नीतिशतक : एक संस्कृत काव्य. कर्ता ⇨ भर्तृहरि. तत्त्वदर्शी आणि नीतिबोधपर असे शंभर श्लोक ह्या काव्यात अंतर्भूत आहेत. नीतिशतकाचा काळ निश्चितपणे सांगता येणार नाही, कारण भर्तृहरीचाच काळ निश्चितपणे ठरविता येत नाही.

नीतिशतकातील शंभर श्लोकांचे, विषयानुसार दहादहा श्लोकांचा एक गट ह्याप्रमाणे कवीने एकूण दहा गट पाडलेले आहेत. अशा गटाला ‘पद्धती’ असे नाव दिलेले आहे. अज्ञ, विद्वस्, मानशौर्य, अर्थ, दुर्जन, सुजन, परोपकार, धैर्य, दैव आणि कर्म ह्या विषयांशी नीतिशतकातील दहा पद्धती संबद्ध आहेत. असे असले, तरी ह्या काव्यातील प्रत्येक श्लोक आपल्यापरीने स्वयंपूर्णच आहे. ‘मुक्तक’ ह्या नावाने ओळखली जाणारी, एकश्लोकी, स्वतंत्र, स्वयंपूर्ण रचनेची परंपरा संस्कृतात आहे. रचनाबंधाच्या दृष्टीने भर्तृहरीचे हे शंभर श्लोक म्हणजे मुक्तकेच होत.

नीतिशतकाचा उद्देश उद्‌बोधनाचा असल्यामुळे त्याचा कल वैचारिकतेकडे आहे. जीवन डोळसपणे जगण्याच्या जाणिवेतून कवीने केलेले सूक्ष्म, व्यापक अवलोकन आणि त्यामुळे त्याच्या विचारांना आलेला ठामपणा, नीतिशतकात दिसून येतोच. तथापि भर्तृहरीचे तरल, संवेदनशील कविमन आणि त्याचे समृद्ध भावविश्वही त्यात प्रकटलेले दिसते.

जीवनाची वाटचाल मनुष्याला स्वप्रयत्नांनी आणि एकट्याने करावयाची असते हे खरे परंतु जीवन जगत असता मनुष्य एकटा नसतो. आप्त, मित्र, मतलबी, धूर्त, शत्रू, अज्ञ, शहाणे, धनिक, सत्ताधारी अशा विविधपरींच्या लोकांचे कडे त्याच्याभोवती असते. प्रत्येकाचे स्वभाव, विचार, आचरण निराळे. ह्या तिहींतही परस्परभिन्नता. विचार, उच्चार आणि आचार यांची एकवाक्यता फक्त सज्जनांमध्ये असते. मनुष्याला तात्त्विक शहाणपण शिकण्याची आवश्यकता सदैव आहे. म्हणूनच भर्तृहरी अज्ञ–विद्वान, दुर्जन–सुजन, दैव–कर्म अशा विरोधी जोड्या उभ्या करून त्यांचे स्वरूप, गुणावगुण, आचरण पद्धती यांवर मार्मिक प्रकाश टाकताना दिसतो. सज्जनांचे कमलासारखे मृदू मन, संकटात पर्वतासारखे खंबीर राहण्याची त्यांची शक्ती, वाणीची मधुरता, परोपकाराला वाहिलेले जीवन या गोष्टी तत्त्व म्हणून कळत असल्या, तरी अंगी वळत नाहीत पण अज्ञानाचे रूप कळले म्हणजे ज्ञानाचा प्रकाश उमलू लागतो. दुर्जनांचे देखणे बहिरंग व विषतुल्य अंतरंग कळले म्हणजे सज्जनांची थोरवी कळते. सत्ता आणि संपत्तीचा मोह माणसाला पडतो. कांचनापुढे जग लोटांगण घालते. धनिकाची खुशामत करण्यासाठी माणूस श्वानलीला करतो. अंधदृष्टीच्या माणसाला जीवनाची मूल्ये नीट कळावी लागतात, म्हणजे मग तो नीतीकडे वळू लागतो. या दृष्टीने माणूस, पिता, पुत्र, कलत्र, मित्र यांच्या अंतरंगावर भर्तृहरीने प्रकाश टाकला आहे. केव्हा ‘तृष्णां छिन्धि, भज क्षमां, जहि मदं, पापे रतिं मा कृथाः ।’ असा रोखठोक उपदेशही केला आहे. जीवनाची उन्नती प्रयत्नाधीन आहे. दैव अटळ आहे हे खरे पण त्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही, हे लक्षात घेऊन प्रयत्नांची कास धरण्याची, धैर्याने जीवन जगण्याची महती कवीने स्पष्ट शब्दांमध्ये वर्णिली आहे व हे करताना अमृतप्राप्तीसाठी प्रचंड परिश्रम करणाऱ्या देवांचा दाखला जसा दिला आहे, तसेच निंदा–प्रशंसा, संपत्ती–दारिद्र्य, जीवन–मरण यांची पर्वा न करता निश्चयी धीराचे पुरुष न्याय्य मार्गावरून रेसभरही ढळत नाहीत, हे अनुभविक बोलही ऐकविले आहेत. नीतिशतकातील उपदेशाचे रूप असे माणसाला धीर देणारे, ऐहिक कल्याणाचा आणि पारमार्थिक श्रेयाचा मार्ग दाखविणारे आहे. जीवनातील स्वार्थ, दुष्टता, मनाचा कोतेपणा इत्यादींनी भर्तृहरीचा भ्रमनिरास झालेला असला, तरी तो जीवनद्वेष्टा नाही, तर अनुभवांनी शहाणा झालेला आहे व आपल्याला गवसलेले हे शहाणपण मनुष्यमात्रापुढे मांडण्याची त्याला तळमळ आहे. म्हणूनच नीतिशतक हे केवळ बोधपर काव्य होत नाही. भर्तृहरीच्या अंतर्मनातील भावव्यथा त्यात प्रकट झालेली आहे. सामान्यपणे हे खरे की, जाणते हेवामत्सराने जळत असतात सत्ताधारी गर्वाने पछाडलेले असतात सामान्य माणसे अज्ञानाने मरगळलेली असतात. अशा परिस्थितीत तत्त्वदर्शी माणसाचे शहाणपण त्याच्या अंगातच जिरून-सुकून जाण्याची वेळ येते. असे असूनही भर्तृहरीची तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नाही. ही आंतरिक तळमळ भर्तृहरीच्या काव्याचा थोर विशेष आहे.

विविध वृत्तांची सफाईदार रचना, भाषेचा प्रसंगोपात्त सामासिक डौल, अन्यत्र अतीव साधेपणा हे भर्तृहरीचे ठळक विशेष. खूपसा मोठा विचार छोट्या वाक्यखंडात वा आटोपशीर पद्यपंक्तीत व्यक्त करण्याची संस्कृत भाषेची जी शक्ती आहे, तिने कीथसारखे पाश्चात्य समीक्षकही हरखून गेले आहेत परंतु भर्तृहरीचा विलक्षण प्रसाद, परखड विचार मोजक्या शब्दांत प्रकट करण्याची त्याची शक्ती, त्याची अनुभवसंपन्नता आणि आंतरिक तळमळ हे गुण त्याचेच होत. त्याचे काव्य विचारशील कविमनाचे एक प्रसन्न दर्शन आहे. भर्तृहरी हा यूरोपमध्ये ख्याती पावलेला बहुधा पहिला संस्कृत कवी असावा. नीतिशतकातील श्लोकांचे डच आणि जर्मन भाषांत अनुवाद झालेले आहेत. मराठीतही ह्या काव्याचे अनेक अनुवाद झालेले आहेत.

संदर्भ : 1. Dasgupta, S. M. De, S. K. A History of Sanskrit Literature (Classical Period), Calcutta, 1947.

   2. Keith, A. B. A History of Classical Sanskrit Literature, Oxford, 1928.

   ३. गद्रे, रा. ना. भर्तृहरिविरचित नीतिशतक, पुणे, १९६१ १९६४.

भट, गो. के.