कबीर : (सु. १३९८ – सु. १५१८). उत्तर भारतातील प्रख्यात संतकवी. त्याच्या जीवनाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. कबीराबद्दल अनेक आख्यायिका मात्र प्रसिद्ध आहेत. त्याचा जन्म-मृत्यू, जात, धर्म, गुरुपरंपरा इत्यादींबाबत विद्वानांत मतभेद आहेत.

सामान्यतः विक्रम संवत १४५५ (इ. स. १३९८) ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेस, सोमवारी त्याचा जन्म झाला असे सर्वमान्य मत आहे. मात्र मृत्यूसंबंधी पुढील तीन तिथ्या सांगितल्या जातात आणि त्या विवाद्य आहेत : (१) माघ शुद्ध ११, सं. १५७५ (इ. स. १५१८), (२) सं. १५५२ (इ. स. १४९५) आणि (३) मार्गशीर्ष शुद्ध ११, सं. १५०५ (इ. स. १४४८). सामान्यपणे मृत्यूची तिथी संवत १५७५ मानली जाते. म्हणजे तो १२० वर्षे जगला. कबीर ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्मास आला. लोकलाजेस्तव तिने काशीजवळील लहरतारा तलावापाशी त्याला सोडून दिले. पुढे नीरू नावाच्या मुसलमान कोष्ट्याने त्याचा प्रतिपाळ केला, अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. तो हिंदू होता की मुसलमान, हाही विवाद्य प्रश्न आहे. तो नाथपंथी ‘जुगी ’ किंवा ‘जोगी ’ जातीचा असावा,असेही एक मत आहे. तो अविवाहित होता, असे काहीजण मानतात, तर काहीजण तो विवाहित होता (पत्‍नी लोई) आणि त्याला दोन मुले होती, असेही मानतात. कमाल हा त्याचा पुत्र व शिष्य असल्याचेही सांगतात. त्याचा गुरू कोण हाही विवाद्य प्रश्न असून काहींच्या मते तो रामानंदांचा शिष्य होता, तर काहींच्या मते तो शेख तकींचा शिष्य होता. त्याचे वास्तव्य काशी येथे होते आणि व्यवसाय कोष्ट्याचा होता तसेच त्याचा मृत्यू गोरखपूरजवळील मगहर गावी झाला, यांविषयी मात्र सर्वांचेच एकमत आहे.

संत कबीर

कबीराच्या साहित्यावर व विचारांवर हिंदू, मुसलमान, सूफी, योगमार्गी, नाथपंथी या सर्वांचा प्रभाव आढळतो. त्यामुळेच अनेक वाद निर्माण झाले असावेत. कबीर निरक्षर असला, तरी ज्ञानी व बहुश्रुत होता. त्याची सर्व रचना मौखिक होती व ती त्याच्या अनुयायांनी लेखनबद्ध केली. कबीर ग्रंथावली  व कबीर-बीजक वा बीजक हे त्याच्या रचनेचे अधिकृत संग्रह मानले जातात. तथापि त्यांतही अनेक पाठभेद आढळतात. शिखांच्या ⇨ग्रंथसाहिबातही कबीराची काही पदे समाविष्ट आहेत.

कबीराने कोणताही एक विशिष्ट पंथ अगर धर्म न अनुसरता साक्षात्कारी (स्वानुभवाच्या) ज्ञानालाच अधिक महत्त्व दिले. परमतत्त्व एकच असून ते  सगुण-निर्गुणभेदातीत आहे. अद्वैत मताचा त्याच्या परमतत्त्वविषयक मतावर प्रभाव पडलेला आढळतो. दृश्यमान जगत माया असून, कनक आणि कांता यांच्या रूपाने ही माया साधकाला छळते, असे तो म्हणतो. ईश्वरोपासनेसाठी त्याने योगमार्ग व ⇨ भक्तिमार्ग या दोहोंचाही पुरस्कार केला असला, तरी भक्तिमार्गावर अधिक भर दिलेला आहे. त्याची भक्ती प्रेमावर आधारलेली असून, ईश्वराशी त्याने गुरू, राजा, माता-पिता, स्वामी, मित्र, सखा, पती अशा अनेक नात्यांनी आपला संबंध प्रस्थापित केला आहे. मात्र या सर्वांत ईश्वर हा प्रियकर वा पती आणि भक्त,प्रेयसी व पत्‍नी या नात्यालाच त्याने अधिक महत्त्व दिले आहे. ⇨सूफी पंथाचा प्रभाव त्यावरून स्पष्ट होतो. या संबंधातूनच स्फुरलेली कबीराची गूढगुंजनपर कविता उत्कट आहे. शुद्ध चारित्र्य, निर्वैरता, निष्कामता, अनासक्ती व सात्विक राहणी या गुणांना तो अधिक महत्त्व देई.

जातपात, कुलाभिमान, धर्मभेद, रूढी, व्रतवैकल्ये, कर्मकांड इत्यादींवर त्याचा काडीमात्र विश्वास नव्हता. हिंदू अगर इस्लामी धर्ममार्तंडांच्या दोषांवर,विसंगतींवर व चारित्र्यहीनतेवर त्याने कडाडून हल्ले केले आहेत. त्याच्या काव्यातील दृष्टांतांतून, प्रतीकांतून, युक्तिवादांतून व प्रामाणिक अनुभूतींतून त्याच्या असामान्य प्रतिभेची साक्ष पटते. तत्कालीन समाजाबाबतचे त्याचे निरीक्षण सूक्ष्म असून, त्याच्या निर्भय, साहसी आणि कलंदर व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन त्याच्या काव्यरचनेतून घडते. कबीराने तत्कालीन धार्मिक मतभेदांची तीव्रता कमी करून वैष्णव आचार्यांचा भक्तिमार्ग सामान्य जनतेपर्यंत आणून पोहोचविला. बाह्य कर्मकांडात रुतून बसलेली धर्माची मूळ मानवतावादी तत्त्वे शोधण्याचा व त्यांचा पुरस्कार करण्याचा त्याने यशस्वी प्रयत्‍न केला. अद्वैती, सूफी, योगमार्गी,भक्तिमार्गी या सर्वांनाच आपलासा वाटावा, असा भक्तिमार्ग रूढ करण्याचा त्याने प्रयत्‍न केला. अनेक हिंदू-मुस्लीम कबीर पंथाचे अनुयायी झाले.

कबीराची भाषा पूरबी हिंदी असल्याचे त्यानेच नमूद करून ठेवले आहे. तथापि तीत व्रज, अवधी, खडी बोली, भोजपुरी, फार्सी, अरबी इ. बोलींतील व भाषांतील अनेक शब्दही आढळतात. त्याच्या भाषेला ‘सधुक्कडी’ असे म्हटले जाते आणि ती संमिश्र स्वरूपाची आहे. खडी बोलीचा तिच्यावर विशेष प्रभाव दिसतो. त्याच्या काव्यात रूपक, उत्प्रेक्षा, दृष्टांत इत्यादींचा वापर सर्रास दिसतो. त्याने ‘उल्टवाँसी ’ (विरोधी भासणारी शब्दरचना) प्रकारातही बरीच रचना केलेली आढळते. कवी म्हणून हिंदी साहित्यात कबीराचे स्थान श्रेष्ठ आहे.

संदर्भ : 1. Machwe, Prabhakar, Kabir, Delhi, 1968.

 २.चतुर्वेदी, परशुराम, कबीरसाहित्यकीपरख, अलाहाबाद, १९५४.

 ३. तिवारी, पारसनाथ अनु.कामत, अ.प्र.कबीर, दिल्ली, १९६७.

 ४.तिवारी,  भोलानाथ,कबीरऔरउनकाकाव्य, दिल्ली, १९६२,

 ५.त्रिगुणायत, गोविंद,  कबीरकीविचारधारा, कानपूर, १९५२.

 ६.द्विवेदी, हजारीप्रसाद, कबीर,  मुंबई, १९६०.

बांदिवडेकर, चंद्रकांत