वर्मा, महादेवी : (? – १९०७ – ११ सप्टेंबर १९८७). प्रख्यात हिंदी छायावादी कवयित्री व लेखिका. उत्तर प्रदेशातील फरूखाबाद येथे जन्म. त्यांचे वडील गोविंदप्रसाद हे भागलपूरच्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते व महादेवी वर्माआई हेमराणी विदुषी होत्या. त्यांच्या आईकडून मीराबाई व तुलसीदास यांच्या पदांची ओळख त्यांना झाली. अशा विद्या-संस्कारसंपन्न वातावरणात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे हिंदी, संगीत व चित्रकला यांचे शिक्षण घरीच सुरू झाले. पुढील शिक्षण इंदूरच्या मिशन स्कूलमध्ये झाले. त्यांचा विवाह १९१६ मध्ये स्वरूपनारायण वर्मांबरोबर झाला पण हा विवाह अल्पकाळच टिकला. विवाहानंतरही त्यांचे अध्ययन अविरतपणे चालू राहिले. १९३३ मध्ये प्रयाग विश्वविद्यालयातून त्या संस्कृत विषय घेऊन एम्.ए. झाल्या. लगेचच प्रयाग महिला विद्यापीठात प्राचार्या म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढे त्या महिला विद्यापीठाच्या कुलगुरूही झाल्या. काही काळ चाँद मासिकाचे संपादकत्व त्यांनी विनावेतन सांभाळले. ह्या मासिकातूनच त्यांच्या सुरुवातीच्या कविता प्रसिद्ध झाल्या. बालपणापासूनच त्या ब्रज भाषेत कविता करू लागल्या. सुरुवातीला त्यांनी समस्यापूर्तीच्या कविता केल्या. प्रारंभीच्या काळात त्यांच्यावर मैथिलीशरण गुप्त यांचा प्रभाव पडला. त्यातून त्यांनी खडी बोलीत रोला व हरिगीतिका छंदांमध्ये कविता रचल्या. ह्या प्रारंभीच्या काळातील कवितांचा समावेश त्यांच्या नीहार (१९३०) ह्या पहिल्या काव्यसंग्रहात केला आहे. स्वतःचे वैयक्तिक दुःख, जगाच्या अशाश्वततेमुळे निर्माण होणारे वैश्विक दुःख, त्यापलीकडे जाण्याची तीव्र अभिलाषा, परब्रह्माशी अपूर्व मीलन व विरह इ. विषयांची अभिव्यक्ती त्यांत दिसून येते. रश्मि (१९३२) ह्या त्यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहात त्यांची दृष्टी कल्पनाविश्व व भावनावेग यांकडून चिंतनशील अनुभूतीच्या नव्या क्षेत्राकडे वळलेली दिसते. वैयक्तिक सुखदुःखांना विश्वाच्या सुखदुःखांशी एकरूप करण्यात त्यांना जीवनाची सार्थकता वाटते. नीरजा (१९३४) ह्या त्यांच्या तिसऱ्या काव्यसंग्रहात व्याकुळ प्रणयभावनेचा आविष्कार दिसतो. त्यात आत्मा व परमात्मा यांच्या मीलनाचे चित्रण, प्रियकर व प्रियतमा या रूपकाद्वारे केले आहे. सांध्यगीत (१९३६) या त्यांच्या चौथ्या काव्यसंग्रहात प्रतीकाच्या भाषेत अज्ञात अस्तित्वशक्तीचे सार्थ चित्रण केले आहे. साधनेच्या शुद्ध बैठकीवर प्रियतमाचे मीलन व्हावे ही इच्छा आणि सृष्टीशी जीवनाची तद्रूपता ही वैशिष्ट्ये त्यात दिसून येतात. नीहार, रश्मि, नीरजासांध्यगीत ह्या पहिल्या चार संग्रहांतील निवडक कविता संकलित करून  त्यांनी यामा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला (१९३९). ह्या काव्यसंग्रहासाठीच त्यांना भारतीय ज्ञानपीठाचा १९८२ चा पुरस्कार लाभला. यामा हा हिंदी भावकाव्याचा मानदंड मानला जातो. दीपशिखा (१९४०) हा त्यांचा पाचवा काव्यसंग्रह. या संग्रहात कवयित्रीने दीपकाच्या प्रतीकाद्वारे आपली वेदना व्यक्त केली आहे. आपल्या साधनेच्या द्वारे कवयित्री असीम अव्यक्त शक्तीशी एकरूप झाली आहे. आधुनिक कवि-महादेवी (१९४१) या संग्रहात त्यांच्या सर्वच कवितांतून त्यांनी स्वतः निवडलेल्या निवडक कवितांचे संकलन केले आहे. सप्तपर्णा (१९७०) या त्यांच्या काव्यसंग्रहात ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, वैदिक साहित्य व वाल्मिकी, अश्वघोष, कालिदास, भवभूती, जयदेव इत्यादींच्या निवडक उताऱ्यांचे हिंदी रूपांतर आहे. त्याला ६० पानांची विस्तृत प्रस्तावनाही आहे. हिमालय हा महादेवींनी संपादित केलेला काव्यसंग्रह असून त्यात चिनी आक्रमणाच्या काळात अनेक कवींनी निर्मिलेल्या निवडक स्फूर्तिप्रद कवितांचे संकलन आहे. संधिनी या त्यांच्या काव्यसंग्रहाची विस्तृत प्रस्तावनाही अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण आहे.

महादेवींची काव्यातील भूमिका ही प्रामुख्याने विरहिणी भारतीय स्त्रीची आहे. त्यांच्या संपूर्ण काव्यसाधनेचा गाभा लौकिक प्रेमभावनेची अलौकिक प्रेमभावनेत परिणती हा आहे. प्रेमाच्या ह्या उदात्तीकरणाला मानसशास्त्रीय बैठक आहे. त्यांच्या सुसंस्कृत व संतुलित स्त्रीमनाची प्रतीती त्यांच्या साहित्यातून येते. त्यांच्या काव्याइतकेच त्यांचे गद्य साहित्यही विपुल आणि समृद्ध आहे. काव्यात अंतर्मुख होऊन स्वतःबद्दल विचार करणाऱ्या महादेवींचे बहिर्मुखी आणि समाजोन्मुख व्यक्तिमत्व त्यांच्या गद्य लिखाणात प्रकटले आहे. सामान्य, उपेक्षित व्यक्तींची दैन्ये, दुःखे व समस्या यांचा सहानुभूतिपूर्वक जिव्हाळ्याने सखोल वेध घेऊन रंगवलेली व्यक्तिचित्रे त्यात आढळतात. महादेवींच्या विशाल वात्सल्यभावाचा व समंजस दृष्टिकोणाचा त्यांतून हृद्य प्रत्यय येतो. अतीतके चलचित्र (१९४१), स्मृतिकी रेखाएँ (१९४३) व मेरा परिवार (१९७४) ह्या तीन संस्मरणात्मक रेखाचित्रांच्या संग्रहांनी त्यांना गद्यक्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला. मेरा परिवार या संग्रहात घरगुती पाळीव पक्षी व प्राणी यांची अतिशय विलोभनीय, हृद्य रेखाचित्रे आहेत. दुष्ट रूढी व अनिष्ट प्रथा यांनी त्रस्त झालेल्या भारतीय स्त्रीजीवनाच्या अनेकविध समस्या-उदा., विधवा-समस्या, पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह-वगैरेंचे चित्रण त्यांच्या गद्य लिखाणात आढळते. तसेच दारिद्र्य, जातीयता, हीन जातीच्या व्यक्तींना सोसावी लागणारी दुःखे व उपेक्षा, अपंगांच्या समस्या. अंधश्रद्धा व परंपरा यांचे बळी ठरलेली हेकट दुराग्रही माणसे व त्यांच्यामुळे दुखावल्या गेलेल्या व्यक्ती ह्यांविषयी त्यांनी केलेले लेखन विचारप्रवर्तक ठरले आहे.

शृंखलाकी कडियाँ (१९३०), क्षणदा (१९५६) व साहित्यकारकी आस्था तथा अन्य निबंध (१९६२) हे अनुक्रमे स्त्रीविषयक, ललित व आलोचनात्मक निबंध यांचे संग्रह आहेत. पथके साथी (१९५६) मध्ये साहित्यिकांच्या आठवणी व वैशिष्ट्ये लेखिकेने स्पष्ट केली आहेत.

महादेवींना ज्ञानपीठाव्यतिरिक्त इतरही अनेक मानसन्मान लाभले : नीरजा काव्यसंग्रहासाठी सक्सेरिया पारितोषिक (१९३४), मंगलाप्रसाद पारितोषिक (१९४४), पद्मभूषण (१९५६), विक्रम विद्यापीठ, उज्जैन यांच्याकडून डी. लिट्. (१९७९), भारत भारती पुरस्कार (१९८३) इत्यादी. उत्तर प्रदेश विधानसभेच्या त्या काही वर्षे नियुक्त सदस्या होत्या. अलाहाबाद येथे त्यांचे निधन झाले.

दुबे, चंदुलाल द्रविड, व्यं. वि.