प्रबोधचंद्रोदय :संस्कृत भाषेतील एक प्रसिद्ध रूपकनाट्य. ह्याचा कर्ता कृष्णमिश्र. चंदेल्ल वंशातील राजा कीर्तिवर्मा किंवा कीर्तिवर्मदेव ह्याने कोणा गोपालाच्या साहाय्याने, चेदी राजा कर्ण ह्याचा पाडाव करून आपले गेलेले राज्य १०४२ मध्ये परत मिळविले. हा विजय साजरा करण्यासाठी गोपालाच्या आज्ञेवरून कृष्णमिश्राने प्रस्तुत नाटक रचले, असे नाटकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. ‘राजाचा सहजसुहृद’ म्हणून गोपालाचा उल्लेख नाटकात आलेला आहे त्यावरून तो क्षत्रिय राजा वाटतो. नाटकाच्या एका संस्कृत टीकाकाराने तो ब्राह्मण असून राजाचा सेनापती होता, असे म्हटले आहे. प्रबोधचंद्रोदयाच्या रचनेबाबत प्रचलित आख्यायिका मात्र वेगळेच काही सांगते : कृष्णमिश्र हा हंस पंथीय संन्यासी होता. तो अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण देत असे. त्याचा एक शिष्य तत्त्वज्ञानाचा उपहास करून नाटके आणि शृंगारिक साहित्य ह्यांत विशेष रस घेऊ लागला. ह्या शिष्याच्या भरकटलेल्या मनाला आवर घालण्यासाठी कृष्णमिश्राने हे नाटक रचिले. १०४२ च्या महोबा शिलालेखात, त्रिपुरीचा चेदी राजा कर्ण ह्याच्यावर कीर्तिवर्म्याने मिळविलेल्या विजयाची नोंद आहे. ह्याच कीर्तिवर्म्याचा देवगडचा शिलालेख १०९८ चा आहे. त्यावरून अकराव्या शतकाचा द्वितीय अर्ध हा ह्या नाटकाच्या रचनेचा काळ दिसतो.

‘ज्ञानरूपी चंद्राचा उदय’ हा ह्या नाटकाच्या शीर्षकाचा अर्थ, अर्थात, हे ज्ञान म्हणजे परमार्थज्ञान होय. नाटकाचे सहा अंक असूनत्यात प्रवृत्ती, निवृत्ती, मोह, विवेक अशा अमूर्त संकल्पना व्यक्तिरेखांच्या रूपाने साकार केल्या आहेत. नाटकाची कथावस्तू थोडक्यात अशी : शिव-मायेच्या समागमातून ‘मनस्’ नावाचा पुत्र जन्मतो. मनस् राजा होतो. प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या त्याच्या दोन राण्या. त्यांच्यापासून त्याला मोह आणि विवेक असे दोन पुत्र होतात. ह्या दोन पुत्रांत द्वंद्व चालू असते. काम, रती, क्रोध, दंभ, दंभाचे आजोबा अहंकार इ. मोहाचे साथीदार आहेत तर मती, धर्म, करुणा, मैत्री, शांती, शांतीची आई श्रद्धा, क्षमा, संतोष, भक्ती हे विवेकाला साह्य करीत आहेत. विवेकाचा उपनिषदनामक स्त्रीशी विवाह झाल्यास तिच्या पोटी प्रबोध हा पुत्र आणि विद्यानामक कन्या जन्मास येतील आणि ती दोघे मोहाचा पराजय करतील अशी भविष्यवाणी आहे. नाटकाच्या अखेरीस ही भविष्यवाणी खरी होते. ह्या नाटकाच्या उपकथानकात शांती आणि श्रद्धा आहेत. मोहाचे साथीदार श्रद्धेला पळवून नेऊन लपवून ठेवतात. शांती तिच्या शोधात भटकू लागते. जैन, बौद्ध, कापालिक इ. धर्म-पंथांकडे ती जेव्हा शोध घेते, तेव्हा त्या त्या धर्माच्या वा पंथाच्या पत्नी आपणच श्रद्धा असल्याचे भासवितात तथापि शांतीला हा बनाव पटत नाही. शेवटी खरी श्रद्धा विष्णुभक्तीपाशी सापडते.

शांतरसाचा प्रयोग म्हणून ह्या नाटकाची निर्मिती झाल्याचे नाटकीय प्रस्तावनेत म्हटले आहे. तथापि कथानकाच्या मांडणीत शृंगार आणि हास्य हे रस आणि भक्ती हा भाव खेळविण्यात आला आहे. दंभ आणि अहंकार ह्यांच्या संवादांतून, तसेच इतर धर्मपंथीयांचे वादविवाद, ढोंग, उद्धटपणा ह्यांतून चुरचुरीत टीकेचे आणि परिहासाचे उद्दिष्ट साधलेले आहे. नाट्योपयोगी घटना, व्यक्तिरेखन, काव्यमय भाषा, पद्ये अशी सामग्री कृष्णमिश्राने खूपशा कौशल्याने योजिलेली आहे. त्यामुळे रचनेचा एकंदर घाट नाट्यबंधाला अनुकूल असाच आहे. तरीही तीन नाट्यापेक्षा तत्त्वावबोधाचे महत्त्व अधिक आहे, हे विसरता येत नाही. अद्वैत वेदान्त आणि विष्णुभक्ती ह्यांचा मनोरम मेळ घालण्याचा प्रयत्‍न त्यात आहे. नाटकाचा प्रतीकार्थ लक्षात घेतला, तर ‘पुरुष’ हाच ह्या नाटकाचा खरा नायक ठरतो. पुरुष मोहात गुंतला, की स्वरूपाच्या ज्ञानाला वंचित होतो. विवेकाने मोहाचा पराजय केला, म्हणजेच पुरुषाला शाश्वत ज्ञान होते. उपनिषदांचे अध्ययन करून विष्णुभक्तीचा आसरा घेतला म्हणजे प्रबोधरूपी चंद्राचा उदय होतो.

अशा प्रतीक-नाटकांच्या रचनेत कलादृष्ट्या काही धोके संभवतात. तत्त्वविचाराच्या प्राधान्यामुळे नाट्यघटक केवळ साधनरूप होण्याची शक्यता असते. अमूर्त कल्पनांना व्यक्तिरूप देताना तत्त्वाला गौणत्व येण्याची किंवा व्यक्तिरेखेची पृथगात्मता हरवून जाण्याची शक्यता असते. कृष्णमिश्र मात्र हे धोके टाळण्यात बराच यशस्वी झाला आहे.

संत तुलसीदास हे ह्या नाटकाने प्रभावित झाल्याचे सांगितले जाते.

ह्या नाटकाचा मराठी अनुवाद स. ब. अमरापूरकर, प्रल्हादमहाराज बडोदेकर आणि गो. वि. सावंत ह्यांनी अनुक्रमे १८५१, १९१६ आणि १९२४ मध्ये केला आहे. जर्मन, फ्रेंच, इंग्रजी भाषांतूनही त्याचे अनुवाद झालेले आहेत. अलीकडे डॉ. सीताकृष्ण नंबिआर ह्यांनी ह्या नाटकाची संस्कृत संहिता, इंग्रजी प्रस्तावना व अनुवाद ह्यांसह प्रसिद्ध केली आहे. (१९७१).

  

भट, गो. के.