मोहन राकेश : (८ जानेवारी १९२५–४ डिसेंबर १९७३). प्रख्यात आधुनिक हिंदी नाटककार, कादंबरीकार व कथाकार, जन्म अमृतसर येथे एका सामान्य पंजाबी कुटुंबात. त्यांचे वडील वकील होते, तरी आर्थिक परिस्थिती ओढाताणीची होती. राकेश यांचे आपल्या आईवर नितांत प्रेम होते. जीव गुदमरून टाकणाऱ्या परिस्थितीतून राकेश सतत घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करीत. त्यांच्या नाटकांतील व कथासाहित्यातील पुष्कळच पात्रे अशी घराबाहेर जाऊ पहाणारी, पलायन करणारी परंतु घराकडे परतणारी आढळतात. जन्मभर राकेश ‘घर’ गोष्टीसाठी आसुसलेले होते मात्र त्यांना ते कधीच सापडले नाही. ही खंत त्यांच्या लेखनात केंद्रस्थानी आहे.

राकेश यांचे आरंभीचे शिक्षण अमृतसरला झाले व नंतर उच्च शिक्षणासाठी ते लाहोरला गेले. ओरिएंटर कॉलेजमधून संस्कृत घेऊन ते एम्.ए. झाले. पुन्हा हिंदी घेऊन प्रथम श्रेणीत त्यांनी एम्.ए. केले. मुंबईस प्राध्यापक म्हणून काम सुरू केले पण मन रमेना, ते कंटाळून सिमल्याला गेले. त्यांचे दोन विवाह असफल ठरले मात्र तिसरा (अनिताशी) काहीसा सफल ठरला. त्यांनी स्थायी स्वरूपाची नोकरी कधीच केली नाही. त्यांचा स्वभाव परस्परविरोधी वैशिष्ट्यांनी बनलेला होता. लिखाणाच्या बाबतीत मात्र ते फार जागरूक आणि निष्ठावंत होते. त्यांची स्वतःच्या लेखनाविषयीची बांधीलकी इतकी जबर होती, की त्यासाठी ते कोणताही त्याग करायला व प्रचंड परिश्रमासाठी तयार असत. त्यांच्या प्रकाशित महत्त्वाच्या कृती अशा : कथासंग्रह : इन्सान के खंडहर (१९५७), नये बादल (१९५७), जानवर और जानवर (१९५८), फौलाद का आकाश (१९६६), रोये रेशे (१९६८) कादंबऱ्या : अंधेरे बंद कमरे (१९६१), न आनेवाला कल (१९६८), अन्तराल (१९७३) नाटके : आषाढ का एक दिन (१९५८), लहरों के राजहंस (१९६७), आधे अधूरे (ध्वनी नाटक १९७१), पैरे तले की जमीन (मोहन राकेश यांचे कमलेश्वरांनी पूर्ण केलेले नाटक १९७५) आखिरी चट्टान तक (प्रवास वर्णन १९६७). त्यांच्या सर्व कथा संकलित करून पहचान (१९७२), क्वार्टर (१९७२) आणि वारिस (१९७४) या तीन खंडांत प्रकाशित केल्या गेल्या आहेत.

मोहन राकेश यांची पूर्ण नाटके संख्येने केवळ तीन असली, तरी हिंदी नाट्यक्षेत्रात गुणवत्तेने व प्रयोगक्षम लेखनामुळे ते ‘प्रसादां’ नंतर महत्त्वाचे नाटककार मानले जातात.

आषाढ का एक दिनचा नायक कालिदास असला, तरी आधुनिक माणसाच्या एकटेपणाची, जीवनातल्या सुकोमल व तरल संवेदनांचा भीषण वास्तवाच्या आगीत होम होण्याची शोकान्त कथा या नाटकात केंद्रस्थानी आहे. राजाश्रयाच्या (सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि भौतिक शक्ती) पाठीमागे लागून सर्जनशील माणसाच्या भावनात्मक आणि मूल्यात्मक जीवनाची राखरांगोळी होते, त्याची व्यथा यात सांगितली आहे. मल्लिका आणि कालिदास यांच्या दर्दभऱ्या प्रेमकहाणीत अनेक जीवनसत्यांचा व अनेकार्थी आशयाचा व्यक्त झालेला हा अनुभव अतिशय करुणरम्य आहे. भीषण नियतीने मल्लिका व कालिदास यांच्या निष्पाप जीवनाचा केलेला मर्मभेद नाटकाला फार मोठी उंची देतो. लहरों के राजहंस नाटकाचा आशय व आषाढ का एक दिन याचा आशय यांत पुष्कळ साम्य आहे. या नाटकाचा आधार अश्वघोषाचे सौंदरानन्द काव्य आहे पण त्यातून व्यक्त होणारा आशय आधुनिक युगातील आहे. आधे अधूरेमध्ये राकेशजींनी सामाजिक वातावरणाचा उपयोग करून जीवनासंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न मांडले. माणसाचा परिस्थितीशी होणारा निरर्थक संघर्ष आणि माणसाच्या वाट्याला सदैव येत असलेले भावनात्मक संबंधांचे करंटेपण, एकटेपणाची बोचक जाणीव, कंटाळवाणेपणा यांवर या नाटकाची उभारणी झाली आहे. नाटकात त्यांनी नाट्यरूपासंबंधी सूक्ष्म प्रयोगही केले आहेत. आधुनिक मध्यमवर्गीय कुटुंबातले कित्येक ताण या नाटकातील पात्रांतून प्रभावीपणे मांडले गेले आहेत. आजच्या जीवनातला सर्वग्रासी असंतोष या सर्वच नाटकांत ताकदीने व्यक्त होतो. राकेशांच्या जवळजवळ सर्वच साहित्यावर अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव पडलेला आढळतो. पैरे तले की जमीनमध्ये ही अस्तित्ववादी विचारसरणी अधिक स्पष्टपणे व्यक्त होते. एक पूल तुटल्यामुळे ‘टूरिस्ट क्लब ऑफ इंडीया’ मध्ये जमलेल्या स्त्री-पुरुषांच्याप्रतिक्रियांतून व संबंधातून आधूनिक जगातिल संकटांचा प्रतीकात्मक आविष्कार केला आहे. राकेशनी अनेक एकांकिकांतही वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यांची प्रयोगशील वृत्ती नाटक या प्रकारातच अधिक आढळते.

राकेश यांच्या तीन कादंबऱ्या व सु. ४० कथा प्रसिद्ध झाल्या. अंधेरे बंद कमरे या कादंबरीत त्यांनी मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या संबंधातले विलक्षण ताण साकार केले आहेत. अंधेरे बंद कमरेमध्ये मध्यमवर्गीय जीवनाचा पट विस्तृत आहे. पुढे तो न आनेवाला कल आणि अन्तरालमध्ये छोटा होत जातो पण राकेश यांची कलात्मकता अधिक सूक्ष्म होते, तीव्रता वाढते, जीवनाचे विसंगत, निरर्थक व यातनामय रूप अधिक बारकाव्यांनी व्यक्त होते.

हिंदी कथेला नवकथेचे रूप देण्याचा १९५५–६० च्या आसपास ज्यांनी प्रयत्न केला, त्यांत मोहन राकेश यांचे नाव प्रामुख्याने पुढे येते. राकेश यांची कथा कादंबरीप्रमाणेच मध्यमवर्गाच्या नागर संवेदनेचे चित्रण करते. त्यांची कथा माणसाच्या गुंतागुंतीच्या मनोव्यापाराचा सामर्थ्याने वेध घेते. सारिका पत्रिकेचे संपादन करीत असताना कथेसंबंधी राकेशनी केलेले लेखनही त्यांच्या प्रगल्भ जाणिवेचे दर्शन घडवते.

भटक्या राकेशनी आखिरी चट्टान तकमध्ये केलेले प्रवासवर्णनही महत्त्वाचे आहे. दक्षिण भारताच्या प्रवासाची ही संस्मरणे आहेत. निसर्ग, माणसे यांबद्दल राकेश यांना असलेले कुतूहल यात व्यक्त झाले आहे. उण्यापुऱ्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या आयुष्यात राकेश यांनी हिंदी नाटक, कादंबरी व कथा यांत घातलेली भर फार मोलाची ठरली आहे.

संदर्भ : १. बनाल, पुष्पा, मोहन राकेश का नाट्य साहित्य, दिल्ली, १९७६.

            २. शर्मा, जगदीश, मोहन राकेश की रंग-सृष्टी, दिल्ली, १९७५.

बांदिवडेकर, चंद्रकांत