जगदीशचंद्र माथुरमाथुर, जगदीशचंद्र : (१६ जुलै १९१७–१४ मे १९७८). आधुनिक हिंदी नाटककार व एकांकिका लेखक. जन्म शाहजहानपूर (उत्तर प्रदेश) येथे. अलाहाबाद विद्यापीठातून एम्. ए. झाल्यानंतर ते आय्.सी. एस्. झाले. बराच काळ आकाशवाणीवर ते महासंचालक म्हणून होते. संगीत-नाटक अकादेमीचेही ते सदस्य होते.

वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी लेखनास आरंभ केला. १९३६ मध्ये त्यांची पहिली एकांकिका ‘मेरी बांसुरी’ रंगभूमीवर आली आणि लगेचच ती सरस्वती नियतकालिकातून प्रसिद्धही झाली. भोर का तारा (१९४६) हा त्यांचा पहिला गाजलेला एकांकिकासंग्रह. नंतर १९५६ मध्ये त्यांचा ओ मेरे सपने हा एकांकिकासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या काही एकांकिका आकाशवाणीवरूनही प्रसृत करण्यात आल्या.

कोणार्क (१९५०), कुंवरसिंह की टेक (१९५५), आशादीप (१९५६), शारदीया (१९५९) आणि पहला राजा (१९६९) ही त्यांची गाजलेली दर्जेदार नाटके होत. पहला राजा हे त्यांचे प्रतीकात्मक नाटक असून ते पृथू ह्या पौराणिक व्यक्ति रेखेवर आधारलेले आहे. त्यातून आधुनिक काळाला उचित असे विचार व्यक्त झाले आहेत. त्यांच्या एकांकिका व नाटकांतून सामाजिक वास्तवाचे तसेच विविध सामाजिक समस्यांचे व्यंग्यात्मक दर्शनही घडते. शारदीया नाटकात नवा प्रयोग आढळतो. या नाटकाचे कथानक दौलतराव शिंदे या मराठा वीराच्या जीवनातील प्रसंगावर आधारलेले आहे. भावनेची तीव्रता व प्रयोगक्षमता ही त्यांच्या नाट्यलेखनाची इतर वैशिष्ट्ये होत. 

नाट्यलेखनाव्यतिरिक्त त्यांनी एक समदर्शी के अनुभव (१९५५) नावाने आपल्या आठवणी आणि दस तसविरें (दुसरी आवृ. १९६४) हा त्यांच्या आयुष्यात आलेल्या व त्यांना प्रभावित करणाऱ्या विविध क्षेत्रांतील दहा प्रसिद्ध व्यक्तींची शब्दचित्रे रेखाटणारा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचे दस तसविरेंचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांचे इतर ग्रंथ असे : दशरथनंदन (नाटक), रघुकुलरीति (नाटक), मेरे श्रेष्ठ रंग एकांकी (एकांकिकासंग्रह) व जिन्होंने जीना जाना (व्यक्तिपरिचय).

दुबे, चंदूलाल द्रविड, व्यं. वि.