हिंदी भाषा :इंडो-यूरोपियन भाषा कुटुंबातील वइंडो-आर्यन भाषासमूहातील एक भाषा. तिचा उगम संस्कृत भाषेतून झाला.इ. स. पू. १५०० ते इ. स. पू. ५०० या कालखंडात संस्कृत ही लोकव्यवहाराची भाषा झाली. त्यानंतर तिची वैदिक व लौकिक रूपे विकसित झाली. वैदिक भाषेचे रूपांतर ग्रांथिक, साहित्यिक भाषेत झाले, तर लौकिक रूपातून पश्चिमोत्तर, मध्यदेशी व पूर्वी बोली विकसित झाल्या. या बोलींच्या विकासातून ⇨ प्राकृत भाषा उदयास आली. प्राकृत भाषेतून ज्या नऊ क्षेत्रीय भाषा जन्माला आल्या, त्यांपैकी हिंदी ही एक होय.लहंदा, पंजाबी, सिंधी, गुजराती, मराठी, हिंदी, ओडिया, बंगाली, असमिया या त्या नऊ क्षेत्रीय भाषा असून त्या आर्यभाषा म्हणून ओळखल्याजातात. या भाषा विभिन्न अपभ्रंशांचे आधुनिक रूप होय. शौरसेनी अप-भ्रंशाचे विकसित रूप पश्चिमी हिंदीच्या स्वरूपात, तर अर्धमागधी अपभ्रंशाचे स्वरूप पूर्वी हिंदीत आढळते. 

 

हिंदी भाषिकांची लोकसंख्या : भारतात हिमाचल प्रदेश, पंजाबचा काही भाग, केंद्रशासित दिल्ली तसेच हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश आणि बिहार ही हिंदी भाषिक राज्ये म्हणून ओळखली जातात. पंजाब वगळता वरील प्रदेशांची राजभाषा हिंदी आहे. इ. स. २०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येच्या ४१.३% लोक हिंदी भाषिक असून ती संख्या ४९,६१,७९,३०३ इतकी होती. जागतिक लोकसंख्येत हिंदीचा क्रम मँडरीन (चिनी), स्पॅनिश व इंग्रजीनंतर चौथा आहे. भारताशिवाय ती नेपाळ, फिजी बेटे, सूरिनाम, गुयाना, दक्षिण व पूर्व आफ्रिका इ. देशांत बोलली जाते. 

 

उपभाषा व बोली : भारतात बोलल्या जाणाऱ्या हिंदीच्या पाच उपभाषा असून त्या प्रत्येकीत वेगवेगळ्या बोली बोलल्या जातात.त्या पुढीलप्रमाणे : (१) पश्चिमी हिंदी : खडी बोली, ब्रज, बांगरू( हरियाणवी), बुंदेली व कनौजी. (२) पूर्वी हिंदी : अवधी, बघेली, छत्तीसगढी. (३) राजस्थानी हिंदी : मारवाडी, जयपुरी, मेवाती व मालवी. (४) पहाडी हिंदी : कुमाऊ व गढवाली. (५) बिहारी हिंदी : भोजपुरी, मगही व मैथिली . 

 

उगम व विकास : हिंदी शब्द ‘सिंधु’ या संस्कृत शब्दापासून निर्माण झाला. सिंध नदीचा प्रांत सिंधू. इराणी भाषेत ‘स’ चा ‘ह’ होतो. त्यातून हिंद, हिंदू, हिंदी हे शब्द आले. हिंदी भाषेच्या अरबी, फार्सी शब्द-प्राबल्यातून हिंदुई, हिंदुस्तानी, उर्दू इ. हिंदी भाषारूपे तयार झाली. आज हिंदीच्या राजभाषा, संपर्कभाषा, प्रमाणभाषा, राज्यभाषा अशा अनेक भूमिका आहेत. 

 

सुमारे १,००० वर्षांपूर्वी निर्माण झालेली हिंदी भाषा आपल्या प्रारंभिक काळात (आदिकाल – सातव्या शतकाचा मध्य ते चौदाव्या शतकाचामध्य) अपभ्रंश होती. तिच्यावर डिंगल, मैथिली, दक्षिणी, अवधी, ब्रजइ. बोलींचा प्रभाव होता. संस्कृत, प्राकृत व पालीचे व्याकरण हे या काळातील भाषेचा आधार होते. गोरखनाथ, विद्यापती, नरपती नाल्ह, चंद बरदाई, कबीर यांच्या काव्यात या काळातील भाषा आढळते. मध्यकाळात (चौदाव्या शतकाचा मध्य ते एकोणिसाव्या शतकाचा मध्य) हिंदीचेस्वतःचे व्याकरण विकसित झाले. अरबी, फार्सी, पुश्तू (पश्तो), तुर्कीइ. भाषांचे शब्द हिंदीत मोगल साम्राज्यकाळात प्रचलित व समाविष्टझाले, तर दुसरीकडे यूरोपीय देशांच्या संपर्कामुळे पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच, इंग्रजी इ. भाषांचे शब्द अंतर्भूत झाले. भक्तिकाळाच्या प्रभावामुळे हिंदीमध्ये संतकाव्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले. जायसी मलिक मुहंमद, सूरदास, तुलसीदास, कबीर, मीराबाई, केशव बिहारी, भूषण यांच्या काव्यरचनांतून भक्तीबरोबरच काव्यशास्त्र, अलंकार, छंद यांचा विकास झाला. हिंदी गद्याचा प्रारंभही याच काळात झाला. आधुनिक काळात(एकोणिसाव्या शतकाचा मध्य ते आजअखेर २०१५) हिंदी भाषेच्या पद्य शैलीबरोबरच गद्य शैली विकसित होऊन सर्व प्रकारांत साहित्य रचले जाऊ लागले. संपर्कसाधने, माध्यमविकास, संगणक, महाजाल इत्यादींमुळे हिंदी ज्ञानभाषा बनत गेली. 

 

हिंदी मानक वर्णमाला, अंक आणि प्रगत तंत्रज्ञान : भारतीय संघराज्य व घटकराज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच जागतिक संपर्क व पत्रव्यवहार (राजदूतावास, राजशिष्टाचार, विश्वसंघटन इत्यादींमधीलपत्रव्यवहार), कामकाज, टंकन, संगणन, महाजालीय संपर्क, संपर्क-साधने इत्यादींत एकवाक्यता व एकरूपता यावी, म्हणून भारत सरकारचा राजभाषा विभाग, वैज्ञानिक व तांत्रिक शब्दावली आयोग, माध्यमिक व उच्च शिक्षण विभाग, मानव संसाधन विकास मंत्रालय, प्रगत संगणकीय विकास केंद्र (सीडॅक), राष्ट्रीय ज्ञान मंडळ (एन्केसी) अशा विविध विभाग व शाखा यांच्या प्रयत्नांतून राजभाषा हिंदीचा विकास, प्रचार, प्रसार आदी स्वरूपाचे कार्य चालू आहे. टंकन, लेखन, अंक, लिपी, लिप्यंतरण, अनुवाद इत्यादींत एकवाक्यता आणण्यासाठी हिंदीची मानक–वर्तनी (स्पेलिंग), नागरी लिपी, अंक (भारतीय व आंतरराष्ट्रीय) निश्चित करण्यात आले आहेत. यांशिवाय संपर्कसाधन-विकास, तंत्रज्ञान, संगणक, महाजाल क्षेत्रीय विकासार्थ उपग्रहीय संपर्कांचे जाळे, बहुभाषी अनुवाद, लिप्यंतरणसंबंधित मृदुसाधने (सॉफ्टवेअर्स), महाजालीय सुरक्षाव्यवस्था इ. हिंदी भाषाक्षेत्रे विकसित करण्यात आली आहेत. 


 

हिंदी मानक वर्णमाला 

स्वर – अ, आ, इ, ई, उ, ऊ,ऋ, ए, ऐ, ओ, औ.

मात्रा – ा, ि, ी, ु, ू, र्, े, ै, ो, ौ.

अनुस्वार – . (अं).

विसर्ग – : (अः).

अनुनासिक चिन्ह – ँ

व्यंजने – क, ख, ग, घ, ङ

, छ, ज, झ, ञ

, ठ, ड, ढ, ण, ड़, ढ़

, थ, द, ध, न

, फ, ब, भ, म

, र, ल, व, ळ

, ष, स, ह.

संयुक्त व्यंजने – क्ष, त्र, ज्ञ, श्र.

हल् चिन्ह – ड्

गृहित स्वन – ऑ, (ॉ), ख़, ज़, फ़.

देवनागरी हिंदी अंक – १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९,०.

आंतरराष्ट्रीय रूप – 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 

 

वरील सर्व घटकांच्या वापराचे लिपी व अंकविषयक व्याकरणीय, गणिती नियम निश्चित करण्यात आले आहेत.

 

हिंदी व्याकरण : हिंदी भाषेचे स्वतःचे व्याकरणनियम असून ते संस्कृत, प्राकृत, अरबी, फार्सी, पाली या मूळ भाषिक व्याकरण-प्रभावांशी सुसंगत असले, तरी त्यात कालसंगत असे बदल, सुधारणा वेळोवेळी होत आल्या आहेत. त्यामुळे हिंदी व्याकरणात वर्णविचार, उच्चारण, लेखननियम, शब्दविचार, शब्द-विकार, अव्यय, रूपांतर, व्युत्पत्ती, वाक्यरचना, वाक्य-पृथक्करण, विरामचिन्हे इ. बाबींचा सविस्तर विचार करण्यात आला आहे. 

 

घटनात्मक राजभाषा हिंदी : भारत स्वतंत्र झाल्यानंतर घटना परिषदेने १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीस राजभाषा म्हणून मान्यता दिली. त्यामुळे तो दिवस भारतभर ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय घटनेच्या कलम ३४३ (१) प्रमाणे देवनागरी लिपीत लिहिल्याजाणाऱ्या हिंदी भाषेस राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. १९६३ मध्ये राजभाषा अधिनियम मंजूर झाला. त्यानुसार भारतीय संघराज्य, संसद यांची कामकाजाची भाषा म्हणून हिंदीला इंग्रजी-बरोबर मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारचा पत्रव्यवहार, संकल्प, नियम, अधिसूचना, अहवाल, निविदा, आदेश इ. हिंदी भाषेत प्रकाशित करणे अनिवार्य आहे. भारतीय संघराज्य-संलग्नित राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांचे तेथील भाषिक स्थितीच्या आधारे क, ख, ग श्रेणीचे प्रवर्ग करण्यात आले असून, त्या स्वरूपाधारे केंद्र व राज्य सरकारच्या पत्रव्यवहार-संपर्काचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार हिंदी राजभाषा-व्यवहाराची निश्चिती करण्यात आली आहे. राजदूतावास, राष्ट्रीय मंडळे, प्राधिकरण, आयोग, बँक, विमा इ. राष्ट्रीय अधिकारिणीच्या कामकाजात वरीलप्रमाणे राजभाषा हिंदीचा वापर अनिवार्य आहे. यासाठी गृह मंत्रालयांतर्गत राज्यभाषा विभाग स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आला आहे. 

 

विश्वभाषा हिंदी : भारत सरकारच्या राजभाषा विभागांतर्गत केंद्रीय हिंदी संचालनालयामार्फत (निदेशालय) हिंदीच्या आंतर्देशीय प्रचार--प्रसारार्थ अनेकविध उपक्रम – उदा., प्रकाशन, अनुवाद, पुरस्कार, अनुदान, लेखक-शिबिरे, अभ्यास-सहली इ. उपक्रम व योजना – राबविले जातात. त्याचबरोबर या विभागामार्फत परदेशांतही हिंदी प्रचार-प्रसाराचे प्रयत्न केले जातात. आफ्रिका, आशिया, अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया खंडांतर्गत देशांतील अनेक विद्यापीठांतून हिंदीचे अध्ययन-अध्यापन होत आहे. तेथील विद्यार्थिसंख्याही मोठी आहे. हिंदीच्या जागतिक प्रचार--प्रसारासाठी विश्व हिंदी संमेलने जगातील विविध देशांत योजली जातात. १९७५ पासून भारताशिवाय मॉरिशस, त्रिनिदाद व टोबॅगो, इंग्लंड, सूरिनाम, अमेरिका, दक्षिण आफ्रिका येथे अशी संमेलने संपन्न झाली असून, त्यामुळे हिंदी विश्वभाषा होण्यास साहाय्य झाले आहे. भारत सरकारमार्फत महाराष्ट्रात वर्धा येथे केंद्रीय दर्जाचे ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ’ स्थापन करण्यात आले आहे. 

 

वेब हिंदी : एकविसावे शतक हे ज्ञानभाषेचे तसेच संगणक व संपर्क माहिती-तंत्रज्ञानाचे मानले जाते. या अनुषंगाने हिंदी भाषेचा विकास झाला असून महाजालकावर हिंदी भाषा व साहित्याची सु. तीन हजार संकेतस्थळे (वेबसाइट्स) उपलब्ध आहेत. ‘गुगल’ या शोधवाहिनीवरील सर्व माहिती क्षणार्धात हिंदीत भाषांतरित होऊन मिळते. हिंदी संकेत-स्थळांचे संग्रहण, नियंत्रण करणारी अनेक हिंदी महाजाली-केंद्रे (पोर्टल्स) उपलब्ध असून त्यांच्याद्वारे हिंदी बातम्या, नियतकालिके (दैनिके, साप्ताहिके, मासिके इ.), शिक्षण, संदर्भ, व्यापार, विविध सरकारी आस्थापना विभाग, विद्यापीठे, खेळ, ज्योतिष, मनोरंजन, धर्म, विज्ञान, अभियांत्रिकी इ. क्षेत्रांची हिंदीत माहिती देणारी संकेतस्थळे सक्रिय आहेत. शिवाय हिंदी भाषेच्या दैनंदिन वापरासाठी शब्दकोश, शब्दांची शुद्ध रूपे(वर्तनी-स्पेलिंग), त्यांची दुरुस्ती, विविध मुद्राक्षरे (फाँट्स), मुद्राक्षर परिवर्तक, लिपी परिवर्तक, भाषांतर, संपादन, मौखिक सामग्रीचे लिखित रूपांतर, लिखितांचे मौखिक सामग्रीत लिखित रूपांतर, लिखितांचे मौखिक उच्चारण अशी विविध सक्रिय व स्थिर (ऑनलाइन व ऑफलाइन) आंतरजालीय संसाधने उपलब्ध असून त्यांच्यामुळे हिंदी अन्य जागतिक भाषांइतकीच समृद्ध झाली आहे. 

 

प्रसारमाध्यमांतील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक अशा दोन्ही क्षेत्रांत हिंदीई-आवृत्त्या नियमित प्रकाशित होत असतात. दृक्-श्राव्य क्षेत्रात चित्रपट, ध्वनिफिती, ध्वनिचित्रफिती हिंदीत उपलब्ध असून, भ्रमणध्वनीवरीलसर्व सुविधा हिंदीत उपलब्ध आहेत. ‘अँड्रॉइड्स’ही आता हिंदीत उपलब्ध आहेत. संगणक, लॅपटॉप, पामटॉप, एल्सीडी, एल्डीपी साधने व त्यांतील विविध हिंदी सुविधा (दृक्, वाच्य, श्राव्य, चल, अचल, आलेखन, व्यंग्यचित्रे, त्रिमिती, चौमिती इ.) उपलब्ध आहेत. हिंदी साहित्य प्रकाशित करणारी ई-बुक्स, ई-जर्नल्स नियमित वाचणे शक्य झाले असून त्यासाठी ‘ई-बुक रीडर्स’, ‘किंडल्स’ मिळतात. त्यांत आता लिप्यंतरण सुविधा उपलब्ध झाल्याने जगातील कोणत्याही भाषेतील व लिपीतील साहित्य हिंदीत भाषांतर, लिप्यंतरण करून वाचणे, ऐकणे, पाहणे, लिहिणे, त्याची मुद्रणप्रत घेणे शक्य झाले आहे. आंतरजालीय संपर्कातून नियमित लेखन, संवाद, संपर्क साधणाऱ्या तांत्रिक सुविधांमुळे (फेसबुक, ब्लॉग, ट्विटर वॉट्सॲप इ.) हिंदीत सामाजिक संपर्ककक्षा नित्य नेमाने रुंदावत आहेत. हिंदी वेबसाहित्य-प्रकाशनाचे प्रमाण वाढले असून त्यावर संशोधन, समीक्षा, प्रबंधलेखनही होत आहे. 

 

दृक्-श्राव्य हिंदी : हिंदी चित्रपटांच्या जागतिक प्रदर्शन-प्रसारणास एक नवे परिमाण प्राप्त झाले आहे. जगातल्या सर्व देशांत ध्वनिमुद्रित झालेले विविधभाषी चित्रपट हिंदीत उपलब्ध झाल्याने हिंदीचा आंतरराष्ट्रीय श्रोता व प्रेक्षकवर्ग वृद्धिंगत होण्यास साहाय्य झाले आहे. त्यामुळे हिंदी भाषिकांची संख्या वाढते आहे. तीच बाब दूरदर्शन वाहिन्यांची. ‘हिस्ट्री, ‘नॅशनल जिऑग्रफी, ‘ॲनिमल प्लॅनेट’ यांसारख्या वाहिन्या इतिहास, संस्कृती, पर्यावरण, पर्यटन इ. विषयांवर हिंदीतून चित्रपट, माहितीपट, लघुपट नियमितपणे प्रदर्शित करीत असल्याने हिंदीच्या विश्वभाषा व ज्ञानभाषा या रूपांना नवे पैलू लाभत आहेत. ‘कार्टून नेटवर्क, ‘हंगामा, ‘पोगो’ यांसारख्या वाहिन्यांमुळे जगभरची बालपिढी शाळेत जाण्यापूर्वीच हिंदी बोलू लागली आहे. 

 

संदर्भ : १. गुरू, कामताप्रसाद, हिंदी व्याकरण, वाराणसी, १९७५.

           २. तिवारी, भोलानाथ, हिंदी भाषा, इलाहाबाद, १९७३.

           ३. नगेंद्र हरदयाल, हिंदी साहित्य का इतिहास, नोएडा, २०१२.

          ४. लवटे, सुनीलकुमार, हिंदी वेब साहित्य, नवी दिल्ली, २०१३

लवटे, सुनीलकुमार