शुक्ल, रामचंद्र : (? १८८४–? १९४०). हिंदी समीक्षक, निबंधकार व साहित्येतिहासकार. उत्तर प्रदेशातील ‘अगोना’ या गावी जन्म. रामचंद्र शुक्लांचे शालेय शिक्षण मिशन स्कूलमध्ये झाले. गणित विषय कच्चा असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून घरीच साहित्य, इतिहास, मानसशास्त्र इ. विषयांचा त्यांनी अभ्यास केला. भारतेंदु मंडळातील एक लेखक पं. बदरीनारायण चौधरी-‘प्रेमघन’ यांच्या सहवासात राहून त्यांनी हिंदी, उर्दू, संस्कृत व इंग्रजी साहित्याचे भरपूर वाचन केले. महात्मा गांधी काशी विद्यापीठात प्रारंभी हिंदीचे प्राध्यापक (१९१९–३७) व पुढे अखेरपर्यंत विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले.

आदर्श जीवन (१९१४), विश्वप्रपंच (१९२०), बुद्धचरित (१९२२), जायसी ग्रंथावली (१९२४), हिंदी साहित्य का इतिहास (१९२९ व सुधा. आवृ. १९४०), गोस्वामी तुलसीदास (१९४३), सूरदास (१९४३), चिंतामणी  (दोन भाग, १९३९, १९४५), रसमीमांसा (१९४९), भाषा की शक्ती इ. त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. अखेरचे काही ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाले. रामचंद्र शुक्लांनी विविध प्रकारचे लेखन केले. चिंतामणी या पुस्तकात त्यांचे निबंध आहेत. ब्रज व हिंदी भाषांतील त्यांच्या काही कविताही उपलब्ध आहेत. एडविन आर्नल्डच्या लाइट ऑफ एशिया या पुस्तकाचा पद्यानुवाद बुद्धचरित या नावाने त्यांनी केला (१९२२). इतरही काही अनुवाद त्यांनी केले.

हिंदी साहित्यात शास्त्रीय समीक्षेची सुरुवात रामचंद्र शुक्लांनी केली. रीतिप्रधान काव्यसमीक्षेच्या प्रभावकाळात त्यांनी रीतीच्या ऐवजी भक्तीवर भर दिला. ‘लोकमंगल’ ही त्यांची संकल्पना साहित्याचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ अधोरेखित करणारी आहे. हिंदीतील जायसी, सूरदास व तुलसीदास यांच्या काव्यावरील समीक्षेतून त्यांनी उपयोजित समीक्षेचे आदर्श प्रस्थापित केले. ‘काव्य में अभिव्यंजनवाद’ या त्यांच्या लेखावरून पाश्चात्त्य समीक्षाविचारांचे त्यांचे सखोल अध्ययन दिसून येते. रससिद्धांतासंबंधी त्यांनी ‘साधारणीकरणा’च्या प्रक्रियेची नवी मीमांसा केली. निबंध आणि समीक्षेच्या प्रांतात ते युगप्रवर्तक म्हणून ओळखले जातात.

सारडा, निर्मला