शेष, शंकर : (२ ऑक्टोबर १९३३-२८ नोव्हेंबर १९८१). ख्यातनाम हिंदी नाटककार. जन्म मध्य प्रदेशातील बिलासपूर येथे. त्यांचे वडील नागोराव शेष, आई सावित्रीदेवी. नागोराव संपन्न कुटुंबातले.त्यांना नाटक-संगीतात रस होता. ते तबलाही वाजवीत. कधीकधी नाटकांना तबल्याची साथही करीत. शंकर शेष ह्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिलासपूर येथे झाले आणि महाविदयालयीन शिक्षण त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजात घेतले. लहानपणापासूनच त्यांना लेखनाची आवड होती. महाविदयालयीन जीवनात (१९५२-५६) शिक्षण घेत असतानाच ते एकांकिका लिहीत होते. विदयार्थिदशेतच आकाशवाणीसारख्या प्रभावी माध्यमासाठी लिहिण्याची संधीही त्यांना मिळाली. मूर्तिकार (१९५५) ही त्यांची पहिली नाट्यकृती. नागपूर विदयापीठातून बी.ए. झाल्यानंतर मॉरिस कॉलेजातच ते अध्यापन करू लागले. त्यांची नोकरी शासकीय असल्यामुळे ठिकठिकाणी त्यांच्या बदल्या होत.१९६१ मध्ये ‘ हिंदी और मराठी साहित्यका तुलनात्मक अध्ययन ’ ह्या प्रबंधासाठी त्यांना नागपूर विदयापीठाची डॉक्टरेट मिळाली. मध्य प्रदेश शासनाच्या शिक्षण विभागातील ‘ आदिम जाती अनुसंधान संस्थान ’मध्ये अधिकारी म्हणून पतिनियुक्ती झाल्यामुळे बिलासपूर-रायपूरच्या दरम्यान असलेल्या प्रदेशातील छत्तीसगडी भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची त्यांना संधी मिळाली. तीतूनच छत्तीसगडी भाषाका शास्त्रीय अध्ययन हा त्यांचा गंथ निर्माण झाला. उपर्युक्त संस्थेमध्ये अधिकारी म्हणून काम करीत असताना आदिवासींच्या जनजीवनाचेही त्यांना जवळून दर्शन झाले. भूमिहीन शेतकऱ्यांवर जमीनदार, वनाधिकारी करीत असलेले अत्याचार त्यांनी पाहिले. त्यातून निर्माण झालेली त्यांच्या मनाची बेचैनी त्यांच्या पोस्टर (१९७७) ह्या नाटकात प्रकट झालेली आहे. १९६८ मध्ये ते पुन्हा अध्यापनाच्या क्षेत्रात आले आणि भोपाळच्या हमीदिया कॉलेजात हिंदीचे अध्यापन करू लागले. १९७० मध्ये मध्य प्रदेश गंथ अकादमीचे सहायक म्हणून पुन्हा त्यांची नियुक्ती झाली. गंथ अकादमीत चार वर्षे काम केल्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ते भारतीय स्टेट बँकेत नोकरीस आले. स्टेट बँकेच्या मुंबई येथील केंद्रीय कार्यालयात राजभाषा विभागाचे ते मुख्याधिकारी होते. मुंबईत असताना चित्रपट, दूरदर्शन, प्रायोगिक रंगभूमी, आकाशवाणी इ. क्षेत्रांमध्ये त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला.
शंकर शेष ह्यांची स्वतःची अशी एक नाट्यलेखन-प्रक्रिया होती. नाटक लिहिताना ते कल्पनेच्या भव्य मंचावर मन:चक्षूंनी एकट्याने पाहणे, हा ह्या प्रक्रियेचा पहिला टप्पा. त्यानंतर नाटक शब्दबद्ध करून ते रंगमंचावर आणणे, हा दुसरा टप्पा. त्यांची नाटके वाचनीयता आणि मंचीयता ह्या दोन्ही निकषांवर यशस्वी ठरली. लोकनाट्याशी निकटचे नाते सांगणारी गीते, नृत्ये इत्यादींच्या आधारे त्यांनी आपल्या नाटकांतले नाट्य अधिक परिणामकारक केले. पोस्टर, अरे मायावी सरोवर, राक्षस ह्यांसारख्या त्यांच्या नाट्यकृतींतून त्यांनी लोकनृत्य आणि लोकसंगीत ह्यांचा अत्यंत व्यापक व वैविध्यपूर्ण प्रयोग केला. दृश्यबदलासाठी प्रकाशयोजनेचा सर्जनशील वापर, समर्थ रंगभाषेतून व्यक्त होणारा अंत:संघर्ष, मार्मिक संवाद ही त्यांच्या नाटकांची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.कीर्तन,समूहगीते, आरत्या, भजन ह्यांचाही समावेश आवश्यकतेनुसार त्यांनी आपल्या नाट्यकृतींसाठी करून घेतला. त्यांच्याकाही नाटकांतून सूत्रधारही आहे. मिथकांचाही त्यांनी आपल्या नाटकांतून उपयोग करून त्यांचा समकालीन जीवनातील समस्यांशी संबंध प्रस्थापित केला.
आपल्या नाट्यसाहित्यातून त्यांनी आधुनिक मध्यमवर्गीय जीवनातील वृत्तिप्रवृत्ती आणि समस्या ह्यांचा वेध घेतला. कलाकारांचे उपेक्षित जीवन, सामाजिक दु:खांच्या मुळाशी असलेली चारित्र्यहीनता, शारीरिक सौंदर्याचे वाढते आकर्षण, शिक्षणक्षेत्रातील वाढता भष्टाचार, अतिमहत्त्वाकांक्षेमुळे होणारा अध:पात असे विषय त्यांनी समर्थपणे हाताळले.
नाट्यलेखनाबरोबरच दिग्दर्शन, सादरीकरण ह्यांच्या संदर्भांतही त्यांनी प्रयोगशील भूमिका निभावली. हिंदीचा स्वतःचा स्वतंत्र रंगमंच निर्माण करण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेत १९५५ ते १९८१ पर्यंत त्यांनी अविरत प्रयत्न केले. रंगमंच निर्मितीची प्रक्रिया हा एक संस्कार असून तो निर्माण करण्यासाठी पिढ्यान् पिढ्यांच्या प्रयासाची आवश्यकता आहे, अशी त्यांची धारणा होती. भोपाळमध्ये असताना तेथील सांस्कृतिक जीवनाचे ते एक अभिन्न अंग बनले होते. तेथील ‘ नाट्यसुधा ’ ह्या प्रयोगशील नाटयसंस्थेशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले होते. शंकर शेष ह्यांची हिंदी ही मातृभाषा असली, तरी मराठीवरही त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. मराठीतील काही नाट्यकृती त्यांनी हिंदीत अनुवादिल्या.
अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी विपुल साहित्य-निर्मिती केली. तीत वीस नाटके, सहा एकांकिका, दोन बालनाट्ये, चार अनुवादित नाटके, तीन कादंबऱ्या, तीन पटकथा ह्यांचा समावेश होतो. तसेच काही प्रबंधही त्यांनी लिहिले. त्यांच्या नाटकांपैकी काही विशेष उल्लेखनीय अशी : नयी सभ्यता के नये नमूने (१९५६), बिन बाती के दीप (१९६८), खजुराहो का शिल्पी (१९७०), एक और द्रोणाचार्य (१९७१), घरौंदा (१९७४), अरे मायावी सरोवर (१९७४), कोमल गांधार (१९७९). त्यांच्या एकांकिकांत त्त्रिभुज का चौथा कोन (१९७१), एक प्याला काफी था (१९७९) आणि अजायब घर (१९८१) ह्यांचा समावेश होतो. त्यांची अनुवादित नाटके : दूर के दीप (१९५९, मूळ नाटक वि. वा. शिरवाडकर ह्यांचे दूरचे दिवे) एक और गार्बो (१९७२, मूळ नाटक महेश एलकुंचवार ह्यांचे गार्बो) चल मेरे कद्दू ठुम्मक ठुम (१९७३, मूळ नाटक अच्युत वझे ह्यांचे चल रे भोपळ्या टुणुक टुणुक) पंचतंत्र (१९८१, मूळ मराठी नाटक पंचतंत्र). कादंबऱ्या : तेंदू के पत्ते (१९५६), चेतना (१९७१), धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे (१९८०, अपूर्ण). घरौंदा आणि दूरियाँ ह्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या तर सोलहवाँ सावन ह्या चित्रपटाच्या पटकथेबरोबर संवादही लिहिले. ह्यांखेरीज छत्तीसगडी भाषा का शास्त्रीय अध्ययन (१९६५) आणि आदिम जाती शब्दसंग्रह एवं भाषाशास्त्रीय अध्ययन (१९६७) हे संशोधनात्मक गंथही त्यांनी लिहिले.
काश्मीरला सुटी घालविण्यासाठी सहपरिवार गेले असता तेथेच त्यांचे आकस्मिक निधन झाले.
संदर्भ : १. गौतम, वीणा गौतम, सुरेश, राजपथ ते जनपथ – नटशिल्पी शंकर शेष, नवी दिल्ली, १९८६.
२. लवटे, सुनीलकुमार, नाटककार शंकर शेष, कोल्हापूर, १९८२.
चव्हाण, गजानन कुलकर्णी, अ. र.