रव्य मूळ व्हर्मिलियन म्हणून प्रसिद्ध होते परंतु आता एकसारख्या ढवळत ठेवलेल्या गंधक व क्षार सल्फाइड यांच्या मिश्रणात पारा हळूहळू घालून याचे उत्पादन करण्यात येते. प्रक्रियेच्या नियंत्रणानुसार रंगछटा लालसर नारिंगी किंवा निळसर लाल मिळते. पूर्वी बऱ्याच प्रमाणात वापरात असलेले हे रंगद्रव्य आता केवळ विशेष उपयोगांकरिताच वापरले जाते.

कोबाल्ट ब्ल्यू : हे कोबाल्ट ऑक्साइड व ॲल्युमिनियम ऑक्साइड यांचे मिश्रण आहे. कोबाल्ट व ॲल्युमिनियम यांची हायड्रॉक्साइडे भट्टीत भाजून तयार झालेल्या ऑक्साइडांच्या मिश्रणाचे चूर्ण केल्यावर चमकदार निळे रंगद्रव्य मिळते. यांची रंजनक्षमता कमी असून बहुतेक वाहकांमध्ये पारदर्शक असते इतर काही गुणधर्मांमुळे हे रंगद्रव्य लावल्यानंतर भाजण्याची आवश्यकता असलेल्या पांढऱ्या रंगलेपांत व पांढरी चमक देणारे म्हणून तसेच चित्रकलेतील रंगद्रव्यांत वापरले जाते.

ॲल्युमिनियम चूर्ण : ॲल्युमिनियम हे रंगद्रव्य म्हणून (पर्णन होणाऱ्या म्हणजे रंगलेपाच्या पृष्ठभागावर सपाट तरंगण्याचा गुणधर्म असलेल्या वा पर्णन न होणाऱ्या रूपातील) अतिशय पातळ पापुद्रे असलेले चूर्ण वा पेस्ट या स्वरूपात वापरतात.

ॲल्युमिनियम चूर्णाचे उत्पादन दाबकर्तनाने अथवा पोलादी चेंडूयुक्त चक्कीच्या साहाय्याने केले जाते. ॲल्युमिनियम चूर्ण किंवा पेस्ट निरनिराळ्या पायुद्यांच्या आकारमानात उपलब्ध आहे. उत्तम दर्जाची पर्णन जाडी ०.२५ मायक्रॉन असून भरड दर्जाची कित्येक मायक्रॉन असते. बहुतेक उत्पादित ॲल्युमिनियम चूर्ण पर्णन होणाऱ्या प्रकारचे असते. स्टिअरिक अम्लासारखे योग्य वंगण व कणांचा आकार यांमुळे ॲल्युमिनियम चूर्णास हा गुणधर्म प्राप्त होतो. ॲल्युमिनियम पापुद्रे वाहकात मिसळून रंगलेप म्हणून पृष्ठभागवर लावले, तर त्यावर धातूचे एक अखंड पटल तयार होते. पर्णनामुळे तयार झालेले पटल आर्द्रतारोधक बनून खालील पृष्ठभागास आर्द्रता न पोचल्याने संरक्षण मिळते याच गुणामुळे खालील पृष्ठभाग एक प्रकारे सीलबंद होत असल्याने ॲल्युमिनियम रंगद्रव्याचा उपयोग खालील पृष्ठभागावरील अगोदरच्या निराळ्या रंगाचा रंगलेप वर येऊन पसरण्यास रोध होतो. ॲल्युमिनियम पटल जंब्रुपार व अवरक्त प्रकाश परावर्तित करीत असल्याने ते रंगद्रव्य रंग लावलेल्या वस्तूचे जंब्रुपार प्रकाशापासून संरक्षण करते तसेच अवरक्त प्रकाशाच्या परावर्तनामुळे वस्तूचे तापमान कमी राहते. त्यास उष्णतारोधक क्षमता असून योग्य उष्णतारक्षक वाहक वापरल्यास उष्णतेपासून रक्षण करणारे रंगलेप तयार करता येतात उदा., नळ व प्रारक (एंजिनात निर्माण झालेल्य उष्णतेचा ऱ्हास करण्याची प्रयुक्ती) यांकरिता वापरण्यात येणारे रंगलेप.

पर्णन न होणाऱ्या प्रकारचे ॲल्युमिनियम चूर्ण काही खास परिणामांकरिता वापरले जाते. यामध्ये पॉलिक्रोम नावाचे लॅकर उपयोगात आणतात. हे लॅकर विविध अर्धपारदर्शक रंगद्रव्ये वापरून करतात व त्यामुळे निरनिराळ्या दिशांनी पडणाऱ्या प्रकाशात विविध रंगछटा दिसतात.

जस्त चूर्ण : धातुकापासून जस्त धातू मिळविण्याच्या प्रक्रियांत जस्त चुर्ण काही प्रमाणात मिळते. त्याचे उत्पादन करण्यासाठी जस्त धातू एका बाजूला बाष्प बाहेर पडण्याची सोय असलेल्या भट्टीत तापवून जस्ताचे बाष्प थंड हवेमुळे संधनकात अतिसूक्ष्म कणरूपात गोळा होते. धातूचे बाष्पीकरण व संघनन यांचे चांगल्या प्रकारे नियंत्रण केल्यास योग्य आकारमानाच्या कणांचे चूर्ण मिळते.

हे चूर्ण निळसर करड्या रंगाचे असून त्याचे विशिष्ट गुरुत्व सु. ७.०० असते. सर्वसाधारण कणांचे आकारमान ६ मायक्रॉन असून यापेक्षा लहान कणही बनू शकतात. जस्त चूर्ण हे क्षारकीय रंगद्रव्य असल्याने शुष्कन तेलातील अम्लांबरोबर त्याची विक्रिया होऊन जस्त साबण बनतात. जस्त चूर्ण दृश्य प्रकाशाचे बरेच शोषण करीत असल्याने ते रंगद्रव्यात वापरल्यास उत्तम अपादर्शकता मिळते. याची रंजनक्षमता कमी असल्याने ते इतर रंगद्रव्यात मिसळून विविध आकर्षक छटा तयार करता येतात. जस्त चूर्ण जंबुपार प्रकाश शोषून घेत असल्याने बाह्य वापराच्या रंगलेपात वापरण्यास उपयुक्त असते. ते बिनविषारी आहे.

जस्त चूर्णामुळे पोलादी व लोखंडी कामाचे गंजणे विद्युत रासायनिक क्रियेने रोखता येते. लोखंड, पाणी व एखादे विद्युत् विच्छेद्य (विद्रावातून विद्युत् प्रवाह जाऊ दिल्यास ज्याचे घटक अलग होतात असा पदार्थ) एकत्र येतात तेव्हा जस्त प्रथम लोखंडाऐवजी विद्रावरूपात जाऊन विद्युत् रासायनिक क्रिया घडून येते. ८७% जस्त चूर्ण व २०% झिंक ऑक्साइड ओलिओरेझीनयुक्त वाहकात वापरून तयार केलेला रंगलेप जास्त उपयोगी ठरतो कारण साठवणीत झिंक ऑक्साइडामुळे घट्ट लेप खाली तळाशी बसत नाही. याचा उपयोग जस्तलेपित लोखंडी पृष्ठभागाकरिताही चांगला ठरतो.


अलीकडील काळात जस्ताचे प्रमाण जास्त असलेली रंगद्रव्ये तयार करण्यास आलेली असून ९५% जस्त चूर्ण कोरड्या पटलामध्ये वापरले जाते परंतु याकरिता प्लॅस्टिकीकरण केलेले पॉलिस्टायरीन, क्लोरिनीकरण व समघटकीकरण (रेणूंची पूनर्रचना केलेले) केलेले रबर यांसारखे विशेष बंधक जास्त उपयोगी पडतात. या रंगलेपाच्या उपयोगामध्ये जस्ताचे कण एकमेकाच्या अगदी जवळ राहून खालील धातूच्या पृष्ठभागाशी संबंध राहिल्यामुळे लोखंडी काम व वरील रंगलेप पटल यांमध्ये विद्युत संपर्क राहतो. यामुळे गंजरोधक क्रिया जस्तलेपित लोखंडी व पोलादी कामाप्रमाणे मिळते.

काजळी : (कार्बन ब्लॅक). रंगलेप उद्योगामध्ये काळ्या रंगाकरिता रंगद्रव्य म्हणून मुख्यतः ज्यांत कार्बन मूलद्रव्य रूपात आहे परंतु ज्याचे प्रमाण कमीजास्त असून इतर खनिज उपपदार्थ निश्चित प्रमाणात असतात, असे पदार्थ वापरले जातात. कार्बनावर आधारित असलेली काळी रंगद्रव्ये निरनिराळ्या खनिज, वनस्पतिजन्य किंवा प्राणिजन्य पदार्थांचे अपूर्ण ज्वलन (कार्बनीकरण) करुन मिळवितात. खनिज हायड्रोकार्बनांचे (नैसर्गिक वायू व खानिज तेल) अपूर्ण ज्वलनाने काळ्या रंगद्रव्यांत कार्बनाचे प्रमाण अधिक ठेवतात व ती उष्ण वायुभट्टी काजळी, चॅनेल काजळी इ. नावांनी ओळखली जाते. दिव्याची काजळी वनस्पती तेल जाळून अथवा दगडी कोळशाच्या डांबराच्या ऊर्ध्वपातनाने मिळते. मध्यम प्रमाणात कार्बन असलेली काळी रंगद्रव्ये (उदा., द्राक्षवेलीजन्य काजळी, फ्रँकफोर्ट काजळी) निरुपयोगी लाकूडयुक्त पदार्थाच्या कार्बनीकरणाने मिळतात. कमी प्रमाणात कार्बन असलेली अस्थी काजळी, हस्तिदंती काजळी इ. रंगद्रव्ये बंदिस्त भट्टीत हाडे भाजून तयार करतात. त्यांमध्ये खनिज अपद्रव्ये (जास्त करून कॅल्शियम फॉस्फेट) असतात. कमी प्रतीचे काळे रंगद्रव्य कमी प्रतीच्या कोळशापासून बनविले जाते. (पहा कोष्टक क्र. २).

काजळी हे नाव हल्ली मुख्यतः नैसर्गिक वायू व खनिज तेल यांपासून बनविलेल्या काळ्या रंगद्रव्याकरिता वापरले जाते. तिचा मुख्य उपयोग टायराच्या उत्पादनात रबर टणक बनविण्यासाठी आणि रबराला अंगचा काळा रंग देण्यासाठी करतात. काजळीच्या जागतिक उत्पादनापैकी साधारणपणे १०% उत्पादन छपाईची शाई आणि रंगलेप यांकरिता वापरले जाते. [⟶ काजळी].

रंगीत कार्बनी रंगद्रव्ये : कित्येक शतके नीळ (इंडिगो), मंजिष्ठ (मॅडर) यांसारखी काही कार्बनी रंगद्रव्ये व रंजकद्रव्ये [⟶ रंजक व रंजकद्रव्ये] चांगल्या प्रकारे माहीत होती. आजच्या युगात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संश्लेषित कार्बनी रंगद्रव्ये वा रंजकद्रव्ये ही १८५६ मध्ये विल्यम पर्किन यांनी मॉव्ह (ॲनिलीन पर्पल) या रंजकद्रव्याचा शोध लावला त्या वेळेपासून माहीत झाली परंतु त्यांचा उपयोग मुख्यतः वस्त्र उद्योगात केला गेल्यामुळे त्यांचा इतर उपयोग होऊ शकतो याकडे दुर्लक्ष झाले. त्या वेळीसुद्धा काही रंजकद्रव्ये वस्त्र उद्योगाबाहेर (उदा चामडे रंगविणे) वापरली जात होती परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीस रंगलेप व छपाईची शाई यांकरिता वापरता येतील अशी रंगद्रव्ये मुद्दाम प्रयोग करुन तयार करण्यात आली. पूर्वीच्या काळी शोधली गेलेली काही रंगद्रव्ये अजूनही नवीन प्रकारे वापरली जात आहेत. एकोणिसाव्या शतकामधील रसायनशास्त्रातील प्रगती, रासायनिक उद्योगांतील वाढ आणि मोठ्या उद्योगांत संशोधन व विकास यांची स्थापना झाल्याने निर्माण झालेली प्रत्येक पदार्थाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याची आणि उपलब्ध रसायनातील (कच्च्या मालातील) दोष काढून टाकण्याची प्रवृत्ती ही या प्रगतीची प्रमुख कारणे होत.

रंगद्रव्ये व रंजकद्रव्ये यांची संख्या जरी खूप मोठी असली, तरी त्यांचे उत्पादन करण्यासाठी मूळ प्राथमिक स्वरुपाच्या काही थोड्या पदर्थापासून नेहमीच्या कार्बनी प्रक्रिया करुन मध्यस्थ पदार्थ तयार केले जातात आणि मग त्यांच्यावर इतर काही रासायनिक प्रक्रिया करण्यात येतात.

प्राथमिक रसायने : यामध्ये मुख्यतः बेंझीन, टोल्यूइन, झायलिने, नॅप्थॅलीन व अँथ्रॅसीन या संयुगाचा समावेश होतो. प्रथमतः यांचे उत्पादन दगडी कोळशापासून मिळणाऱ्या डांबराच्या ऊर्ध्वपातनाने करीत असत. नंतर ती खनिज तेल ऊर्ध्वपातितांपासून संश्लेषणाने तयार करण्यात येऊ लागली.

मध्यस्थ रसायने : डांबराच्या ऊर्ध्वपातनाने किंवा इतर मार्गानी मिळालेली प्राथमिक रसायने सरळ रंगद्रव्ये किंवा रंजकद्रव्ये म्हणून वापरता येत नाहीत. त्यावर काही रसायनिक प्रक्रिया करून मध्यस्थ बेंझिडीन ३.३ डायसल्फॉनिक अम्ल रसायने मिळवितात व त्यांचे रूपांतर पुढे रंगद्रव्यात वा रंजकद्रव्यात करता येते.

 

प्राथमिक रसायनांपासून मध्यस्थ रसायने मिळविण्यासाठी मुख्यतः ⇨नायट्रीकरण, ⇨हॅलोजनीकरण व ⇨सल्फॉनीकरण या प्रक्रियांचा उपयोग करून प्राथमिक रसायनांच्या वलयी संरचनेत प्रतिष्ठापन केले जाते (एका अणूच्या वा अणुगटाच्या जागी दुसरे अणू किंवा अणुगट बसविले जातात). यानंतर काही इतर प्रक्रिया वापरुन NO2, हॅलोजने, SO3 H यांच्या ठिकाणी दुसरे अणुगट घालतात किंवा केंद्रीय बेंझीन वलयातच प्रतिष्ठापन केले जाते. आणखी एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरणाची (विशेषतः अँथ्रॅसिनाचे अँथ्रॅक्किनोनात रुपांतर करण्यासाठी) होय.


नायट्रीकरण : सर्वांत सोपी प्राथमिक प्रक्रिया म्हणजे बेंझिनापासून नायट्रोबेंझीन तयार करणे. ही प्रक्रिया ⇨ॲरोमॅटिक संयुगांचे विशेष लक्षण असून ती नायट्रिक अम्लाबरोबर सल्फ्यूरिक अम्ल उत्प्रेरक (प्रक्रियेचा वेग बदलण्यास मदत करणारा पदार्थ) म्हणून वापरून करण्यात येत.

अधिक तापमान व जास्त संहत अम्ले वापरुन आणखी NO2 गट (जास्तीत जास्त तीन) वाढविता येतात.

ही प्रक्रिया केवळ हायड्रोकार्बनांवरच (बेंझीन वगैरे) नव्हे, तर इतर प्रतिष्ठापित हायड्रोकार्बनांवरही करता येते व ती जास्त सोप्या रीतीने होते. एकदा नायट्रो संयुगे मिळविल्यावर त्यांचा उपयोग इतर प्रतिष्ठापक गट बदलून घालण्यासाठी करता येतो. हायड्रोकार्बनांपेक्षा ऑर्थो व पॅरा या ठिकाणी असलेल्या प्रतिष्ठापक गटांचे अधिक सुलभपणे नायट्रीकरण करता येते. सूत्र २ वरून असे दिसून येते की, काही थोड्या प्राथमिक रसायनांपासून पुष्कळ निरनिराळ्या प्रकारची मध्यस्थ रसायने मिळतात. अशा प्रकारे थोडाफार फरक असलेली निरनिराळी रसायने वापरून आवश्यक गुणधर्म असलेली रंगद्रव्ये वा रंजकद्रव्ये तयार करता येतात.

क्षार संगलन : सल्फॉनिक अल्माचे क्षार धातूच्या (सोडियम, पोटॅशियम इ.) हायड्रॉक्साइडाबरोबर उच्च तापमानाला संगलन (वितळविणे) केल्यास SO3 H गटाचे हायड्रॉक्सिल (OH) गटाने प्रतिष्ठापन होते. ही प्रक्रिया नॅप्थॅलीन रसायनांच्या बाबतीत जास्त करुन वापरली जाते.

ऑक्सिडीकरण : ही प्रक्रिया अँथ्रॅसिनापासून अँथ्रॉक्लिनोने, नॅप्थॅलिनापासून थॅलिक अनहायड्रॉइड आणि बेंझिनापासून बेंझाँल्डिहाइड व बेंझॉइक अम्ल ही रसायने तयार करण्यासाठी वापरतात. ही प्रक्रिया साधारणपणे व्हॅनेडियम आधारित उत्प्रेरक वापरुन हवेमध्ये केली जाते. काही बाबतीत इतर ऑस्किडीकारके वापरतात. जसे अँथ्रॅक्किनोनाच्या बाबतीत अम्ल क्रोमेट प्रतिष्ठापित अँथ्रॅक्किन वापरुन व सरळ क्षार संगलन करून एकदम रंगद्रव्य वा रंजकद्रव्य मिळू शकते (सूत्र ७).

रंगद्रव्यांचे किंवा रंजकद्रव्यांचे वर्गीकरण करण्याच्या तीन पद्धती आहेत : (१) रेणूंच्या सर्वसाधारण विन्यासावरून, (२) एका वा अधिक क्रोमोफोरांच्या गुणधर्मावरून, (३) एका वा अधिक प्रतिष्ठापक गटांवरून. यांच्यामुळे रंगछटा, विद्राव्यता, रंगविण्याच्या व रंग पक्का होण्याच्या गुणधर्मावरील परिणाम यांची निश्चिती होते. पहिल्या व दुसऱ्या पद्धतीत क्रोमोफोरांरून वर्गीकरण करतात. तिसऱ्या पद्धतीत रंगद्रव्याचा वा रंजकद्रव्याचा मूळ रंग अथवा लावण्याचा प्रकार यावरून वर्गीकरण केले जाते.

गट : नायट्रोरंजक द्रव्ये फारशी प्रचारात नाहीत कारण तपकिरी, पिवळी, नरिंगी व हिरवी इतक्याच रंगछटा यात मिळतात पण याहून महत्त्वाचे कारण म्हणजे सर्व नायट्रो गट असलेली रसायने स्फोटक असतात. नायट्रो गटांची संख्या जितकी जास्त तितका स्फोटाचा धोका जास्त असतो.

पहिल्या महायुद्धानंतर विशेषेकरून वापरले गेलेले स्फोटक द्रव्य म्हणजे ट्रायनायट्रोटोल्यूइन (टीएनटी) हे होय.


नायट्रोसो गटामधील एक महत्त्वाचे हिरवे रंगद्रव्य म्हणजे ‘पिगमेंट ग्रीन बी. सी. आय.’ हे होय. हे तयार करण्यासाठी नायट्रोसो-बीटानॅप्थॉल व फेरस सल्फेट यांच्या मिश्रणावर क्षाराची विक्रिया करण्यात येते. हे अतिशय गडद हिरवे रंगद्रव्य म्हणून पायस रंगलेप व डिस्टेंपर यांत वापरतात कारण त्यावर क्षाराची विक्रिया होत नाही. ॲझो गट ( −N = N−) : यांपैकी महत्त्वाचे रंगद्रव्य म्हणजे टोल्यूइडीन रेड (सी. आय. पिगमेंट रेड ३) हे होय. यातील पहिला घटक मेटा-नायट्रो-पॅराटोल्यूइडीन असून ते अगोदर बऱ्याच निरनिराळ्या विक्रिया करुन तयार केले जाते. यातील निरनिराळे टप्पे सूत्र ९ मध्ये दाखविले आहेत. याचे नंतर १५० से. तापामानावरील हायड्रोक्लोरिक अम्ल आणि सोडियम नायट्राइट यांच्या साहाय्याने ⇨डायाझोटीकरण करण्यात येते.

संयुग्मन प्रक्रियेसाठी (रेणूंच्या जोडणीकरिता) बीटा नॅप्थॉलाचा दाहक सोड्यात विद्राव करुन pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] नियंत्रणाकरिता थोड्या प्रमाणात सोडियम ॲसिटेट व हायड्रोक्लोरिक अम्ल घातल्यावर बीटा-नॅप्थॉल सूक्ष्म कणरूपात अवक्षेपित होते आणि डायाझो विद्राव बराच वेळ ढवळत ठेवल्यावर चमकदार तांबडे रंगद्रव्य अवक्षेपित होते. संयुग्मन पूर्ण झाल्यावर रंगद्रव्य गाळले जाते व धुतल्यावर वड्यांच्या रूपात वाळवून त्याचे चूर्ण करतात आणि प्रमाणीकरणासाठी अगोदर तयार केलेल्या रंगद्रव्याशी तुलना करून योग्य ते फेरबदल केले जातात. संयुग्मनाचे तापमान, अवक्षेपण, मिसळण्याची त्वरा या सर्वाचा रंगद्रव्याच्या रंगछटेवर व क्षमतेवर परिणाम होतो

बीटा-नॅप्थॉल दुसरा घटक बदलून ॲसिटोॲसिटानिलाइड वापरले, तर आणखी एक महत्त्वाचे रंगद्रव्य ‘ॲरिलामाइड यलो जी’ मिळते. हे एक उत्तम प्रकारचे पिवळे रंगद्रव्य असून पुष्कळ प्रचारात आहे.


वरील विवेचनावरून असे दिसून येते की, संयुग्मन ही प्रक्रिया करण्याकरिता योग्य घटक निवडल्यास रंगछटा व गुणधर्म यांमध्ये बदल करता येऊन निरनिराळी रंगद्रव्ये बनविता येतात. जर दोन्ही मध्यस्थ रसायने मोनो-ऍझो संयुग्मके असतील SO3H सारख्या पाण्यात विरघळण्यास प्रवृत्त करणाऱ्या गटांपासून मुक्त असतील, तर तयार होणारी ॲझो संयुगे तेलात किंवा कार्बनी विद्रावकात विद्राव्य असतात. त्यामुळे त्यांना तेल-विद्राव्य ॲझो रंजकद्रव्ये म्हणतात. जलविद्राव्यक गट नसलेल्याजास्त जटिल मध्यस्थ रसायनांना अथवा पॉलिऍझो संयुगांना ॲझो रंगद्रव्य-रंजकद्रव्य म्हणतात. विद्रावकात विद्राव्य असणारी रंजकद्रव्ये तयार करण्यासाठी ज्यांचा उपयोग करता येतो अशी ॲझोअम्ल रंजकद्रव्ये म्हणजे धातवीय जटिल रंजकद्रव्ये होत. त्यांचे सर्वसाधारण संघटन सूत्र ११ मध्ये दर्शविले आहे.

*ब्रॅडफर्ड (इंग्लंड) येथील सोसायटी ऑफ डायर्स अँड कलरिस्ट्‌स आणि लॉवेल (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) येथील अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ टेक्स्टाइल केमिस्ट्‌स अँड कलरिस्ट्‌स या संस्थांनी प्रसिद्ध केलेले.

अँथ्रॅक्किनोन : या रंजकद्रव्यांतील अँथ्रॅक्किनोन केंद्र हे क्रोमोफोर असते. एकच अँथ्रॅक्किनोन वलयो रचना असलेली रंगद्रव्ये वा रंजकद्रव्ये ॲलिझरिनाप्रमाणे तयार करतात. सी. आय. विद्रावक ग्रीन ३ हे १ : ४ डायक्लोरो अँथ्रॅक्किनोन आणि पॅरा-टोल्यूइडियाचे दोन रेणू यांचे संघटनन करुन मिळते. (सूत्र १२)


इंडान्थ्रोन, फ्लॅव्हॅन्थ्रोन : अँथ्रॅक्किनोनापासून तयार केलेली रंजकद्रव्ये (व्हॅट रंजकद्रव्ये) पुष्कळ वर्षे सेल्युलोजयुक्त कापडाकरिता पक्के (न विटणारे) रंग म्हणून वापरात आहेत. त्याच प्रकारातील इंडान्थ्रोन ब्ल्यू व फ्लॅव्हॅन्थ्रोन यलो ही अनुजात (एका संयुगापासून बनविलेली दुसरी) रंगद्रव्ये म्हणून चांगली माहीत असून बऱ्याच प्रमाणातवापरली जातात. (सूत्र १३, १४). याशिवाय ब्रोमॅन्थ्रोन रेड (सी. आय. व्हॅट ऑरेंज ३) व अँथ्रॅपिरिमिडीन यलो (सी. आय. व्हॅट यलो) ही दोन्ही उत्तम पक्केपणाच्या गुणधर्माकरिता प्रसिद्ध आहेत.

डाय व ट्राय-फिनिल-मिथेन रंजकद्रव्ये : यांपैकी उपयुक्त असे ऑरॅमीन (सी. आय. बेसिक यलो २) हे डाय – फिनिल-मिथेन रंजकद्रव्य आहे. हे पिवळे रंजकद्रव्य कागद, कापड व कातडे यांसाठी वापरण्यात येते. (सूत्र १७).

मॅलॅकाइट ग्रीन (सी. आय. बेसिक ग्रीन) हे ट्राय-फिनिल-मिथेन रंगद्रव्य असून त्याला उत्तम हिरवा रंग असतो.

ॲझीन गट : या क्रोमोफोरापासून ॲनिलीन ब्लॅक हे एकच महत्त्वाचे रंगद्रव्य मिळते. यासाठी तांबे वा व्हॅनेडियम लवणाचा उत्प्रेरक म्हणून उपयोग करुन ॲनिलिनाचे क्रोमिक अम्लाने ऑक्सिडीकरण केले जाते. याचा विशेष उपयोग प्रयोगशाळेतील लाकडी टेबलाच्या पृष्ठभागासाठी करण्यात येतो. याकरिता पृष्ठभागावर प्रथम ॲनिलीन लावून त्याचे क्रोमिक अम्लाने ऑक्सिडीकरण करतात. यामुळे लाकडाच्या अंतर्गत भागात ॲनिलीन ब्लॅक तयार होते. त्यावर नंतर मेणाचा थर देण्यात येतो. या क्रियेमुळे प्रयोगशाळेत काम करताना टेबलाच्या पृष्ठभागावर सांडलेल्या अम्ल, क्षार वगैरे रसायनांचा परिणाम होत नाही. हल्ली याऐवजी क्षरणरोधी फरश्यांचा उपयोग करतात.

थॅलोसायनीन रंगद्रव्ये : १९५० सालाच्या सुमारास ‘थॅलोसायनीन ब्ल्यू बी’ या रंगद्रव्याचा शोध लागला व तो क्रांतिकारक ठरला. या रंगद्रव्याची निळी रंगछटा उत्तम असून त्याचा रंगाच्या पक्केपणाचा गुणधर्म फार चांगला आहे. या शोधामुळे एक नवीन क्रोमोफोर सापडला. इतर क्रोमोफोरांप्रमाणे विविध छटा या क्रोमोफोरामुळे मिळत नसल्या, तरी उत्तम निळी व हिरवी छटा असलेली रंगद्रव्ये मिळतात. ही रंगद्रव्ये अम्ले, क्षार व उष्णता यांच्या परिणामाच्या बाबतीत स्थिर असून त्यांची रंजनक्षमता उच्च आहे. मात्र ही रंगद्रव्ये तुलनेने महाग आहेत. शोभादायक, एनॅमल, मोटारगाड्यांचे रंगलेप, लिनोलियम, प्लॅस्टिके, छपाईची शाई, रबरी वस्तू यांसाठी, तसेच रंगाचा पक्केपणा व रासायनिक स्थैर्य आवश्यक असणाऱ्या ठिकाणी या रंगद्रव्याचा उपयोग होतो.

कॉपर थॅलोसायनीन हे रंगद्रव्य थॅलिक ॲनहायड्राइड, यूरिया व क्युप्रिक क्लोराइड एकत्रित तापवून तयार करतात. थॅलोसायनीन ग्रीन जी हे एक महत्त्वाचे हिरवे रंगद्रव्य आहे. काही वेळा कॉपर थॅलोसायनीनाच्या रेणूमध्ये क्लोरीन व ब्रोमीन यांनी प्रतिष्ठापन केल्याने चमकदार पिवळ्या-हिरव्या छटांची रंगद्रव्ये मिळतात. त्यांचे पक्केपणाचे गुणधर्म मूळ रंगद्रव्याइतकेच चांगले राहतात.


लेक व टोनर : सर्वसाधारण व्याख्येप्रमाणे लेक हे एक प्रकारच्या अकार्बनी आधारद्रव्यावर पाण्यात थोडी फार विरघळण्याची क्षमता असलेले कार्बनी रंजकद्रव्य संयोजित होऊन तयार झालेले रंगद्रव्य असते. हे संयोजन एक प्रकरच्या लवण निर्मितीने वा ⇨ग्राभणाने होते. अशा प्रकारे तयार होणाऱ्या रंगद्रव्यात आधारद्रव्य आवश्यक असते व शेवटी तयार झालेल्या रंगद्रव्याचा ते अविभाज्य भाग असते. टोनर हे सुद्धा आधारद्रव्याबरोबर तयार करता येते पण यात आधारद्रव्य हे विरलकारक असून त्यामुळे तयार होणाऱ्या रंगद्रव्याची छटा फिकट होते. टोनरची रंगछटा सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त गडद असून ते सामान्यतः पाण्यात अविद्राव्य परंतु अल्कोहॉलसारख्या इतर विद्रावकांत विद्राव्य असते. यातील आधारद्रव्य अकार्बनी रंगद्रव्याच्या स्वरुपात नसते.

पाण्यात विरघळणारी पुष्कळशी रंजकद्रव्ये टोनर बनू शकत नाहीत परंतु त्यांचे रुपांतर लेकमध्ये करणे शक्य असते. हे कार्य अकार्बनी आधारद्रव्याबरोबर रंजकद्रव्याचे अवक्षेपण केल्याने साध्य होते. आधारद्रव्य म्हणून ॲल्युमिना ब्लॅक फिक्स यासारख्या पदार्थाचा उपयोग केला जातो. ही रंगद्रव्ये रंगलेप, छपाईची शाई इत्यादींकरिता मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

ॲलिझरीन लेक हा एक विशेष गट आहे. संश्लेषित रंगद्रव्ये व रंजकद्रव्ये उपलब्ध होण्यापूर्वी मॅडर (नैसर्गिक ॲलिझरीन) हे रुबिया टिक्टोरम या वनस्पतीपासून काढलेला अर्क व बंधक यांपासून बनविलेले गडद

निळसर लाल छटेचे रंगद्रव्य कापड उद्योगात वापरीत असत. मॅडर लेक हे रंगद्रव्य सध्या संश्लेषित ॲलिझरीन रेड ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइडाबरोबर उकळून तयार केले जाते. रंगलेप, शाई व चित्रकारांचे तैलरंग यांत या रंगद्रव्याचा उपयोग केला जातो. विद्राव्य कॅल्शियम लवण, सल्फॉनीकरण केलेले एरंडेल (टर्की रेड तेल) आणि सर्वसाधारणपणे एक फॉस्फेट यांच्या संयोगाने ॲलिझरीन, ॲल्युमिनियम व कॅल्शियम, तसेच अवक्षेपित तेल आणि फॉस्फेट यांचा सहसंबंध जटिल पदार्थ बनतो. ॲलिझरीन लेक रंगद्रव्यांची छटा गडद निळसर लाल असून ॲलिझरिनाचे अनुजात वापरुन इतर निळसर किंवा गडद छटा असलेली रंगद्रव्ये मिळतात परंतु फारशी महत्त्वाची नाहीत.

टोनरचे चांगले उदाहरण म्हणजे रेड २ बी टोनर हे होय. याचे उत्पादन २−क्लोरो ४−टोल्यूइडीन – ५ −सल्फॉनिक अम्लाचे डायाझेटीकरण करुन आणि नंतर बीटा−हायड्रॉक्सी−नॅप्थॉनिक अम्लाबरोबर संयुग्मन करुन करण्यात येते. निरनिराळ्या द्रव्याची संहती, तापमान, ढवळण्याची क्रिया इत्यादींवर पूर्ण नियंत्रण ठेवल्यास उत्पादित पदार्थ चांगल्या प्रतीचा मिळतो. (पहा कोष्टक क्र. ५)

रंगद्रव्याची तपासणी : रंगद्रव्याची उपयुक्तता ठरविण्याच्या दृष्टीने खालील गुणधर्म महत्त्वाचे आहेत.

(१) रंग : रंगद्रव्याचा रंग हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्याच्या रंगछटेवर रंगलेपाची रंजनक्षमता व दृश्य बाह्यस्वरुप अवलंबून असते.

 

(२) कणांचे आकारमान : रंगद्रव्याची उत्कृष्टता त्याच्या कणांच्या आकारमानावर अवलंबून असते. सर्वात बारीक कण किंवा चूर्ण असलेली रंगद्रव्ये उत्कृष्ट ठरतात. त्यामुळे रंगलेपालाही उत्कृष्टता प्राप्त होते.

 

(३) पूर्ण रंग (मासटोन) : रंगद्रव्याचा रंगछटा व तेलाबरोबरील विक्रिया पहाण्यासाठी तेल आणि रंगद्रव्य यांचे मिश्रण बनवून त्याचे विलेपन करतात आणि विलेपित पृष्ठभागाचे परीक्षण करतात.

 

यांशिवाय घनता, अपारदर्शकता, तेलांचे शोषण इ. गुणधर्माची तपासणी करता येते व त्यावरुन रंगद्रव्याची उपयुक्तता ठरविता येते.


उत्पादन इतिहास : रंगद्रव्य हा रंगलेपांचा मुख्य घटक असल्यामुळे त्याचा इतिहास रंगलेप उद्योगाच्या प्रगतीशी निगडित आहे. त्याचप्रमाणे रंजकद्रव्ये व ⇨रंजनक्रिया या क्षेत्रातील प्रगतीशीही त्याचा संबंध आहे. ब्रिटनमध्ये पर्किन यांनी १८५६ मध्ये मॉव्ह या संश्लेषित रंजकद्रव्याचा शोध लावला. त्यामुळे इतर देशांतून आयात करण्यात येणाऱ्या वनस्पतिजन्य रंजकद्रव्याचे महत्त्व कमी होऊन रंजकद्रव्यांच्या उत्पादनात स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने प्रत्येक देश प्रयत्न करु लागला. यामध्ये पर्किन यांच्या शोधाचा फायदा घेऊन जर्मनीतील शास्त्रज्ञांनी इतर रंजकद्रव्ये व रंजनक्रिया यासंबंधी संशोधन आणि सुधारणा केल्या. याचा परिणाम असा झाला की, पहिल्या महायुद्धात

रंजकद्रव्ये तयार करणायाऱ्या कारखान्यांचे त्वरित रूपांतर दारूगोळ्याच्या कारखान्यात करणे शक्य झाल्याने जर्मनीचे दारूगोळा उत्पादनात वर्चस्व राहिले.

याच्या अगोदर ब्रिटन व मग इतर देशांत औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊ लागल्याने त्याकरिता रंगलेप व म्हणून रंगद्रव्ये यांचे उत्पादनही जास्त प्रमाणात होऊ लागले. युद्धकाळात सैनिकांना जास्त प्रमाणात कपडे लागत असल्यामुळे ते रंगविण्यासाठी रंजकद्रव्ये व रंजनक्रिया यांबाबत संशोधन झाले. तसेच ब्रिटन व इतर देशांत कापड उद्योगाची प्रचंड वाढ झाल्याने रंजकद्रव्य उद्योगाचीही वाढ झाली. याच काळात असे लक्षात आले की, रंगद्रव्ये व रंजकद्रव्ये हे वर्गीकरण केवळ त्यांचे गुणधर्म व वापरण्याच्या पद्धती यांमुळे केले गेले आहे.

इतर प्रगत देशांच्या मानाने भारतात बहुतेक सर्व आधुनिक उद्योग उशिरा सुरू झाले. व्हाइट लेड हे रंगद्रव्य बनविण्यास कलकत्ता येथील २-३ कारखान्यांत १९६०−६५ च्या दरम्यान सुरुवात झाली. पुढे मुंबई येथेही रंगद्रव्ये तयार करणारे काही कारखाने सुरू झाले. याच सुमारास त्रावणकोर टिटॅनियम प्रॉडक्टस या केरळमधील कंपनीने टिटॅनियम डाय-ऑक्साइडाचे उत्पादन करण्यास प्रारंभ केला परंतु मागणी जास्त असल्यामुळे सु. ८,०००−९,००० टन टिटॅनियम डाय-ऑक्साइड आयात करावे लागत होते.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या औद्योगिक धोरणात बदल झाल्याने परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने अथवा त्यांच्याकडून संबंधित तंत्रज्ञान विकत घेऊन रंगलेप उद्योगातील कित्येक कारखाने उत्पादन करीत आहेत. या कारखान्यांत एशियन पेंट्स, गुडलॅस नेरोलॅक, गरवारे पेंट्स, जेन्सन अँड निकोल्सन, बाँबे पेंट्स, शालिमार पेंट्स, कलर केम व अमर डाय केम या प्रमुख कारखान्यांचा समावेश आहे. यांशिवाय प्रत्येक राज्यात कुटीरोद्योग वा लघुद्योग आहेत आणि त्यांच्या द्वारे स्थानिक मागणी काही प्रमाणात भागते पण त्यांच्या उत्पादित मालातील मुख्य दोष म्हणजे मोठ्या कारखान्यांच्या मानाने त्याचा दर्जा कमी असतो. भारतीय मानक संस्थेने रंगद्रव्ये व रंगलेप यांसंबंधीचे विनिर्देश (कार्य, कच्चा माल, गुणवत्ता इत्यादींसंबंधीचे सविस्तर वर्णन) भारतीय परिस्थितीनुसार ठरविलेले असून त्यांची मानके (प्रमाणे) प्रसिद्ध केलेली आहेत.

पहा : रंगलेप रंजक व रंजकद्रव्ये.

 

संदर्भ : 1. Chapman, B. N. Anderson. J. C. Ed., Science and Technology of Surface Coatings, 1974.

          2. Edwards, J. D. Wray, R. I. Aluminum Paint and Powder, New York, 1955.

          3. Khanna, A. S. Paints and Varnishes, Hyderabad, 1959.

          4. Lubs, H. A., Ed., The Chemistry of Synthetic Dyes and Pigments, New York, 1955.

          5. Meyers, R. Long, J. S. Pigments, 1975.

          6. Patterson, D., Ed., Pigments : An Introduction to their Physical Chemistry, Amsterdam, 1967.

         7. Payne, H. F. Organic Coating Technology, Vol. 2. Pigments and Pigmented Coatings, New York, 1961.

        8. Solomon, D. H. Hawthorne, D. G. Chemistry of Pigments and Fillers, 1983.

 

चिपळूणकर, मा. त्रिं. पोतनीस, श्री. पु. कोंडकर, निनाद