पराडकर, बाबूराव विष्णु : (१६ नोव्हेंबर १८८३–१२ जानेवारी १९५५). नामवंत हिंदी पत्रकार. जन्म वाराणसी येथे. त्यांचे घराणे महाराष्ट्रातील. बाबूरावांचे आई-वडील अन्नपूर्णाबाई व विष्णुशास्त्री महाराष्ट्रातून वाराणसीला येऊन स्थायिक झाले. विष्णुशास्त्री हे संस्कृतचे पंडित होते. बाबूरावांचे मूळ नाव सदाशिव, परंतु ‘बाबू’ हे वडिलांनी प्रेमाने दिलेले नावच पुढे रूढ झाले. सुरुवातीस संस्कृतचे अध्ययन झाल्यावर १९०० मध्ये ते भागलपूर येथून मॅट्रिक झाले. १९०३ मध्ये त्यांचा विवाह झाला.

वडिलांच्या निधनानंतर १९०६ मध्ये ते कलकत्त्यास त्यांच्या मामांकडे गेले. प्रख्यात पत्रकार ⇨ सखाराम गणेश देउसकर हे त्यांचे मामा. तेथे मामांकडून त्यांनी हिंदी वंगवासी  या पत्रात संपादनाचे प्राथमिक धडे घेतले (१९०६-१९०७). तेथे अंबिकाप्रसाद वाजपेयी, बदरीनारायण चौधरी ‘प्रेमधन’ यांसारख्या विद्वान हिंदी साहित्यिकांशी तसेच रासबिहारी घोष आणि अरविंद घोष यांसारख्या क्रांतिकारकांशी त्यांचा संबंध आला. नंतर १९०७ ते १० ह्या काळात ते हितवार्ता या हिंदी साप्ताहिकाचे संपादक होते. या वेळीच ते बंगाल नॅशनल महाविद्यालयात हिंदी व मराठीचेही अध्यापन करू लागले. १९११ मध्ये ते भारतमित्र ह्या (साप्ताहिकाचे दैनिक झालेल्या) पत्राचे संयुक्त संपादक झाले. हितवार्तामध्ये राजकीय विषयांवर गंभीर स्वरूपाचे टीकालेखन करून त्यांनी हिंदी पत्रसृष्टीत एक नवीन परंपरा सुरू केली. सुरुवातीपासूनच त्यांनी राष्ट्रीय भावनेतून संपादन कार्य केले. संपादनासोबतच त्यांनी राजकारणातही सक्रिय भाग घेतला. १९१६ मध्ये राजद्रोहाच्या संशयावरून त्यांना अटक झाली व साडेतीन वर्षे नजरकैदेत रहावे लागले. १९२० मध्ये नजरकैदेतून मुक्त होताच ते वाराणशीस आले. १९२० मध्ये तेथून ‘ज्ञानमंडल’ संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या आज ह्या दैनिक पत्राचे संपादकत्व त्यांना व श्रीप्रकाश यांना देण्यात आले. सुमारे चार वर्षे ते ह्या पत्राचे संयुक्त संपादक होते. नंतर ते त्याचे संपादक व १९३४ पासून अखेरपर्यंत प्रमुख संपादक होते. १९४३ ते ४७ ह्या काळात ते संसार ह्या पत्राचे संपादक होते. हिंदीतील अग्रगण्य पत्र म्हणून आज ह्या दैनिकास उच्च स्थान प्राप्त करून देण्याचे व ते लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. या पत्राद्वारे त्यांनी केलेले हिंदी भाषेच्या विकासाचे व राष्ट्रजागृतीचे कार्य चिरंतन स्वरूपाचे आहे.

सोळाव्या हिंदी साहित्य संमेलनाच्या अधिवेशनात संपादक संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९२५). सिमला येथे भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९३१). संमेलनात त्यांना ‘साहित्य वाचस्पति’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. गीतेवरील हिंदी भाष्य (१९२४) तसेच बंगालीतील देशेर कथा (१९०४) ह्या देउसकरांच्या प्रसिद्ध ग्रंथाचा त्यांनी देशकी बात नावाने हिंदीत अनुवादही केला. हिंदी भाषेत त्यांनी शेकडो नवे पारिभाषिक शब्द रूढ केले. त्यांची शैली स्वतंत्र असून लहान लहान वाक्यांद्वारे क्लिष्ट विषयही सुबोध करून सांगणे, हा तिचा विशेष म्हणावा लागेल. वाराणसी येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : व्यास, लक्ष्मीशंकर, पराडकरजी और पत्रकारिता, बनारस, १९६०.

बांदिवडेकर, चंद्रकांत