भूषण : (१६१३ – १७१५). रीतिकालीन प्रख्यात हिंदी कवी भूषण हे हिंदी रितिकाव्ययुगात जन्मले परंतु त्यांनी वीररसात्मक कविता लिहिली आणि त्यामुळेच ते विशेष प्रसिद्ध आहेत. ते काश्यप गोत्री कान्यकुब्ज ब्राम्हण. जन्म कानपूर जिल्हातील तिकवाँपुर (त्रिविक्रमपूर) येथे. भूषण यांचे मूळ नाव ज्ञात नाही. चित्रकूटनरेश रूद्रदेव सोळंकी यांनी ‘भूषण’ हे नाव कवीला मानाने दिले व तेच रूढ झाले. वडीलांचे नाव रत्नाकर त्रिपाठी. भूषण यांच्या अन्य तीन भावांची नावे-चिंतामणी, ⇨ मतिराम व नीलकंठ. पहिले दोघे हिंदी कवी होते. भूषण यांच्या जन्माबाबत शिवसिंह सेंगर १६८१, ग्रीअर्सन १६०३ आणि रामचंद्र शुक्ल १६१३ हे सन देतात. यांतील १६१३ हा अधिक ग्राह्य मानला जातो. भूषण शिवाजीचे समकालीन होते. शाहू, बाजीराव, सोळंकी, महाराज जयसिंग, महाराज रानसिंह, अनिरूद्ध, राव बुद्ध, कुमाऊँनरेश, गढवाल नरेश, औरंगजेब, दारा शुकोह इत्यादींची प्रशंसा करणारे फुटकळ छंद भूषण यांनी लिहिले आहेत. अर्थात या सर्वांचे ते आश्रित होते असे नाही मात्र शिवाजी, औरंगजेब, छत्रसाल व सोळंकी यांनी भूषण यांना आश्रय दिला होता, असे अभ्यासक मानतात.

भूषण यांनी रचलेले सहा ग्रंथ सांगितले जातात : शिवराजभूषण, शिवबावनी, छत्रसालदशक, भूषणहजारा, भूषणउल्हास व दूषण उल्हास. पैकी पहिले तीन उपलब्ध आहेत. भूषण यांचे सर्व काव्य फुटकळ स्वरूपाचे व मुक्तक प्रकारातील आहे. रितिकालीन परंपरेप्रमाणे त्यांनी काही कविता लिहिली पण त्यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. भूषण यांची वीररसप्रधान कविता विशेष प्रसिद्ध आहे. युद्धवीर, दयावीर, दानवीर, व धर्मवीर या चारही प्रकारच्या वीरांची वर्णने त्यांनी केली आहेत पण युद्धवीरांचे वर्णन करण्यात त्यांना अधिक यश मिळाले आहे. इतर रीतिकालीन कवींच्या तुलनेने कल्पनाशक्ती, विद्वत्ता, आचार्यत्व, कलाकौशल्य यांत भूषण कमी असले, तरी हिंदू राष्ट्राचा उद्धार करणाऱ्या शिवाजीला नायक बनवून त्यांनी काव्यरचना केली हे त्यांचे वैशिष्ट्य होय. एक प्रकारे समकालीन राजकीय घडामोडींचे महत्त्व ध्यानात घेऊन कविता लिहिणारे जागरूक कवी म्हणून भूषण यांचे महत्त्व आहे. म्हणूनच शिवाजी व छत्रसाल यांच्याबद्दल लिहिलेली भूषण यांची कविता सामान्य जनतेत गौरवभूत झाली आहे. शिवराजभूषण हे प्रसिद्ध काव्य त्यांनी १६७३ मध्ये पूर्ण केले असून त्यात कवित्त व सवैया वृतांत रचलेले एकूण ३८४ छंद आहेत. हा अलंकारशास्त्रावरील ग्रंथ असून त्यात १०५ अलंकारांची लक्षणे देऊन उदाहरणांसहित विवेचन केले आहे. अलंकारलक्षणांच्या दृष्टीने काहीसा सदोष असा ग्रंथ असला, तरी त्यातील विविध रसात्मक उदाहरणांमुळे तो वाचनीय झाला आहे. जयदेवाच्या चंद्रालोक या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव या ग्रंथावर आहे. या ग्रंथाच्या लेखनाची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे वास्तवपूर्ण व उदात्त राष्ट्रीय भावनेने ओथंबलेले सूचक वर्णन अलंकारनिरूपण करताना आले आहे. शिवबावनी मध्ये ५२ छंदांत शिवाजी महाराजांची कीर्ती गाइली आहे. छत्रसालदशकमध्ये १० छंदांत छत्रसालाचे यश व गुणगान आहे. त्यांची भाषा वीररसाला अनूकूल अशी आहे. साहित्यिक दृष्ट्या भूषण यांची भाषा सौंदर्य व सौष्ठव यांनी युक्त नसली, तरी तिच्यातील शब्दांचा नाद आणि ओज यांमुळे वीररसाची निष्पत्ती उत्तम तऱ्हेने होते. त्यांची भाषा ब्रज असून त्यात प्रसंगानुसार अरबी, फार्सी, तुर्की, बुंदेलखंडी, व बैसवाडी शब्दांचा उपयोग केला आहे.

भूषण यांच्या सर्व रचनेचा रा. गो. काटे यांनी संपूर्ण भूषण (१९३०) ह्या शीर्षकाने आणि शिवराजभूषणचा दु. आ. तिवारी यांनी मराठी शिवराजभूषण (१९३१) ह्या शीर्षकाने मराठीत अनुवाद केला आहे.

संदर्भ :

१. दीक्षित, भगीरथप्रसाद, महाकवी भूषण, अलाहाबाद, १९६३.

२. मिश्र, विश्वनाथप्रसाद, संपा भूषण ग्रंथावली, वाराणसी, १९३१.

३. सिंह, हरदायालु, संपा भूषण भारती, अलाहाबाद, १९५८.

बांदिवडेकर, चंद्रकांत