भट्ट, उदयशंकर : (३ ऑगस्ट १८९८-? १९६६). आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी व कादंबरीकार. जन्म इटावा येथे. उदयशंकरांचे पूर्वज मूळ गुजरातमधील सिंहपूर येथील. तेथून ते इंदूर संस्थानात येऊन तेथील बुलंदशहर जिल्ह्यातील कर्णदास या गावी स्थायिक झाले. उदयशंकर यांनी काशी हिंदू विद्यापीठातून बी.ए., पंजाब विद्यापीठातून ‘शास्त्री’ आणि कलकत्ताहून ‘काव्यतीर्थ’ ह्या पदव्या संपादन केल्या. लाहोरमधील लाला लजपतराय यांच्या नॅशनल कॉलेज, खालसा कॉलेज व सनातन धर्म कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात आकाशवाणीचे सल्लागार व निदेशक म्हणूनही त्यांनी काम केले.

आजोबा दुर्गाशंकर आणि वडील मेहता फतेहशंकर यांच्या संस्कृत व्यासंगामुळे संस्कृत भाषा-साहित्याचेही त्यांनी अध्ययन केले. वडिलांच्या व्रज भाषेतील कवितांच्या चर्चेतून प्रेरणा मिळून उदयशंकर यांनीही सुरुवातीस व्रज भाषेत काव्यरचना केली.

तक्षशिला (१९३१) हा त्यांचा पहिला काव्यसग्रह. राका (१९३५), मानसी (१९३९), अमृत और विष (१९३९), विसर्जन (१९३९), युगदीप (१९४४), विजयपथ (१९५०) इ. त्यानंतर प्रकाशित झालेले त्यांचे काव्यसंग्रह होत.या काव्यावर छायावादाचा प्रभाव असला, तरी विषयांत विविधता आहे. निराशा, दैववाद, निष्कियता यांच्याबद्दलची नापसंती, नवजागृतीचा प्रयत्न तसेच देशभक्ती यांचे दर्शन त्यांच्या काव्यात घडते.

उदयशंकर विशेष प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या नाटकांसाठी आणि एकांकिकांसाठी. त्यातील विषय पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक असे विविध आहेत. परंपरेने चालत आलेल्या पुरूषी अहंकाराविरूद्ध अधिकारशाहीविरूद्ध, स्त्रीचे बंड, असहायता आणि शेवटी आत्मसमर्पण यांचे चित्रण कमला (१९३९) सारख्या सामाजिक नाटकात आणि अंबा (१९३५ ) व मत्स्यगंध (१९३७) यासारख्या पौराणिक नाटकात उदयशंकर यांनी प्रभावी रीतीने केले आहे. त्यांच्या विक्रमादित्य (१९३३) दाहर अथवा सिंधपतन (१९३३), मुक्तिपथ (१९४४) आणि शक विजय (१९४९) या ऐतिहासिक नाटकावर पाश्चिमात्य नाट्यशैलीचा विशेष प्रभाव जाणवतो. अंतहीन अंत (१९३७) नया समाज (१९५५), जीवन और संघर्ष ही त्यांची अन्य उल्लेखनीय नाटके होत. तथापि उदयशंकर यांची प्रतिभा विशेष खुललेली दिसते ती त्यांच्या पद्यमय भावनाटयांत. मत्स्यगंधा, विश्वामित्र (१९३८), राधा (१९४१), कालिदास (१९५०) इ. भावनाटयांत मनातील नाना विकार, वासना, नैतिक मूल्ये, विवेक याच्यां संघर्षाचे चित्रण आहे. उदयशंकर यांची ही भावनाट्ये हिंदी साहित्यातील मोलाची भर म्हणावी लागतील.

उदयशंकर यांचे अभिनव एकांकी नाटक (१९४०), स्त्री का हदय (१९४२), आदिम युग (१९४८), समस्या का अंत (१९४८), धुमशिखा (१९४९), अंधकार और प्रकाश (१९५२), पर्दे के पिछे (१९५३) इ. एकांकिकासंग्रह प्रकाशित झाले आहेत. यामध्ये आधुनिक काळातील मध्यमवर्गीय माणसाच्या सामाजिक आर्थिक प्रश्नांच्या विवेचनाबरोबर अंधश्रद्धा, स्वार्थी वृत्ती, अनाचार यावरं टीका आहे. हास्यप्रधान एकाकिकांमधील विनोद बोचरा नसून निर्भेळ करमणूक करणारा आहे. त्यांच्या एकांकिकांचा एक वैशिष्टयपूर्ण प्रकार म्हणजे नभोनाटये. आकाशवाणीत स्वतः काम केल्याने उदयशंकर यानीं नभोनाट्याचे कलामाध्यम म्हणून महत्त्व जाणले व आपली नभोनाटये लिहीली. ‘आदिंम युग’ ‘समस्या का अंत’ इ. उल्लेखनीय नभोनाट्य होत.

उदयशंकर यांनी काही कांदबऱ्याही लिहील्या, त्या पुढीलप्रमाणे : सागर लहरे और मनुष्य (१९५५), एक नीड दो पंछी (१९५६ जुने नाव वह जो मैने देखा), लोक परलोक (१९५८), डॉ. शेफाली (१९६० जुने नाव नये मोड), शेष अशेष (१९६०).

उदयशंकर यांच्या हया वैविध्यपुर्ण लेखनात त्यांची मानवता, अन्यायाची चीड, परंपरेचे प्रेम, आधुनिकतेचे आकर्षण इ. विशेष जाणवतात.

दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं.वि.