अप्पय्य दीक्षित : (१५५४—१६२६). एक संस्कृत ग्रंथकार व महापंडित. मद्रासमधील अडैयपालम येथे तो जन्मला. त्याच्या कालाविषयी वाद असला, तरी वर दिलेला काल सर्वसाधारणत: मान्य केला जातो. तो तमिळ ब्राह्मण होता. अप्पदीक्षित, अप्पयदीक्षित आणि अप्पय्यदीक्षित अशीही त्याची नावे आढळतात. चित्रमीमांसा  ह्या त्याच्या ग्रंथातील उल्लेख पाहता, त्याचा पूर्वज वक्ष:स्थलाचार्य नामक कोणी होता, असे दिसते. काहींच्या मते आचार्य किंवा आच्चान् दीक्षित या त्याच्या आजालाच वक्ष:स्थलाचार्य असे म्हणत. अप्पय्य दीक्षिताच्या पित्याचे नाव रंगराज असे होते. अप्पय्य दीक्षित हा शैवपंथी होता. तो श्रीकंठाचार्यांच्या शैव विशिष्टाद्वैत मताचा होता परंतु शांकराद्वैत हे अंतिम होय, विशिष्टाद्वैतविचार हा केवलाद्वैत मताकडे जाण्याची अलीकडचा पायरी, असे त्याचे मत होते. विजयानगरचा पहिला वेंकटपती (१५८६–१६१३) आणि वेल्लोरचा चिन्नबोम्म (१५४९–६६) हे त्याचे आश्रयदाते राजे होत. व्याकरण, मीमांसा, वेदान्त, साहित्यशास्त्र इ. विषयां- वर त्याने शंभरापेक्षा अधिक ग्रंथ लिहिले, असे सांगितले जाते. कुवलयानंदचित्रमीमांसा  आणि वृत्तिवार्तिक (अपूर्ण) हे त्याचे साहित्यशास्त्रावरील तीन ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. कुवलयानंद  हा ग्रंथ जयदेवाच्या चंद्रालोकावर आधारलेला असून त्यात १२४ अलंकारांची चर्चा आहे. महामहोपाध्याय पां. वा. काणे ह्यांच्या मते ही संख्या ११५ आहे. चित्रमीमांसेत ध्वनी, गुणिभूतव्यंग्य आणि चित्र असे काव्याचे विभाग करून काव्यासंबंधीचे शास्त्रीय विवेचन त्याने केले आहे. वृत्तिवार्तिक (अपूर्ण) मध्ये शब्दांच्या अभिधा व लक्षणा या शक्तींचे विवेचन आहे, ध्वनीचे नाही. ब्रह्मसूत्र शांकरभाष्याच्या भामती  टीकेवरील अमलानंदाच्या कल्पतरू  नामक टीकेवर परिमल  नामक त्याची टीका प्रसिद्ध आहे. शिवार्कमणिदीपिका  किंवा  शिवादित्यमणिदीपिका  ही   ब्रह्मसूत्रावरील शैव विशिष्टाद्वैतमताच्या श्रीकंठभाष्यावरील टीका होय. न्यायरक्षामणि  ही  ब्रह्मसूत्रावरील त्याची अद्वैतपर  टीका. सिद्धांतलेशसंग्रह  हा त्याचा शांकराद्वैतीवरील ग्रंथ. त्याचा विधिरसायन  हा प्रसिद्ध ग्रंथ पूर्वमीमांसाविषयक आहे. यांशिवाय शिवतत्वविवेक, शिवाद्वैतनिर्णयवादनक्षत्रमाला, उपक्रमपराक्रम, मध्यमुखमर्दन इ. ग्रंथ त्याने लिहिले आहेत. ⇨जगन्नाथपंडित  हा अप्पय्य दीक्षिताच्या साहित्यशास्त्रविषयक विचारांचे खंडन करणारा विख्यात ग्रंथकार होय.

संदर्भ:Kane, P. V. History of Sanskrit Poetics, Delhi, 1961.

जोशी, लक्ष्मणशास्त्री