धर्मवीर भारती

भारती, धर्मवीर : (२५ डिसेंबर १९२६ – ). आधुनिक हिंदी साहित्यिक व धर्मयुग या हिंदी साप्ताहिकाचे संपादक. जन्म अलाहाबाद येथे. आठव्या इयत्ते असतानाच भारतींच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे अलाहाबादमध्येच राहणारे मामा अभयकृष्ण जौहरी यांच्याकडे भारतींना रहावे लागले व त्यांच्याच प्रोत्साहनाने त्यांचे पुढचे शिक्षण झाले. ४२ च्या आंदोलनात भाग घेतल्यामुळे एक वर्ष शिक्षणात खंड पडला. १९४५ मध्ये बी. ए. परीक्षेत हिंदी विषयात सर्वप्रथम येऊन त्यांनी ‘चिंतामणी घोष पदक’ मिळवले. १९४७ मध्ये ते प्रथम श्रेणीत एम्. ए. झाले. पुढे धीरेंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सिद्ध साहित्य’ या विषयावर संशोधन करून त्यांनी पी. एच्. डी. मिळवली.

अभ्युदय पत्रिकेत अर्धवेळ नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतले. १९४४ साली संगममध्ये सहकारी संपादक झाले. नंतर एक वर्ष हिंदुस्तानी अकॅडेमीमध्ये उपसचिवाचे काम केले. नंतर प्रयाग विश्वविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९६० पर्यंत तेथे कार्य केल्यावर धर्मयुग या प्रसिद्ध साप्ताहिकाचे संपादक म्हणून ते मुंबईस आले व तेव्हापासून आजपर्यंत धर्मयुग मध्येच प्रमुख संपादक या नात्याने कार्य करीत आहेत.

कॉमनवेल्थ रिलेशन्स कमेटीच्या निमंत्रणावरून १९६१ मध्ये पहिली विदेश यात्रा त्यांनी केली. इंग्लंड व यूरोपीय देशांत ते जाऊन आले. १९६२ मध्ये जर्मनीचा, १९६६ मध्ये इंडोनेशिया व थायलंडचाही त्यांनी प्रवास केला. १९६७ मध्ये संगीत अकादमीचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९७१ मध्ये त्यांनी मुक्तिवाहिनीबरोबर बांगला देशाची गुप्त यात्रा केली व त्या क्रांतीचे प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले विवरण धर्मयुग मधून प्रकाशित केले. १९७१ मधील भारत – पाक युद्धाच्या वेळी भारतीय स्थलसेनेबरोबर युद्धआघाडीवरील रोमहर्षक अनुभवही त्यांनी घेतला. १९७४ मध्ये त्यांनी मॉरिशसची यात्रा केली व मॉरिशसच्या भारतीय रहिवाशांच्या समस्यांचे अध्ययन केले. १९७२ मध्ये सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा गौरव केला.

भारती बहुमुखी प्रतिभेचे लेखक असून मुख्यतः ते कवी म्हणून प्रख्यात आहेत. ‘अज्ञेय’ यांनी संपादित केलेल्या दूसरा सप्तक मध्ये प्रातिनिधिक महत्वाचे कवी म्हणून त्यांचा समावेश झाला आहे. त्यांचे नाटक अंधायुग (१९५५) हिंदी साहित्यात एक मैलाचा दगड मानले जाते. कौरव पांडवांच्या भारतीय युद्धाची समाप्ती आणि त्यानंतरची जीवनात आलेली मूल्यभ्रष्टता व दारुण दुःख ही या पद्य नाटकाची पार्श्वभूमी आहे. पण यातून भारतींनी स्वातंत्र्यानंतर भारतात निर्माण झालेल्या दारुण व शोकजनक परिस्थितीचा वेध घेतला असून समकालीन माणसाच्या शोकान्त नियतीचे मोठे करुण गंभीर चित्र रेखाटले आहे. भारती विचारांनी आधुनिक आहेत पण त्यांचे विचार व भावना यांना भारतीय परंपरेचा सुदृढ आधार आहे हे त्यांच्या अंधायुगमध्येच नव्हे, तर कनुप्रियासारख्या तरल, कोमल, काव्यातूनही स्पष्ट दिसते. कनुप्रिया (१९५८) मध्ये राधेच्या उत्कट प्रणयभावनेतील वेदना व्यक्त करण्यात कवीला कमालीचे यश लाभले आहे पण त्यापलीकडे जाऊन भारतीय समाजात पुरुषाने स्त्रीच्या केलेल्या उपेक्षेचे व स्त्री पुरुषांच्या प्रेमगर्भ द्वंद्वात्मकतेचे चिरंतन भावविश्वही त्यात उमटले आहे. ठंडा लोह (१९५२), सात गीत वर्ष (१९५७) या काव्यसंग्रहांत त्यांची स्फुट कविता संकलित आहे.

भारतींना हिंदीच्या ‘नयी कथा’ आंदोलनात भरीव कामगिरी केली आहे. मुर्दों का गांव (१९४८), चांद और टूटे हुए लोग (१९५२), बंद गली की आखिरी मकान (१९६४) हे त्यांचे तीन कथासंग्रह गुणवत्तेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. ऐन पंचविशीत लिहिलेली त्यांची कादंबरी गुनाहोंका देवता (१९४९) लोकप्रियतेच्या दृष्टीने फारच गाजली. सूरज का सातवां घोडा (१९५१) ही कादंबरी प्रयोगधर्मी असून वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून ती त्यांनी लिहिलेली आहे. या कादंबरीतही समकालीन जीवनातील विसंगती व मूल्यभ्रष्टता तीव्रपणे व्यक्त झाली आहे.

भारतींच्या गद्यलेखनात नाट्यात्मकतेचा गुण आहेच पण त्यांचा नदी प्यासी थी (१९५४) हा एकांकिकासंग्रह त्यांच्या या गुणाची पूर्ण साक्ष देतो. भारतींच्या निबंधसाहित्यात त्यांनी देशोदेशी केलेल्या प्रवासाची मोठी सुंदर वर्णने असून मार्मिक अवलोकनक्षमता, भिन्न भिन्न संस्कृतींतील वैशिष्ट्ये टिपण्याचे कौशल्य यांचा चांगला प्रत्यय येतो. ठेले पर हिमालय (१९५३), कहनी अनकहनी (१९६५), पश्यंती (१९६६) हे त्यांचे निबंध संग्रह होत.

धर्मवीर भारतींनी हिंदी साहित्यातील नव्या वैचारिक व साहित्यिक चळवळीत सक्रिय भाग घेतला व नव्या साहित्याच्या प्रतिष्ठापनेसाठी विचारांची बैठक प्राप्त करून दिली. मानवमूल्य और साहित्य (१९६२) हा त्यांचा दर्जेदार ग्रंथ हिंदी वैचारिक साहित्यात महत्वाचा मानला जातो. तत्पूर्वी त्यांनी प्रगतिवाद : एक समीक्षा (१९५३) या ग्रंथात साम्यवाद व त्याचे साहित्यिक विचार यांचा उत्तम परामर्श घेतला आहे. याशिवाय त्यांनी निकष व आलोचनासारख्या प्रतिष्ठित साहित्यिक नियतकालिकांच्या संपादनकार्यातही सहयोग दिला आहे. १९६० पर्यंत साहित्यिक म्हणून व त्यानंतर धर्मयुग चे संपादक म्हणून भारतींनी हिंदी साहित्याची केलेली सेवा मोठी आहे.

संदर्भ : राजपाल, हुकुमचंद, धर्मवीर भारती :साहित्य के विविध आयाम, साहिदाबाद, १९८०.

बांदिवलेकर, चंद्रकांत